in

अक्षरयज्ञ – ८

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

अक्षरयज्ञ – अक्षरांचे संवर्धन करण्यासाठी एकत्रितरित्या येऊन विविध भावनांनी रंगांसोबत आणि रंगानी अक्षरांसोबत केलेला दैवी संवाद. रोजच्या चित्रांपेक्षा जरा वेगळे… न पाहिलेल्या रंगांचे बेधुंद ताशेरे… बंधमुक्त आकारांचे कागदावरती स्वैर विहरणे. भावनांच्या डोहातून कागदावर उमटणारी अक्षरे… जणू  वर्ण,छटा ,कल्पकतेने आच्छादून अवतरणारी शक्तिरूपे .या तीन दिवसांच्या कार्यशाळेतून मिळणारी ही ऊर्जा पुढचे ३६५ दिवस उत्साहित, कार्यरत ठेवते. आणि म्हणूनच या यज्ञात पुन्हा पुन्हा यायला मला नेहमीच आवडते. अच्युत पालव कॅलिग्राफी फॉऊंडेशनच्या वतीने दरवर्षी अक्षरयज्ञ आयोजित केला जातो. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला स्वल्पविराम देऊन एखाद्या शांत ठिकाणी तीन दिवस एकत्र येऊन स्वतःला व्यक्त करून घेण्याची संधी देणारा, सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुरु केलेला हा एक अनोखा उपक्रम. येताना कॅलिग्राफी किंवा सुंदर चित्र यायला हवे अशी अट मुळीच नसते पण जाताना प्रत्येकजण स्वतःतील रंग शोधत आपले मनातले चित्र सोबत नक्कीच घेऊन जातो. म्हणूनच अभियांत्रिकी , वैद्यकीय , वाणिज्य , कला अशा अनेक क्षेत्रांतील सर्वांनाच हा यज्ञ आपलासा वाटतो. २००७ सालापासून सुरु झालेला हा अक्षरयज्ञ आजपर्यंत सुरु आहे. प्रत्येक वेळी नवी संकल्पना … नवा सहभाग… नवे मार्गदर्शक ….नवी सत्रे  …,परंतू  येणारा अक्षरानुभव प्रत्येक वेळी तितकाच दिव्य….मी यावर्षी चौथ्यांदा ही कार्यशाळा अनुभवत होते पण तरीदेखील त्यातून मिळालेला अनुभव आणि आनंद खूप वेगळा  आणि नाविन्यपूर्ण होता . 

आतापर्यंत मी उपस्थित राहिलेल्या अक्षरयज्ञांत नाट्य , नृत्य , संगीत अशा कलांच्या माध्यमातून जागृत होणाऱ्या भावनांच्या खोल डोहातून चिंब भिजलेल्या कल्पनांच्या कुंचल्याने मनावर , हृदयावर विविध भावरंगांचे चित्र रंगवत नव्याने अक्षरांचा शोध घेण्यावर भर असायचा. तो एक विलक्षण अनुभव असायचा. विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांच्या सानिध्यात आमची अक्षरकला आणि सृजनशीलता विकसित होत असे. पण यावर्षी हे स्वरूप थोडे वेगळे जाणवले. यावेळी पूर्ण अक्षरयज्ञाचा श्वास म्हणजे सर्वांना सुरवातीला घाबरवून टाकणारे माध्यम – कॅनव्हास. म्हणूनच या अक्षरयज्ञाची पहिली जाहिरातच मनात घर करून गेली आणि इथे येण्याचा निश्चय तत्क्षणी पक्का झालेला. अजय चव्हाण – advertising च्या क्षेत्रातील प्रख्यात नाव. कॅनव्हासवर त्यांची विशेष पकड. आणि असे गुरु आम्हाला या अक्षरयज्ञाच्या निमित्ताने लाभले. विशेष करून कॅनव्हास हाताळण्याचे तंत्र शिकून घेण्याच्या इच्छेने आलेल्या सर्वांसाठीच ही एक खास रंगीत मेजवानीच. 

२८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या कार्यशाळेत येण्यासाठी अनेकांनी अगदी दिवसापूर्वीच घर सोडले होते. सकाळी सुमारे १० पर्यंत जवळजवळ सर्वच सहभागी उपस्थित राहिले होते. प्रथमच आलेल्या सर्वांनाच त्या हिरवळीने , निसर्गाने पहिल्या क्षणातच भुरळ पाडली होती. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील अशी निसर्गरम्य वास्तू हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण. जागा जितकी सालस आणि सुंदर तितकेच इथले जेवणसुद्धा सात्विक पण अतिशय चविष्ट. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणजे मुंबईतील एक असे आकर्षक ठिकाण जिथे ज्ञानाचे संवर्धन होत असते. ज्ञान देणारा आणि घेणारा या दोघांसाठी विद्येची देवाणघेवाण करण्यासाठी यापेक्षा योग्य जागा असूच शकत नाही. राहण्याच्या आणि खाण्याच्या सर्व  उपलब्ध सोयी, उत्तम कर्मचारीवर्ग , प्रसंगोचित वातावरण अशा सर्वार्थाने परिपूर्ण जागेत ३ दिवस वास्तव्य करण्याचे एक वेगळे समाधान असते. अशाप्रकारे सर्व बाजुंनी सुव्यवस्था असली कि मूळ कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. प्रत्येकवेळी सुंदर निसर्गाने तर येणाऱ्यांचे स्वागत होतच असते पण त्यापेक्षा विशेष आकर्षण असते ते अक्षरयज्ञाच्या वतीने अक्षरांची सुरेख आरास करून होणारे स्वागत. आजपर्यंत प्रत्येक वेळी एक नवा विषय आणि नवी कल्पना. वरपासून खालपर्यंत मांडलेले अक्षरांची महती सांगणारे पेपरड्रॉप्स, मधोमध फुलांनी सुशोभित केलेली समई आणि त्या समोर रचलेले ३५ कोरे कॅनव्हास. पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे ते दृश्य. 

आमचे सर्वांचे लाडके गुरु पद्मश्री अच्युत पालव आणि मान्यवर प्रमुख पाहुणे आणि या कार्यशाळेची कमान पुढील ३ दिवसांसाठी पेलून घेण्यासाठी सज्ज असलेले अजय चव्हाण सर आणि आम्ही सर्व सहभागी कलाकार यांच्या उपस्थितीत उदघाटन आणि प्रस्तावना परिचय असा छोटासा पण महत्वपूर्ण कार्यक्रम सुंदररित्या पार पडला. पुढच्याच क्षणी केलेल्या निदर्शनाप्रमाणे प्रत्येकजण उत्साहाने समोर मांडलेल्या रचनेतून एकेक कॅनव्हास घेऊन जात मुख्य दालनात प्रवेश करू लागला आणि अक्षरयज्ञाचा मूळ आरंभ सुरु झाला. खूप विचार न करता आपापल्या क्षमतेप्रमाणे रंगांची उधळण करत आपापल्या कोऱ्या कॅनव्हासला एक अद्भुत रूप देण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरु झाला…सुरुवातीला फक्त निरीक्षण करत, अगदीच गरज असल्यास रीतसर हस्तक्षेप करत अजय सर आणि अच्युत सर आपापली कामगिरी चोख बजावत होते. कुठेही स्पर्धा नाही पण तरीही प्रत्येकजण आपले १००% देण्यासाठी चढाओढ करत होता. बघता बघता सारे कॅनव्हास सौन्दर्याने भिजून गेले. ती सुंदरता पुन्हा एकदा प्रवेशद्वारी केलेल्या रचनेत अधिक भर घालण्यास तत्पर झाली. विविध हातांनी, विविध आकारांनी, विविध रंग-ढंगानी सजलेले सारे कॅनव्हास पुन्हा एकदा एकत्र आले आणि एक नवी रचना डोळ्यांसमोर निर्माण झाली. प्रत्येकाची कलाकृती एकमेकांपेक्षा वेगळी असली तरी ती त्यात एकरूप झाली आणि हा प्रयोग सफल झाला. आतापर्यंत केलेले काम आमच्या मनाप्रमाणे , आजपर्यंत शिकलेल्या गोष्टींपर्यंत सुरु होते. आता या कार्यशाळेचे एकेक पैलू समोर येण्यास सुरुवात झाली. अजय सरांचे प्रात्यक्षिक ही आम्हां सर्वांसाठी दृश्य पर्वणीच. रबर सोल्युशन हे एक नवे शस्त्र नव्यानेच आम्ही अनुभवत होतो. या नव्या शस्त्रासोबत समर्पक पोत ,आकर्षक रंगसंगती , प्राचीन अक्षराकृती आणि सोबत प्रश्नोत्तरांचा संवाद असा सुरेख संगम तिथे घडून येत होता. ‘आनंद घेत मनसोक्त काम करा… एखादी चूक झालीच तर तो कॅनव्हासच तर आहे ना… पुन्हा gesso मारा आणि नव्याने निर्मिती करा’…अजय सरांचे हे वाक्य अनेकांना आजपर्यंत वाटणाऱ्या भीतीपासून दूर साऱण्यास समर्थ ठरले असावे. gesso ,रबर सोल्युशन हे सारेच नवे असले तरी अजय सरांच्या प्रात्यक्षिकामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे सर्वांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि सारेच हिरीरीने कामाला लागले. आसपास नजर टाकता सगळीकडे दिसत होते ते शुभ्र कोरे नवे कॅनव्हास , नव्या कल्पना, नवे प्रयोग , नवा हुरूप. कानांवर सलग पडणारा ड्रायरचा आवाज हे या सर्वांचे प्रमाण ठरत होते. भावनांना अक्षरांचा स्पर्श झाला कि मनातील रंग शब्दरूप घेऊन कॅनव्हासवर ओघळू लागतात…ही ओघळणारे अक्षरे जेव्हा मनाचा ठाव घेतात, अंतरंगातील भाव तेव्हा अचूक समोर उमटलेली असतात. खरेच मनाचे चित्र पाहिले आहे का कधी? नक्कीच नाही..पण अक्षरयज्ञात अशाप्रकारे ३ दिवस मनसोक्त मोकळे होऊन जे काही समोर उमटत जाते तेच आपलेसे वाटते जणू हेच ते मनाचा ठाव घेणारे मनाचे चित्र. असा अनुभव प्रत्येक वेळी येत राहिला आणि चित्रांच्या रूपात इतस्ततः मंडल जाऊ लागला.  एका विशिष्ट कालावधीनंतर अजय सरांचे प्रात्यक्षिक पुन्हा सुरु होत असे, पुन्हा गप्पांच्या माध्यमातून ज्ञानात भर पडत असे. असा हा कलात्मक प्रवास बराच काळ सुरु होता. सरतेशेवटी सकाळपासून केलेल्या या प्रयोगाचे फलित समोर येण्यास सुरुवात झाली… जणू काही एक जादूच वाटावे इतके त्या चित्राचे रूप पालटून गेले. असाच प्रयोग दुसऱ्या दिवशी सुद्धा अनुभवला जेव्हा मास्किंग टेप साधन म्हणून हातात आले. आजपर्यंत कशापासून वंचित होतो आणि आज काय गवसले याचा आनंद चेहऱ्यांवर दिसून येत होता. सर्वजण एकच प्रकारचे तंत्र जरी शिकत असलो तर प्रत्येकाचे प्रयोग फार वेगळे होते. नुसते इतरांचे काम पाहणे हे देखील नकळत खूप काही शिकवून जात होते. संवाद मग तो शाब्दिक असो वा मौन पण तो सतत सुरु होता आणि त्यातून नव्याने उपजणारी कार्यक्षमता हीच या कार्यशाळेची खासियत आहे. 

रोज संध्याकाळी आजपर्यंत केलेले विशेष काम सर्वांसमोर प्रस्तुत करण्याची आणि त्याबद्दल व्यक्त होण्याची सर्वांना संधी मिळत असे. या कार्यशाळेतील दुसरा नवा पैलू समोर आला तो खास अमेरिकेतून आलेल्या अमित कुलकर्णी यांच्या रूपात. त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे असलेला खजिना सर्वांसमोर रिता केला क्षणभर वाटले असाही छंद असावा एखादा. छंद म्हणण्यापेक्षा तो एक ध्यास होता. आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो कि या कार्यशाळेच्या निमित्ताने पेनांचे इतका सुंदर संग्रह अगदी जवळून पाहायला मिळाला. २०० वर्षांपूर्वीचे पेन्स आणि त्यानंतर त्यांच्यात होत जाणारे नूतनीकरण, शाई तयार करण्याचे तंत्र, एखाद्या पिसापासून उमटणाऱ्या अक्षरांपर्यंतचा प्रवास या सर्वांचा सखोल अभ्यास आणि त्याचे सादरीकरण खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होते. अमित यांनी अशा प्रकारचे अनेक पेन अगदी जपून ठेवले आहेत. ते नियमित या ना त्या कारणाने वापरात असल्याने ते आजही अतिशय सुस्थितीत आहेत.त्यांची ही शिस्त प्रत्येक सुलेखनकारासाठी शिकण्यासारखी आहे. केवळ आमच्यासाठी इथवर हा सर्व ठेवा आणला त्यासाठी त्यांचे खूप आभार. हे सर्व इतकेही सोपे नक्कीच नसावे. आज सर्व पहाटेच लवकर उठल्याने थकून गेले होते त्यामुळे छान जेवणानंतर थोड्या गप्पा मारून सर्व आपापल्या रूम्सकडे परतले. त्यातही संजीव जोशींसारखे एखादे अवलिया असतात जे कोणत्याही क्षणी आपल्या कलेसोबत असलेल्या आसक्तीने इतरांना थक्क करतात. सुलेखन फक्त कागद किंवा कॅनव्हासपर्यंत सीमित न राहता मिळेल त्या प्रत्येक माध्यमावर काम करण्याचा त्यांना छंद. आजही जेव्हा सर्व झोपण्याच्या तयारीत परतत होते तेव्हा हे महाशय जमिनीवर एक मोठा कॅनवास अंथरून त्यावर भल्या मोठ्या ब्रशने आपली कलाकुसरी करण्यात मग्न होते. आता असे दृश्य पाहिल्यावर एखादा कलाप्रेमी दाद न देता कसा झोपायला जाईल. कलेप्रती असलेली ही आसक्ती खरेच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या जागेचा खराखुरा आनंद घ्यावा तर तो पहाटेच्या वेळी. माझ्या आयुष्यातील एकमेव ठिकाण जिथे अलार्ममुळे नव्हे तर पक्षांच्या किलबिलाटाने मनावरचे मळभ दूर होऊन चैतन्याचे वारे अंगभर भिनू लागतात. आणि तेच सारे दिवसभर अविश्वसनीय असे काम करण्यास ऊर्जा देतात. अगदी ठरलेल्या वेळेत ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ चे सर्वेसर्वा असलेले आणि भारतीय राजनीतिज्ञ विनय सहस्त्रबुद्धे यांचे झालेले आगमन,आमच्या अक्षरांना अगदी उत्स्फूर्तपणे दिलेली दाद , सुलेखन कलेच्या संगोपनासाठी केलेले मार्गदर्शन, प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमातून केलेले शंका निरसन आणि या सर्वांसोबत आमच्या अक्षर प्रवासाला मिळालेले प्रोत्साहन हे सर्व खूप आनंददायक आणि समाधानकारक आहे. अक्षरांच्या संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात करून पुढे पाऊले तर टाका, प्रयत्न योग्य आणि प्रामाणिक असतील तर अशी सुवर्णसंधी नक्कीच उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी दिला. 

अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पा , केलेल्या कामांचे सादरीकरण , अजय आणि अच्युत सरांचे वेळोवेळी होणारे मार्गदर्शन , अधूनमधून चहा- नाश्ता, वेगवेगळ्या खाऊंची देवाणघेवाण आणि मनाला वाटेल तेव्हा मनसोक्त केलेले काम … अशाप्रकारे अक्षरयज्ञातील प्रत्येकाचा कलाप्रवास सुरु होता. अक्षरांच्या संवर्धनासाठी असे अक्षरयज्ञ वेळोवेळी होत राहायला हवे ज्यातून निर्माण होणारी ऊर्जा भावी समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.आणि हीच पद्मश्री अच्युत पालव यांची ‘अक्षरयज्ञ’ सुरु करण्यामागील संकल्पना आहे. आतापर्यंतच्या अक्षरयज्ञात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी मार्गदर्शनपर उपस्थिती दिली आहे, शेकडो कलाकार विचारांचे समर्पण करत, अक्षरांची समिधा आणि रंगांची आहुती देत आहेत आणि त्यामुळेच २००७ पासून सुरु झालेला हा अक्षरयज्ञ आजही त्याच प्रखरतेने तेजाळत आहे. अच्युत सरांनी सुरु केलेल्या या अक्षरयज्ञातून निर्माण होणारी ब्रह्मक्षरे दूरपर्यंत अशीच तेजस्वी राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. 

– रुपाली ठोंबरे 

Read More 

What do you think?

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

यमुनातीरीचे बुलबुल