in

एअर इंडिया फ्लाइट क्रॅश – वेटिंग फॉर फायनल कॉल..

प्रतिकात्मक फोटो 


सर्वात वाईट असतं निरोप न घेता कायमचं निघून जाणं…

कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येताहेत. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील 88 वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.

एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो.
संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.

जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!

मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.

कालच्या विमान अपघातात मरण पावलेले पायलट सुमित सभरवाल येत्या काही महिन्यात ते एअर इंडिया मधली पायलटची नोकरी सोडून आपला सर्व वेळ वडिलांना आणि कुटुंबाला देणार होते. तसे त्यांनी मित्रांना व विमान कंपनीलाही कळवले होते.

काल टेकऑफ करण्याआधी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितले होते की लंडनला पोहोचताच कॉल करेन.
त्या वृद्ध पित्याला मुलाचा पोहोचल्याचा फोन आला नाही मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळली. काय वाटले असेल त्यांना?

ते नियतीला नक्की सवाल करत असतील की, ‘मी आजारी असताना मला नेले नाही आणि जो कुटुंबाचा कर्ता होता त्याला नेलेस! असे का केले?’ खरेतर याचे उत्तर कुणापाशीच नाही.

मुलगा कायमचा निघून गेला असला तरीही त्याच्या फोन कॉलची त्यांना कायमच प्रतीक्षा राहील. काहींनी विमानात बसल्यावर सेल्फी टाकले. काहींचे विमान चुकले तर कुणी विमानातून उतरले. हे सर्व प्रारब्ध आहे वगैरे म्हणून आपण बाजूला होऊन विसरून जातो.
मात्र वास्तवात या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी आपण करत नाही. असो.

या विमानातील जवळपास प्रत्येक प्रवाशाची सुमित सभरवाल यांच्यासारखीच दास्तान असेल. 
काही दिवसांतच आपण ही संपूर्ण घटनाच विसरून जाऊ, मात्र ज्यांनी आपली आवडती माणसे गमावलीत त्यांचा काळडंख भरून येणार नाही.


त्याही पलीकडे जाऊन जे डॉक्टर्स यात हकनाक मरण पावले त्यांच्याविषयी सर्वाच्याच मनात अपार कणव आहे. किती स्वप्ने पाहिली असतील त्यांनी! त्यांना इथेपर्यंत पोहोचता यावे म्हणून त्यांच्या आईवडिलांनी किती खस्ता खाल्ल्या असतील! निमिषार्धात होत्याचे नव्हते झाल्याने त्यांना किती मोठा धक्का बसला असेल!

काही वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चांमध्ये तज्ज्ञ सांगत होते की, विमान कोसळणार हे सभरवाल यांना लक्षात आल्यावर त्यांनी दोन वेळा ते राईझ करण्याचा प्रयत्न करून काहीशे मीटर अंतर ते पुढे नेले आणि जिथे दाट लोकवस्ती नव्हती तिथे ते कोसळू दिले. विमान कोसळण्यापूर्वीच्या शेवटच्या काही सेकंदाच्या क्लिपमध्ये हे प्रकर्षाने जाणवते.

ज्या भागावरून विमान उडत होते तो दाट लोकवस्तीचा भाग होता. त्यामुळे मार्गात येणाऱ्या उंच आणि तुलनेने कमी लोकवस्ती असणाऱ्या इमारतीचा त्यांनी काही सेकंदात वेध घेऊन विमान तिथेपर्यंत नेले आणि मग ते जागेवरच खाली कोसळले.

असे झाले नसते आणि विमान नागरी वस्तीत पडले असते तर बळींची संख्या मोठया प्रमाणात वाढली असती. अर्थात याची पुष्टी तपासातच होईल तोवर ही सगळे गृहीतके असतील. सभरवाल यांनी हे जिवाच्या आकांताने साध्य केले असेल तर हजारो प्राण वाचवल्यासाठी समाज त्यांच्या ऋणात राहील.

सारे जिकडे तिकडे पांगतील, चर्चेचा धुरळा खाली बसेल आणि अखेरच्या सफरीवर गेलेल्या दुर्दैवी जिवांचे व्याकुळ आप्तजन आजन्म त्यांच्या प्रतिक्षेत राहतील. सुमित सभरवाल यांचे वडील नियतीचा फायनल कॉल येईपर्यंत मुलाच्या लंडनला फ्लाइट लँड झालेल्या कॉलची वाट पाहत राहतील..

मागे राहिलेल्या लोकांसाठी अंतिम विदाईचा निरोप अनमोल असतो..


– समीर गायकवाड 

_____________________________________________

काही नोंदी – मागील काही दिवसात घडलेल्या घटनांपैकी बंगलोरमधील रस्त्यावर झालेली चेंगराचेंगरी असो वा मुंबईत लोकलमधून पडून निधन पावलेले लोक असोत वा कालच्या घटनेतील मोठ्या संख्येने बळी पडलेले लोक असोत, आपल्याला हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. आपण याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, यासाठी खालपासून वरपर्यंत जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आपल्याला वाटत नाही. आपण निव्वळ शोक व्यक्त करतो, चडफड मांडतो आणि पुढच्या दुर्घटनेकडे वळतो.

अशा घटना जेव्हा कधी घडतात तेव्हा त्याची जबाबदारी कुणी घेत नाही आणि आपणही त्यासाठी कुणाला दोषी ठरवत नाही. 300 मृत व्यक्तींच्या नातलगांना 300 कोटी दिले जाणार हे आपण मिरवतो मात्र विमान कंपनीने असे शेकडो कोटी खर्ची घालून बिनचूक आणि तंत्रशुद्ध कामगिरी करत चोख सेवा द्यावी असे आपण म्हणत नाही. वास्तवात हे त्या विमान कंपनीचे आद्य कर्तव्य असते मात्र एखादी गोष्ट लार्जर देन लाईफ ठरवली की तिला दोषी ठरवणे कठीण जाते.

जेव्हाही अशा दुर्घटना घडतात तेव्हा काही लोक समोर येतात आणि यासाठी सरकारला दोषी धरू नका म्हणतात, राजकारण करू नका म्हणतात मात्र यातल्याच बऱ्याच लोकांनी दशकापूर्वी बारीक सारीक गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरलेले असते, राजकारण केलेले असते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला असतो. अशा घटनांचे राजकारण केले जाऊ नये हे आपले मत सर्वकालिन सारखेच असले पाहिजे आणि सर्व शासकांच्या बाबतीत आपली भूमिका समान असली पाहिजे. घटनेची अश्रूधूळही खाली बसलेली नसते आणि आपल्याकडे डिजिटल लिंचिंगचे टोळीयुद्ध सुरू झालेले असते.

मुळात आपला लोचा झालाय, आपल्याला समस्या टाळायच्या नसून समस्येवर तोडगे न काढता केवळ व्यक्त व्हायचेय. दोषनिश्चितीमधून काहींना वाचवण्याची ही खटपट आपल्यापैकी कुणाच्याही जिवावर आली तरी फरक पडणार नाही कारण तेव्हाही दोषी मंडळींच्या बाचावसाठी कुणी ना कुणी सरसावले असेलच! हे किळसवाणे सत्यही आपल्या अंगवळणी पडले आहे. काळ बदलला की बचावकर्ते नि आरोपकर्ते बदललेले असतात, त्यांच्या भूमिकांची अदलाबदल झालेली असते.

Read More 

What do you think?

32 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कलावंतांच्या गहिऱ्या प्रेमाचे सच्चे उदाहरण!

त्या एका (च) घरात? (with English subtitles)