हरवलेली धुळवड...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

खेड्यांनी धुळवडीचा दणका भारी असतो.आदल्या दिवशीच्या होळीचा आर विझत आलेला असला तरी त्यात विस्तवाचे निखारे असतात, त्या निखाऱ्यांवर पाण्याने भरलेली घरातली पातेली, हंडे ठेवले जातात. मग पाणी किंचित कोमट होतं. त्याच पाण्याने राहिलेला आर विझवला जातो. चांगला रग्गड चिखल केला जातो. उरलेलं गरम पाणी घरी नेलं जातं. या पाण्याला विशेष गुणधर्म असतो अशी एक जुनाट बात यामागे असते. दरम्यान घरोघरी लाल रश्श्याचा बेत होतो. पूर्वी हरेक घरी चुली असत तेंव्हा अख्ख्या गावात पिसाळलेल्या वासाचा जाळ व्यापून असे. आता सिलेंडर महाग झाल्याने पुन्हा सरपण आणि चुली दिसू लागल्यात, मातीचा लेप लावलेल्या पातेल्यात आधण ठेवलं जातं. सकाळीच पडलेले वाटे रटरटून शिजतात.जमेल तसे घसे 'ओले' होतात. ताटं वाढली जातात. बुक्कीत कांदा फुटतो, करकचून लिंबू पिळले जातात. नाकातून पाणी येईपर्यंत तिखट जाळ रस्सा भाकरीचा कुस्करलेला काला दाबून हाणला जातो.पोटं तटतटून गेली की वेशीपाशी पसरलेल्या होळीच्या चिखलात मस्ती सुरु होते. पार एकमेकाला लोळवून अंगाखांद्यावर चिखल लेप्ला जातो. हौसे गवसे नवसे त्या चिखलात पाणी ओतत राहतात. चिखल काही केल्या हटत नाही.गावकीचे एकेक जथ्थे येत राहतात. वरच्या खालच्या आळीतले मधल्या गल्लीतले सगळेच येतात, कचकून शिव्या हासडल्या जातात.काहींची बाचाबाचीदेखील होते, काही हमरातुमरीवर येतात मग केसाची चांदी झालेली गावातली जुनी शिसवी लाकडं मधी पडतात आणि तंटा वाढू देत नाहीत.काहींची जुनी भडास बाहेर निघते. पार सात पिढ्यांचा उद्धार केला जातो. मग शहाणी सवरती मंडळी त्यांचं भांडण मिटवून देतात.कैक दिवसापासून एकमेकाच्या बांधावर कुऱ्हाडी परजणारे हात एकमेकाला चिखल लावतात.काहींची नशा इतके चढते की पायजामे फाडले जातात, सदऱ्यांचे हातुपे टरकावले जातात, फाटलेल्या कपड्यांची लक्तरे विजेच्या तारांवर नाहीतर वेशीतल्या पिंपळावर भिरकावली जातात.काही तर्राट झालेली दोनचार जणं तिथंच लोळत पडतात. उन्हे वरकड होतात आणि वेस ओस पडते.दिवसभराच्या कामाने थकलेल्या बायका माजघरात पाठ टेकतात तर कर्दमल्या अंगाने घरात शिरलेली पुरुष मंडळी न्हाणी घाण करून बायकांचं काम वाढवून ढेलजेत निजायला मोकळी होतात.दिवस कलण्याच्या बेतात आला तरी जांभया जारी असतात, नंतर घरोघरच्या गड्यांचं घोरणं हळूहळू आकसत जातं.पडवीवर चुळा भरून माणसं ताजीतवानी होतात. सांजप्रहरी मंदिराच्या कळसाला स्पर्श करून दर्ग्याच्या मिनारांहून केशरी प्रकाश किरणे तिरपी होत लयाला जातात. वेड्या वाकड्या भरगच्च झाडांच्या सावल्या मातीत विरून जातात. पाखरांची किलबिल अन् गायींच्या गळ्यातल्या घंटांचा नाद एकजीव होऊन आसमंतात घुमत राहतो. पाकोळ्या सांदीत विसावतात, आपापल्या फटीत कपारीत पारवे निश्चल होऊन जातात.काहीशा आळसावलेल्या पावलाने अंधार गावात शिरतो, वेशीपाशी पारावर बसलेल्या कष्टकऱ्यांच्या गप्पा कान देऊन ऐकतो. जुनी माणसं आजच्या दिवशी एकेक तंटे बखेडे कसे निकाली निघाले याचे गणित मांडू लागतात. कुणी एक भावनावश झालेला फाटक्या धोतरातला जीव भाऊबंदकी संपल्याचे कबूल करू लागतो, अंधाराचे डोळे पाणवतात !रात्र गडद होत जाते. गाव गाढ झोपी जाते. देवळाच्या गाभाऱ्यातले विठू रुखमाई मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसतात, ओलेत्या डोळ्यांनी गावाचं प्रेमळ स्वरूप अंतःकरणात साठवतात.खरे तर धूळवडीचा दिवस हा दंगामस्तीचा, शिव्या देण्याचा असं एक समीकरण जनमानसात रुजवलं गेलंय. पण वास्तव तेव्हढेच नाही. या निमित्ताने मनातला विखार बाहेर काढण्यास प्रोत्साहित केलं जातं, माणसांची मने रिती केली जातात, सगळे कढ रिकामे केले जातात मग उरतो तो एकच तोंडवळा ! तो म्हणजे आपुलकीने सद्गदित झालेल्या माणुसकीचा ! ज्यायोगे तुटलेली मने जोडली जातात !खरे तर यामागे गावजीवनाचे काही आडाखे आहेत, माणूसपणाचे काही इंटरेस्टिंग धागे आहेत !चैत्र येतो आणि जमिनीतलं पाणी घटू लागतं, वैशाख वणव्यात पाण्याची मोठी टंचाई होते. गुरांना चारा उरत नाही. सरत आलेली कामे डोंगराएव्हढी वाटू लागतात. शेतीतली औजारे आणणं एकट्या दुकट्याला झेपत नाही. कुठल्या न कुठल्या कामासाठी सायड करावी लागतेच ! कशाची ना कशाची नड पडतेच ! मग आठवतो तुटलेला माणूस, गमावलेला माणूस, दुरावलेला माणूस ! म्हणूनच धुळवडीच्या दिवशी मने सांधली जातात. नात्यातली वीण घट्ट केली जाते.मात्र ही धुळवड आता इतिहासजमा झालीय. आता माणसं मनातली गोष्ट बोलून दाखवत नाहीत. घुमनघुस्की झालीत. डूख धरून बसतात. मिटवून घ्यायला दोन पावलं मागं सारायला क्वचित कुणी तयार असतो. ज्याला त्याला मीपणा आलाय ! आजही वेशीतल्या होळीच्या आरात चिखल होतो मात्र तिथे आता मने जुळत नाहीत, नुसता राडा असतो. ती धुळवड केंव्हाच मातीत मिसळलीय.गावाकडं आता धुळवडीला खूप मोठे बेत केले जातात. घमेले भरून मटणाचे वाटे शिजतात, त्यातलं जुनं सत्व खूप आधीच ऊतू गेलंय ! पूर्वी होळीची पुरणपोळी खूप गोड लागायची. आताही गोड लागते मात्र त्यातला गोडवा कमी झालाय कारण माणसं कडवट होत चाललीत.धुळवडीच्या शुभेच्छा !- समीर गायकवाड.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!