शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

एका शापित राजहंसाची दास्तान..    शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल. त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याआधी सद्यकाळात घडलेल्या दोन घटनांचा इथे उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. काही दिवसांपूर्वी शैलेंद्र यांची जात सार्वजनिक केल्याबद्दल काहींनीं विरोध केला होता. दिनेश शंकर याने आपले वडिल शैलेंद्र यांचा "अंदर की आग" या कवितासंग्रहाच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली यांनी तो प्रकाशित केला. या पुस्तकाच्या मनोगतात दिनेश शैलेंद्र यांनी आपल्या वडिलांची सामाजिक पार्श्वभूमी (बिहारची धुसिया चर्मकार जात) उघडपणे नमूद केली. या पुस्तकाचे प्रकाशन करताना सर्वोच्च समीक्षक डॉ. नामवर सिंग यांनी शैलेंद्र यांना संत रविदासांनंतरचे सर्वात महत्त्वाचे दलित कवी असे वर्णन केले. पण शैलेंद्र यांची जात उघड करण्यावर अनेक साहित्यिक आणि लेखकांनी आक्षेप घेतला. तेजिंदर शर्मा या लेखकाने सोशल मीडियावर आपला आक्षेप नोंदवताना असेही म्हटले आहे की, डॉ. नामवर सिंह यांनी केवळ शैलेंद्रच नव्हे तर सर्व साहित्यप्रेमींचा अपमान केला आहे. मुद्दा असा आहे की एखादे महान व्यक्तिमत्व जर दलित असेल तर त्यांची जात उघड करायला काय हरकत आहे? ब्राह्मण किंवा इतर उच्चवर्णीय व्यक्तींच्या जातींचा उघडपणे प्रचार केला जातो, तेव्हा कोणी आक्षेप नोंदवत नाही. मात्र दलित व्यक्तिमत्त्वाची जात उघड करण्यास विरोध केला जातो हा दुटप्पीपणा होय.यानंतर आणखी एक घटना मीडियाने पुरती दाबून टाकली. 21 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी 3 वाजता, मुंबईत शैलेंद्रच्या मुलाच्या लग्नाच्या 31 व्या वर्धापनदिना निमित्तच्या कार्यक्रमात चक्क सशस्त्र गुंड घुसले होते. बेसबॉल बॅट आणि काठ्या घेऊन सुमारे तीसेक गुंड त्याच्या घरात घुसले. त्यांनी दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल  हिसकावून घेतले आणि त्यांना एका कोपऱ्यात बसवून घरातील प्रत्येक वस्तू समोरील ट्रकवर चढवली. एक चमचाही सोडला नाही. या गुंडांनी शैलेंद्रच्या हस्तलिखित कविता, पत्रे, पुरस्कार आणि ट्रॉफी हिसकावून घेतल्या. त्यांना बळजबरीने दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीला ट्रकमध्ये बसवायचे होते, मात्र त्यानंतर तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि पोलिस येण्यापूर्वीच गुंडांनी ट्रकसह पळ काढला. दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीने त्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र आजतागायत पोलिसांनी ना माल जप्त केला ना गुंडांना पकडले. पोलिसांनी केवळ एकाला पकडले होते, परंतु त्यालाही चौकशीसाठी रिमांडवर न घेता सोडले गेले. माध्यमांचा आणि प्रशासनाचा हा सापत्नभाव कशासाठी? हीच घटना कुण्या उच्चवर्णीय वा कथित उच्चभ्रू व्यक्तीबाबतीत घडली असती तर त्याचे ठळक मथळे दिसले असते. मात्र शैलेंद्रांच्या बाबतीत असे घडले नाही. केवळ जातीपायी त्यांना त्यांच्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील करिअरला मुकावे लागले होते हे कुणी नाकारेल काय? असे असूनही त्यांच्या जातीय व डाव्या वैचारिक जडणघडणीचा मुद्दा झाकून ठेवावा असं म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांची सुरुवातीची जडणघडण,  साम्यवादाकडे झुकणारी त्यांची वैचारिक बैठक, जन्माने दलित असण्याने वेळोवेळी नाकारलं जाणं, अंगी अफाट कौशल्य असूनही आश्रितासारखं जिणं जगताना मनाचं एकारलं होत जाणं नि नंतरच्या काळात जीवनात येत गेलेले विलक्षण उतार चढाव, जीवघेणा संघर्ष आणि अखेरीस आलेले अपयशाचे दाट झाकोळ हे सारं त्यांच्या कवितांमधून जाणवतं. त्यांच्या रचना बेगडी न ठरता त्यात एक प्रकारचं आपलेपण हरेकास जाणवतं. आजच्या काळात लोक ज्या विखारी विभाजनवादी भाषेत बोलतात त्या भाषेत सांगायचे झाले तर शैलेंद्र 'आपले' नव्हते, आताच्या लोकांनी 'बायकॉट शैलेंद्र' अशी मोहीम चालवली असती. बिहारमधील आरा जिल्ह्यातील धुसपूर गावातील दलित कुटुंबातील शैलेंद्र यांचा जन्म 30 ऑगस्ट 1927 रोजी रावळपिंडी (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील केसरीलाल आणि आई पार्वतीदेवी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बिहारमधून रावळपिंडीला स्थलांतरित झाले. जिथे त्यांचे वडील केसरीलाल राव ब्रिटिश मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (जे मुरी कॅन्टोन्मेंट एरियात होते) कंत्राटदार होते. शैलेंद्र लहानपणापासूनच आधी रावळपिंडी आणि नंतर मथुरेत आपल्या वडिलांसोबत राहत असल्याने त्याचा गावाशी विशेष संबंध नव्हता. त्यांच्या गावातील बहुतेक लोक शेतमजूर होते. रावळपिंडीत त्यांच्या मातापित्यास कठोर परिश्रम करावे लागले. अवघे काही दिवस सुखाचे आले मात्र हा आनंद दीर्घ काळ टिकला नाही. दुःख जणू पाठलाग करत त्यांचा मागोवा घेत समोर उभं ठाकलं. केसरीलालना आर्थिक नुकसान सोसावे लागले, कुटुंब रस्त्यावर आले. पोटापाण्याचे हाल सुरू झाले. तरीही  स्वाभिमान कुणाची मदत मागू देत नव्हता. अखेर रेल्वेमार्गाचे काम पाहणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावास या परिस्थितीविषयी कळले नि मग ते स्वतः तिथे आले. हलाखीत अडकलेल्या केसरीलालला कुटुंबासह घेऊन ते मथुरानजीक गावी आले. मथुरेत कुटुंबाची आर्थिक समस्या इतकी वाढली की शैलेंद्र आणि त्यांच्या भावांनी भुकेने मरावे म्हणून वडील त्यांना विडी ओढायला लावले. एवढ्या आर्थिक अडचणींनंतरही शैलेंद्रने मथुरा ते इंटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीने शैलेंद्रच्या मार्गात काटे आणले होते आणि एक वेळ अशी आली की भगवान शंकरावर अपार श्रद्धा असलेल्या शैलेंद्रनी देवाला दगड मानले. गरिबीमुळे त्यांच्या एकुलत्या एक बहिणीवर उपचार करता आले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. या दरम्यानच्या काळात शैलेंद्र यांच्या मातोश्री पर्वतीबाई यांच्या प्रकृतीची अत्यंत हेळसांड झाली, दातावर मारायला देखील पैसा नसल्याने त्यांनी आजारपण लपवलं होतं. घरादारच्या चिंतेने ग्रासलेल्या त्या माऊलीने आपला इहलोकीचा प्रवास खूप लवकर संपवला. शैलेंद्र बालवयात असतानाच त्यांची आई अकाली गेली. त्यांची आई कमालीची देवभक्ती करणारी सोशिक भारतीय स्त्री होती, आपल्या आईने इतकी कठोर भक्ती आराधना करूनदेखील ती एकाएकी देवाघरी गेल्याने शैलेंद्र नास्तिकतेकडे झुकले. आईचं अकाली जाणं त्यांना चटका लावून गेलं, पुढे जाऊन ती पोकळी सदैव त्यांच्या कवितांत डोकवत राहिली. आई गेल्यानंतर ते अबोल नि अंतर्मुख राहू लागले. मथुरा येथे शिक्षण घेत असताना इंद्र बहादूर खरे नावाच्या एका कवीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनाही कवितेचे आकर्षण जाणवू लागले. खऱ्या अर्थाने इथे त्यांच्या लेखणीचा जन्म झाला. त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. वडील कामावर गेलेले असत, घरात आई नसे. घर खायला उठे. मग पौगंडावस्थेतले शैलेंद्र यमुनेच्या काठी जाऊन बसत. इथे त्यांच्या मनाचा तळ ढवळून निघत असे. नदीला साक्षी ठेवून आपल्या मानातल्या भावनांना त्यांनी शब्दरूप देण्यास सुरुवात केली. तरीही त्यावर ते समाधानी नव्हते. आपल्या कविता वाचकांसमोर याव्यात असं त्यांना राहून राहून वाटू लागलं. आग्रा शहरात प्रकाशित होणाऱ्या नया युग, साधन या मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. प्रारंभी ‘शचीपती’ या टोपणनावाने त्यांनी या कविता लिहिल्या. त्यांचे खरे नाव शंकरदास असले तरी त्या नावाने ते फार कमी ओळखले गेले.कविता लिहिताना आपल्या अंतःकरणाचा ठाव त्यांना खोलवर गवसला. भवतालाकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन मिळाला. आपल्या आईवडिलांची ससेहोलपट त्यांनी पाहिली होती, आजूबाजूच्या श्रमिकांचे शोषण पाहताना त्यांच्या मुठी वळत. मात्र त्यावरचे प्रहार त्यांनी शब्दांमधून केले. त्यांच्यातल्या देशप्रेमाच्या ज्योती इतक्या दाहक होत्या की स्वातंत्र्यलढ्यात ते कारावास भोगून आले. त्यांच्या कवितेतली बंडखोरी इथूनच प्रसवली मात्र तिचे प्रकटन त्यांच्या प्रकृतीसारखंच सौम्य सुसंस्कृत नि नितळ होतं. कसेबसे शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना हॉकी खेळताना पाहून काही विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि ‘आता हे लोकही खेळतील’, असे त्यांना हिणवले गेले. याची परिणती शैलेंद्रांच्या खचण्यात झाली. त्यांनी संतप्त होऊन त्यांनी आपली हॉकी स्टिक फोडली. शैलेंद्र अत्यंत दुखावले गेले. जड अंतःकरणाने त्यांनी आवडत्या क्रीडा क्षेत्रास अलविदा केलं. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम असणं गरजेचं होतं. मुंबईतल्या अक्राळ विक्राळ आकाराच्या अजस्त्र यंत्रांनी सुसज्ज असलेल्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात ट्रेनी म्हणून त्यांना नोकरी मिळाली. अकरा रुपये पगारात त्यांना निर्वाह करायचा होता. या दरम्यानच्या काळातच त्यांच्या विचारसरणीवर डाव्या विचाराचा पगडा पक्का झाला. एकीकडे जगराहाटीत त्यांची दमछाक होत होती तर दुसरीकडे मनातला संवेदनशील कवी स्वस्थ बसू देत नव्हता. कवितेचं प्रसवणं जारी होतं. रेल्वे क्वार्टरच्या खोलीत बसून कविता करणाऱ्या शैलेंद्रना त्यांचे मित्र हसत असत. त्यांची टवाळी करत, हा नाद सोडून त्यानं कामात लक्ष घालावं असा सल्ला ते देत. शैलेंद्र मात्र त्याकडे दुर्लक्ष करत."काम नये नित गीत बनानागीत बनके जहाको सुनानाकोई ना मिले तो अकेले में गाना.. "हा त्यांचा पिंडच झाला होता.काम सुटल्यानंतर ते पृथ्वीराज कपूरच्या रॉयल ऑपेरा हाऊससमोर असलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या कार्यालयात वेळ घालवत असत. रोज संध्याकाळी कवी तिथे जमायचे. याच काळात ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ची सांस्कृतिक शाखा, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये सामील झाले आणि त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील समाजवादी-थीम असलेली कविता आणि गाणी लिहायला सुरुवात केली. “हर जोर-जुल्म की टक्कर में, हरताल हमारा नारा है” (प्रत्येक अत्याचार, प्रत्येक अतिरेकाविरुद्ध संप हे आमचे हत्यार आहे) अशी प्रसिद्ध घोषणा त्यांनी तयार केली, आजही आंदोलक ही घोषणा वापरतात.त्यांच्या लेखणीतला दमदार आशय पाहून ‘हंस’ या हिंदी मासिकात त्यांच्या कविता छापून येऊ लागल्या ज्याचे संपादक हिंदीतले ख्यातनाम नि लोकप्रिय लेखक प्रेमचंद होते. मुंबईने शैलेंद्रच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पण मनातली तगमग शांत बसू देत नव्हती. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी आणि बेकलाईटी या मर्ढेकरी कवितांसारखं त्यांचं आयुष्य यंत्रांच्या गोंगाटात दडपून गेलं होतं. कबीर नामदेव नि तुकोबांच्या विचारधारेची शब्दकळा त्यांच्या कवितेत नेटाने आढळते. हा कालखंड भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचा परमोच्च काळ होता. बापूंनी 'चले जाव'चा नारा दिला होता. काय नि कोणासाठी लिहायचं याचं द्वंद्व त्यांच्या मनी सुरू असे.  देशभरात भारत छोडोची मोहीम भरात आली होती कवी मनाच्या शैलेंद्रवर याचा प्रभाव पडणं साहजिक होतं. त्यांनी हिरीरीने यात भाग घेतला, कारावास भोगला. आपली लेखणी क्रांतीसाठी मशालीसारखी परजायची असं त्यांनी मनोमन ठरवलं. इंडिअन नॅशनल थिएटरच्या नाटकांमध्ये हाती डफ घेऊन स्वरचित गीत गाणारे शैलेंद्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असत. पारतंत्र्य, गुलामी, क्रांतीकारकांचा विद्रोह हे त्यांच्या गीतांचा विषय झाले.एके दिवशी अशाच एका मुशायऱ्यात शैलेंद्र गात होते.'जलता हुआ पंजाब... ' हे गीत होतं आणि समोरच्या श्रोत्यांत होते राजकपूर!राजकपूरना शैलेंद्रच्या गीतांची इतकी भुरळ पडली की कार्यक्रम संपताच त्यांनी थेट भेट घेत आपल्या सिनेमांसाठी गीतलेखन करण्याची ऑफरच दिली! मात्र स्वाभिमानी बाणेदार वृत्तीच्या शैलेंद्रनि ती ऑफर धुडकावून लावली. आपण आपली कला विकणार नाही, ती पोट भरण्यासाठी वापरणार नाही. देशभक्तीसाठीच तिचा उपयोग केला जाईल असं ठासून सांगितलं. तरीही आरकेने त्याला आर्जव केलं की, 'जेंव्हा कधी त्याचा इरादा बदलेल वा कधी कशाची गरज पडली तर त्याने बिनधास्त यावं, आरकेची दारं त्याच्यासाठी सदैव खुली असतील!'इतके बोलून हिंदी सिनेमाचा तो बेताज बादशाह निघून गेला आणि पुढे जाऊन शैलेंद्र त्याच्या गीतांच्या दुनियेत रममाण झाले होते."योद्धा हम दोनों एक ही मैदान केपरदेसी कैसे चाल चल गयाझूठे सपनों में हमको छल गयावो डर से घरसे निकल तो गयापर दो आँगन कर गया मकान के..."हिंदू मुस्लिम यांच्यात इंग्रज जो द्वेष पेरत होते त्याला उत्तर देणारं हे गीत शैलेंद्रच्या मनात काय चाललं होतं याची ग्वाही देतं. आताच्या धर्मद्वेषानि ग्रासलेल्या काळात अशी प्रभावी गाणी असणं बरंच अहमियत असणारं ठरलं असतं. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्याच गीतांच्या कैफात शैलेंद्र जगत होते आणि याच दरम्यान त्यांच्या आयुष्याला नवे वळण देणारी घटना घडली.1948 मध्ये एका नातलगाच्या लग्न सोहळ्यास हजर राहण्यासाठी ते झाशीला आले होते. इथेच त्यांची भेट शकुंतलेशी झाली, शकुंतला त्यांच्या दूरच्या नात्यातली होती. उभयतांचे सूर जुळले, पुढे जाऊन त्यांनी विवाह केला. त्यांच्या दांपत्य जीवनाची सुरुवातच कठोर परिश्रमाने नि संघर्षाने झाली. लग्नानंतर ते दोघे मुंबईस रवाना झाले. रेल्वेच्या नोकरीत मिळणारा तुटपुंजा पगार त्यांच्या संसारास पुरात नव्हता. नियतीने त्यांची कठोर परीक्षा बघायचं ठरवलं होतं, शकुंतलेस दिवस गेले. तिने गोंडस मुलाला जन्म दिला आणि कुटुंबाची ओढाताण वाढत गेली.आपल्या हेकेखोर स्वभावाने आणि फुकट फौजदारकीने कुटुंबाच्या अर्थार्जनास फटका बसतोय हे शैलेंद्रना उमगत होते. अखेर आपल्या पत्नीची आणि तान्ह्या बाळाची फरफट त्यांना असह्य झाली. शकुंतलेस माहेरी पाठवण्याइतके पैसेही आपल्याकडे नसावेत याचे त्यांना अतिव शल्य झाले. आपणच यास कारणीभूत असल्याची टोचण लागली.त्याचक्षणी त्यांना राजकपूरचे ते शब्द आठवले. अधिक विलंब न करता त्यांनी आरकेचे महालक्ष्मीला असलेलं ऑफिस गाठलं. दरबानाने त्यांना गेटवरच अडवलं. त्यासरशी त्यांनी केवळ शैलेंद्र आला आहे असा निरोप दिला. तेंव्हा आरकेचं 'बरसात'चं काम चाललं होतं. राज कपूरसमोर जाताच त्यांनी जुन्या भेटीची आठवण करून दिली. आपल्याला पैशांची गरज आहे आणि त्या बदल्यात त्याने हवे ते काम करवून घ्यावे असं निसंकोचपणे सांगितलं. राजनि शैलेंद्रची अडचण ऐकून घेतली, त्यांना आधी मदत केली नि अडचणीतून मन मोकळं झाल्यावर परत यायला सांगितलं.दुसऱ्याच दिवशी शैलेंद्र परतले ते दोन अमीट गाणी घेऊनच!‘बरसात में हम से मिले तुम सजन’ आणि ‘पतली कमर हैं, तिरछी नजर हैं’या दोन्ही गीतांनी नवा ट्रेंड सेट केला. इंडस्ट्रीला पहिलं वाहिलं टायटल सॉन्ग लाभलं. आरके, शंकर जयकिशन आणि शैलेंद्र यांची अद्भूत केमिस्ट्री जन्मास आली. शैलेंद्र आरकेच्या कोअर टीमचा भाग झाले. यानंतर शैलेंद्रनि कधी मागे वळून पाहिले नाही. मदत म्हणून पाचशे रुपये देऊ करणाऱ्या आरकेसाठी त्यांनी कायमच तितकेच मानधन घेतले त्यात कधीच वाढ केली नाही. इतरांकडून मात्र ते दहा हजार रुपये घेत असत हे विशेष होय. राजकपूर त्यांना कविराज आणि रशियन कवी अलेक्झांडर पुष्किन म्हणत. या नंतर सिनेसृष्टीमधील सर्वच नामवंतांसोबत काम करण्याची संधी शैलेंद्रना मिळाली.  आर.के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारलेल्या देव आनंद अभिनित 'गाईड' चित्रपटात एक गीत होतं - 'वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ.. ' जगण्याचा मार्ग हरवलेल्या कुठल्याही व्यक्तीस हे गाणं आपल्या भावना व्यक्त करणारं वाटेल. यातल्या काही पंक्ती अशा होत्या -'कोई भी तेरी, राह ने देखेनैन बिछाए न कोईदर्द से तेरे, कोई ना तड़पाआँख किसी की ना रोईकहे किसको तू मेरामुसाफिर जाएगा कहाँ..'या गीतामधली ही वेदना अगदी आर्त होती. हे दुःख बाभळीच्या काट्यासारखं होतं. जगाने धुत्कारलेल्या माणसाचा सल त्यात होता. शैलेंद्रनी झेललेल्या वेदनाच इथे शब्दरूपात होत्या. 'गाईड' अफाट चालला. लोकांनी त्यातली गाणी डोक्यावर घेतली. - आज फिर जीने की तमन्ना है, दिन ढल जाए, गाता रहे मेरा दिल, क्या से क्या हो गया, पिया तोसे नैना लागे, सैंया बेइमान, तेरे मेरे सपने, हे राम मेरे रामचंद्र, अल्ला मेघ दे पाणी दे आणि वहा कौन है तेरा ही ती गाणी होती.राजकपूरची कारकीर्द ज्या 'श्री 420' ने अगदी बहरात आली त्यातील सर्वाधिक गाजलेलं गीत होतं- 'दिल का हाल सुने दिलवाला!' एका निहायत सच्च्यासीध्या, भोळ्या भाबड्या बेरोजगार तरुणाची रसिली कथा यात होती. 'दिल का हाल सुने दिलवाला..' हे गीत त्या काळच्या आदर्शवादाचे प्रतिनिधित्व करत नव्हते मात्र त्याकाळच्या नितळ साधेपणाचे ते लख्ख प्रतिबिंब होते. फुटपाथच ज्यांचे घर होते अशा बेघरांना आभाळाचे छत होते, त्यांचे संसार उघड्यावर होते, हाती येईल त्या कामास तडीस नेणाऱ्या अष्टौप्रहर भटकणाऱ्या अगणित लोकांनी शहरे भरली होती. काम नसले तर रित्यापोटी झोपणारे हे जीव वेळप्रसंगी इतरांसाठी चोऱ्यामाऱ्या करत. त्यांचे विश्वच दैन्य दारिद्रयाने ग्रासलेले होते. त्यांचे दुःख कुठल्या सिनेमात कुणी मांडायचा सवालच नव्हता मात्र शैलेंद्र याला अपवाद होते. स्वतःच्या शैशवातील गरीबीचे चटके त्याने शब्दबद्ध केले होते -"छोटे से घर में गरीब का बेटा,मैं भी हूँ माँ के नसीब का बेटा,रंजो गम बचपन के साथी,आंधियों में जले जीवनबाती,भूख ने हैं बडे प्यार से पाला.”शिणलेल्या, गांजलेल्या एका बदनसीब तरुणाचे रसरशीत चित्र या ओळींमधून समोर येतं जे कथेमधील नायकास तंतोतंत चपखल बसत होतं. वास्तवात ही तर शैलेंद्र यांची स्वतःचीच कैफियत होती!1955 साली नूतन आणि बलराज साहनी यांच्या भूमिका असणारा 'सीमा' हा अत्यंत देखणा सिनेमा आला होता. एक प्रौढ पुरुष आणि घर सोडून आलेली एक कोवळी तरुणी यांच्यातल्या अबोल प्रेमाची कथा यात होती. यातलं मन्ना डे यांच्या आवाजातील 'तू प्यार का सागर है..' हे गीत म्हणजे प्रेमी युगुलांसाठीची भावोत्कट रचना आहे. तर काहींच्या मते हे एक भजन आहे.या गीतातल्या एका कडव्यात प्रेमाच्या शक्यअशक्यतेच्या द्विधा मनस्थितीचे वर्णन करताना कथेची नेमकी नस पडकलीय -"इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी,कोई क्या जाने कहाँ है सीमा,उलझन आन पड़ीऽऽऽउलझन आन पड़ी कानों में जरा कह दे,कि आएँ कौन दिशा से हम..."कथेतील उमर ढळत चाललेल्या नायकास एकीकडे आयुष्याचं आकर्षण जाणवतंय आणि तिथंच काही अंतरावर त्याला त्याच्या दुःखासमवेत कवेत लपेटून घेणारा मृत्यू उभा आहे. नियतीने (की तिने?) त्याला कसल्या कोड्यात टाकलंय? आता त्यानं नेमकं कुठं जावं? जन्म-मृत्युच्या नेमक्या सीमा आहेत तरी कुठे? विनंती करतो की, निदान दया दाखवून सांग तरी असं आर्जव यात आहे? मनात इतका गोंधळ आहे की कुठल्या दिशेनं तुझ्याकडे यावं हे काही केल्या कळत नाही.'सीमा'मधल्या या गीताने सारे प्रेमीजन व्याकुळ झाले होते. शैलेंद्र यांनी आयुष्याच्या प्रारंभी जीवनमृत्यूचे जे द्वंद्व लढलं त्याचा हा प्रसव होता. 1966 मध्ये वैजयंती मालाचा 'आम्रपाली' प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्यातील कथासंहितेची, वैजयंतीमालाच्या सौंदर्याची, नृत्य कौशल्याची, देखण्या चित्रपट मूल्यांची चर्चा सुरू झाली. याबरोबरच 'आम्रपाली'मधील वेगळ्या धाटणीच्या गीतांचीही मोहिनी पडली. एक राजा, एक नगरवधू गणिका आणि महान साधू यांच्यातला तत्वसंघर्ष यात चितारला होता. रसिक प्रेक्षक 'आम्रपाली'च्या सौंदर्याने घायाळ होणं साहजिक होतं!मात्र कथेतील बोजड वाटणारं तत्वज्ञान गीतांमधून अगदी सुलभ सरळ पद्धतीने समोर आलं.विवेक, वासना, विकार, संयम आणि मनःशक्ती यांच्यातलं द्वंद्व केवळ गाण्यांमधून मांडायचं म्हणजे कठीण काम होतं. मात्र शैलेंद्रनी लीलया हे काम पेललं.जाओ रे, जोगी तुम जाओ रेये है प्रेमियों की नगरीयहाँ प्रेम ही है पूजाजाओ रे ...संगीतकार अनिल बिस्वास यांनी सुरावट दिलेल्या 'छोटी छोटी बातें मधील 'कुछ और जमाना कहता है..' या गीतातील पंक्ती तर अत्यंत आशयघन आहेत-“ये बस्ती है इन्सानोंकी इन्सान मगर भूले ना मिलापत्थत की बुतों से क्या कीजे फरियाद भला टूटे दिल की... ”शैलेंद्र यांच्या गीतांचा बाज अभूतपूर्व असा होता. जड शब्दांचा हव्यास नसलेली नेटक्या नि नेमक्या शब्दांनी सजलेली अर्थपूर्ण गीते इतक्यावरच त्यांच्या गीतांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यांच्या गीतांना असणारी पार्श्वभूमी जाणून घेतली की त्यामागचा अर्थ अधिक व्यापक नि खोल होतो.शैलेंद्रांनी इतिहास रचला. हिंदी चित्रपट गीतांना विदेशात प्रेमाचं स्थान मिळवून देण्याची अचाट कामगिरी त्यांच्या गीतांनी केली. 'आवारा हूँ’, ‘मेरा जूता हैं जपानी’ ही त्यांची गाणी विदेशात खास करून रशियामध्ये लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी रशियन भाषेचा अभ्यास केला होता. रसिकांनी डोक्यावर घेऊनही त्यांचे पाय मातीचेच होते. अंगी असणारी नम्रता कधी ढळू दिली नाही आणि अतिआत्मविश्वासाला बळीही पडले नाहीत. देशभरात करमणुकीची समान साधने नव्हती तरीही त्यांची गाणी सर्वदूर पोहोचली होती. प्रेमाची गाणी वा जीवनविषयाची गाणी असली तरी त्यांच्या गीतातून एक छुपा संदेश असायचा ज्याच्या तत्कालीन समाजमनावर नकळत परिणाम झाला होता.त्यांच्यातला कवी त्यांनी नेहमीच काळजातल्या दिव्याप्रमाणे जतन करून ठेवला होता."ऊपर नीचे नीचे ऊपर लहर चले जीवन की,नादाँ हैं जो बैठ किनारे पूछें राह वतन की,चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी”या गाण्यातला (श्री 420) अप्रतिम जीवन संदेश कोण बरे विसरेल?“कहते हैं ग्यानी, दुनिया है फ़ानी,पानी पे लिखी लिखायी, है सबकी देखी,है सबकी जानी हाथ किसीके न आयी..कुछ तेरा ना मेरा, मुसाफ़िर जायेगा कहाँ…”हे तत्वज्ञान इतक्या सहज सोप्या शब्दांत सिनेगीतांत (गाईड) कोण बरे सांगेल?"सब कुछ सिखा हमने सिखी ना होशियारीसच है दुनिया वालो हम है अनाडी!..."'अनाडी'मधला सच्चेपणा इतक्या तरल शब्दांत कुणाला मांडता येईल?“मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी,जले बहार के लिये वो ज़िन्दगी...”खरे तर हे मानवी आयुष्याचे सार आहे, जे शैलेंद्रनि आपल्या किशोरवयात अनुभवलं होतं!'गाईड'ने जसा सुरेल इतिहास निर्मिला तशीच कामगिरी 'मधुमती'ने केली होती आणि या जादूमध्ये शैलेंद्रचा वाटा मोठा होता. जुल्मी संग आँख लड़ी, आजा रे परदेसी, चढ़ गयो पापी, दिल तड़प तड़प के, घड़ी घड़ी मोरा दिल, हम हाल-ऐ-दिल सुनाएंगे, जंगल में मोर नाचा, सुहाना सफ़र, टूटे हुये ख़्वाबों ही सर्व गाणी आजही ऐकली जातात.या गीतांचे एक वेगळे वैशिष्ट्य होते ते म्हणजे सर्व नऊ गीतांचे मुखडे वेगळ्या धाटणीचे होते, यात अवधी, भोजपुरी, मैथिली, उर्दू, गंगेच्या काठची रसाळ हिंदी आणि शुद्ध पांडित्य असणारी हिंदी ही सर्व गुणलक्षणे यातील भिन्न रचनांमधून आढळतात.'यहुदी'मधलं ये मेरा दिवानापन है हे साधं सरळ प्रेमगीत जितकं थेटपणे मनाला भिडतं तितकीच 'बसंत बहार' मधली 'भयभंजना सुन हमारी' ही विराणीही भावते. 'रमैय्या वस्तावैया' हे गीत बांधकाम मजुरांनी गायलेलं लोकगीत ऐकून सुचलं होतं तर एकदा जवळून जाणाऱ्या एका देखण्या स्त्रीकडे जयकिशन यांची सहज नजर गेली तेंव्हा तिथे असणाऱ्या शैलेंद्रना 'मूड मूड के ना देख...' हे गाणं सुचलं होतं!साठच्या दशकात ठराविक संगीतकार काही ठराविक गीतकारांना संधी देत. त्याच धर्तीवर शंकर जयकिसन यांचे शैलेंद्रसोबत अलिखित ऐक्य होते. मात्र मधल्या काही वर्षात एसजेंच्या हातून हे कॉम्बिनेशन कायम राहिले नाही. शैलेंद्रना ही गोष्ट खटकली. त्यांनी एका चिठ्ठीवर दोनच पंक्ती लिहून पाठविल्या -‘छोटी सी ये दुनिया पहचाने रस्ते है,कही तो मिलोगे तो पूछेंगे हाल.. ’चिठ्ठी वाचताच शंकर जयकिशन द्वयीस अन्वयार्थ उमगला. त्यांनी शैलेंद्रना पुन्हा जवळ केले. संधीही दिली. 'रंगोली' चित्रपटातील गीतात याच पंक्तींचा वापर केला गेला.अशी विविधांगी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर शैलेंद्रच्या गाण्यातील सहजतेचे सिक्रेट उमगते.'गर्दिश में हूं,आसमान का तारा हूं. आवारा हूं..' या पंक्तींचा जन्मही असाच चालता बोलता झालेला. शैलेंद्र हे अंतप्रेरणेने उस्फुर्त काव्य लिहिणारे असल्याने ही गीते कधी खटकली नाहीत. त्यांचा लळा मात्र अफाट लागला.‘खोया खोया चांद’ (काला बाजार), ये रात भीगी भीगी, ये मस्त समाये...'(चोरी चोरी), 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन' (दूर गगन की छाव में), 'रुलाके गया सपना मेरा.. ' (ज्वेल थीफ), 'मेरे साजन है उस पार..' (बंदिनी), 'अजीब दास्ता है ये...' (दिल अपना प्रीत पराई) या अवीट गोडीच्या गीतांमधून भिन्न स्वभावप्रकृतीचे शैलेंद्र समोर येत राहिले. दिग्गज गीतकार आणि संगीतकारांच्या काळात त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, कुणाचीही नक्कल न करता स्वतःला घडवत गेले. कामावर निष्ठा ठेवत कवितेशी प्रामाणिक राहिले.आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेले असल्याने कथेतील कारुण्यमय संघर्षाने भारलेल्या प्रसंगांना साजेशी गाणी लिहिताना त्यांना आपला जीवनानुभव कामी आला. टूटे हुये ख्वाबोने हम को ये सिखाया है, हाय गजब कहीं तारा टूटा, गाता रहे मेरा दिल, तू हि मेरी मंझील, सजनवा बैरी होगए हमार, आज फिर जिने कि तमन्ना हैआणि ओ जाने वाले हो सके तो लौट के आना ही गाणी त्याचे प्रतीक ठरावीत.फिल्मी पडद्यावर कविता जिवंत करण्यासाठी शैलेंद्रनी जिवाचं रान केलं. मात्र गीतकार म्हणून इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांनी एक काव्यमय स्वप्न पाहिलं होतं ज्याचं नाव होतं 'तिसरी कसम'! मात्र याच स्वप्नाने त्यांना पुरतं लयास नेलं. विख्यात हिंदी साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू ह्यांच्या 'मारे गये गुलफाम' या कथेच्या ते प्रेमात पडले होते. त्यांनी रेणूंकडे या कथेवर चित्रपट करण्याची परवानगी मागितली. रेणूंनी होकार देताच शैलेंद्रनी त्यांना दहा हजार रुपये देऊन हक्क विकत घेतले आणि रेणूंनाच चित्रपटाची पटकथा लिहायला सांगितली. चित्रपटाच्या नायकासाठी राज कपूर सोडता कोणी दुसरा कोणी डोळ्यापुढे येणं शक्यच नव्हतं. मात्र वेळेअभावी राजने दिग्दर्शनास नकार देत केवळ अभिनयास होकार दिला. दिग्दर्शकाचा शोध बासू भट्टाचार्यापाशी संपला. मोठ्या उत्साहात चित्रपटाचा मुहूर्त झाला. शैलेंद्रचा पहिलाच चित्रपट म्हणून सगळ्या चित्रपटसृष्टीने खूप कौतुक केलं.पण चित्रपट रखडत गेला. तब्बल ५ वर्षं झाली, तरी चित्रपट पूर्ण होत नव्हता. खूप लोकांनी शैलेंद्रना फसवलं. बजेट ४-५ लाखांवरून २५-२६ लाखांवर गेलं. फिल्म एडिट करायलासुद्धा पैसे उरले नव्हते. शैलेंद्र पुरते कर्जात बुडालेले होते मात्र सिनेमा चालेल याविषयी ते आश्वस्त होते. दरम्यान रेणूदेखील आजारपणामुळे त्यांच्या मूळ गावी परतले आणि शैलेंद्र एकटे पडले. शेवटी चित्रपट कसाबसा पुरा झाला. सिनेमा जबरदस्त झाला होता. अभिनय, पटकथा, गीत संगीत तांत्रिक अंगे सर्व काही उजवं होतं.पण हा सिनेमा आम आदमीसाठी नाही अशी धारणा वितरकांत तयार झाली नि त्यांनी हात आखडता घेतला. चित्रपट प्रदर्शित करण्यास कोणीच राजी नव्हतं. शैलेंद्रच्या आयुष्यभराची कमाई होत्याची नव्हती झाली आणि मस्तकी कर्जाचं ओझं आलं. या धक्क्यातून ते कधीच सावरू शकले नाहीत. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर काही वितरक बिहार बंगाल नि युपीमध्ये रिलीज करण्यास तयार झाले. आपल्या चित्रपटाचे भव्य स्क्रिनिंग्ज करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्या जितेपणी कधीच पुरं झालं नाही.'तिसरी कसम' बॉक्स ऑफिसवर फेल गेला इतकंच गणित नव्हतं, मुद्दा एका माणसाच्या स्वप्नाचा, स्वाभिमानाचा, संवेदनशीलतेचा, आयुष्यभराच्या कमाईचा आणि जगावरच्या विश्वासाचा होता. हे सर्वच उध्वस्त झालं. परिणामी शैलेंद्र अबोल झाले, त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. असेच काही दिवस उदासीनतेने भारलेल्या एकांतात गेले. एके दिवशी त्यांच्या मनाने उचल खाल्ली नि ते थेट राजकपूरला भेटायला गेले. त्या भेटीत त्यांचा संवाद असा झालाच नाही. नुसती दृष्टादृष्ट झाली. थिजलेल्या मनाने ते घरी परतले. त्या दिवसानंतर ते अक्षरशः खचून गेले.१३ डिसेंबरचा दिवस उजाडला. त्या सकाळी त्यांना अत्यंत अस्वस्थ वाटत होतं.काही तरी अघटित घडणार आहे याची त्यांना पुसटशी जाणीव झाली असावी. त्यांच्या पत्नीने शकुंतलाने डॉक्टरांना फोन केला, त्यांनी तत्काळ दवाखान्यात आणण्यास सांगितलं. ते हॉस्पिटलच्या दिशेनेच रवाना झाले होते. मात्र का कुणास ठाऊक रस्ता वाकडा करून ते आरकेकडे गेले. दोघांच्या गप्पा झाल्या. निघताना राजने विचारलं, "रे कवीराज! जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां... अपना गाना कब पुरा होनेवाला है?"हा प्रश्न मेरा नाम जोकरमधील त्या अजरामर गीतासंबंधी होता. सवाल ऐकून शैलेंन्द्र हसले आणि उत्तरले, "कल का तमाशा तो निपटा लूँ, तभी पूरा कर लूंगा.."१४ डिसेंबर राजकपूरचा वाढदिवस. त्याच अनुषंगाने शैलेंद्रने हे उद्गार काढले होते. बड्डे पार्टीचा गोंधळ संपला की कामाला लागता येईल असं त्यांना सांगायचं होतं. मात्र नियतीच्या मनात काही और बात होती.इस्पितळात दाखल होताच शैलेंद्रच्या तपासण्या केल्या गेल्या आणि त्यांना ऍडमिट करून घेतलं गेलं. त्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत गेली. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. त्यांना आपल्या मित्राला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. खुद्द आरके आपल्या पत्नीसह त्यांची भेट घेऊन गेला. मुकेशचे पाय तिथून निघत नव्हते, ते तिथेच थांबले होते. इंडस्ट्रीत शैलेंद्रच्या आजारपणाची बातमी एव्हाना पसरली होती, आरके स्टुडिओमध्ये शैलेंद्रना अराम पडावा म्हणून होमहवन सुरु झाले होते. विघ्न टळल्याची बातमी कानी यावी म्हणून सगळेच आतुरले होते मात्र दुःखद वार्ताच सगळ्यांच्या कानी पडली.शैलेंद्र हरले होते, श्वासांची लढाई त्यांना जिंकता आली नाही. सगळ्यांना जबर धक्का बसला. राजकपूरच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्याच्या देहातला आत्माच निघून गेला होता!काही महिन्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सनी 'तिसरी कसम'चे हक्क विकत घेतले आणि पुनर्प्रकाशनात सिनेमाने बऱ्यापैकी यश मिळवले. हिरामण गाडीवाल्याच्या भूमिकेत राज कपूर यांनी जान ओतली होती आणि नौटंकीवाल्या हीराच्या भूमिकेत वहिदा रेहमान यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम अदाकारी पेश केली होती. शैलेंद्रच्या ‘हाय गजब कहीं तारा टूटा’, ‘पान खाए सैंया हमार’, ‘आ आभी जा रात ढलने लगी’, ‘सजनवा बैरी होगए हमार’, ‘सजन रे झूट मत बोलो’ या गाण्यांनी कहर केला. मात्र हे यश पाहायला शैलेंद्र हयात नव्हते.आयुष्यात सर्वांना सर्व मिळेलच असं होत नसतं, कुणाच्या तरी वाट्याचं आकाश दुसऱ्याच कुणाच्या तरी हिश्श्यात आलेलं असतं. सगळ्याच व्यथा बोलून दाखवता येत नसतात, सगळीच स्वप्ने पुरी होत नसतात. आपली स्वप्नं मरुन जाणं आणि आपल्या व्यथा ऐकून घेणारं कुणी नसणं या सारखं दुःख नसतं. आयुष्यभर उपेक्षेत जगलेल्या शैलेंद्रच्या वाट्याला ही दुःखे आली, निबर माणसं यात निभावून जातात शैलेंद्रसारख्यांना ते जमत नाही, त्यांच्या आयुष्याची पाने अकाली मिटतात नि मग जग त्यातलं मखमली मोरपीस शोधून त्यांची महती गात राहतं!केवळ काही वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल आठशे गीतं लिहून आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शैलेंद्र यांना आजतगायत चित्रपट विषयक कोणताही मोठा पुरस्कार मिळालेला नाही ही खेदाची गोष्ट आहे. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात तरी सरकारने ही चूक दुरुस्त करावी.शैलेंद्र तुम्ही जिथे असाल तिथे सुख समाधान नांदो, तुमच्यामुळे ते जगही आता रसरशीत झालं असेल. तुम्हाला सलाम! - समीर गायकवाड.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!