सत्संग........!!
By SnehalAkhila on मन मोकळे from https://hallaagullaa.blogspot.com
नलावडयांच्या घरी सासू सूनेला घरादारात वादळ निर्माण करणाऱ्या आगलाव्या आणि चटकदार प्रसंगांनी खच्चून भरलेल्या मालिका सोडून सत्संग ऐकायची सवय कुठून जडली कोण जाणे!!दोघी सकाळी बरोब्बर सात वाजता टिव्हीसमोर अगदी देवासारख्या शांत बसून ज्ञानार्जन करत. समोरची ज्ञानवाणी ऐकताना मनोमन आता आपण अगदी असंच वागायचं, असा पक्का निर्धार करत.सासूच्या डोळ्यासमोर प्रत्येक उदाहरणात सून येई तर सुनेच्या डोळ्यासमोर सासू!!"या संसाराच्या मायेतून आपण मुक्त व्हायचं, करु दे तिचं तिला काय करायचं ते. आपण नुसतं लांबून बघायचं. अजिब्बात कशातही मन घालायचं नाही." रोज म्हणजे रोज अगदी न चुकता सासू सत्संग ऐकून झाला की हे ठरवायचीच.अन् तिकडे त्यांच्या सुनेचं पण अगदी असंच मनात चालू असायचं."जाऊ दे, किती दिवस राहिलेत सासूचे आता. त्यांची सेवा हेच माझं कर्तव्य असायला हवं खरंतर. काय होतं चार शब्द ऐकले त्यांचे तर, झिजणार थोडीच आहे मी? एवढ्याही वाईट नाहीत तशा. तोंड थोडं खराब आहे इतकंच. दुर्लक्ष करायचं आता. नाहीतर काय उपयोग एवढा सत्संग ऐकून?" (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); शहाणपणाचा डोस पिऊन झाल्यावर साधारण अर्धा तसा, कधी कधी फारतर एक तास दोघी एकमेकींना प्रचंड मान द्यायच्या. आदराने बोलायच्या, कुणाचं काही चुकलं तर सोडून द्यायच्या. सकाळी छान अंगावर घ्यावं वाटणारं कोवळं ऊन कसं नंतर नंतर पारा वाढल्यावर नकोसं वाटू लागतं. तसंच हळूहळू त्यांच्याही सकाळी घेतलेल्या शहाणपणाच्या डोसाची मात्रा त्यांनाच जड व्हायला लागायची. नुकतीच तासापूर्वी केलेली प्रतिज्ञा त्यांच्या स्मृतिपटलावरून नंतर भुर्रर्र उडून जायची.मग संसारातून मुक्त होऊ पाहण्याचा ठराव स्वतःशीच पास केलेली सासू, सुनेच्या हातून एखादं भांडं पडलं, तरी डोक्यात तिडीक जाऊन ओरडायची, "हं, पाडा पोचे पाडा. सगळ्या भांड्याची विल्हेवाट लावा एकदाची. आम्ही मेला इतकी वर्षे संसार केला, एकेक भांडं जीवापाड जपलं. ह्या महाराणीच्या हाताला तर हीss मोठं मोठाली भोकं आहेत नुसती भोकं!! सगळ्या भांड्याची दुर्दशा करून टाकलीय माझ्या.हे बोलता बोलता, सासूच्या मनात हळूच सत्संग सांगणारे बुवा यायचे आणि म्हणायचे , "बाई सोड आता हा मोहपाश!! ठरवलं तशी वाग!! मुक्ती मिळेल तुला!! कसली ती क्षुद्र भांडी घेऊन बसलीयेस?" (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "असं कसं? माझी सगळी भांडी माझ्यासमोर टणाटणा आपटून पिचकवतीये ही भवानी, त्या मुक्तीचं नंतर बघू," म्हणत सासू बुवांना आल्या पावली मनातल्या मनातूनच माघारी फिरवून टाकायची. तिकडे सुनेलाही भांडणाची खुमखुमी चढलेली असायची, तीही उकसवायची सासूला, "काय बाई जीव अजून काही सुटत नाही त्या भांड्यातला. माणसावर नाही तेवढं त्या भांड्यावर प्रेम. आडव्या पडलात की भांडी नाही येणार तुमचं करायला!!""तू त्याचीच वाट बघ हा!! मेले ना तरी हडळ होऊन तुझ्या डोक्यावर नाचेन माझी भांडी आपटवलीस तर......""नाचा किती नाचायचय ते थयाथया!! तुमच्या सारख्या दहा हडळींना पुरून उरेन कळलं? दांडगे-पाटील नाव आहे म्हटलं माहेरचं!!"सत्संगवाले बुवा सुनेलाही मनातून हलवायचे, "बाई वरती तुझं कर्म नोंदवलं जाणार ग. दांडगे की लांडगे नाव नाही काही........." (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "वरचं बघू वरती गेल्यावर," म्हणून सुनही 'एक्स्क्युज मी' करून मनातून त्यांना फटदिशी बाजूला सारून टाकायची.तास सरला की उरलेला दिवस दोघींची टकळी संसारातल्या अनेकानेक फुटकळ कारणावरून जी सुरू व्हायची, ती अखंड सुरूच राहायची. सत्संगवाले बुवा दोघींच्या मनात डोकावून डोकावून दोघींंना आवरायचा आटोकाट प्रयत्न करायचे बिचारे, पण नलावडे सासू सुनेला नंतर नंतर त्यांचा डिस्टर्बन्स असह्य होऊन, त्याच मग आपल्या मनातून बुवांना मुक्ती देऊन टाकत. दोन्ही नलावडे बाया दिवसभर कामापेक्षा एकमेकींशी वचावचा करूनच अगदी मेटाकुटीला येत. रात्री आपापल्या नवऱ्यांच्या डोक्याशी दिवसभराचं कुचकुच करत बसत. यांच्या भांडणाशी लेना न देना असणाऱ्या नवऱ्यांना त्या अशांततेतही शांत झोप लागे.मग याही उशीर झाला बाई, सकाळी लवकर उठायचंय, नाहीतर सत्संग बुडेल म्हणून गुडूप करून झोपुन जात.सकाळी डॉट सातला हातातलं सगळं काम सोडून टिव्हीतल्या बुवांच्या समोर बसत. सगळं काही कानात जीव टाकून नीट ऐकत. तस्सच सगळं वागायचं ठरवत. टिव्हीतले बुवा सर्वाना उद्देशून रोजच म्हणत, "व्रतच घ्या, काहीही झालं तरी सर्वांशी, अगदी शत्रूशीही चांगलंच वागायचं."या दोघी माना हलवून 'हो घेतलं, अगदी आत्तापासून घेतलं म्हणत.'अन् तासाभराने स्वतःहूनच त्यावर पाणीही सोडत!!नलावडे सासू सून मोठ्या चिकाटीच्या हं बाकी, आजपर्यंत ना सत्संग सोडला, ना भांडण!! वर्ष झालं आता, आणखी किती वर्ष या बायांना सुधरवण्यात बुवांची जातील कुणास ठाऊक?कसं होणार यांच्या मुक्तीचं देवच जाणे बाबा!!मी म्हणते, सांगितलं कोणी होतं यांना, भलता नाद लावून घ्यायला, उगाच आपला माझ्या अन् बुवांच्या जीवाला नसता घोर????©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});