अमरत्वाच्या शोधाची डिजिटल गोष्ट..
माणसाला जेव्हापासून जन्म मृत्यूच्या संवेदना अधिकाधिक कळत गेल्या तेव्हापासून त्याला एका गोष्टीचे नेहमीच कुतूहल आणि आकर्षण राहिलेय ते म्हणजे अमरत्व! आपल्याला मरणच नको अशी इच्छा असणारे अनेक लोक आपल्या अवती भवती आढळतील. याविषयी अनेक दावे सांगणारे वा अमुक एक व्यक्ती इतक्या वर्षांची दीर्घायु आहे असं सांगणारेही अनेक नजरेस पडतात. यातले बहुसंख्य अमरत्वप्राप्तीने झपाटलेले असतात. वास्तवात जेव्हा एखाद्या सजीवाचा जन्म वा आरंभ होतो तेव्हाच हेही निश्चित असते की त्या सजीवाचा मृत्यू वा अंतही नक्की आहे, कारण जगात असा कोणताही सजीव नाही ज्याचा अंत नाही! हा जीवनचक्राचा नियम आहे, सृष्टी यावरच चालते हे विसरून चालणार नाही. तरीही अमर व्हायचे भूत काहींचा पिच्छा सोडत नाही. अशाच एका माणसाची खरीखुरी हकीकत ‘डोन्ट डाय: द मॅन हू वॉन्ट्स टू लिव्ह फॉरएव्हर’ या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलीय. ‘टायगर किंग’ या गाजलेल्या सिरिजच्या कार्यकारी निर्मात्याने ही फिल्म बनवलीय. सत्तेचाळीस वर्षे वयाच्या एका प्रौढ पुरुषाच्या अमर होण्याच्या स्वप्नाची ही गोष्ट. मृत्यूवर मात करून अमर होण्यासाठी पणाला लावलेल्या कोट्यवधी डॉलर्सच्या प्रयत्नांचे वर्णन यात आहे. त्या व्यक्तीला असे का करावे वाटते आणि तो त्यात यशस्वी होतो का हे सांगणे म्हणजे फिल्मचा आत्मा काढून घेण्यासारखे आहे.
ही कथा आहे ब्रायन जॉन्सन या एकेकाळी स्वतःला अस्थिर असुरक्षित समजणाऱ्या कोट्यधीश तरुणाची. तो स्वतःला डिप्रेशनच्या खोल डोहात असल्यागत समजायचा. जगापासून गोष्टी लपवल्या म्हणजे सारं सुरळीत होईल असं त्याला वाटायचं. अगदी स्वतःच्या सावलीला देखील तो आपलं मानायचा नाही. तरीदेखील या माहितीपटात तो म्हणतो की, ‘जगातल्या बुद्धीमान व्यक्तींच्या लेखी मी एक आपत्ती आहे, मला मृत्यूची भीती वाटत नाही’. एका प्रसंगात तो सांगतो की मला जंगायचे आहे मात्र पळपुटा वा भेकड म्हणून नव्हे तर धैर्यशील धाडसी म्हणून जगायचे आहे. खरेतर त्याला ज्या भीतीचा उल्लेख करायचा होता ती भीती म्हणजे मृत्यूची भीती होती. फिल्ममध्ये एक प्रसंग असा आहे की जॉन्सनला पक्की जाणीव होते की तो आता कमीत कमी एकशे वीस वर्षे जगू शकतोय तरीही तो अठरा वर्षांचाच दिसेल! या टप्प्यापर्यंतच संशोधन करून थांबायचे की आणखी पुढे जारी ठेवायचे याचे उत्तर शोधताना त्याला जगातल्या अंतिम सत्याची प्रखर जाणीव होते!
फिल्ममध्ये जॉन्सनच्या मृत्यूच्या चिंतेची सुरुवात त्याच्या वयाच्या मध्यापासून ते तिशीनंतर त्याच्या संतापी वृत्तीतून उद्भवते. ज्यामुळे तो स्वतःविषयीचे चिंतन करू शकतो. एलडीएस चर्च(येशूच्या अंतिम काळातील संतांचे चर्च)विषयी त्याच्या मनात असणाऱ्या प्रतिमा एका रात्रीत ध्वस्त होतात. चर्चसोबतचे जीवनाच्या शाश्वततेचे त्याचे नाते तुटून पडते. एक तंत्रज्ञान उद्योजक म्हणून दिवसाचे चोवीस तास ताणतणावापेक्षा जीवनात आणखी काही आहे याचा तो विचारच करत नाही. पती, वडील, मुलगा आणि मॉर्मन(एलडीएस चर्चचा फॉलोअर) या नात्यांचा त्याला कोणताही आनंद घेता येत नाही. त्यातून तो स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावतो. आपण कोण आहोत आणि काय करत आहोत या जाणिवेने त्याच्या मनात घृणा उत्पन्न होते. या नकारात्मक विचारांच्या शिखरावर त्याला तीव्र नैराश्य येते, आत्महत्येचे विचार येतात. एकवेळ अशी येते की तो स्वतःला संपवून टाकणारच होता! मात्र त्याच वेळी त्याच्या मनात असा विचार आला की आयुष्याला नवे वळण मिळाले. आपण जर ब्रायन जॉन्सन नसतो एक पती, वडील, मुलगा आणि तंत्रज्ञान उद्योजक नसतो तर तो कोण असलो असतो या प्रश्नावर तो खिळून राहतो. चर्चचा नाद सोडल्याशिवाय आपण खरे सत्य शोधू शकणार नाही हे तो ओळखतो नि त्या दिवसापासूनच स्वतःला शोधताना आयुष्याची दोरी कायमची बळकट करण्याची कल्पना जन्म घेते. तो पूर्णतः शारीरिक आरोग्यावर लक्ष्य केंद्रित करतो. मनोआरोग्याचा शोध घेत नाही कारण त्याला पुन्हा कन्फ्यूजन नको असते. हे करताना सामाजिक संबंध आणि मानवी समुदायाचे महत्त्व त्याला आपसूक पटते. कसे ते फिल्ममध्येच पाहणे इष्ट! ‘डोन्ट डाय..’ ही केवळ एक फिल्म नसून एक उपक्रम झाला होता ज्यात अनेक आहारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, डॉक्टर्स. समुपदेशक यांची मतमतांतरे मांडली गेलीत. यात एक कटूसत्य असेही आहे की जॉन्सन आणि त्याच्या सहकाऱ्यांप्रमाणे, जगातील अनेकांना अशा प्रकारच्या सुखसोयी मिळत नाहीत कारण ते गरीब देशांमध्ये भयानक परिस्थितीत काम करण्यात व्यस्त असतात, दिवसरात्र मेहनत करून विविध वस्तूंचे उत्पादन करतात विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे फारसे पैसे नसतात आणि तरीही त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही तर त्या उलट जॉन्सन सारखे अनेक लोक आढळतात की ज्यांच्यापाशी सर्व आहे तरीही त्यांना मरणाच्या भयगंडाने ग्रासलेय! मृत्यूचा वा अस्तित्व नसण्याचा खरा अर्थ फिल्म थेट सांगत नाही तरीही प्रेक्षकाला तो अर्थ उमगतो!
एकेकाळी मोबाईल पेमेंट उद्योजक असलेला जॉन्सन ज्याची स्टार्ट-अप कंपनी पेपलने विकत घेतली होती तो दरवर्षी २ दशलक्ष डॉलर्सहून अधिक खर्च करतो, ज्याचा उद्देश वैद्यकीय देखरेखीखालचा सर्वसमावेशक आरोग्य आणि तंदुरुस्तीचा प्रोग्राम आहे जो एखाद्या व्यक्तीला वयस्कर झाल्यानंतरही तरुण राहू शकतो का हे शोधण्यासाठी डिझाइन केलेला असतो. यासाठी तो स्वतःचा वापर गिनी पिगसारखा करू देतो! हे अत्यंत देखण्या आणि सफाईदार पद्धतीने दाखवलेय. नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंटरी पाहता येईल. नवनवीन औषधे, सौंदर्य प्रसाधने, तरुण राहण्यासाठीच्या शस्त्रक्रिया, विविध उपकरणे, व्यायामाची आधुनिक साधने आणि व्यायाम पद्धती, अवाढव्य संशोधन यंत्रे, जटिल जैवसूत्रे आदी अनेक गोष्टी अचंबित करतात. फिल्मसाठी मुक्त हस्ते पैसे खर्च केल्याचे जाणवते! एक वेगळा विषय अत्यंत चकचकीत नि डिजिटल पद्धतीने मांडलाय ज्यायोगे प्रेक्षकांना नवा दृष्टिकोन लाभू शकतो. जाता जाता सांगायची गोष्ट – सोनी लिव्हवरती रेखाचित्रम हा अत्यंत उत्कंठावर्धक थ्रिलर सिनेमा आहे. आवर्जून पाहण्याजोगा!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings