in

शोध मराठी रंगभूमीवरील ‘ती’च्या अस्तित्वाचा!

सिनेमाच्या तुलनेत नाटकाची परिणामकारकता अधिक आहे हे सर्वमान्य आहे. लेखकाला काहीतरी सांगायचे असते वा मांडायचे असते त्या सूत्राला नाट्यरूप देत नाटक आकारास येते. मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की बदलत्या काळानुसार रंगभूमीही बदलत गेलीय नि सादरीकरणापासून ते विंगेमागील घटकांच्या भावविश्वापर्यंत सारं काही बदलत गेलंय. नाटकांचे आशय बदलत गेले, नाटकांचे नेपथ्य वेष केशभुषा नि प्रकाशयोजना सारं सारं आमूलाग्र बदलत गेलं. त्यामुळेच नाटकांना समाजाचा आरसा असं म्हटलं गेलं तर त्यात वावगं असं काही नाही. मराठी रंगभूमीच्या मुहूर्तमेढीपासून ते अगदी अलीकडच्या नाटकापर्यंत नजर टाकली तर लक्षात येते की नाटकांनी जशी कात टाकलीय त्याहून अधिक वेगाने नि वैविध्याने नाटकांमधील स्त्री पात्रांनी कात टाकलीय. भारतीय रंगभूमीची सुरुवात ही भरताच्या नाट्यशास्त्रापासून सांगितली जाते. चारही वेदांतून आवश्यक बाबी एकत्र करून पंचमवेद तयार करण्यात आला; ज्यात सादरीकरणाचे मूल्य आणि प्रबोधनाची कास होती. भरतमुनी आणि त्यांच्या शंभर पुत्रांनी या पंचमवेदाचा अभ्यास केला. पौराणिक दाखल्यांनुसार स्वर्गात इंद्रसभेत ‘ध्वजामह’ नावाच्या महोत्सवात भरतमुनीने पहिले नाटक सादर केले, तेव्हा त्या नाटकातील स्त्री आणि पुरूष पात्रांचा अभिनय अप्सरांनी केला. म्हणजे नाट्यकलेची सुरुवात स्त्रियांकडून झाली. खरेतर स्त्रियांची पात्रे मुबलक हवी होती वा स्त्रियांच्या प्रश्नांवर नाट्यसंहिता पुष्कळ हव्या होत्या मात्र झाले उलटेच! नाट्यकला पृथ्वीतलावर आल्यावर महिलांना नाटकात प्रवेश करण्यासच बंदी झाली! जगभरातल्या लोकसंस्कृतीत जे घडत गेले तेच आपल्याकडेही घडले तेही अधिक प्रभावाने! हा प्रभाव पुरुषप्रधान संस्कृतीचा होता! समाजात हजारो वर्षे स्त्रियांवर अन्याय होत आला, त्यांची मुस्कटदाबी होत गेली मात्र त्याचे परिणामकारक चित्रण नाटकात अभावाने येत गेले. संस्कृतीच्या कडबोळ्याखाली स्त्रियांचे शोषण लपवून टाकण्यात समाजाच्या नैतिक ठेकेदारांना यश मिळाले. मात्र कोंबडे झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा राहील काय या न्यायाने स्त्रियांच्या प्रश्नांची नि भावभावनांची दखल रंगभूमीला घ्यावीच लागली!


एक काळ असाही होता की मराठी नाटकांत स्त्री पात्रांच्या भूमिकेसाठी स्त्रियांना रंगमंचावर प्रवेश नव्हता. संगीत नाटकांचा काळ पाहिला की याची प्रचिती येते. बालगंधर्वांचे नाव सर्वतोपरी झाले त्यामागची पार्श्वभूमी याची साक्षीदार आहे. वास्तवात त्या कालखंडातील नाटकांत देखील सामाजिक प्रश्न हाताळले जायचे. स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांचे शोषण यावरही प्रकाश टाकला जायचा परंतू त्या नाटकांतील स्त्रियांच्या भूमिका पुरुष साकारायचे अशी अवस्था होती! स्त्रियांना स्टेजवर येण्यास मज्जाव होता मात्र स्त्रियांच तिथे येत नसत असं सांगितलं जायचं, वास्तवात समाजाविरोधात बंड करून रंगमंचावर जाऊन अभिनेत्रीचे काम करण्याची उर्मीच कुणात नव्हती कारण प्रथा परंपरा यांचे भयंकर जोखड घेऊन तत्कालीन स्त्रिया जगत होत्या. जसजशा स्त्रिया शिक्षित होत गेल्या, त्यांना आपले हक्क कळू लागले नि स्त्रीच्या स्वावलंबनाचे वारे वाहू लागले. अर्थातच याला काही मोजक्या पुरुषांनी जबरदस्त समर्थन दिलेलं. स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रतिबिंब नाटकांत पडले नसते तर नवल झाले असते! हळू हळू नाटके आणि सिनेमा दोहोंत स्त्रिया अभिनय करताना दिसू लागल्या. बालगंधर्व, कृष्णा खाडिलकर, बळवंत किर्लोस्कर, गणेश बोडस यांच्या पावलावर पाऊल टाकत पती जयराम शिलेदार यांच्या साथीने जयमाला शिलेदार कधी रंगमंचावर अवतीर्ण झाल्या कुणाला कळलेच नाही. सुरुवातीला सनातन्यांनी छाती पिटली पण तो विरोध लवकरच नरम पडला. रसिकांना हा बदल हवाहवासा होता. त्याहीआधी 1886 साली जन्मलेल्या गिरिजाबाई केळकरांनी पुरुषांचे बंड हे नाटक लिहिलं! 1912 साली हे नाटक रंगमंचावर आलं.

हिराबाई पेडणेकरांनी वयाच्या विशीत 1905 साली ‘जयद्रथ विडंबन’ हे नाटक लिहिलं. त्यांचे ‘संगीत दामिनी’ हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते. किर्लोस्कर मंडळींनी हे नाटक करावे अशी हिराबाईंची इच्छा होती, पण ते घडू शकले नाही. ‘ललितकलादर्श’ने या नाटकाला यश मिळवून दिले आणि ते चार वर्षे रंगभूमीवर गाजत राहिले. हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता-निबंधलेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या ‘मनोरंजन’ मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यांनी लिहिलेल्या मीराबाईच्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. राम गणेश गडकऱ्यांच्या अखेरच्या दोन नाटकापैकी ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ (1919) ही नाटके ही रसिकमान्य आहेत. त्यातही ‘एकच प्याला’ मधील नलूचे पात्र हे पहिले लोकप्रिय स्त्री पात्र ठरावे. या नाटकाने रंगभूमीचा आणि पर्यायाने नाटकातील स्त्री पात्रांचा बाज बदलला. वरेरकरांच्या भूमिकन्या सीता (1955) या उत्तररामचरितातील एका नव्या व वेगळया वादळी ट्रॅजिडीमधील सीतेच्या पात्राची वाहवा झाली कारण अशा प्रकारे पौराणिक पात्रास थेट सामाजिक संदर्भ देणं धाडसाचं काम होतं. या दरम्यानच एक नवा अध्याय मराठी रंगभूमीवर आकार घेत होता तो म्हणजे विजया मेहता!

1951 पासून विजयाबाई भारतीय विद्याभवनातील नाटकांतून अभिनय करीत असत. ऑथेल्लो नाटकाचे मराठी रूपांतर झुंजारराव (1953) या नाटकातील ‘कमळजे’च्या भूमिकेपासून विजया मेहतांचा मुंबई मराठी साहित्य संघासोबतचा प्रवास सुरू झाला. साहित्य संघाच्या नाटकांतून त्यांनी प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून संशयकल्लोळ (भूमिका : कृत्तिका), तुझे आहे तुजपाशी (भूमिका : उषा), सुंदर मी होणार (भूमिका: दीदीराजे आणि मेनका) या नाटकांतून काम केले. विजया मेहता 1960 च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या चेहरा होत्या. त्याच साली त्यांनी नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक-अभिनेते अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत मुंबईत ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. 1973 – 1996 हा काळ त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर व्यतीत केला. विविध निर्मात्यांसाठी त्यांनी नाटके दिग्दर्शित केली आणि काही नाटकांतून अभिनय केला. मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी, पंखांना ओढ पावलाची, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष , वाडा चिरेबंदी ही नाटके केली. त्यांनी एतद्देशीय रंगभूमीबरोबरच आंतरराष्ट्रीय रंगभूमीवरही काम केले आहे. त्यांनी इंडो-जर्मन थिएटर प्रोजेक्टसाठी मुद्राराक्षस, शाकुंतल, हयवदन, नागमंडल आदी नाटके जर्मन रंगभूमीवर फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यासोबत आणि स्वतंत्रपणेही दिग्दर्शित केली. त्यातून दोन भिन्न देशांच्या संस्कृतींचा मिलाफ घडला.

दरम्यान एकपात्री पुरुष कलाकारांची नाटके रंगमंचावर आली होती मात्र एखाद्या स्त्री कलाकाराचे एकपात्री नाटक आले नव्हते. ‘व्हय, मी सावित्रीबाई’ हे नाटक 1989 मध्ये दाखल झालं. त्याचं जोरदार स्वागतही झालं. समाजव्यवस्थेशी नि बुरसटलेल्या सांस्कृतिक गोष्टींशी संघर्ष करताना केवळ पतीच्या जोडीने उभं राहण्यात समाधान न मानता मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई या नाट्यप्रवेशातून प्रेक्षकांना पुन्हा भेटल्या. ज्येष्ठ समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांच्या अशिक्षित, पण अंगभूत शहाणपण असलेल्या पत्नीची- बयोची गोष्ट नाटककार वसंत कानेटकर यांनी ‘हिमालयाची सावली’मधून मंचावरून मांडली गेली. याच काळात
विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकातल्या बेणारे बाईंच्या पात्राने रंगमंच गाजवला. स्वगताचा अतिशय गाजलेला प्रवेश अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी सादर केला. 1967 मध्ये मंचावर आलेल्या या नाटकानं त्या काळात अगदी नवीन असलेली आणि अजूनही तितकीच खरी वाटणारी एक स्त्री-भूमिका मराठी रंगभूमीला दिली. शाळेत शिकवणाऱ्या बेणारे बाई या मनस्वी शिक्षिकेला अभिरूप न्यायालयातल्या खटल्याचा सराव करताना बरोबरची मंडळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात, तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून तिला गिधाडांसारखं टोचून कोंडीत पकडतात, तेव्हा घायाळ पक्षिणीसारखी झालेली ही स्त्री या स्वगतातून समाजाला सुनावते, की तिच्या चारित्र्याबद्दल बोलायचा अधिकार कुणालाच नाही! आपल्या वाट्याला आलेल्या दिव्यंगत्वावर मात करत जगभरात आपल्या नावाचा झेंडा फडकावणाऱ्या हेलन केलर यांच्या जिद्दी शिक्षिकेची कथा ‘किमयागार’ या गाजलेल्या नाटकातून पुढे आली.

या दशकात आणखी एक डार्क शेडेड सेमीपॉर्न गणल्या गेलेल्या नाटकांचा हैदोस सुरू होता. वास्तवात अनेक चांगल्या नाटकांची प्रसिद्धी अकारण अश्लील, हॉट अँड बोल्ड अशी केली गेल्याने त्या नाटकांवर चुकीचे शिक्के बसले. जंगली कबूतर, अहो मी तुमचीच या नाटकांनी कहर केला होता. संस्कृतीरक्षकांच्या विरोधाचा फटका सखाराम बाईंडर, गिधाडे, पुरुष या टोकदार आशयाच्या नाटकांना बसला. या नाटकांच्या जाहिराती स्त्रीला उत्तान भडक दाखवले जाई, जेणेकरून निव्वळ आंबटशौकीनांना पर्वणी वाटावी! नाटकातल्या अभिनेत्रीकडे भोगवस्तू स्त्री म्हणून पाहण्याचा टिपिकल ‘धंदेवाईक’ दृष्टिकोन या काळात अधिक प्रकर्षाने समोर आला. कालांतराने हा ट्रेंड मागे पडला मात्र मागच्या दशकात ‘एक चावट संध्याकाळ, ‘अॅग्रेसिव्ह, ‘अश्लील वारे’ यासारखी फक्त प्रौढांसाठी असलेली नाटके आली. व्हजायना मोनोलॉग्ज’ या इंग्रजी नाटकाचे मराठी रुपांतर ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ नावाने रंगमंचावर आले. स्त्रीच्या दुर्लक्षित देहिक जाणिवांची वीण यात होती. सवंग गल्लाभरू अभिरुचीहीन नाटके नव्हती. यात अभिनय करणाऱ्या स्त्रियांना मानलंच पाहिजे कारण जे विषय बंद खोलीआड देखील खुलेपणाने चर्चिले जात नाहीत त्यावर थेट नाट्य सादरीकरण करणे ही साधी गोष्ट नाही. ‘मिस्टर अँड मिसेस’ या दशकापूर्वीच्या नाटकात नवरा-बायकोंमधल्या भांडणाचं, त्यांच्या ताणल्या गेलेल्या नात्याचं छुपे कॅमेरे लावून चित्रण करू देणारा अभिनेता नवरा आणि या ‘घटस्फोटाच्या रिअ‍ॅलिटी शो’बद्दल कळल्यानंतर मनातून कोसळलेली, पण त्यातही स्वत:ला सावरून नवऱ्यासमोर उभी राहणारी पत्नी यांचं कथानक होतं.

राजकीय सामाजिक परिघातले स्त्रीचे स्थान शोधणारी नाटकेही येऊन गेली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्त्रीविषयक मांडणी करणारी ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’ व ‘जग काय म्हणेल?’ ही तीन नाटके 1930 ते 1940 या दशकात लिहीली. मधल्या काळातील ‘आमदार सौभाग्यवती’चे नाव राजकीय नाटकांत अग्रस्थानी राहील. ‘अग्निपंख’मधील ‘बाईसाहेब’, ‘देहभान’मधील ‘दमयंती/ मावशी’, ‘कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’ आणि रातराणी’ नाटकातील ‘मिसेस् अ‍ॅना स्मिथ’ या व्यक्तीरेखांचा उल्लेखही करावा लागेल. तिला काही सांगायचंय’ (2019) हे हेमंत एदलाबादकर यांचे नाटकही टोकदार होते. रेल्वे स्टेशनच्या प्रतिभागृहात काही वेळासाठी थांबलेल्या पाच स्त्रियांच्या संवादातून पुढे सरकणारे ‘सेल्फी’ हे गतदशकातले नाटक याच जातकुळीचे! पर्ण पेठे अभिनित ‘अडलंय का?’ हे नव्या नाट्यबोलीचे नाटक याच वर्गवारीतले!

नव्वदच्या दशकातल्या ‘चारचौघी’मध्ये ‘नवऱ्यानं टाकलेली बाई’ हा शब्दप्रयोग रुळलेल्या आपल्या समाजात दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेमप्रकरण करून परत आलेला नवरा स्वीकारायचा की नाही, हे ठरवणारी मानी स्त्रीही असू शकते हा टोकदार संदेश होता. हा विषय आता कालसुसंगत वाटत असला तरी त्या काळात बाईनं आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून घटस्फोट मागणं समाजात अनेकांच्या भुवया उंचावणारं होतं! ‘संगीत देवबाभळी’ या 2018 मध्ये रंगमंचावर आलेल्या आणि अतिशय वाखाणल्या गेलेल्या द्विपात्री नाटकात विठोबारायाची रखुमाई आणि तुकोबांची आवली या दोघींच्या संवादातून केवळ त्यांचेच नव्हे तर हरेक स्त्रीमनाचे चौकटीत बंदिस्त असलेले पदर उलगडले होते. संस्कृती, पारंपारिकता आणि आधुनिकता याच्या विचित्र कोंडीत प्रत्येक क्षेत्रातील निर्मितीशील व्यक्तीच्या आयुष्यात आलेला एखादा साक्षात्कारी क्षण आपल्याला सांस्कृतिक संचिताचे नेमके भान देतो, मुळांची जाणीव करुन देतो. श्रुती मधुदीप अभिनित ‘पाच फुटाचा बच्चन’ या दिड वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेल्या एकपात्री नाटकात गावखेड्याच्या मातीतील हा सांस्कृतिक संघर्ष नेमकेपणाने समोर येतो. हरवू पाहणारी मूल्ये गवसण्याची शक्यता वाढते. 

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

सुखाचे घर!

बारा वाड्यांचं “आगरवायंगणी”