त्याची मयत वगैरे जाम थाटात काढली होती. तुफान पब्लिक मयतीला आलं होतं (तसेही आमच्या इथे रिकामटेकडी माणसे खूप असतात). पुढारी तर हरामी सगळे झाडून आले होते, त्या समाजातील पुढच्या मतांवर त्यांचा डोळा जो असतो! असो.
मयत झाली. त्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी अकाली विधवा झाली.
काही नालायकांनी तिच्या कानात राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न केला पण ती बधली नाही.
त्याच्या कोवळ्या पोरांना काही हराम्यांनी मधाचे बोट लावले.
पोरं बिथरली. बापाचे कटआऊट लावून बापाच्या राजकीय दुष्मनांना चॅलेंज देऊ लागली. परिसरात असणाऱ्या दोन नंबर धंद्यावरून भांडणे होऊ लागली.
माझा एक जवळचा मित्र या दिवंगत राजकीय कार्यकर्त्याच्या जवळचा होता, तो काही वर्षापूर्वी अपघातात मरण पावलेला. त्याची दोन पोरे या कार्यकर्त्याच्या मागे फिरत.
उत्सव मिरवणुका असल्या की त्यांचा थाट असे. अभ्यासात लक्ष नव्हते.
घरच्या गरजा त्यांची आई भागवायची, एका खाजगी ऑफिसमध्ये ती माऊली दिवसभर काम करायची.
आई कामावर बाहेर पडली की ही पोरे बाहेर बोंबलत फिरत.
घरी म्हातारी आज्जी होती तिचे कुणी ऐकत नसे.
पोरे अक्षरशः वाया गेली होती, नात्यातल्या आणि ओळखीतल्या हरेकाने समजून सांगूनही काही फरक पडला नव्हता. मात्र हा जननायक कार्यकर्ता मेला आणि ती पोरे उघडयावर पडली. त्यांच्या सवयींचे वांदे झाले.
घरी भांडणे सुरु झाली. कार्यकर्त्याच्या पोरांनी या पोरांना जास्त जवळ केले नाही कारण यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता! चारेक दिवसांपूर्वी पोरांच्या आज्जीला हृदयविकाराचा धक्का बसला.
सिव्हिलमध्ये ऍडमिट केले गेले. तिथे महत्वाची औषधे नव्हती, औषधपाण्याला पैसे नव्हते.
आईने किडूकमिडूक दागिने गहाण ठेवले.
म्हातारी वाचली मात्र ते दागिने कधीच सुटणार नाहीत याची त्या माऊलीला जणू खातरीच होती.
हे कमी की काय म्हणून दोन पोरांपैकी एकाने परवा दिवशी दुसऱ्याच्या मोटरबाईकने एकाला धडक दिली.
कच्ची तक्रार दाखल झाली.
बाईचा धीर सुटला. चार चौघांना फोन केला. कुणी आले कुणी नाही.
काहींनी धीर दिला तर कुणी हात वर केले.
न राहवून ओळखीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मला फोन केला, त्याला ठाऊक होते की पोरांचा बाप माझा मित्र होता. फोन करुन त्याने सारा वृत्तांत कथन केला. त्यांना काय मदत केली हे लिहिण्याची ही जागा नाही.
मात्र त्या दोन्ही मुलांना इतके वाईट झापले की त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
माझा काळा भूतकाळ त्यांना सांगितला. बिघडवायला शेकडो हात पुढे येतात मात्र सुधरवण्यासाठी मोजकेच हात पुढे येतात याची जाणिव करुन दिली.
त्यांचा बाप कुठे चुकला आणि ते कुठे चुकत आहेत हे ही त्यांना सांगितलं.
आईला आधार द्यायचा सोडून राजकारण्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही हे ही सांगितले. पुढे जाऊन भीक मागण्याची ही लक्षणे आहेत.
आयुष्यभर गुरासारखे कष्ट केलेल्या, आपल्या प्रत्येक हौस मौजेचा स्वप्नांचा जीव घोटलेल्या विधवा आईने बेवारस म्हणून मरावे अशी अपेक्षा आहे का असे कळवळून विचारताच धाकटा पोरगा रडू लागला.
जवळ आला आणि मिठी मारून रडू लागला, बहुतेक गेल्या कित्येक वर्षात त्याने कुणाला मिठीही मारली नसावी आणि तो रडला ही नसावा.
दोन्ही पोरांना समजावून सांगितले. रीतसर कॉलेजला जाऊन फालतू धंदे बंद करण्याचा शब्द त्यांनी दिलाय.
आमच्या सोलापुरात गल्लोगल्ली अशी कुटुंबे आणि असे सर्वपक्षीय राजकारणी सापडतील ज्यांना अशी पोरे रॉ मटेरियल म्हणून हवी असतात! या हरेकास नियतीने सडवले पाहिजे, रडवले पाहिजे म्हणजे यांना कळेल की लोकांची पोरे नासवण्याने काय दुःख वाट्याला येते!
घरी बाप असला पाहिजे आणि त्याला खमकी भूमिका घेता आली पाहिजे.
आईही खमकी भूमिका घेतेच मात्र सारी जबाबदारी तिच्यावर पडली की ती इथे कमी पडते हे निरीक्षण आहे.
राजकीय नेत्यांच्या मागे धावून आपल्या आयुष्याची माती करून घेणाऱ्या प्रत्येक नालायक माणसाने आपला नाहीतर निदान आपल्या बायकापोरांचा विचार तरी केला पाहिजे.
एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीचे तमाम राजकारणी तर नीचच असतात कारण त्यांना माणसं फक्त नि फक्त वापरायची असतात!
आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे!
– समीर गायकवाड.
नोंद – दोन दशकांपूर्वी बऱ्यापैकी अशाच स्थितीतून मी गेलो आहे. माझा भूतकाळ वाईट आहे, ‘रेड लाइट डायरीज – खुलूस’च्या प्रस्तावनेत याविषयी मी लिहिलेय देखील! त्यात लपवण्यासारखे काही नाही. माझ्या भावंडांनी मला पुन्हा माणसात आणलं हे वास्तव आहे. वेळीच सावध करणारी माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटत नाहीत. नियती इतर अनेक प्रकारच्या संधी वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा देत असेल मात्र अपमार्गाच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठीची सशक्त संधी एकदाच येते ती ओळखता आली पाहिजे नाहीतर घसरण होत राहते आणि आयुष्याच्या शेवटी सोबतीला उरतो पश्चात्ताप नि खंगलेले शरीर!
GIPHY App Key not set. Please check settings