स्वातंत्र्यवीर सावरकर - विशेष लेख

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

२६ फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यदिन त्यानिमित्त......स्वातंत्र्यवीर सावरकर - विशेष लेखलेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगलअल्प परिचय:       स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नांव विनायक दामोदर सावरकर. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गांवी २८ मे १८८३ रोजी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. तेथे त्यांनी एल्. एल्. बी चा अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासून त्यांच्यावर क्रांतिकारक विचारांचा प्रभाव होता. १ जानेवारी १९०१ रोजी त्यांनी 'मित्रमेळा' नामक संघटना स्थापन केली. पुढे इ. स. १९०४ मध्ये तिचे नाव 'अभिनव भारत' असे ठेवण्यात आले. या संघटनेच्या सभासदांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची शपथ घ्यावी लागे. अभिनव भारत संघटनेमार्फत सावरकरांनी तरूणांत राजकीय जागृती निर्माण केली आणि त्यांना क्रांतिकारी कार्याकडे वळविले.        सावरकर इ. स. १९०६ मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी 'जोसेफ मँझिनी' या इटालियन देशभक्ताचे चरित्र लिहिले. इ. स. १८५७ च्या उठावासंबंधी 'भारतीय स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. हा उठाव म्हणजे बंड नसून स्वातंत्र्ययुद्ध होते असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. इंग्लंडमध्ये त्यांचा अनेक भारतीय क्रांतिकारकांशी संबंध आला. या क्रांतिकारकाना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. सावरकर एक साहित्यिक व विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध होते. माझी जन्मठेप, भारतीय स्वातंत्र्यसमर, संन्यस्त खड्ग, हिंदु पदपादशाही, कमला हा काव्यसंग्रह व काळे पाणी ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. इ. स. १९३८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जगभर गाजलेली साहसी उडी:       इंग्लंडमध्येच राहून इंग्रज सरकारवर दहशत निर्माण करण्याचे काम सावरकरांनी केले. पुढे त्यांचे अनेक सहकारी पकडले गेले. मदनलाल धिंग्राना फाशी झाली. कांहीना तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे आपले इंग्लंडमध्ये राहणे हे धोकादायक आहे, असं समजून त्यांनी भारतात परतण्याचा निश्चय केला. पण भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच इंग्लंड च्या व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांना पकडण्यात आले. राजद्रोह आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.       सावरकरांवर खटला चालविण्यासाठी त्यांना 'मोरिया' जहाजावरुन भारतात नेण्याचे ठरले. त्यांना मोरिया जहाजावर चढविण्यात आले. जहाज काही दिवसाच्या प्रवासानंतर 'मार्सेलिज' या फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बंदराजवळ आले. सावरकर पहारेकऱ्याला म्हणाले, "मला शौचालयात जायचे आहे". पहारेकरी त्यांना शौचालयाकडे घेऊन गेले. सावरकरांनी आतून दरवाजा बंद केला आणि आतील हालचाली कळू नयेत म्हणून शौचालयाच्या काचेवर आपला ओवरकोट ठेवला आणि त्यांनी पोर्टहोलमधून स्वतःला बाहेर झोकून दिले. समुद्रात उडी घेतली. शरीरावर जागोजागी खरचटले होते, ओरखडे निघाले होते. त्यातून रक्त निघत होते, पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. भारताचे स्वातंत्र्य आणि विकास हेच अंतिम ध्येय मानलेल्या सावरकरांच्या डोळ्यासमोर फक्त आपले ध्येय दिसत होते.       बराच वेळ झाला तरी कैदी बाहेर येत नाही हे लक्षात येताच त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही पहारेकरी जहाजावरच्या डेकवर धावत आले, पहातात तो काय! सावरकर समुद्रातून विजेच्या वेगाने मार्सेलीजकडे चालले होते. जहाजावर गोंधळ उडाला. 'कैदी पळाला...कैदी पळाला' असा गलका झाला. ताबडतोब समुद्रात पहारेकऱ्यांच्या उड्या पडल्या. तोपर्यंत सावरकर फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचले होते. आता या परक्या भूमीवर इंग्रजांची सत्ता नसल्यामुळे आपल्याला पकडण्यात येणार नाही असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांना पकडण्यात आलं आणि पुन्हा जबरदस्तीने मोरियावर चढविण्यात आले.       सावरकरांची ही साहसी उडी त्रिखंडात गाजली. भारतात तर स्वातंत्र्यवीराचे नांव ज्याच्या-त्याच्या तोंडी आले. इंग्रज सरकारचे नाक चांगलेच कापले गेले. असे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. भारताचे स्वातंत्र्य आणि भारताचा विकास हेच त्यांचे ध्येय होते, हाच त्यांचा श्वास होता.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीस आमचे शतशः प्रणाम।
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!