जगात कुठेही गेलं तरी अपवाद वगळता शोषणप्रवृत्ती असणारे लोक आपल्या प्रभावाच्या बळावर यंत्रणांना हवं तसं वाकवतात हे वास्तव आहे. ही दास्तान आहे आयेशा परवीन हिची. ती पाकिस्तानातली आहे. काही दिवसांपूर्वी तिने युरोपियन देशांत दिलेल्या मुलाखती प्रकाशझोतात आल्या होत्या. जी आयेशा आज तिच्या कामाच्या बळावर जगभरात प्रसिद्धी मिळवतेय तिने काही वर्षांपूर्वी नरकयातनेहून वाईट आयुष्य भोगलंय हे कुणालाही खरं वाटणार नाही. तिचे अपहरण केले गेले, ती शुद्धीवर येऊ नये म्हणून तिला अंमली पदार्थ दिले गेले आणि एका वेश्यागृहात विकलं गेलं, जिथे तिने पाच वर्षांहून अधिक काळ काम केलं. आयशा परवीन बद्दल सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती सहजी या गाळातून सुटली नाही परंतु तिने तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणे कधीही सोडले नाही! सामान्यतः सभ्य पांढरपेशी स्त्रिया लवकर हिंमत हारून आपल्या वाट्याला आलेले भोग आयुष्यभर सोसत राहतात, त्यांना बाह्य जगातून पाठबळ असले तरीही त्या विद्रोह करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आयेशाने मात्र कठोर तपस्या करावी तसा संघर्ष केला.
आयुष्यातील पहिली 14 वर्षे, आयशा परवीन पाकिस्तानच्या जंगली वायव्य प्रदेशातील एका गावात तिच्या कुटुंबासोबत राहिली. गतकाळातल्या एका विशिष्ठ संथ लयीत जगणाऱ्या तरीही आनंदी असणाऱ्या छोट्याशा खेड्यात ती वाढली. एके दिवशी शाळेत जात असताना अचानक कुणीतरी तिच्या मस्तकावर टणक वस्तूने प्रहार केला. ती बेशुद्ध झाली. तिचं अपहरण केलं गेलं. त्यानंतरच्या काळात तिच्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. त्या दिवशी आयेशाला शुद्ध आली तेव्हा तिच्या गावापासून शेकडो मैल दूर असलेल्या खानपूर या पाकिस्तानी शहरातील ब्रॉथेलमध्ये आपण नजरकैदेत आहोत हे तिला उमगलं. तिच्यावर आघात केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताना तिला गुंगीचे द्रव्य दिले होते हे ही तिला आकळले.
शुद्धीवर आल्यानंतर आपण नेमके कुठे आहोत आणि आपल्यासोबत काय घडलं आहे याचा अंदाज तिला लवकर आला नाही. गुंगीच्या औषधाचा असर सरल्यानंतर तिथल्या लोकांनी तिला दरडावलं. तिला धंदा करावा लागणार आणि ते सांगतील त्या आज्ञेचे पालन करावे लागेल असं त्यांनी निक्षून सांगितलं. सुरुवातीचे बरेच दिवस आयेशाने त्यांचे हुकूम माणण्यास नकार दिला. ती रडली, तिने आरडा ओरडा केला. त्याने काहीही फरक पडला नाही. मग ती हतबल झाली आपल्या पालकांकडे परत जाऊ देण्यासाठी तिने नाक रगडले, तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते मात्र त्या अधम व्यक्तींना तिची दया येत नव्हती. आपले शीलहरण करणाऱ्यांना रोखण्यासाठी तिने प्रतिहल्ले केले. बळजोरीने खोलीत प्रवेश करणाऱ्या पुरुषांविरुद्ध ती जमेल तशी झुंजली. त्यात तिलाच मारहाण झाली. तरीही तिने जिद्द सोडली नव्हती. त्या कुंटणखान्याचा मालक – मियां शेर नावाचा माणूस विकृत इसम होता जो तिच्याच पश्तून जमातीतीला होता. तिला वाटायचे की त्यामुळे तरी कधी तरी त्याला आपली दया येईल नि तो आपल्याला सोडून देईल मात्र तसे काही कधीच घडले नाही. उलट त्याने तिला भयंकर मारहाण केली. तिचा अनन्वित छळ केला. आपण इतकी ताकद दाखवूनही आयेशा ऐकत नाही हे लक्षात येताच तिला अद्दल घडवण्यासाठी, तिला लज्जास्पद अपमानास्पद वाटावे तसेच तिचे मनोबल खच्ची करण्यासाठी त्याने राक्षसी उपाय केला! तिच्या योनीमध्ये त्याने तापलेले लोखंडी चिमटे खुपसून ठेवले. कित्येक दिवस ती जखमांनी विव्हळत होती. अभूतपूर्व यातनांनी तिचा जीव व्याकुळला. तरीही तिने उमेद सोडली नाही हे विलक्षण होय.
अपहरण करून बळजोरीने उपभोगल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत आशियाच नव्हे तर जगभरात कमीअधिक फरकाने हेच चित्र दिसते. पाकिस्तान तर कट्टर धार्मिक राजवटीने ग्रासलेला विखारी पुरुषप्रधान विचारसरणीचा देश असल्याने तिथे हे चित्र अधिक ठळक होते. तिथेही हजारो मुलींचे लहान वयात अपहरण केले जाते आणि वेश्यागृहात कैद केले जाते, त्यानंतर त्यांच्यावर बळजोरी करून त्यांना धमकावले जाते, अगदी कुत्र्यांची विष्ठा खाण्यासही भाग पाडले जाते, त्यांचे मनोबल तोडून या गोष्टी त्यांना त्यांचे नशीब म्हणून स्वीकारण्यास भाग पाडले जाते. या मुली अनेक वर्षे बंदिवासात घालवतात, ग्राहकांना आकर्षित करताना एड्सची बाधा झाली तरी त्यांची सुटका होत नाही. अखेर देह झिजून खंगून गेल्यावर मृत्यूच त्यांना जितेपणीच्या नरकातून मुक्ती देतो! ही दुनिया जालिम आहे आणि विलक्षण मायावीही आहे. विविध संस्थांच्या अंदाजानुसार दरवर्षी लाखो चिमुरड्या मुलींची कुंटणखान्यात जबरदस्तीने रवानगी केली जाते.
युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार केवळ आशियामध्ये एक दशलक्ष बालके गुलामगिरीच्या स्थितीत आहेत. अपहरण झालं तेव्हा 14 वर्षांची आयेशा आता 26 वर्षांची आहे. ती आता आणखी तेजतर्रार नि उत्साही आहे! सडपातळ बांध्याची ही तरुणी काहीशी हसमुख वाटत असली तरी तिच्या डोळ्यांत पाणीही तितकंच सहजतेने तरळतं. बस्स काही जुन्या दाहक आठवणीहि तिला दुःखद करतात! लाख अधम प्रयत्न करूनही मियां शेर तिचे खच्चीकरण करू शकला नाही. तिच्या अपहरणानंतरच्या वर्षांमध्ये, मियां शेर किंवा त्याच्या पत्नीने तिला मारहाण केली नसेल असा एकही दिवस गेला नाही, हे असूनही तिने लढाई सुरूच ठेवली त्यामुळेच ती यशस्वी होऊ शकली
सलग सहा वर्षे ती कुंटणखान्यात जेरबंद होती. रात्री तिला नग्न झोपण्यास भाग पाडले जायचे जेणेकरून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यास तिला लाज वाटावी. आयेशासोबत असणाऱ्या अन्य मुलींनी देखील जमेल तसा प्रतिकार करणे सुरूच ठेवले. मात्र त्यांची उपयोगिता संपली होती परिणामी त्यांची हत्या केली गेली. आयेशाच्या मते मियां शेरच्या कुंटणखान्यातील सर्व मुलींचा मृत्यू अनैसर्गिक असावा. तिथल्या मुलींना त्याने कंडोमचा वापर करण्यापासून मज्जाव केला होता त्यामुळे अनेक रोगग्रस्त पुरुष येऊन त्यांना भोगून जात. शिवाय आपला रोग त्यांना बहाल करत. हा एक प्रकारचा खूनच होता असं आयेशा म्हणते!
असं असलं तरीही सहा वर्षांच्या बंदिवासानंतर तिची सुटका एका पुरुषाच्या सहकार्यानेच झाली हेही एक वास्तव आहे. मोहम्मद अक्रम नावाचा एक मेटलवर्कर कुंटणखान्यात दुरुस्तीचे काम करण्यास आला होता तेव्हा त्याची नि आयेशाची नजरानजर झाली. त्याला तिची दया आली. त्याचं सहानुभूतीपूर्वक उदार वागणं पाहून आयशाने त्याला पळून जाण्यास मदत करण्याची विनंती केली. त्याने तिच्या सुटकेचा कट रचला त्यातूनच त्यांच्यात प्रणय फुलला. 5 जानेवारीस रात्री उशिरा आयेशा अंधारात सावधतेने जागी झाली. दिवसा एका फटीत लपवलेले कपडे नेसले. मियां
शेर तिच्या आणि दाराच्या मधोमध अंथरुणावर निजला होता त्याला अलगद ओलांडून ती बाहेर पडली. त्याला घरातच कोंडून बाहेरून कडीकोयंडे लावून ती तडक सुसाट बाहेरच्या मुख्य रस्त्यावर आली, जिथे मोहम्मद अक्रमची कार तिची वाट पाहत होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी निकाह केला.
तिला वाटलं होतं की आता साऱ्या यातना संपून एका नव्या सुखी जीवनाची सुरुवात झाली असेल मात्र तसं घडलं नाही. जगात सगळीकडे शोषक आपली ताकद वापरून व्यवस्थेला वाकवतात याला पाकिस्तान अपवाद असण्याची सुतराम शक्यता नव्हती. मियाँ शेरने तत्काळ पोलिसांकडे जाऊन आयेशा ही आपली दुसरी पत्नी असून तिने पलायन करून आपली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद अक्रमसोबत पळून जाऊन तिने व्यभिचार केला आहे असा दावा त्याने केला. त्याच्याकडून लाच खाल्लेल्या पोलिसांनी त्याला हवी तशी फिर्याद नोंदवून घेतली नि ते आयेशाच्या मागावर निघाले. ती पोलिसांच्या हाती लवकर लागली नाही. दरम्यान मियां शेरच्या भाडोत्री गुंडांनी अनेकदा तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
याच दिवसात एक मोठा योगायोग आयेशाच्या आयुष्यात घडला. मेरी क्लेअर या फ्रेंच नियतकालिकासाठी महिलांच्या शोषणाविषयी संशोधनपर काम करणारे द न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार निकोलस क्रिस्टोफ यांची अपघातानेच भेट झाली. आयेशाचा संघर्ष पाहून ते भारावून गेले. अटक होण्यापासून काही पावलं ती दूर होती. आयेशा नि अक्रम कसेबसे स्वतःला लपवून अश्राप जिणं जगत होते. दोन दिवसांनी तिच्या अनुपस्थितीत तिच्याविरुद्ध सुनावणी केली जाणार होती त्याची तिला अतोनात भीती होती. तिच्यासाठी लढणारं तिच्या बाजूने बोलणारं कुणीच नव्हतं! मिया शेर कधीही तिचा ताबा घेण्याच्या स्थितीत होता. त्याने तिला पकडले तर नक्कीच तिची रवानगी त्या नरकातच करणार होता. तिचा पुन्हा छळ होणार होता हे स्पष्ट होतं. किंवा तो तिची हत्याही
करण्यासही मागेपुढे पाहणाऱ्यातला नव्हता. वेळ कमी असल्याने पोलिसांकडे जाण्यापेक्षा थेट त्याच्याकडे जावं नि काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून निकोलस क्रिस्टोफ एकटयानेच धाडस करून मियाँ शेरची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या घरातुन चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यात गेले.
मियां शेर या नुसता नावाचा शेर नव्हता! भयंकर दणकट अंगाचा आडदांड इसम होता तो! निकोलसना त्या क्षणाला तो टिपिकल शोषक वृत्तीचा मध्यमवयीन हैवानी पुरुष वाटला. निकोलसला त्यानं हल्ल्यात घेतलं नाही यावरून तो चलाख होता हेही लक्षात येतं. त्यानं निकोलसची विचारपूस केली, त्याच्यासोबत चहापान केलं. आपण असा काही धंदा करत आहोत हेच त्यानं नाकारलं, आयेशा लबाड असून व्यभिचारी आहे हा हेका त्याने शेवटपर्यंत सोडला नाही. निकोलसना राहवलं नाही त्यांनी त्याला विचारलं की तो तिला तुरुंगात पाठ्वण्यासाठी इतका उतावीळ का आहे? त्या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर ऐकूनच निकोलस सावध झाले. अटक केल्यानंतर तिला तुरुंगात टाकले जाईल तेव्हा आपण तिचा पती असल्याच्या अधिकाराने तिथे जाऊन तिचा जामीन देऊ. नि मग ती पुन्हा माझी होईल असं त्यानं अगदी मग्रुरीने सांगितलं. एकदा का आयेशा त्याच्या ताब्यात गेली असती तर तिच्याशी संपर्क साधणे कठीण झाले असते म्हणून निकोलसनि हातातली सगळी कामे टाकून द न्यूयॉर्क टाईम्ससाठी ते जो कॉलम लिहायचे त्यात आयेशाच्या संघर्षाकडे जगाचे लक्ष वेधले. तिच्यासाठी मदतीची याचना केली. पाकिस्तानी दूतावासाने याची दखल तीव्रतेने घेतली. शिवाय पाकिस्तानसह जगभरातील असंख्य वाचकांनी मदतीस तयार असल्याचे कळवले. स्थानिक न्यायालयावर नकळत दबाव निर्माण झाला. त्या सोमवारी सुनावणी होऊन आयेशाची मुक्तता घोषित झाली नि मिया शेरला अटक करण्याचे फर्मान निघाले!
निकोलस क्रिस्टोफ यांच्या प्रयत्नांना यश आलं! पाकिस्तान सरकारने आयशावरील आरोप वगळण्याचे आदेश दिले आणि त्याऐवजी मियां शेरला अटक करण्यात आली. ज्या पोलिसांनी तिची रवानगी पुन्हा एकदा कुंटणखान्यात करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनीच आता तिला संरक्षण देऊ केले. अनेक वाचकांनी द न्यूयॉर्क टाइम्सच्या ऑफिसमध्ये फोन करून आपण व्यक्तिशः आयेशाची काही मदत करू शकतो का याची विचारणा केली. त्या दिवसापासून आयेशाने तिचा संघर्ष अधिक टोकदार केला. ती आता अन्य पीडित स्त्रियांसाठी झुंजत होती, तिची झुंज पाहून युनायटेड नेशन्सने तिला व्हिएन्ना येथे लैंगिक तस्करीवरील परिषदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलं. तिथे ती निर्भीड होत व्यक्त झाली! कुंटणखान्यात असताना अनेकदा गर्भपात केला गेल्याने नि अंतर्गत भाजल्याच्या जखमा झाल्याने आपण आई होऊ शकत नाही याची जाणीव तिला आता फारशी सतावत नाहीए कारण आपलं जीवन तिने इतर निरपराध मुलींच्या सुटकेसाठी समर्पित केलंय. ती त्यासाठी कार्यरत असते. पाकिस्तानसारख्या कर्मठ धर्मांध देशात राहून अशी चळवळ चालवणं आगीत चालण्यासारखं आहे हे तिला ठाऊक आहे, किंबहुना त्यामुळेच तिचा निर्धार अधिक ठाम आहे!
आता ती दृढ निश्चयी नि निर्धारपूर्वक वागणारी धैर्यवान स्त्री झाली असली तरी निकोलस क्रिस्टोफ यांच्याशी भेट झाल्यानंतर तिचे पहिले वाक्य काय होतं हे सांगितल्याशिवाय लेख पूर्णत्वास जाणार नाही!
“देवाने गरीब लोकांना मुली देऊ नये,” असं ती रडत रडत उद्गारली होती!
“आणि जर मुलगी झाली तर देवाने तिला मरण द्यावे.” हे तिचं पुढचं वाक्य होतं!
तेव्हा काही क्षणांसाठी खचलेली आयेशा आता वाघीण झालीय जी रक्षण करतेय इतर मुलींचे!
दुर्गामातेने अधमाचं पतन केलं नि सत्वशीलतेचं रक्षण केलं. चांगलं नि वाईट ठरवताना कोणत्याही प्रकारची वर्गवारी आड येऊ देऊ नये. त्यात काळे पांढरे बदलत नाही!
आयेशा धर्माने कोण आहे, ती कोणत्या देशात राहते नि गतकाळाने तिच्यावर किती अन्याय करत तिच्याकडून काय काय करवून घेतले याला मी महत्व देत नाही! तिने अधमांचे पतन केले, त्यासाठी प्राण पणाला लावले आणि आता ती स्त्रियांच्या हक्कासाठी लढते आहे! माझ्यासाठी ती दुर्गाच आहे!
नमन!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings