in

आईच्या आठवणींचा पाऊस!

पावसाळ्यात वेगवेगळ्या वस्तू सादळून जातात, वातड होतात. त्यांची चव बदलते. आई होती तेव्हा घरात बहुतेक जर्मन पितळाचे डबे होते. त्यातल्या बहुतांश डब्यांची झाकणे बिघडलेली असत, सांदीतून फटीतून हवा आत जाऊन आपलं काम चोखपणे पार पाडे. आई यावर शक्कल लढवत असे, जुनेर साड्यांचे तुकडे डब्याच्या तोंडावर लावून मग झाकण लावत असे. आतल्या वस्तू सादळत नसत. जुनेर साड्या नसल्या की वर्तमानपत्रांची पाने त्यांची कसर भरून काढत. आईचा कल मात्र साड्यांच्या तुकड्यांकडे असे.

डब्यात ठेवलेल्या वाळवणाच्या वस्तू पावसाळी हवेत तळून, भाजून खाताना त्याला निराळाच स्वाद येई. डबा उघडताच आईच्या साडीचा तो स्निग्ध मायागंध दरवळे! आता एअरटाईट कंटेनर असतात, वस्तू सादळत नाहीत मूळ चव शाबित राहते मात्र त्यात तो मायेचा स्निग्ध परिमळ दरवळत नाही! कालपरवा जुन्या बोहारीण मावशी घरी आल्या होत्या, घर हुडकत हुडकत आल्या होत्या. आसपास बांधकामे पुष्कळ झाल्याने घर लवकर सापडले नाही म्हणून हैराण झाल्या होत्या. ‘घरात जुने काही कपडे असतील तर दे बाबा’, असं म्हणत हेका लावून बसल्या होत्या. अलीकडे अपवाद वगळता घरोघरी रोजच्याला कुणी साडी नेसत नाही याची त्यांना खंत होती. एक्स्टर्नल कॉलेज करत असणाऱ्या त्यांच्या तरुण सुनेला घेऊन आल्या होत्या! 

इकडच्या तिकडच्या चार गोष्टी बोलून झाल्यावर आईची आठवण काढून रडू लागल्या. “रेणुकाबाई होती तवा मला कधी कमी पडलं नाही! या गल्लीला आले की माझं डालगं भरलेलं राही!” असं म्हणू लागल्या. त्यांची व्यथा त्या सांगत होत्या. डब्याच्या झाकणाचा व साडीच्या जुनेर तुकड्यांचा विषय काढताच त्या हमसून रडू लागल्या. खूप वेळ झाल्यावर त्या शांत झाल्या. त्यांच्या रडण्याचं कारण ऐकताच मीही चाट पडलो.

झालं असं होतं की वडिलांनी कधी नव्हे ती नवी साडी आणली होती नि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बोहारीण मावशी शांताबाई दारी आल्या होत्या. आईने त्यांना जुने कपडे काही दिले नव्हते कारण जुनेर फार काही शिल्लक नव्हतंच! शांताबाई फारच आग्रह करू लागल्यावर तिने लगबगीने आत जाऊन नवी साडी आणली नि तिच्या हातावर ठेवली. ‘घडी मोडून आठवड्याने आणून दे!” असं तिला सांगितलं! घडी मोडायला नवी साडी दिली यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, “लग्नानंतर फक्त दोनदा नवी साडी नेस्ले बघा रेणुका ताई!” ती रडत रडतच आईला सांगत होती. तिच्या डोळ्यांचं पाणी थांबायला तयार नव्हतं. आईने तिला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं. मग ती शांत झाली.

थोड्या वेळाने गरम चहा झाला, काही गप्पा झाल्या. तिच्या डालग्याला हात लावून डोईवर ठेवलं नि ती आस्ते कदम निघून गेली. रस्ता पार करेपर्यंत मी तिच्याकडे पाहत होतो. कोपऱ्यावर गेल्यावर तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले तेव्हा तिने डोळ्यांना पदर लावलेला स्पष्ट दिसला होता.

आईच्या साड्यांना अद्भुत स्निग्ध मायेचा परिमळ होता, तिच्या स्नेहार्द्र करुण जीवनाचा लळा त्या धाग्यांना लागला असावा! आता किती जरी कुंद पावसाळी हवमान असलं तरी वस्तू सादळत नाहीत मात्र आठवणींचा पाऊस कधी अंगणात बरसतो तर कधी डोळ्यांतून पाझरतो! मात्र आईच्या आठवणींचा पाऊस सुखात्म वा अंतःकरणातली सतार हळुवार छेडणाऱ्या अलवार सरींचाच असला पाहिजे असे काही नाही. मराठी साहित्यात उदात्तीकरण खूप चालते, आईविषयी कुणी काही नकारात्मक लिहिणं जवळपास दुरापास्तच झालंय. आई ही देखील ही एक व्यक्ती आहे, तिचेही जीवन आहे तिचेही मन आहे नि तिच्याही आवडीनिवडी आहेत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडला आहे. तिच्यातही गुणदोष असू शकतात यावर आपण विचार करत नाही. नामदेव ढसाळ याला अपवाद होते!

ढसाळ त्यांच्या आईविषयी लिहितात की, आई गेली याचं दुःख नाही; प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषाआड तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात, आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता! तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत राहायची. बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता, प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा. चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही. शहरातही तिने तवलीमध्ये अन्न शिजवलं, पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं. बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं. बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे. आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं. दुःख याचं आहे की तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले. लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं. प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली. स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला! आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही…

आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे… विजा का चमकतात? पाऊस का पडतो? तो सांगू पहायचा आजीला; ‘माझ्या येडपटा’ म्हणत ती त्याच्या पाठीत धपाटा टाकायची. नियंत्याची अशी चेष्टा करू नये बाबा असं म्हणायची. तिला हे जग, गैबान्याची शाळा वाटायची ती म्हणायची. पृथ्वी म्हणजे त्याने अंथरलेली लांब चादर आहे तिला आदी नाही अंत नाही. ऊन-सावली हे सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची. म्हणून आई मेली याचं दुःख नाही, प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते!

आपली आई गेली याच दुःख आपल्याला झाले नाही असं सांगणारे ढसाळ आपल्या नकळत त्यांच्या आईशी आपला परिचय करून देतात. तिची स्वभाववैशिष्ट्ये ते सांगतात, तिच्या गुणदोषावरही लिहितात. हे जग तिला गैबान्याची शाळा वाटायची असं ढसाळ सहज म्हणतात पण तिला तसं का वाटायचं याचं उत्तरही ते कवितेत देऊन टाकतात. तिच्या देवभोळेपणाची ते टिंगल उडवत नाहीत मात्र त्याचा उपहास करून त्यातले मर्म समोर आणतात. पृथ्वी म्हणजे देवाने अंथरलेली लांब चादर आहे असं सांगणाऱ्या आईचा भाबडेपणा ते आपल्या समोर आणतात असे नव्हे तर आईच्या मेंदूत घर करून राहिलेल्या खुळ्या कल्पनांच्या ठिकरया उडवतात. ईश्वराच्या मर्जीशिवाय पानही हलू शकत नाही या दांभिक वाक्याचा ते समाचार घेतात, ऊन सावली हा ईश्वरी इच्छेचा खेळ कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या मनात हळूच उपस्थित करतात. पृथ्वीला सुरुवात नाही, अंत नाही यातला फोलपणा ते दाखवतात. आपल्या चिमुरडया मुलाला कळते की वीजा का चमकतात, पाऊस का पडतो कारण त्याने शिक्षण घेतले आहे, विज्ञानाची कास धरली आहे. आई अशिक्षित आहे तिच्या डोक्यामध्ये अशा खुळचट कल्पनांनी ठाण त्यामुळेच मांडले आहे. तरीदेखील आई आपल्या नातवाचे खुलासे ऐकून घेत नाही कारण आपलं आयुष्य अशा विचारांच्या नादी लागून बर्बाद करून घेतलं आहे. याचा सल ढसाळांच्या मनात आहे त्यामुळेच उद्विग्न होऊन ते आई मेल्याचं दुःख नाही असं म्हणतात.


– समीर गायकवाड 

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

एक नयी शुरुआत

दोन हजारची नोट आणि चाकावरची अ‍ॅन्टेना