समलैंगिकतेबद्दल भारतीय समाज मनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय नाही कारण हा मुद्दा आपल्या संस्कृती संस्काराच्या विरोधातला आहे. खेरीज हा वैयक्तिक विषय असून याला सार्वजनिक स्वरूप देऊ नये अशी मल्लिनाथीही केली जाते. तर काहींना असे वाटते की हा दुभंगलेलं जीवन – मुखपृष्ठ शारीरिक जडणघडणीचा विषय आहे याच्यावर खुली चर्चा योग्य नव्हे. काहींना हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण वाटते. याविषयी खोलात जाऊन चर्चा करण्याऐवजी काहीजण कुजबुज स्वरूपामध्ये बोलताना आढळतात! समलैंगिकतेडे संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीचे प्रतिबिंब भारतीय साहित्य, विविध कलाविष्कार आणि अन्य माध्यमांमध्ये दिसते. अत्यंत तोकड्या प्रमाणात याच्या समर्थनार्थ लिहिले गेलेय. त्यावर वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद न येता कथित संस्कृतीरक्षकांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे प्रतिसादच अधिक येतात. समलैंगिकतेवरती चित्रे, कथा, कविता, प्रहसने, सिनेमे, जाहिराती, नाटके, डॉक्युमेंट्रीज, पथनाट्य यांचे प्रमाण एकूण निर्मितीच्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. भारतीय समाजात एकूण किती लोकांचा कल समलैंगिकतेकडे आहे याची नेमकी आकडेवारीही आपल्याला ठाऊक नाही. ती एक नकोशी देहवृत्ती आहे इथून आपली जाणीव सुरू होते, ही अनैतिक आणि अनैसर्गिक भावना आहे असे आपल्या मनात हेतुतः रुजवले गेलेय. अशी भावना मनात येणे हे पाप आहे ही आपली कमालीची ‘प्रगल्भता'(?)! प्रत्यक्षात वास्तव उलटे आहे. मानवाखेरीज 1500 हून अधिक प्राण्यांमध्ये समलैंगिकता आढळते त्यामध्ये सिंह वाघ कुत्रा पेंग्विन इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. व्यक्तीचा लैंगिक कल पारंपरिक नसू शकतो, एखाद्याला समलैंगिक असावं वाटणं हे नैसर्गिक आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेय. आपल्या शिक्षणप्रणालीमधून, अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण वगळलेय कारण ते गुप्तज्ञान आहे अशी आपली जुनाट धारणा!
वास्तवात स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या समलैंगिकतेचा शोध घेणे आणि त्याची मांडणी पात्रांच्या आधारे विस्तारत नेऊन तिला कादंबरीचे स्वरूप देणे हे सोपे काम नाही. परंतु अरुणा सबाने यांनी ते लीलया पार पाडले आहे. हरेक व्यक्तीच्या ठायी जसे गुण असतात तसेच विकार ही असतात. वैफल्य, वासना, तिरस्कार, भीती, मत्सर, तृप्तता, असमाधान, लोभ, द्वेष इत्यादींनी सर्वच माणसांना ग्रासलेले असते मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करून सारेच आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. ही जगण्याची सामान्य पद्धत होय. मात्र आपल्या शरीरामध्ये काही देह भावना आक्रोश करून स्वतःच्या अस्तित्वाविषयी आणि लैंगिक कल विषयक काहीएक स्टेटमेंट करत असतात त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते किंबहुना त्या भावनांचे दमण केले जाते. परिणामी आपल्या मनातले लैंगिक खुलेपण आपण स्वतःच खुडून टाकलेले असते. मी कोण आहे आणि माझा लैंगिक कुणाकडे आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नसतो, कारण समाजाने आपल्यावरती काही सेक्शुअल गोष्टी लदलेल्या आहेत त्या आपण मुकाट स्वीकारलेल्या आहेत. वरवर हा सर्व विचार गुंतागुंतीचा जटिल वाटतो कारण याविषयी आपण काहीएक चर्चा कुठेही कधीही केलेली नसते. व्यक्ती आपल्या एकांतात देखील स्वतःच्या देह भावनेविषयी स्वसंवाद करत नाहीत. किंबहुना या विषयावर चर्चा करणे अथवा कुणापाशी जर मन हलके केले तर त्याचे वाईट पडसाद म्हटले जातील आणि लोक आपल्याकडे चुकीच्या नजरेने पाहतील या गोष्टीचे अथक दडपण प्रत्येकावरती दिसते! ‘दुभंगलेलं जीवन’ या कादंबरीमध्ये हे दडपण लेखिकेने भिरकावून दिले आहे. कादंबरीमधली तिची पात्रे तिच्या ठायी असलेल्या बंडखोरीची, विद्रोहाची भाषा बोलतात पण ती भाषा रौद्र स्वरूपाची नसून प्रवाही शांत संवादी मर्मभेदी पद्धतीची आहे. ती नेमक्या दुखत्या नसेवर करकचून बोट ठेवते, इतके की कादंबरीच्या शेवटी अस्वस्थ व्हायला होतं.
शलाका ही या कादंबरीची नायिका. ती एका स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करते. हेतूत: अविवाहित राहून एकटीच पण स्वतंत्र राहते! एका मुलीला ती दत्तक घेते. ही नोंद महत्त्वाची आहे कारण, एकल पालकत्व असलेल्या व्यक्ती अथवा स्त्री पुरुष दांपत्य एकत्रित रित्या सर्वसाधारणपणे दत्तकविधान करताना मुलगाच दत्तक घेतात जेणेकरून आपल्या अनेक गोष्टींचा वारसा त्याच्या नावावरती पुढे नेता यावा! किंबहुना तोच आपला वारसदार आहे असे अगदी ठासून सांगण्याची भूमिका त्यामागे असते. परंतु एकट्याने राहणारी शलाका एक मुलगी दत्तक घेते हे विशेष! शलाका ही खोलात जाऊन विचार करणारी, संवेदनशील प्रौढा असल्याने समाजात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ नेमका लावते. बालवयात असताना कुटुंबातले शारीरिक संबंधांविषयीचे काही अनुभव तिचं भावविश्व हादरवून सोडतात, त्यातून तिच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी ती वाचनाचा आसरा घेते हे या कादंबरीचे वेगळेपण होय! (हा विचारच अनेक प्रश्नांवर मात करण्यास पूरक ठरू शकतो) या सर्व गोष्टींमुळे एकंदर कुटुंब व्यवस्थेविरुद्धच तिच्या मनात संताप असणं नैसर्गिक होय. तिच्या समाजकार्यात आदिनाथ नावाच्या तरुणाची तिला मोलाची साथ लाभते. तिला तो पसंत असतो, ते परस्परांच्या प्रेमात पडतात. एकमेकांची ओळख व्हावी नि प्रेमातले गहिरेपण आकळावे म्हणून ते दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात. काही काळ असे एकत्रित राहून झाल्यानंतर आदिनाथ शलाकापाशी लग्नाचे टुमणे लावतो. वास्तवात त्याच्या या मागणी मागेही एक दडपण असते. आपण लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहतो, आपल्या बहिणीचे लग्न जमण्यात त्याची अडचण होऊ नये ही त्यामागची भावना! आपल्या लग्नाशिवाय बहिणीचे लग्न मार्गी लागणार नाही याची त्याला एक प्रकारची खात्रीच असते म्हणून त्याने शलाकापाशी लग्नाचा आग्रह धरलेला असतो. शलाकाचे आदिनाथवर प्रेम असते पण त्याला लग्नाचे स्वरूप देणे तिच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येबाहेरची गोष्ट असते. जगण्यासाठी लग्न आवश्यकच आहे याच्याशी ती बिलकुल सहमत नसते. एकट्या स्त्रीने स्वतंत्र राहणे अथवा तिला कोणी पुरुष आवडला तर त्याच्यासोबत लिव-इन मध्ये राहणे यात तिला गैर वाटत नसते. आपण ज्याच्यासोबत राहतो त्याच्याशी आपले मतभेद होतात तेव्हा त्याच्यापासून अलिप्त होणे हे सुद्धा तिला उचित वाटते. मात्र काहीही झाले तरी आपले स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे यास तिचे प्राधान्य असते. तिच्या या बंडखोर विचारांमुळे कुटुंबात, समाजात तिला विविध स्तरांवर झगडावे लागते. तिच्या मते कोणतीही स्त्री माता होऊ शकते त्यासाठी तिने आपल्या गर्भातूनच अपत्य जन्मास घातले पाहिजे हे गैरलागू. प्रत्येक स्त्रीला माता होण्याचा हक्क आहे त्यासाठी ती मूल दत्तक घेण्याचा पर्याय खुला ठेवू शकते. याच विचारातून नांदेडच्या वरदान संस्थेकडून ती एका छोट्या मुलीला दत्तक घेते.
आपली दत्तक मुलगी उर्वी हिला शाळेत प्रवेश घेण्यासाठी शलाका विविध शाळांचे अर्ज भरते, बापाच्या जागी ती स्वतःचे नाव आडनाव लावते तरीही उर्वीला प्रवेश मिळत नाही. त्या विरोधात आवाज उठवताच तिच्यावरच चिखलफेक केली जाते. स्त्री कधीच पुरुषाशिवाय राहू शकत नाही या मिथकाविरुद्ध तिचा खंबीर संघर्ष यातून पुढे येत राहतो. मातृत्व मिळवण्यासाठी स्त्रीला पुरुषाचे नाव अथवा साथ अनिवार्य असण्याची गरजच नाही हा विचार ती अत्यंत प्रखरपणे रुजवू पाहते. स्त्री-पुरुषांच्या संबंधासाठी महत्वाचे मानले गेलेल्या परंतु एका अर्थाने अत्यंत बुरसटलेल्या व बऱ्यापैकी कालबाह्य झालेल्या विवाह संस्थेच्या नैतिक व पावित्र्य विषयक संकल्पनांना ही कादंबरी तुरुंग लावते. देह भावनेचे व लैंगिक खुलेपणाचे स्वातंत्र्य मागताना ती कुठेही स्वच्छंदी न होता विचारांचा मजबूत पाया समोर ठेवते हे या कादंबरीचे वैशिष्ठ्य. शलाकाचे विचारस्वातंत्र्य कुठेही उत्श्रृंखल वाटत नाही. स्त्री-स्वातंत्र्यासंदर्भातील चिंतन आणि स्त्री-पुरुष समानते विषयक संतुलित विचारांच्या मांडणीने कुटुंबव्यवस्थेतील अन्य घटकांच्या जगण्यातली दुविधा नेटकेपणाने समोर येते. बालपणातले शोषण, एकल स्त्रीला स्वतंत्र राहताना येणाऱ्या अडचणी, सामाजिक कार्यात झोकून देण्यासाठी खुणावणारे परिपक्व मन हे टप्पे नेमके टिपलेत.
शलाकाच्या बहिणीची मुलगी असणारी सुचिता ही या कादंबरीची सहनायिका. शलाकाची बहीण अनुराधा हिचे घाईत शरदशी लग्न लावून दिले जाते. समाजामध्ये लब्ध प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या धनदांडग्या कुटुंबातील शरदचे रमेश नावाच्या मित्राशी अत्यंत खोलातले समलैंगिक संबंध असतात. अनुराधाला ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा तिला धक्का बसतो. ती उन्मळून पडते. आपल्या पतीला समलैंगिकताच हवी होती तर त्याने आपल्याशी लग्न का केले हा प्रश्न तिला पोखरून काढतो. आपल्याशी एक प्रकारची प्रतारणा केली गेलीय असे तिला वाटू लागते. कुटुंबसुखास ती वंचित होते. हे क्लेश तिचे जीव घेऊनच संपतात. तिच्या मृत्यूनंतर काही कालावधीने शरदचाही मृत्यू होतो. पुढे जाऊन या दाम्पत्याची कन्या सुचिताचे लग्न तिची आत्या राजनशी लावून देते. सासरी तिच्या वडिलांचे समलैंगिक असण्यावरून तिला बोल लावले जातात. तीदेखील त्यांच्या वळणावर गेलीय का अशी शंका घेतली जाते. हा एक प्रकारचा मानसिक छळच असतो. जे दुःख आपल्या आईच्या वाट्याला आले ते आपल्या हिश्श्याला येऊ नये म्हणून तिने कैक काळ करुणा भाकलेली असते, मात्र तिच्याही वाट्यास निराशा येते. आपले वडील समलिंगी होते या कथित देहभावनांचे ओझे ती वागवत राहते. अखेरीस ती मनोविकाराने त्रस्त होते. तिचे संतुलन ढासळते. तिने सावरावे म्हणून शलाका तिला खंबीर आधार देण्याचा प्रयत्न करते. समाजात जर समलैंगिकतेस मान्यता असती तर या सर्वांची आयुष्ये सुलभ झाली असती, त्यांना अपराधाच्या काळकोठडीत कैद व्हावं लागलं नसतं. ही कादंबरी केवळ या विषयावर चर्चा करत नसून याचे मनोचिकित्सक विश्लेषणही करते. अगदी मोजक्या प्रसंगात कामुकता येते मात्र ती अश्लीलतेकडे झुकणारी नसून कादंबरीची गरज आहे. यातली पात्रे कमालीची संयमी भाषा वापरतात, कुठेही डार्क शेड न येऊ देता पुरुष आणि स्त्री यांच्या दोहोंच्या देहस्तरावरच्या गे आणि लेस्बियन समलैंगिकतेवर प्रकाश टाकते.
काळ पुढे जातोय, जग त्यानुसार बदलतेय मात्र आपण अजूनही लवचिक भूमिका न स्वीकारता जुन्या विचारांना घट्ट बिलगून आहोत. जगभरातील विविध भाषांत, संस्कृतींमध्ये समलैंगिकतेविषयी लिहिलं बोललं गेलंय. प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो याने यावर विपुल लेखन केलेय. विख्यात कवी लॉर्ड बायरन यांनी आपल्या कवितांमध्ये समलैंगिकांसाठी फ्रेंड ही संज्ञा वापरलीय. भारतीय शिल्पकला, साहित्य, इतिहास यामध्ये तब्बल दोन हजार वर्षांपासूनचे समलैंगिकतेचे उल्लेख, नोंदी आढळतात. व्यक्तीचे लिंग (जेंडर) आणि सेक्स या दोन गोष्टी भिन्न आहेत हेच मुळी आपण मान्य करायला तयार नाही. व्यक्ती स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी असली तरी तिचे मन तिला काही वेगळेच सुचवू इच्छिते तेव्हा त्या व्यक्तीचा सेक्सुअल कल सामान्य व्यक्तींहून भिन्न असतो, ते विजातीय लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होत नाहीत. ही एक शारीरिक भावना आहे, तिचा व्यक्तीच्या जेंडरशी थेट संबंध नाही. मात्र याचा संबंध भावनात्मकतेशी नक्की असतो. हिंदू पुराणांनुसार भगीरथाचा जन्म दोन स्त्रियां पासून झालाय, कार्ले येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यात दोन अर्धअनावृत्त स्त्रियांचे स्तनस्पर्शाचे शिल्प आहे, कामसूत्रात समलैंगिकतेवर तपशीलवार माहिती आहे तर खजुराहोच्या शिल्पांमध्येही समलैंगिकतेस स्थान आहे. अय्यप्पा या देवास उभयलिंगी मानले जाते. ‘बाबरनामा’पासून सिराज औरंगाबादीच्या कवितेपर्यंत अनेक सुफी रचनांमध्ये समलैंगिकतेचे संवेदनशील वर्णन आलेय. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
लैंगिक, शारीरिक, मानसिक आणि न्यायिक अशा चार स्तरांवर समलैंगिकांना लढावे लागते त्याचे संदर्भ या कादंबरीत कधी संवादाच्या स्वरूपात तर कधी वर्णनात्मक पद्धतीने समोर येतात त्यामुळे याकडे पाहण्याची नेमकी दृष्टी वाचकांना लाभते. दोन समलिंगी व्यक्तींनी परस्पर सहवासातून देहिक मानसिक सुख मिळवणे इतकीच याची व्याप्ती नाही हे ‘दुभंगेलेलं जीवन’मध्ये पानोपानी जाणवते. एखाद्या समलिंगी स्त्रीला समलिंगी पुरुषापेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो हे वास्तव कोणत्याही फेमिनिझमयुक्त अभिनिवेशाविना अगदी सरलतेने आकळते. यातील पात्रे शरीरसुखासाठी हपापलेली नसून त्यांचा शोध आहे सच्च्या स्वीकृतीचा, निरपेक्ष प्रेमाचा, एकजिनसी भावबंधाचा! त्यामुळे कादंबरी वाचून झाल्यानंतर बराच काळ ही पात्रे आपल्या मनःचक्षू समोर रेंगाळत राहतात हे लेखिकेचे यश होय. ‘दुभंगलेलं जीवन’ ही कादंबरी वाचली, तिची लेखनशैली आशयासह आवडली, त्यातला विचार पटला इथेपर्यंत सर्व ठीक वाटते मात्र त्यानंतरही या कादंबरीचे काही बिंदू मनात अखंड खोदकाम करत राहतात. जसे की एक व्यक्ती म्हणून आपल्या शारीरिक, लैंगिक जाणिवांविषयी आपण किती गंभीर आहोत? आपल्या देहजाणिवांचा मनोव्यापार आपण मनाच्या तळखान्यात कैद करून ठेवलाय का? त्याचे प्रकटन आपण टाळतो, आपण असे का वागतो? अनुराधाने जे भोगलेय ते आपल्यापैकी कितीएकजण मुकाट्याने सोसत असतात, त्यांच्या मनाचा कोंडमारा त्यांच्या लैंगिक जाणिवांना कोणत्या अवस्थेत पोहोचवतो याचे आपल्याला काही भान असते का? सुचिता आणि अनुराधा यांच्यात असणारा जनरेशन गॅप कादंबरीत अत्यंत भेदकपणे अधोरेखित झालाय हे विशेष. अनुराधाला ज्या गोष्टी कधीच जमल्या नाहीत त्या सुचिताला जमतात, उमगतात तरीही ती कोलमडून पडते. ही मानसिक अवस्था शरीरात कोणते स्थित्यंतर घडवून आणते याकडे अरुणा सबाने अत्यंत तटस्थतेने पाहतात नि एकेक परते खोलत उकल करतात. कृष्णा अग्निहोत्री यांच्या कुमारियाँ या कादंबरीमध्ये सरिता आणि गुड्डी या दोन समवयीन मुलींची समलैंगिकता केंद्रस्थानी होती. त्यात एके ठिकाणी गुड्डी प्रश्न करते की, ‘केवळ तिने एखाद्या मुलासोबत फिरू नये म्हणून बंधने लादली जातात आणि परिणामी तिचे व सरिताचे संबंध दृढ होत जातात, जवळीक मर्यादेबाहेर वाढत जाते. मात्र ही जवळीक समलैंगिकतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिला का विरोध होतो? स्त्रीला हे स्वातंत्र्य नाही का?’
‘दुभंगलेलं जीवन’मध्ये सुचिता याच्या पुढचा टप्पा गाठते आणि उत्तर शोधते! अमृता पाटील यांच्या ‘कारी’चा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या कादंबरीत दोन समलैंगिक तरुणी त्यांच्या अंतिम उद्दिष्टात असफल होतात परिणामी आत्महत्येचा प्रयत्न करतात. मात्र दुर्दैवाने त्यात त्या अपयशी ठरतात. त्यानंतर त्यांची ससेहोरपळ सुरु होते. पारंपारिक चौकटी मोडून त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जी लढाई लागते त्याची गाथा म्हणजे कारी! अरुणा सबाने यांच्या कादंबरीमधली शलाका ही व्यक्तिरेखा या समस्येचे उत्तर आहे! तुझे आहे तुझपाशी, तू कधी न चुकलाशी यावर ती ज्या पद्धतीने ठाम राहते ते अफलातून आहे. संवेदनशीलता जपत प्रसंगी कणखरपणा अंगी बाणल्याविना यात यश नाही हे तिला पक्के ठाऊक आहे. प्रसंग फुलवण्याची हातोटी आणि गंभीर विषय असूनही त्याला बोजडपणाच्या छटेपासून दूर ठेवणं या प्लसमार्कमुळे कादंबरी वाचनीय झालीय. अशा वर्गवारीतील साहित्यावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी आणि निकोप लैंगिक भावनायुक्त समाजासाठी अशा आशयाचे साहित्य आणखी मुबलक प्रमाणात लिहिले गेले पाहिजे, जेणेकरून यावर खुलेपणाने व्यक्त होण्यास तरी लोक उद्युक्त होतील. एका अचर्चित विषयावरील धाडसी कादंबरीसाठी अरुणा सबाने यांचे अभिनंदन! अशा कादंबरीस प्रकाशक टाळाटाळ करतात मात्र रोहन प्रकाशनने ही कादंबरी देखण्या स्वरूपात प्रकाशित केलीय. अन्वर हुसेन यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ आशयसमृद्धी करणारं आहे. प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुष आपल्या मनोदेहिक (सायकोसोमिक) जाणिवा सशक्त करण्यासाठी जेही वाचू इच्छितात त्यात या कादंबरीचा समावेश असला पाहिजे!
– समीर गायकवाड.
पूर्वप्रसिद्धी दै. लोकसत्ता.
GIPHY App Key not set. Please check settings