सासुरवास........!!
By SnehalAkhila on मन मोकळे from https://hallaagullaa.blogspot.com
तुझी आई डोक्यात जाते हं माझ्या बरेचदा!! सारखी आपली मागे लागलेली असते माझ्या. घरात पाऊल ठेवल रे ठेवलं की कामाला लावते. चहा पण सुखाने पिऊ देत नाही.तो पिता पिताच जरा तेवढी कोथिंबीर आणून द्या, दळण आणून द्या, चमचमीत खावं वाटतय वडा पाव आणून द्या, नाक्यावरचा ढोकळा आणून द्या अन् बाकी काही नाही आठवलं तर पोट जड झालंय इनो आणून द्या, धक्क्याला लावतेच आपली. तुझं बरं आहे तुला यायला होतो उशीर, मी आपला समोर सापडतो. मला समोर बघूनच एक एक आठवतं की काय कोण जाणे!! महिना झाला की आता, कधी जाणार आहे परत? कपाळावर शक्य तितक्या आठ्या पाडत महिनाभरातच सासुरवासाला कंटाळलेल्या मयूरने रसिकाला त्रासलेल्या सुरात विचारलं.आपल्या आईबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य रसिकाला सहन झालीच नाहीत. तिने लगेच मयूरचा धिक्कार करायला सुरुवात केली.माझी आई बिचारी तुला मुलासारखं मानून एकेक कामं सांगते, तर तुला त्याचा त्रास होतो मयूर? वाटलं नव्हतं माझ्या आईबद्दल तू असा विचार करत असशील!! एकुलती एक मी मुलगी तिची राहिली आल्यासारखी दोन महिने सुखाने तर लगेच तुझ्या पोटात दुखायला लागावं?खरंतर तू तिला दोन महिन्यात काय जाता, रहा की आणखी महिनाभर असा आग्रह केला पाहिजेस. किती छान वाटेल तिला!! केलाही असता ग. चुपचाप पडून राहिली असती तर नक्की केला असता. पण तुझी आई जरा म्हणून मला बसू देत नाही. एकतर कामावरून थकून यायचं, आणि हिने एकेक कामं काढून पळायला लावायचं. कुणाला वैताग नाही येणार सांग? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); स्वैपाकाला लावत नाही हेच नशीब माझं!! आणखी राहिली ना तर ते सुद्धा करायला मागेपुढे पाहणार नाही, लिहून देतो मी. आत्ता दहा मिनीटांपूर्वी बघ ना, तू समोर होतीस तरी मला सांगून गेल्या, मी समोरच्या मंदिरात जातेय. मी यायच्या आत तेवढं मशीन लावून घ्या. तुलाही सांगू शकल्या असत्या ना? मुलगी नाही दिसत, मीच दिसतो का? मी तर हात टेकले बाई तुझ्या आईपुढे!! मी नाही लावणार जा, मशीन बिशीन!! मयूर तोंड वाकडं करून आतल्या बेडवर जाऊन लोळत पडला.तशी रसिकाही आत आली. आणि त्याला म्हणाली, आज तू जे काही बोलतोयस, ते मी सुद्धा चार महिन्यांपूर्वी बोलले होते. ते सगळं आठव. म्हणजे तुला आपोआप सारं लक्षात येईल. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); रसिकाने आठवण करून देताच मयूरच्या सगळं डोळ्यासमोर आलं. जेव्हा त्याची आई आली होती गावावरून. अगदी तेव्हाही रसिका असंच सारं त्याला सांगत होती. तुझी आई उगाच शोधून शोधून मला काम देत बसते रे. सकाळी वेगळी भाजी. त्यातली उरली असेल तरी रात्री नवीन दोन भाज्या, गरम गरम भाकऱ्या आमच्याकडे अशीच पद्धत आहे, म्हणून करायला लावते. तू लवकर येतोस, तुला मस्त आराम मिळतो. आणि मी आल्यावर मात्र मला जरा निवांत दोन घोट कॉफी घ्यावी वाटली तर काम आवर पटपट. जेवायला उशीर होईल नाहीतर म्हणून मागे लागते.स्वतः काही करून ठेवत नाही. सुनेकडे जाऊन फक्त आराम करायचा एवढंच डोक्यात ठेवलय तिने. तुला जराही हलवत नाही. तुला सगळं हातात देतेय, आणि तिने नाही दिलं तर मला द्यायला लावतेय. आणि तू ही मस्त मजा घेतोयस त्या सगळ्याची. जरा बोलून बघ ना तिच्याशी. थोडी तरी मदत करायला सांग ना तिला. कामावरून येऊन थकून एवढं सर्व करायला त्राण नसतो अंगात. बघ ना जरा सांगून त्यांना.त्यावर त्याने दिलेलं उत्तर देखील सटकन् आठवलं त्याला, अन् मात्र मनात आता कुठं चलबिचल झाली. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); रसिका एवढ्या आर्जवाने सांगत होती तरी मयूरला जराही काही वाटलं नव्हतं. उलट त्यावेळी तो बेजबाबदारपणे म्हणाला होता, एवढ्यात कंटाळलीस माझ्या घरच्यांना? तरी बरं कायमसाठी नाही आलेत. दोन तीन महिने राहतील आणि जातील. आपल्या मुलाकडे नाही येणार तर कुठे जाणार?तेवढं सहन करायला काय होतं तुला?मयूर त्यावेळी तसं म्हटला कारण मयूरच्या स्वतःच्या अंगावर काही आलं नव्हतं. पण जेव्हा आलं तेव्हा त्याला त्याची जाणीव झाली. तो बेडवरून उठला, आणि रसिकाला म्हणाला, कळलं मला. मी त्यावेळी आईशी बोलायला हवं होतं. तुझी बाजू मांडायला हवी होती. आपल्या डोक्यावर सदैव कोणी बसून राहण्याचा त्रास मला आता कळला.रसिका त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली, मला झाला त्याच्या खूप कमी पटीत होता तरी तू महिनाभरात वैतागलास. मी तीन महिने कसे काढले असतील याची तुला आता थोडीतरी कल्पना आली असेल. त्या जाताना सांगून गेल्या होत्या, आता होळीनंतर येऊ तुझ्याकडे राहायला तीन-चार महिने. म्हटलं त्याच्या आधी तुला ठिक करावं. म्हणजे होळी झाल्यावर सुद्धा मला कुणाच्या नावाने बोंबा माराव्या लागणार नाहीत.आईला सांगते आता तुला रिलीज करायला.......पण एका अटीवर!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अट मंजूर!! मी माझ्या आईशी नक्की बोलेन ती आल्यावर. आणि तिने नाही ऐकलं तर मी मदत करून हलकं करेन तुझं काम. तुला एकटं पाडणार नाही नक्कीच!!आता कृपा करून सोडव मला या सासुरवासातुन, मयूर अगदी हात जोडून म्हणाला.रसिकाने हसत आईला फोन लावला आणि म्हणाली, लवकर ये ग. सासुरवासातून मुक्त होण्यासाठी जावई तुझ्या पायावर लोटांगण घालायचं म्हणतोय!!चला, म्हणजे पडदा पडला म्हणायचा नाटकावर. खाष्ट सासूचा रोल संपला एकदाचा. देव सगळ्या मुलींच्या नवऱ्यांना माझ्या जावयासारखी सुबुद्धी देवो, असं म्हणत तिच्या आईने फोन बंद केला.तिच्या मनात आलं, नवरा पाठीशी असेल, त्याला जाण असेल, तर कुठल्या मुलीला सासुरवास जाणवेल?ती हसत सहन करेल सगळे घाव, जर तिचा त्या घरातला सर्वात जवळचा, विश्वासाचा व्यक्ती; तिचा नवरा, त्यावर प्रेमाची फुंकर घालायला सदैव पुढे असेल.........काय वाटतं तुम्हाला........?? रसिकाच्या आईचं बरोबर तर आहे ना?©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});