सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.*** ***** सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील. इन्स्टाग्राम हे माध्यम तरुण अधिक प्रमाणात वापरतात. १४ ते २४ वयोगटाचे वापरकर्ते तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. लिंक्डइनचा वापर २१ ते ३५ वयोगटाचा अधिक असून बहुतांशी प्रोफेशनल कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. व्हॉटसएपचे माध्यम फॉरवर्ड टाईपच्या मजकुरासाठी अधिक वापरले जाते इथे थेट संवादाचा अभाव आहे. तुलनेने फेसबुक हे लेखन वाचनाचे मोठे माध्यम आहे. मात्र १४ ते २५ वयोगटातील युजर्स इथे एकूण संख्येच्या नगण्य प्रमाणात आढळतात. २५ ते ३५ वयोगटातील युजर्स इथे टाईमपास, फोटो शेअरिंग, संगीत गाणी रिल्स मेसेंजर इत्यादीमध्ये अधिक रमतात. मुळात ते फुरसतीच्या वेळातच इथे येतात कारण ते त्यांच्या करिअरच्या प्रारंभ काळात वा जॉब सीकिंगच्या टप्प्यावर असताना इथे आलेले असतात. नवं प्रेम ओसरून जीवनाचा जोडीदार नुकत्याच गवसलेल्या स्थितीत ते इथे दाखल झालेले असतात, सबब त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लेखन वाचनानुषंगाने साहित्यातील वैचारिक प्रगल्भता इत्यादीसंबंधीचा खासच नसतो. ३५ ते ४५ हा वयोगट मुख्यतः इथे तत्सम गतिविधीत सामील असतो. या खालोखाल ४५ ते ५५ या वयोगटातील युजर्स येतात. ५५ ते ६५ वयोगटातील युजर्स देखील इथे बऱ्याच प्रमाणात असतात मात्र वाचन वगळता त्यांचा वावर हा इमोजी कमेंटण्यापुरता असतो. सक्रिय चर्चा, देवाण घेवाण वैचारिक दृष्टिकोनांची चर्चा यावर ते फारसे व्यक्त होत नाहीत कारण त्यांच्या आयुष्यातल्या अनेक वळणवाटांवर त्यांनी खूप काही अनुभवलेलं असतं त्यामुळे इथे येऊन पुन्हा नव्याने डोकेफोड करावी याकडे त्यांचा कल नसतो.फेसबुकवरील विविध ग्रुप्स आणि त्यांचे आशय विषयमी त्यातील युजर्सचे सरासरी वय पाहिले तरी वरील गृहितकांची प्रचीती यावी.आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया -ज्यांचे वय ३५ ते ४५, ४५ ते ५५ आहे अशांच्या साहित्यविषयक परीघातून समोर येणारे मुद्दे असे दिसतात - पुलं, वपु, जीए, गोनिदा, गदिमा, रणजित देसाई इत्यादीच त्यांच्या मते अजूनही वाचनप्राधान्यक्रमात प्रथमस्थानी असतात आणि त्यांचेच लेखन त्यांना श्रेष्ठ वाचनीय वाटते. त्यांच्या बाहेरचे अनेक लेखक त्यांना ठाऊक नसतात, या वर्गातील कुणाचीही नावे इथे लिहीत नाही कारण दिवसभरात अशी खूप नावे लिहिली गेलीत की ज्यांच्या विषयी आताच्या वाचकांना खूप कमी ठाऊक आहे.म्हणजेच ज्यांचा जन्म ऐंशी ते नव्वद दरम्यानचा आहे अशांच्या वाचनप्राधान्यात तीच जुनी नावे आहेत जी त्यांच्या जन्माआधीपासून प्रस्थापित होती! मागील दहा वीस वर्षात मराठी साहित्यात काय नवे लिहिले गेलेय किंवा कोणती जोरकस पुस्तके लिहिली गेलीत असे विचारले तर दोनचार लेखकांच्या नावापुढे कित्येकांची गाडी सरकत नाही, पुस्तकांची तर नावे देखील सांगता येत नाहीत अशी अनेकांची अवस्था असते मात्र याच मंडळींना तीन दशकांपूर्वीच्या लेखकांविषयी भरभरून बोलावे वाटते, त्यावर लिहावे वाटते हे नाकारता येणार नाही. म्हणजेच ही मंडळी साहित्यद्वेष्टी नाहीत मात्र यांना नव्याचा सोस नाही की नव्या लेखनाविषयी ओढ नाही, फारशी माहिती नाही आणि त्याविषयी जाणून घेण्याची ऊर्मीही नाही!इथे फेसबुकवर काही मान्यवर नामवंत लेखक, समीक्षक, संपादक, प्रकाशक मंडळी सक्रिय असतात त्यांच्या साहित्य विषयक पोस्ट्स पाहिल्या तर असे लक्षात येते की सामान्य माणूस ज्याला विचारप्रवण, वैचारिक, बोजड, गहन, प्रबोधनात्मक, क्लिष्ट, तत्वज्ञानाधारित व तर्कवादी अशा वर्गवारीत घालून मोकळा होतो अशा पुस्तकांविषयीच तिथे अधिक चर्चा असते. भरीस भर म्हणून त्यावर कठीण शब्दांत चिकित्सा असते. प्रेम, रोमँटीसिझम यावर आधारित पुस्तकांना थिल्लर उठवळ मानण्याकडे कल मोठया प्रमाणांत जाणवतो. जीवनावर भाष्ये करणारी साधेसुधे आशय विषय असणारी पुस्तके हा यांचा चर्चा विषय असत नाही, जितक्या गहन कठीण आशय विषयांची पुस्तकांची भलामण करता येईल तितकी केली जाते. जे विषय सामान्य वाचकांना बोजड वाटतात त्यावरच इथे वादावादी नि चर्चा जारी असते, त्यात सामान्य फेसबुक युजर सामील नसतोच! एका ठराविक परिघातील मंडळी यात सहभागी असतात. मग या पुस्तकांना वाचक लाभत नाही, यावर सामान्य वाचकांत व्यापक चर्चा होत नाही असा दावा करण्यापूर्वी विचार करायला हवा.त्याचवेळी उदाहरण म्हणून अशी एक तक्रार केली जाते की जे. के. रोलिंग या लेखिकेने लिहिलेली हॅरी पॉटर सिरीजमधली पुस्तके जगभर लोकप्रिय झाली, त्यांच्या लाखो प्रति खपल्या वगैरे वगैरे. मग मराठीतील नवी पुस्तके का वाचली जात नाहीत असा प्रश्न विचारला जातो. वास्तवात आजघडीला या जॉनरमधलं मराठी साहित्य लेखन कुणी करत असेल तर त्याच्या विषयीची चर्चाच ही कथित साहित्यिक मंडळी करणार नाहीत कारण ही गोष्टच इथे बौद्धिक व प्रगल्भ मानली जात नाही. मग त्यावर नामवंत साहित्यिक समीक्षक मंडळी काय म्हणून बॊलतील?'तो फलाणा काय लिहून लिहून काय लिहिणार आहे - प्रेम, रोमान्स, जीवनानंद, मेलोड्रामा, फालतू फिक्शन या पलीकडे त्याची झेप जात नाही' याची त्यांना खात्री असते.म्हणजे हे विषयच त्यांनी गौण ठरवलेले असतात.मात्र ज्या मुख्य वयोगटातील फेसबुक युजर्स इथे सक्रिय असतात त्यांच्या लेखी हेच विषय जिव्हाळ्याचे होते नि आहेत, त्यांना आवडणाऱ्या लेखकांनी हेच बिंदू केंद्रस्थानी ठेवून लेखन केलेलं असल्याने तो परीघ मोडून बाहेर पडावेसे वाटत नाही. त्यामुळे राहून राहून त्यांच्या किशोरवयात जे वाचनसंस्कार झाले त्याकडेच ओढ घेतात. नवी पुस्तके, नवे लेखक, नवे आशय विषय, नवी वर्गवारी हे सर्व या वाचकांच्या समोर येण्यात साहित्यजगत कमी पडले हे मान्य केले पाहिजे. मग असे का घडले यावर आत्मचिंतन केलं जाणं अपेक्षित आहे. मागील दोन दशकांच्या कालावधीत मराठी साहित्यात विनोद, भय, शृंगार या साहित्यरसांना तसेच क्राईम, थ्रिलर, एरॉटिक वर्गवारीतले लेखन करणारे किती लेखक या वाचकांना ठाऊक आहेत? बालसाहित्य हा साहित्यप्रकार विशीच्या पुढील वयाच्या किती वाचकांच्या साहित्यजाणिवांत आहे? ज्या पुस्तकांना अत्यंत नावाजलेले पुरस्कार दिले जातात अशी पुस्तके किती लोक वाचत असतात किंबहुना त्यांना लोकाश्रय लाभतो का याची प्रामाणिक चिकित्सा कोण नि कशी करणार? 'मास व्हर्सेस क्लास' किंवा 'तिथे गर्दी आहे इथे दर्दी आहेत' अशा वाक्याचा आधार घेऊन काही समीक्षक लेखक मंडळी काही आशय विषय मोडीतच काढत असतील तर केवळ त्यांच्याच आत्मीयतेचा विषय असणाऱ्या पुस्तकांचा खप, त्यांना लाभणारी लोकप्रियता, त्याअनुषंगाने केली जाणारी साधक बाधक चर्चा त्यांनी न केलेली बरी.***** इथे एक वाक्य नेहमी वाचनात येते की लोक आजकाल वाचत नाहीत. माझ्या मते हे एक सफेद झूठ आहे. छापील मजकुराचे डिजिटल साधनांवरचे वाचन, इंटरनेटवर उपलब्ध असणारे फुकटचे कंटेंट, पीडीएफ व अन्य डिजिटल स्वरूपातले लेखन, विविध वेब पोर्टल्सवरील साहित्य आणि सोशल मीडियावर उपलब्ध असणारे लाखो पोस्टकर्त्यांचे (लेखक?) लेखन हे ही वाचले जातेच की! कित्येकांच्या ब्लॉगची आजवर लाखोंच्या घरात वाचने झालीत. फेसबुकची नवी प्रोफेशनल टूल्स वापरली आणि त्यातून समोर येणारा डाटा खरा मानला तर एका पोस्टचा रिच काही लाखमध्ये जातो आणि पोस्ट एंगेजमेन्ट काही हजारात जाते, रिऍक्शन्स शेकड्यात दिसतात. आपल्या लेखनावर वाचक किती वेळ रेंगाळला होता हे उमजते. इथे काय वाचले जाते?की याला वाचनाच्या पुस्तकी व्याख्येत गृहीत धरायचेच नाही?की या लेखनासच कथित साहित्यजगताची मान्यता नाही?की हे सगळेच लेखन त्यांच्या लेखनकर्त्यासह टुकार टाकार समाजायचे? याचाही विचार व्हायला हवा.यातही आणखी काही मेखा आहेत.चांगल्या नि नामवंत प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या प्रकाशकांना नव्या लेखकांची पुस्तके छापण्यात शून्य स्वारस्य असते (अपवादाचा आधार घेऊन सत्य नाकारता येत नाही!) ज्यांची नावे मोठी झालेली असतात वा जी नावे पूर्वापार माथी मारली जात असतात अशांचीच पुस्तके ते छापत राहतात. मग नव्यांना लोकाश्रय नाही अशी ओरड कशाच्या आधारे केली जाते? वाचकांचा कल विख्यात प्रकाशनगृहांकडे असतो हे सर्वश्रुत आहे. साहित्य संमलेनात देखील ही मंडळी दादागिरी करून नव्या प्रकाशकांना स्पेस मिळू नये यासाठी कार्यरत असतात मग नव्या प्रकाशकांकडून प्रकाशित केले जाणारे कथित नव्यांचे लेखन लोकांपर्यंत पोहोचणार तरी कसे?'तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो' या न्यायाने वागणारे कैक साहित्यिक(?) इथे दिसतात. त्यांच्या परिघाबाहेरील लेखकाच्या साहित्यकृतीविषयी ते विलक्षण मौन धारण करतात. नव्या लेखकांच्या नव्या पुस्तकांविषयी कौतुक वा गुणदर्शक मुद्दे मांडता येत नसतील तर निदान त्यातील दोषदर्शन देखील केले जावे पण तेही केले जात नाही. जेणेकरून त्या पुस्तकाविषयी कमीत कमी चर्चा होते परिणामी ते पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्यात अजूनच कमी पडते. कदाचित इतरेजनांच्या साहित्यकृतीविषयी काहींचा अंतस्थ हेतू हा असू शकतो. दरम्यान 'ज्यांच्या भलाईत आपलं भलं आहे' अशांच्या पुस्तकांबाबतीत मात्र ओळखीच्या नि बैठकीतल्या मंडळींना हाताशी धरून पेप्रात चर्चा घडवून आणणे, अपार कौतुक करणारे रिव्ह्यूज लिहिले जाणे, साहित्यविषयक वर्तुळांत त्याविषयी चर्वितचर्वण करवणे असे प्रकार केले जातात. ही चाटूगिरी मोठ्या प्रमाणात सोशलमीडियावर आढळते! सद्यघडीला पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांपासून ते पंचविशीत असणाऱ्या तरुणांपर्यंतच्या मराठी वाचक वर्गात कोणते साहित्य वाचले जातेय याविषयीचा काही डाटा उपलब्ध नसणे आणि त्यांच्या अभिरुचीविषयी कमालीची तुसडी भावना बाळगणे या दोन गोष्टी येणाऱ्या काळात या विषयाला अजूनच खोलात घेऊन जाणाऱ्या आहेत.सरते शेवटी काही गोष्टी लेखकाच्या पुस्तक विषयक दृष्टीकोनाबद्दल मांडतोय- आजघडीस मराठीत मला दोन प्रकारचे लेखक जाणवताहेत, एक म्हणजे 'माझे पुस्तक तुम्ही वाचा न वाचा मला त्याने काही फरक पडणार नाही' अशी काहीशी आढ्यताखोर भूमिका असणारे होत.तर दुसरे म्हणजे आपलं पुस्तक वाचकाने वाचावे यासाठी धडपड करणारे होत.पहिल्या वर्गवारीतील लेखकांच्या भूमिकेमागे त्यांची काहीएक वैचारिक भूमिका असू शकते त्यावर आपल्याला तक्रार असण्याचे कारण नाही. या वर्गवारीतील लोकांनी खप आणि आवृत्ती याविषयी बोलू नये असा नैतिक संकेत असायला हवा.दुसऱ्या वर्गवारीतील लॆखकांचे अनेक उपवर्ग पडतात.जसे की ओळख वापरून, विविध कंपूंच्या कुबड्या वापरून, परस्पर हितैषी भूमिका घेऊन, विविध प्रकारची प्रलोभने दाखवून आपलं पुस्तक वाचलं जावं यासाठी प्रयत्नरत असतात.मोफत पुस्तक वाटणे नि आपण होऊन स्वखर्चाने पुस्तके छापून आणणाऱ्या लेखकांचाही एक उपवर्ग आहे. तर काहींची प्रामाणिक मार्गाने धडपड सुरु असते. पुरस्काराचे वेष्टन लावलं की पुस्तकास थोडंसं महत्व प्राप्त होतं नि त्यावर थोडीफार चर्चा होते म्हणून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे पुरस्कार मिळवण्यासाठी लॉबिंग(!) करून पुस्तक विक्रीचा पैस वाढवणे हा देखील एक लेखकवर्गच होय.पुस्तकास व्यावसायिक स्वरूपाचे प्रॉडक्ट मानावे की न मानावे याविषयी कन्फ्युजन दिसते. पुस्तकास प्रॉडक्ट मानण्यास अनेकांचा नकार असतो असं करणे म्हणजे उथळ बाजारू उठवळपणा करणे हा समज अत्यंत दृढ केला गेलाय.कुटुंबातील तीनेक लोकांमध्ये पाचशे सहाशे रुपयांचे तिकीट काढून लोक जो सिनेमा बघून त्यास स्मृतीचा भाग बनवून घेतात त्या सिनेमांचे प्रोफेशनल लॉंचिंग आजकाल सर्रास होते. मात्र दीडदोनशे ते तीनचारशे रुपये मूल्य असणाऱ्या आणि भौतिक स्वरूपात वाचकांसोबत राहणाऱ्या पुस्तकांचे अत्यंत थंडनिर्विकारपणे प्रकाशन होते. त्यात संबंधित लेखक प्रकाशकांचे मित्र, आप्तेष्ठ परिचित नि तुरळक साहित्य रसिकांचा अपवाद वगळता काही रिकामटेकडे लोक सामील असतात. सामान्य वाचक वर्गाचा सहभागच या प्रक्रियेत नसतो. मग सामान्य वाचकांना या पुस्तकांविषयी कळणार तरी कुठून? पुस्तकांचे टीझर्स बनवणे, युट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवर त्या पुस्तकाच्या मुख्य बिंदूंवर फोकस करणे, विविध शहरांत पुस्तकातील काही मजकुराचे सार्वजनिक वा नियोजनपूर्वक अभिवाचन करणे, लेखकाने प्रकाशकाने पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यन्त पोहोचण्यासाठी विविध डिजिटल साधनांचा वापर करणे, सामान्य वाचकांचा त्यात सहभाग वाढवण्यासाठी नवनवीन चांगल्या क्लृप्त्या लढवणे (आपलं प्रॉडक्ट विकलं जावं यासाठी नैतिक मार्गाने जाणाऱ्या जितक्या काही चांगल्या मार्केटिंगच्या कल्पना आहेत त्यांचा अवलंब करणे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. बहुसंख्य मराठी लेखकांना यात कमीपणा वाटतो वा याचा न्यूनगंड असावा. इतकं सारं विरोधात असताना नव्या पुस्तकांच्या खपाबद्दल नि वाचनप्रमाणाबद्दल बोलणं अनाठायी आहे.अखेरचा मुद्दा -गावखेड्यात राबणारे शेतकरी, छोट्या नि मध्यम शहरात राहणारे रोजच्या कमाईवर गुजराण करणारे, मोठ्या शहरातले पॊटाची लढाई लढणारे नि श्रमिक कष्टकरी लोकांसह गरीब तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांनी साहित्य वाचावे म्हणून कोणते विशेष प्रयत्न कुठे केले जाताहेत का? उदाहरणार्थ मोठाल्या शहरातील बकाल वस्त्यात राहणारा नि भंगार वेचणारा माणूस काही वाचत असेल का किंवा बांधकाम मजूर, मोलकरीण, हमाल तोलार, सफाई कामगार, रोजंदारी कामगार अशा असंख्य श्रमिक शोषित वर्गातील माणसं वाचत असतील काय आणि जर वाचत असतील तर त्यांचे प्राधान्य कशाला असेल यावर कुठे काही चर्चा मराठी साहित्य जगतात होते का? पाककलेची पुस्तके आणि लाइफगुरु पठडीतील आयुष्यच्या सक्सेसचा फंडा सांगणाऱ्या पुस्तकांचा वाचकवर्ग मुख्य साहित्य प्रवाहाकडे वळवण्यासाठी कोणते प्रयत्न झाले आहेत? सामाजिक उतरंडीत तळाशी असणाऱ्या लोकांनी मराठी पुस्तके वाचावीत यासाठी कुठल्या साहित्यविषयक संस्थांनी किती प्रयत्न केले आहेत? आजही खंडेराव आणि नेमाडे हाच ज्यांच्या जिव्हाळयाचा विषय असतो त्यात आताच्या पंधरा ते पंचवीस वयोगटातील किती मंडळी आहेत याचे मूल्यमापन कोण नि कसे करणार? ज्यांच्या साहित्यिक जिव्हाळ्याचा हा विषय आहे ती मंडळी बहुतांशी तिशीच्या, चाळीशीच्या पुढची आहेत मग ऐंशी नव्वद नंतर दखल घेतलं जावं असं काही लिहिलंच गेलं नाही की ते लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचलं नाही याचे उत्तर प्रामाणिकपणे शोधायला हवे. उच्चदर्जाचे समीक्षक वा आस्वादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळींपैकी किती लोक खुल्या दिलाने समग्र पुस्तकव्यवहाराविषयी खरी परखड मते मांडतात? एक वर्ग तर असा आहे की कादंबरी म्हणजेच लेखन अशी त्यांची धारणा आहे मग तर सर्वच प्रश्न निकाली निघतात. जुन्यांना मोडीत काढायचे असेल तर खुशाल काढले जावे मात्र त्याआधी नव्यांची किमान नावानिशी साधी चर्चा तरी व्हावी, त्यांची नावे तरी लोकांसमोर पोहोचली जावीत यासाठी मराठी साहित्य जगतात किती जागरूकता आहे हा संशोधनाचा विषय व्हावा.मी एक साधा वाचक आहे. सहा वर्षांपासून सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन तसेच विविध वर्तमानपत्रांत नियतकालिकांत सदरलेखन करतोय. आगामी काळात माझीही काही पुस्तके प्रकाशित होतील हे प्रांजळपणे नमूद करून सांगू इच्छितो की वरील विचार माझ्या आकलनानुसार मांडले आहेत त्यात काहींना त्रुटी उणिवा दोष जाणवू शकतात जे स्वाभाविक आहे. तरीदेखील या मुद्यांचा विचार व्हावा असे मनापासून वाटते.- समीर गायकवाड.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!