in

उदयगिरी … एक स्वप्नपूर्ती

आज भारताची शान असलेल्या, आत्मनिर्भर भारताचे प्रतीक ठरलेल्या विशाल अशा दोन भारतीय युद्धनौका ‘आय एन एस उदयगिरी’ आणि ‘आय एन एस हिमगिरी’ दिमाखात समोर उभ्या , डावीकडे पांढऱ्या शुभ्र गणवेषांमध्ये अतिशय शिस्तीमध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या स्वागतास सज्ज असलेले ५० नौसैनिक, दोन्ही युद्धनौकांचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन, आसपास खूप काही सुरु होते पण सर्व अगदी शांतपणे आणि सुव्यवस्थेत… हे असे दृश्य माझ्यासारख्या सामान्य नागरिकासाठी स्वप्नवतच होते. पण आज मी तिथे उपस्थित होते भारतीय नौसेना पोत उदयगिरी आणि हिमगिरी या युद्धनौकांच्या प्रवर्तिकरण समारोहासाठी एक अतिथी म्हणून. खरं सांगते तिथे पाऊल ठेवणे हेच खूप अभिमानास्पद वाटत होते. लहानपणापासून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना फक्त गोष्टींमध्ये, वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर पाहिले होते. आज आसपास त्यांच्यामध्ये वावरणे आणि ते आपल्याशी बोलत आहेत , आपले कौतुक करत आहेत , युध्दनौकेमध्ये आतपर्यंत जाण्याची संधी, देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेली भेट हे असे क्षण आयुष्यात आले यावर विश्वासच बसत नव्हता. आणि या सर्वांचे श्रेय जाते माझ्यातील कलेला, या कलेला योग्य वेळी योग्य प्रकारे खत पाणी घालून फुलवणाऱ्या माझ्या ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ या सुलेखन शाळेला आणि युद्धनौकेसाठी कार्य करण्यासाठी उत्स्फूर्त करणाऱ्या ‘उदयगिरी’ युद्धनौकेच्या कलाप्रेमी कॅप्टनला. 

आजही प्रकर्षाने आठवतो तो दिवस. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित अशा ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ या कलादालनात आमचे ‘अक्षरभारती’ हे सुलेखन कलाप्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडत असताना एके दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन आणि सोबत कमांडर यांनी तिथे भेट दिली.ते तिथे सामान्य दर्शकाप्रमाणे आले होते पण तरी त्यांची बोलण्याची पद्दत, समोरच्याबद्दल असलेला आदर , शांत असे व्यक्तिमत्त्व या सर्वामुळे आमची ती भेट असामान्य वाटली. मला मुळातच माझ्या कलाकृतींबद्दल भरभरून बोलायला खूप आवडते आणि इथे तर समोरून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनाही माझ्या कल्पना , विचार जाणून घेण्यात रस होता. भारतीय ११ शास्त्रीय भाषांमध्ये केलेल्या एका कलाकृतीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या चित्राबद्दल सांगताना मी कित्येक वर्षांपासून असलेली माझी इच्छा व्यक्त केली. आपला देश जसा शेतीप्रधान आहे तसाच तो लिपिप्रधान आहे. अनेक भाषा आणि लिप्यांनी समृद्ध अशी आपली भारतीय संस्कृती अशा चित्रांच्या माध्यमातून जगासमोर मांडली तर नक्कीच भारत देशाची एक खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण बाजू विश्वात प्रकाशमान होईल. कदाचित हाच माझा विचार त्यांना आवडला असावा आणि काही महिन्यांतच त्यांनी मला संपर्क साधला. आणि त्यानंतर ‘उदयगिरी’ या नावाला समर्पक अशा एकूण ४ कलाकृती माझ्या हातून घडून आल्या ज्यांनी भारतीय सुलेखन क्षेत्रात आज एक इतिहास घडवला. 

या प्रत्येक चित्राचे एक वैशिष्ट्य आहे. खरे तर प्रत्येक चित्रातून एक नवीन ब्लॉग निर्माण होईल. मी तयार केलेली सर्व अक्षरचित्रे असल्याने चित्रातील कण न कण अक्षरांनी सामावून गेलेला आहे. त्यातील एका चित्रात शास्त्रीय , अधिकृत आणि पुरातन अशा एकूण २१ भारतीय भाषांमध्ये उदयगिरी हे नाव रंग आणि रचना यांचा मेळ घालून कलात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. २१ च का तर २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून. जरी अनेक लिपी असतील तरी ते चित्र एक वाटते… ही  संकल्पना भारतातील विविधतेत असलेली एकता दर्शवते. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या केबिन मध्ये दिमाखात विराजमान झाले आहे. माझ्याप्रमाणेच इतरही चित्रकारांची चित्रे त्या दालनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत.  दुसरे चित्र म्हणजे ५ फ्रेम्सची एकत्र रचना. यातील प्रत्येक चित्रचौकटीत उ द य गी  री अशी अक्षरे समुद्रलाटांच्या अक्षरशैलीमध्ये अनुक्रमे मांडली आहेत… दुरून दिसताना ते फक्त एक अक्षर वाटते पण जवळ जाऊन पाहिले तर ते प्रत्येक अक्षर हजारो भारतीय लिपीकृत अक्षरांनी तयार झालेले आढळून येईल. या चित्रात एक विशेष म्हणजे यात असलेला एक प्रतीकात्मक बिंदू जो प्रतीक आहे सूर्याचा… प्रत्येक फ्रेममध्ये त्या बिंदूचा होणारा प्रवास म्हणजे सूर्योदय… उदयगिरी या त्या नौकेच्या नामार्थाला समर्पक. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या बेडरूम मध्ये आहे. घरी तयार करताना हे चित्र खूप सामान्य वाटले मला पण त्या ठिकाणी फ्रेमिंग केल्यानंतर खूप सुंदर वाटत होते. खरेच म्हणतात ना चित्राला योग्य जागा , प्रकाशयोजना मिळाली तर त्यातील सौंदर्य अधिक खुलते. तिसऱ्या चित्राची अक्षरांची मूळ संकल्पना अशीच होती फक्त इथे बिंदू नसून पाचही चित्रे विविध रंगांतील अक्षरांनी भरून गेली आहेत. हे पाच रंग म्हणजे ऋतूंचे प्रतीक… आपली युद्धनौका सर्व ऋतूंमध्ये, परिस्थितींमध्ये त्याच जोशात आणि उत्साहात कार्यरत असेल ही त्यामागची माझी संकल्पना. चौथे चित्र म्हणजे मी प्रथमच केलेला एक आगळावेगळा प्रयोग होता जो सुरुवातीला फार कठीण वाटत असला तरी शेवटी ते यशस्वीरीत्या पूर्ण झाले. उगवत्या सूर्यासोबत रंगलेले आकाश, खाली समुद्राच्या पाण्यातील लाटांवर अलगद पसरलेले त्याचे  प्रतिबिंब, एक पक्षांचा थवा जणू या दिनकराला भेटण्यासाठी आतुर होऊन झेप घेत आहे आणि अशा या वातावरणात विशाखापट्टणम येथील डॉल्फिन टेकडीवर दिमाखात उभे असलेले दीपगृह…असे भूदृश्य मी प्रथमच कॅनवासवर अस्तित्वात आणले होते आणि या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पाणी, आकाश, अगदी पक्षीसुद्धा अक्षरांनी चितारले होते. वॉर्डरूम म्हणजे डाईनिंग एरिया… तिथे ही दोन्ही चित्रे आज नौसैनिकांना साथ देण्यासाठी तिथे उपस्थित झाली आहेत. ओडिया लिपीमधील अक्षरे आणि देवनागरीतील शिरोरेषेला एक वेगळे वळण देऊन समुद्राच्या लाटा निर्माण झाल्या, तेलुगू मधील अक्षरांची एक विशेष ठेवण असते आणि त्यातूनच माझ्या चित्रातील पक्षी अगदी लयीत जन्माला आली, आता राहिले आकाश तर ते मात्र ११ भाषांतील अक्षरांनी भरून आले होते. प्रत्येक लिपीतील अक्षरे थोडी वेगळी पण अगदी सहज इतरांसोबत सामावून जाणारी…आपल्या देशाची हीच तर खासियत आहे. 

महिनाभरापूर्वी ही चित्रे घरात साकारत असतानाही काही वेगळ्याच भावना होत्या. आपल्या देशासाठी काही करायला मिळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. एकदा बोलता बोलता तेथील कमांडर बोलून गेला कि आम्ही घरापासून ४-६ महिने दूर नौकेवर असताना एका वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये असतो त्यावेळी तुझी ही चित्रे मनाला एक वेगळा आनंद देतील ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे… त्याचे हे शब्द अक्षरशः मनावर खूप खोल कोरले गेले आहेत आणि स्वतःबद्दल एक वेगळा अभिमान जागृत झाला. आज ती सर्व चित्रे सागवान फ्रेम्स मध्ये बंदिस्त होऊन युद्धनौकेमधील महत्वाच्या ३ रूम्स मध्ये आहेत. देशाच्या इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी पितळेच्या टॅलीवर कोरलेला प्रत्येक चित्रामागचा माझा विचार आणि वर्णन… त्यासोबत त्यावर कोरलेले आपले नाव हा मला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान आहे असे मी मानते. जोपर्यंत ही युद्धनौका राहील तोपर्यंत ती चित्रे अजरामर राहतील असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा धन्य वाटले. आणि हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि स्वतः अनुभवणे हा एक खूप मोठा अविस्मरणीय क्षण होता. 

या सर्वांतून आनंद , समाधान , सन्मान तर मिळालाच पण यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही शिकवून गेली. आपण सैनिकांबद्दल, त्यांच्या त्याग-शौर्य-कर्तृत्वाबद्दल खूप काही ऐकतो परंतू त्याची जाणीव मला तिथे उपस्थित राहून जास्त झाली आणि त्यांच्याबद्दल असलेला अभिमान द्विगुणित झाला. देशातला प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागासमोर आपल्या व्यथा फारच तुटपुंज्या वाटू लागल्या. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे शिस्त. शिस्त असते हे माहित होते पण ठरलेल्या वेळेपेक्षा एक मिनिट उशीर सुद्धा अजिबात चालत नाही किंवा ठरलेल्या गणवेषात काडीमात्राचाही बदल अशा चुकीला माफी नाही, कुठलीही सबब अपेक्षित नसते आणि तिथे काम करणारेही इतके शिस्तशीर असतात कि आपली चूक लक्षात येताच कुठलीही सबब  हे प्रत्यक्ष पाहिले. त्यांचे स्वतःचे काम, बोलण्यात मिनिटामिनिटाचा हिशोब असायचा. त्यामुळे वेळेची किंमत कशी असावी हे शिकायला मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व ही तर प्रत्येक सामान्य व्यक्तीवर खास ठसा उमटवणारी असते. आदराने बोलणे, वागणे आणि त्यासोबतच असलेले देशप्रेम हे सर्व त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. 

पूर्वार्धात ८ वर्षे ‘ओ एन जी सी’ साठी वेल प्लॅनर म्हणून काम करत असताना जो देशाभिमान मला जाणवायचा त्याच भावना जवळजवळ १० वर्षांनंतर उदयगिरीसाठीचे हे काम करताना दाटून आल्या. याच वर्षी माझे गुरु आणि APSC चे सर्वेसर्वा अच्युत पालव यांना सुलेखन क्षेत्रातील विलक्षण कामगिरीबद्दल ‘पद्मश्री’ हा किताब देऊन सन्मानण्यात आले  आणि त्याच वर्षी त्यांच्या एका विद्यार्थिनीच्या सुलेखन चित्रांना भारतीय नौदलाने अशाप्रकारे सन्मान बहाल केला हे सर्वच भारतीय सुलेखनकारांसाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही गोष्टी भारतीय सुलेखन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ‘तू माझी विद्यार्थिनी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो’… आपल्या गुरुकडून अशा शब्दांत आपले कौतुक व्हावे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आणि उदयगिरीच्या या माध्यमातून आज स्वप्नपूर्ती झाली असे मला वाटते. माझ्याप्रमाणेच इतर अनेक सुलेखनकार देशातील अनेक भाषांत, लिप्यांत उत्तम काम करत आहेत, त्या सर्वानाच अशाप्रकारे संधी उपलब्ध झाल्या तर नक्कीच या क्षेत्रात एक नवी क्रांती घडून येईल.  एरव्ही चित्रकलेत काय ठेवले आहे म्हणणाऱ्यांसाठी या कलाक्षेत्रातही भविष्यात किती संधी उपलब्ध आहेत त्यासाठीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तीव्र इच्छा असेल तर माणूस कुठेही आपले स्थान प्रबळ करू शकतो. त्यामुळे आपली मुले नुसती चित्र काढत असतील तर त्यासाठी दुःखी न होता त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यातूनच एक नवा भारत नक्कीच जगासमोर येईल. 

 – रुपाली ठोंबरे . 

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अंतराय

लघुकथा संग्रह क्र. १२ ( विधायक अलक ) जावई आमचे भले !