इस्लाम धर्मातील स्त्रियांचे स्थान
✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
इस्लाम धर्म स्त्री आणि पुरूष भेद मानत नाही. स्त्रीला गुलाम म्हणून न वागविता त्यांना बरोबरीच्या हक्काने वागवावे, अशी कुरआनची आज्ञा आहे. स्त्रियांचे हक्क पवित्र आहेत. त्यांना दिलेले हक्क अबाधित राहतील अशी खबरदारी घ्या. हे उद्गार आहेत हजरत मुहंमद पैगंबर सल्लल्लाहू अल्लैहिवसल्लम यांचे . स्त्री म्हणजे आपल्या लहरीप्रमाणे वागणारी एक व्यक्ती नसून आपल्या बरोबरीने वागणारी सामान्य व्यक्ति आहे. असे प्रत्येकाने समजले पाहिजे. इस्लाम धर्मात स्त्रियांचा दर्जा फार मोठा आहे. तिला पशुप्रमाणे वागविण्याचा किंवा तिला मारझोड करण्याचा पुरूषाला अधिकार नाही. आपण जर स्त्रियांची कुचंबना करू, त्यांना शिवीगाळ करून दुखवू अल्लाहच्या घरी आपण गुन्हेगार ठरू. स्त्रियांना चांगल्या तन्हेने वागवा अशी अल्लाहची आज्ञा आहे.
मुस्लिम म्हणविणाऱ्याने आपल्या पत्नीचा व्देष करू नये. तिच्या एखाद्या दुर्गुणाकडे पाहून नाखूष असाल तर तिच्या सद्गुणाकडे पाहून प्रसन्न व्हा. असा पैगंबर साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. एका गृहस्थाने आपल्या पत्नीस कसे वागवावे असे पैगंबरसाहेब यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले, तुम्ही ज्यावेळी खाता त्यावेळीच तिला खावयास द्या. आपल्याबरोबर तिलाही कपडे खरेदी करा. तिला शिवीगाळ करू नका. मारहाण करू नका.
आपल्या पत्नीशी अत्यंत सहृदयतेने वागणे याचा अर्थ तिच्या अंगी असलेल्या अनेक गुणांचा गौरव करणे होय. पैगंबर साहेबांच्या दृष्टीने पत्नीची योग्यता फार मोठी आहे. तिचे स्थान उच्च आहे. तिची प्रसन्नता हा आपल्या उत्कर्षाचा व सौख्याचा पाया आहे, असे आपण मानले पाहिजे. याहीपुढे जावून हजरत मुहंमद पैगंबर अलैहिवसल्लम म्हणतात, संतुष्ट स्त्रीने आपल्या पतीबद्दल केलेली प्रार्थना अल्लाह लवकर ऐकतात व त्याला स्वर्गात उच्च स्थान देतो.
स्त्रियामध्ये विधवांची स्थिती अनुकंपनिय असते. त्यांचा जगामधला आधार तुटलेला असतो. त्यांचे सौख्य नष्ट झालेले असते. अशा विधवा स्त्रियांची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या होरपळून गेलेल्या भावनांवर सहानुभूतीची फूंकर घातली पाहिजे. त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदात जाईल, अशी खबरदारी घेतली पाहिजे. स्त्रियांना दिलेले हक्क-अधिकार केवळ दिखाऊ आहेत अशी कोणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. स्त्रियांचे हक्क पवित्र व शाश्वत आहेत. रमजानमध्ये पहाटे उठून सेहरीची व रोजा असताना इफ्तारची व्यवस्था करणाऱ्या स्त्रीचा आदर करा. कराल ना!
GIPHY App Key not set. Please check settings