अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा असे मेसेज आजच्या दिवशी अनेक जण पाठवतात मात्र अक्षय तृतीया म्हणजे काय, या दिवसाचे नेमके महत्व काय हे अनेकांना सांगता येत नाही. भारत पूर्वापार कृषक देश आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेला इथला चरितार्थाचा व्यवसाय म्हणजे शेती. शेतीचा आणि अक्षय तृतीयेचाही संबंध आहे. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते. गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेस असतो, यादिवशी नांगरटीची सुरुवात होते. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठी ऋतूचक्रातले अखेरचे चार महीने. या चार महिन्यातले ऊन आणि अक्षय तृतीयेचे ऊन यांचे एक गणित असते.
आपल्याकडे हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूमध्ये हिवाळा विभागलाय. गुलाबी थंडीचं हवामान ज्याला म्हटलं जातं तो हेमंत आणि कडाक्याच्या थंडीत जीवसृष्टी गोठून जाते, पानगळीने झाडं मोकळी होऊन जातात तो शिशिर. मार्गशीर्ष आणि पौष हे दोन महिने हेमंत ऋतूमध्ये येतात. मार्गशीर्षातला पारा फारसा वर चढत नाही तरीदेखील ते ऊन नको नकोसे असते, मुलाची जडणघडण होण्यासाठी आईने कठोर व्हावे तसं याचं झालेलं असतं. थंडीने कोरड्या पडलेल्या त्वचेला हे ऊन सोसत नाही. मनाच्या एका भागास ऊन हवेसे असते तर दुसऱ्याला नकोसे असते. पौषातलं उन्ह नितळ निळ्या आभाळातून थेट अंगणात उतरतं. पानगळीच्या मौसमात पौषाची सांज थोडीशी उदास होते मात्र सकाळ अगदी प्रसन्न असते. कारण सकाळची अतिव कोवळी उन्हे जणू तान्ह्या बाळाची लुसलुशित मल्मली कायाच!
शिशिर ऋतूमध्ये माघ आणि फाल्गुन येतो. माघ महिन्यातील उन्हे रुक्ष असतात, ती एका तालात वाढत जातात आणि त्याच तालात उतरत जातात. सुगीचे दिवस संपत आलेले असतात आणि थंडीनेही हात आखडता घ्यायला सुरुवात केलेली असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नि गोंधळून गेलेल्या पौगंडावस्थेतल्या मिसरूडी पोरासारखं ऊन फाल्गुन मासात असतं. त्याचं थंडीवरही प्रेम असतं आणि उन्हाच्या तापत्या किरणांवरही जीव असतो. यातल्या कुणा एकाचाही विरह त्याला सोसवत नाही त्यामुळे दिवसा उन्हे आणि रात्री थंडी असा करार मदार करून तोडगा काढला जातो.
चैत्रातलं ऊन सकाळी सह्य असतं, दुपारी थोडंसं त्रास देतं.वैशाखातलं ऊन मात्र पोळतं. अंगाची लाही लाही होते. अक्षय तृतीया या पोळणाऱ्या उन्हांची तृषार्त साक्ष देते कारण या दिवशी धूळ पेरणी केली जाते. हेमंत ऋतूमध्ये ओलावा टिकून असतो, शिशिर ऋतूमध्ये ओलावा सरून शुष्कता येते. मग येतो वसंत ऋतू ज्यामध्ये चैत्र आणि वैशाख येतात. चैत्राच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुढी पाडव्याला कोरड्या झालेल्या मातीमध्ये नांगरट केली जाते. त्यानंतर 33 दिवसांनी अक्षय तृतीया येते. नांगरट केल्यानंतरची खत मिश्रित माती तण काढून आजच्या दिवशी खाली वर केली जाते. यालाच धूळपेरणी म्हणतात! आज पेरलेली धूळ म्हणजेच माती शेतीत कायम टिकून राहते असं मानलं जातं. मशागत आणि पेरणी यांच्यातला सुवर्णमध्य आजच्या दिवशी असतो.
तर काही भागात, विशेषतः कोकणात आजच्या दिवशी पेरणी देखील केली जाते. कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये पेरणी करणे सोपे जाते. हा पेरणीचा मुहूर्त असून ऐश्वर्य व संपन्नता आणणारा, विपुल धनधान्य देणारा मुहूर्त आहे अशी मान्यता आहे. आज पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धारणा आहे. आजच्या मुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मातीप्रती कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मातीमध्ये आळी घालतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते, असा गावाकडे समज आहे.
वैशाख सरला की ग्रीष्म ऋतू येतो. त्यातल्या ज्येष्ठ महिन्यात खरीप हंगामाची तयारी केली जाते. अक्षय तृतीयेनंतर बरोबर दीड महिन्यांनी पावसाळा येतो! आषाढ पाऊसमान घेऊन येतो. शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज होतं, पेरणीचे फुटवे वाढू लागतात. मग पांडुरंगाचे आभार मानण्यासाठी आषाढी वारीला बळीराजा कूच करतो. या सर्व कृषीजीवनाचा मध्य अक्षय तृतीयेस असतो! या दिवसाला अन्य काही दिनविशेषही आहेत. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जाते. महर्षी व्यास मुनींनी आजच्या दिवशी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे काहींच्या लेखी हा दिवस ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नवी खरेदी केली जाते, आज जे काही खरेदी केली जाते त्या वस्तूची वाढ होते, तिचा क्षय होत नाही असा समज असल्याने आज मोठ्या प्रमाणात सोने, वाहन, जमीन, सांसारिक वस्तू आदींची खरेदी केली जाते.
हिंदु कालगणनेच्या आख्यायिकांनुसार आजच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असे मानले जाते. चारधाम पैकी एक बद्रिकेदार या धामाचे दरवाजे आज खुले केले जातात. हे मंदिर अक्षयतृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. मध्ययुगात विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समता व बंधुत्वाचा संदेश देणार्या महात्मा बसवेश्वरांचा जन्मसुद्धा अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला. आपल्या परंपरेतील दोषांविरुद्ध बंड करावयाचे आणि मुख्य प्रवाहाशी भक्कम दृढतर नाते ठेवायचे, हा आपल्या सुधारणांचा आत्मा होय. दोषांचे निर्दालन आणि प्रगतीचा व परिवर्तनाचा पुनरुच्चार हा आपल्या परंपरेचा मध्यवर्ती धागा होय. तो अक्षयतृतीयेने जपला आहे.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. बांके बिहारी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र कृष्ण मंदिरांपैकी एक आहे. हरिदास हे तानसेनचे गुरु होत. त्यांची कृष्णावर निस्सीम भक्ती होती. ते वृंदावनस्थित निधिवनात कृष्णभक्ती करत, तिथे गायन करत. अशी मान्यता आहे की, भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिले! हे कुमार वयातले कृष्ण होते. हरिदासांच्या विनंतीवरून ते राधेसह प्रकट झाले! त्यांना पाहून हरिदास मंत्रमुग्ध झाले. त्यांचे शिष्यही त्यांना म्हणू लागले की, आम्हाला तुम्ही भगवंताचे दर्शन घडवावे. त्यांनी कृष्णाला आर्जवे केली. मग कृष्णाने त्यांना कायमस्वरूपी तिथे वास करेन असा वर दिला. ती जागा म्हणजे बांकेबिहारी मंदिर होय.
हरिदास गरीब होते. त्यांनी कृष्णाला आर्जव केलं की मी गरीब असून तुम्हाला रोज लंगोट नेसवू शकतो मात्र राधेला रोज नवी वस्त्रे कोठून आणू? त्यावर तोडगा म्हणून कृष्ण राधा एकाच मूर्तीत अवतरले अशी आख्यायिका सांगितली जाते. मुरली वाजवित किंचित मान वाकडी असणाऱ्या स्वरूपातले कृष्ण मुरारी म्हणून हे बांके बिहारी! या मंदिराची रचना पारंपरिक राजस्थानी शैलीत आहे, ज्यात सुंदर खांबांवरती नाजूक कोरीव काम आहे.
इथल्या रोजच्या दर्शनाचा एक शिरस्ता आहे, तो म्हणजे काही मिनिटासाठी मूर्तीसमोरचा पडदा हटवला जातो, याला झांकी असं म्हटलं जातं! काही मिनिटांत पडदा पुन्हा झाकला जातो! तेव्हढेच दर्शन. भक्त मानतात की बांके बिहारींच्या मूर्तीचे तेज इतके असते की माणसं भोवळ येऊन पडतात! त्यामुळेच कमी वेळासाठी दर्शन दिले जाते. सोशल मीडियाच्या अनेक रिल्समध्ये बांकेबिहारी आणि त्यांचे आसावलेले भक्त दिसतात. ही मूर्ती पूर्णतः काळ्या पाषाणामधली आहे. तिला स्त्री आणि पुरुष दोघांचा संयुक्त वेष चढवला जातो. बांके बिहारींचेही आजच्या दिवसाशी नाते आहे. कृष्णांचे बंधू बलराम. ते कृषक संस्कृतीचे प्रतीक होत. बलराम आजच्या दिवशी शेतातली कामे सुरु करण्यासाठी कृष्णाला भेटायला येतात तेव्हा त्यांना फुरसतीने भेटता यावे म्हणून आजच्या दिवशी बांके बिहारींचे दर्शन अधिक वेळ खुले ठेवले जाते.
वास्तवात बलराम म्हणजे साक्षात ईश्वर असे जरी मानले नाही तरी शेतीच्या नव्या हंगामकामांना सुरुवात करणारे शेतकरी त्या काळात आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तिथे येत असणार म्हणून आजच्या दिवशी तिथे दीर्घ दर्शन असू शकते. असो. श्रद्धेचा भाग म्हणून जरी याकडे पाहिले तरी अक्षय तृतीयेचे शेती-मातीशी आणि ईश्वराशी असलेले नाते समोर येते! म्हणून हा दिवस खास आहे!
– समीर गायकवाड
आजच्या कृषी पूजेविषयीची नोंद – अक्षय्यतृतीयेच्या दिवशी गावातील कुंभाराकडुन मातीचा माठ आणि एक छोटे मडके आणले जाते. नंतर त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकला जातो. त्यामुळे या पाण्याला सुगंध येतो. नंतर घरातील एखादा सदस्य जाऊन शेतातून पळसाचे पान आणुन त्याचे पत्रावळी व द्रोण हाताने तयार करतो. तो पर्यंत घरातील महिलामंडळी आमरसाचा स्वयंपाक करतात. (वेगवेगळ्या भागात भिन्न पदार्थ केले जातात) नंतर नैवैद्याचे ताट पत्रावळीवर काढले जाते त्यात आंब्याचा रस,पोळी, शेवयाचा भात, भजी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. पाण्याने भरलेल्या माठावर हे ताट ठेवुन ते पुर्वजाच्या फोटोसमोर ठेवुन फोटोची पुजा केली जाते. संपूर्ण कुटुंब आदराने पूर्वजांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशिर्वाद घेतात. पुढे पै-पाहुण्यातील एका पित्राला जेवायला बोलावलेले असते त्या पित्राचे पाय धुवून त्यानां गंधगोळी लावून त्यांना प्रेमाने जेवू घातलं जातं. विदर्भात आखजी नावाने अक्षय्यतृतीया साजरी होते.
GIPHY App Key not set. Please check settings