अल्हाह पहात आहे
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
नाफे अ (रजि.) म्हणतात, की हजरत अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) एकदा मदिना मुनव्वराच्या बाहेर निघाले हाते. खुद्दाम त्यांच्याबरोबर होते. जेवणाची वेळ झाली. खुद्दामने दस्तरखान अंथरले. दस्तरखान म्हणजे जेवतांना वापरावयाचा कपडा. ज्याच्यावर ताट ठेवून मुस्लिम बांधव जेवण करतात. सर्वजण जेवायला बसले. एक मेंढपाळ शेळ्यामेंढ्यांना राखत तिथून निघाला होता. त्याने सर्वांना अस्सलमो अलैकुम म्हटले.
हजरत इब्ने उमर (रजि.) यांनी त्याला जेवायला बस म्हटले. तो म्हणाला, आज माझा रोजा (उपवास) आहे. हजरत इब्ने उमर (रजि.) म्हणाले, किती कडक उन्हाळा जाणवत आहे. ऊन बरसत आहे आणि अशावेळी तू रोजा करत आहेत. तो म्हणाला, मी माझ्यासाठी सवाब (पुण्य) अल्लाहकडून मिळवत आहे. त्यामुळे मला कसलाही त्रास वाटत नाही.
त्यानंतर हजरत उमर (रजि.) त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले, आम्हाला एक बकरी विकत घ्यायची आहे. तिची किंमत सांग. आम्ही तिची कुर्बानी करू आणि तुलाही त्यातील काही भाग देवू. की जो तुला रोजा सोडतेवेळी उपयोगी पडेल. तो म्हणाला, या बकऱ्या माझ्या नाहीत. मी तर गुलाम आहे. या बकऱ्या माझ्या सरदाराच्या म्हणजेच मालकाच्या आहेत. हजरत इब्ने उमर (रजि.) म्हणाले, सरदाराला कसे कळेल. समज कळलेच तर म्हण की, लांडग्याने खाल्ली म्हणून. त्याने आकाशाकडे बोट दाखवत म्हटले, तो सर्वज्ञ अल्लाह पहात आहे ना. मग मी कस सांगू लांडग्याने खाल्ली म्हणून हजरत इब्ने उमर (रजि.) आश्चर्यचकीत झाले. ते मनात म्हणाले, एक गुराखी म्हणतो अल्लाह पहात आहे. किती प्रामाणिक आहे हा. त्यानंतर हजरत इब्ने उमर (रजि.) यांनी त्या गुलामाला आणखी बकऱ्या खरेदी करून दिल्या. त्याला गुलामीतून मुक्त केले.
वरील प्रसंगावरून आपणास बोध मिळतो की, आपण जे काय करत आहोत ते अल्लाह पहात आहे असा भाव मनात ठेवनू केले तर आपल्या हातून कधीच गैरकृत्य घडणार नाही. नमाजपठण करताना चित्त विचलित होते तेव्हा अल्लाह आपल्याकडे पहात आहे असे समजून नमाजपठण करावे. त्यामुळे एकाग्र होवून अल्लाहची उपासना करता येते. जी उपासना अल्लाह कबुल करेल व आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होईल. (फजाईल अमाल पानं.७००)
GIPHY App Key not set. Please check settings