इस्लाममध्ये नारी-स्थान
इस्लामच्या आगमनापूर्वी अरब राष्ट्रात मुलगी एक तिरस्कृत व्यक्ती होती. इस्लाम धर्माने तीला वारसाहक्क दिला. विवाह सोहळ्यामध्ये तिच्या मान्यतेला प्रथम स्थान दिले. तिच्या उत्तमरित्या पालनपोषण करणाऱ्या पित्याला स्वर्गप्राप्तीचा शुभसंदेश दिला. उत्तम मातृत्व करणाऱ्या मातेच्या पायाखाली स्वर्ग असल्याची माहिती तिच्या संतानाला करून दिली. शारीरिकदृष्ट्या महिला दुर्बल असलीतरी सामाजिकदृष्ट्या तिला पुरूषाइतकेच स्थान दिले गेले. पवित्र कुरआनमध्ये महिलांसंदर्भात एक संपूर्ण सुरह म्हणजे अध्याय अवतरविण्यात आला असून एकूण ४९ आयतीत म्हणजे श्लोकात महिलांचा आणि त्यांच्या कौतुकास्पद बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. पवित्र कुरआन हा एकमेव असा आकाशी ग्रंथ आहे. ज्यांत स्त्री-पुरूष समानतेचा उल्लेख करण्यात आला आहे. जे कर्मकांड पुरुषावर बंधनकारक आहेत ते जसेच्या तसे महिलांवर देखील आहेत. जेणेकरून महिलांना देखील पुण्यप्राप्तीचे पुरेपूर अवसर प्राप्त झाले आहेत ज्यामुळे महिलांचे देखील मनोबल व मनोधैर्य वाढीला लागले. पुण्यप्राप्तीत आणि आध्यात्मिक सुबत्तेबाबत पवित्र कुरआनमध्ये पुरूषाबरोबर महिलांचे देखील बरोबरीने उल्लेख करण्यात आला आहे.
हजरत मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैवस्सलम स्त्रियांचा आदर राखत होते. त्यांना आग्रह करत नव्हते ते महिलेच्या इच्छेला प्राधान्य देत होते. या संबंधीचे एक उदाहरण पाहू या. हजरत बरीरह (रजि) नावाची एक महिला हजरत मुहमंद सलेल्लाह अलैवस्सलम यांच्या धर्मपत्नी हजरत आएशा (रजि) यांची सेविका होती. तिला हजरत आएशा यांनी मुक्त केले होते. त्या महिलेच्या विवाह हजरत ‘मुगीस’ नावाच्या एका व्यक्तीबरोबर झाला होता. ज्यांना त्या पसंत करीत नव्हत्या. काही दिवसांनी त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्या आता मुक्त होत्या. त्यांचे पती त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करण्याचा आग्रह करीत त्यांच्यामागे अक्षरशः रडत फिरायचे. एकदा ते आपली मागणी घेऊन हजरत प्रेषित साहेबांजवळ गेले आणि हजरत बरीरहने त्यांच्याबरोबर पुनर्विवाह करावा, अशी शिफारस करण्यास भाग पाडले. पैगंबर साहेबांनी हजरत बरीरह यांना त्यांच्या पतीची इच्छा सांगितली. बरीरहने विचारले, ‘या रसूलुल्ला सलेअल्लाहु अलैवस्सलम हा आपला सल्ला आहे की आग्रह ? “प्रेषित साहेब म्हणाले, “हा आदेश नसून केवळ सल्ला आहे. बरीरह म्हणाल्या, “मग तर मी त्यांच्याशी विवाह करू इच्छित नाही” प्रेषित साहेबांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागू दिले. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत अनेक कार्यक्रम राबवित असताना जगभरात आणि विशेषतः भारतात काय घडत आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. महिलांना शक्ती प्रदान करण्याकरिता तीन बाबी महत्वाच्या मानल्या जातात. १. वित्तीय किंवा आर्थिक स्वायत्तता, २. सामाजिक्र आत्मनिर्भरता आणि ३. ज्ञान वा शिक्षणक्षेत्रातील स्वावलंबन. परंतू स्त्रियांच्या बाबतीत एक चौथी गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे स्त्रियांचे शील रक्षण. केवळ इस्लाम नव्हे तर प्रत्येक धर्मात स्त्रियांच्या शील रक्षणाबाबत कठोर शिक्षा व उपाय सुचविण्यात आले आहेत. पुरूषांबाबत देखील विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि परस्त्री गमनाच्या प्रवृत्तीला आळा घालण्याकरिता चाबकाचे १०० फटके आणि विवाहित स्त्री किंवा पुरुषाने व्यभिचार केल्यास जमिनीत निम्मे पुरून, दगडांचा वर्षाव करून ठार मारण्याची शिक्षा आहे. ही शिक्षा इस्लामपूर्वी ज्यू-इस्त्रायली आणि ख्रिस्ती काळापासून चालू होती. पैगंबर साहेबांनी ती होती तशीच चालू ठेवली त्यात काहीही बदल केले नाहीत.
इस्लामी संस्कृतीत नारी समाजाला अत्यंत आदरभावनेने वागविण्याची प्रथा आहे. महिलांना विधीशास्त्रात आणि साहित्यात ‘सन्फे नाजूक’ म्हणजे नाजूक अस्तित्व राखणारी म्हणून संबोधले जाते. त्यांच्याकडून अवजड कामे करून घेणे उचित नाही. त्यांच्या रक्षणासाठी इस्लामने त्यांना वयात आल्याबरोबर गोषा-पर्दा म्हणजेच हिजाब आणि बुरखा प्रदान केला आहे. मुलींनी जर आपल्या सौंदर्याला गोड पदार्थाप्रमाणे झाकून ठेवले तर त्यावर माशी बसणार नाही. मग तिला जुदो कराटे सारख्या कठीण कठीण कवायती शिकण्याची गरज भासणार नाही असे वाटते. समाजात पसरलेल्या लैंगिक छळाची पन्नास टक्के तीव्रता कमी करण्याचे कुरआनातील मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. हे पैगंबर सलेअल्लाहु अलैवस्सलम श्रध्दावान स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टीची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आपल्या साजशृंगार दर्शवू नये. आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये, असे कुरआनच्या २४ व्या’ भागातील अननुर या अध्यायात ३१ व्या श्लोकात म्हटले आहे. या आदेशाव्यतिरिक्त असेही म्हणण्यात आले आहे की, आपल्या पत्नी व मुली यांना सांगा की आपल्या चादरीचे पदर उत्तपणावर अच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पध्दत होय. जेणेकरून त्यांना त्रास दिला जाणार नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. अमीन.


GIPHY App Key not set. Please check settings