विधवा स्त्री भारतमाता नसते का?

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

"विधवा स्त्री भारतमाता नसते.विधवेने कुंकू लावू नये!"किती गरळ आहे यांच्या मनात!23 जानेवारी 1664 रोजी शहाजी राजे निवर्तले. 6 जून 1674 रोजी शिवबांचा शपथविधी झाला तेंव्हा जिजाऊ मां साहेब हयात होत्या. राज्याभिषेकानंतर अकराच दिवसांत त्यांचे दुःखद निधन झाले.शहाजी राजांच्या मागे उर्वरित दहा वर्षात वा पुढच्या इतिहासात त्यांचं महत्त्व कमी झालं का?कधीच नाही!आपण अजून मागे जाऊ या.दशरथ राजाची पत्नी कैकेयी हिच्या अट्टाहासापायी राम, सीता, लक्ष्मण वनवासाला गेले. पुत्रविरहाने दशरथ राजे व्याकुळ होऊन मरण पावले.दशरथांच्या पश्चात कौशल्येस हीन लेखले गेले का?नाही!पंडू राजाच्या निधनानंतर कुंतीस कमीपणा आला का?नाही!आता आणखी एक परंतु अत्यंत महत्त्वाचे उदाहरण पाहू.संभाजी भिडेंचा मुख्य प्रभाव सांगली कोल्हापूर भागात आहे त्यामुळे तरी हा प्रश्न नक्कीच पडला पाहिजे.3 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम महाराज निवर्तले तेंव्हा त्यांच्या पत्नी ताराराणी पंचवीस वर्षांच्या होत्या.पतीच्या निधनानंतर या लढवय्या झुंजार स्त्रीने हार न मानता स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या संकटाचा सामना केला.त्याला याच मातीत गाडलं.1706 मध्ये औरंगजेब मेल्यानंतर पुढे पंचावन्न वर्षे ताराराणी विविध संकटांना झुंजत होत्या.मराठा साम्राज्यातील सर्वाधिक पराक्रमी स्त्री म्हणून गौरवल्या गेलेल्या भद्रकाली ताराराणींचा सारा पराक्रम वैधव्यकाळातलाच आहे!मग त्या विधवा होत्या की सौभाग्यवती होत्या याने काय फरक पडतो?19 मार्च 1754 रोजी पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला तेंव्हा अहिल्यादेवी होळकर 29 वर्षांच्या होत्या.त्यानंतरच्या काळात अहिल्यामाईंनी जे अप्रतिम शासन केलं ते विख्यात आहे. ब्रिटिश लेखकांनी त्यांची तुलना कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट यांच्याशी केलीय यावरून त्यांच्या महान शासनपद्धतीची कल्पना यावी.पतीच्या निधनानंतर तब्बल एकेचाळीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचे शकट हाकले. आजही त्यांच्या शासनप्रणालीचे दाखले आपण देतो.पतीच्या अपरोक्ष जगताना त्यांचा पराक्रम झळाळून उठला आहे, त्यांची देदीप्यमान कारकीर्द तेजस्वीच होती. त्या विधवा असल्याने त्यात कुठेही कमीपण आलेलं नाही.मी तर त्यांना भारतमातेचं ओजस्वी स्वरूप मानतो!जोतिबांच्या निधनानंतर सावित्री माईंनी सात सत्यशोधक समाजाचे काम खंबीरपणाने सांभाळले. आपल्या कर्तव्यापासून त्या ढळल्या नाहीत की त्यांचा आवेशही कमी झाला नाही. त्यांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावरून कोट्यवधी सावित्रीच्या लेकी शिक्षण घेताहेत. मग सावित्रीमाई विधवा झाल्या होत्या म्हणून त्यांना भारतमाता म्हणण्यास हे नकार देणार आहेत का? याने समाधान होत नसेल तर अजून एक महत्वाचे उदाहरण पाहू. हे उदाहरण तर अगदी बोलके आहे, अगदी भिडे आणि त्यांचे समर्थक देखील यावर निरुत्तर होतील.भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक मुख्य प्रतीक म्हणून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख होतो. त्यांचा पराक्रम सर्वांनाच ज्ञात आहे.१८५७ चे बंड होण्याआधीच २१ नोव्हेंबर १८५३ रोजी राणी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर नेवाळकर यांचा मृत्यू झाला.त्यानंतरची तीन वर्षे राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना कडवी झुंज देण्यात घालवली आहेत. ५ जून १८५७ रोजी झाशीच्या सैनिकांनी इंग्रजांविरोधात एल्गार केला. त्या लढ्यात राणीस वीरमरण आलं!लक्ष्मीबाई विधवा झाल्या होत्या तेंव्हा त्या कुंकू लावत नव्हत्या मात्र भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या त्या प्रतीक आहेत. मग त्यांच्यात भारतमाता नाहीये का ? भारतमातेच्या रूपात राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, ताराराणी, जिजाऊ, कुंती, कौशल्या या स्त्रिया रुजत नाहीत का?मुळात भारतमाता विधवा की सवाष्ण हे ठरवणारे हे कोण? आई ही आईच असते ती विधवा असो वा सधवा असो त्याने काय फरक पडणार आहे?स्त्री विधवा असो वा सधवा असो त्याने तिच्या कारकिर्दीस, जगण्याच्या लढाईस कमीजास्त लेखता येत नाही. तिच्यात भारतमाता असल्याने तिने कुंकू लावले पाहिजे हे थोतांड ठरवणारे हे कोण?भिडे त्या पत्रकार महिलेस म्हणाले की, "तुला मी भारतमाते सारखं मानतो. तू आधी कुंकू टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलेन, कारण भारतमाता विधवा नव्हती!"हा केवळ त्या पत्रकार महिलेचा अपमान नसून समग्र विधवा स्त्रियांचा अपमान आहे. विधवा स्त्री भारतमाता का असू शकत नाही असा त्यांना सवाल करायला हवा होता.इतिहासातील पराक्रमी महिलांचे दाखले त्यांना द्यायला हवे होते. जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई यांना आपण भारतमातेचेच रूप मानतो.भिडे वा आणखी कुणी त्यांना तसं मानत नसतील तर तो त्यांचा कोतेपणा आहे.वास्तवात इथे त्या पत्रकार महिलेस अडवण्याचा मुद्दा नसून बुरसटलेल्या सनातनी पुरुषी मानसिकतेचा मुद्दा आहे जी विधवा स्त्रीला कमी लेखते, विधवेवर धर्माच्या नावाखाली बंधने लादते. जग कुठे चाललेय आणि हे अजून पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेच्या डबक्यात खितपत पडले आहेत!ज्यांच्या ज्यांच्या घरी विधवा स्त्री आहे ते तिला भारतमाता मानत नसतील तर आनंद आहे!भिडेंनी कुणाशी बोलायचं वा कुणाशी न बोलायचं हे भिडे ठरवतील. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे, त्यात गैर काहीच नाही.मात्र न बोलण्यासाठी त्यांनी जे कारण दिलेय ना ते छद्मी आहे, विधवा स्त्रियांना हीन लेखणारे आहे. स्त्रियांच्या हक्कावर गदा आणणारे आहे.या देशातील सर्वच स्त्रियांना मी भारतमाता मानतो.मग तिचा पती असणं, नसणं वा तिचं अविवाहित असणं याने देखील मला फरक पडत नाही.मग तिने कुंकू लावून बोलावं की आणखी कसं राहावं हा त्या त्या स्त्रीचा हक्क आहे. तिने कुंकू लावावे याचे कारण भारतमाता विधवा नव्हती असं म्हणणं विधवांवर अन्याय करणारं आहे.- समीर गायकवाड#भारतमाता #विधवा #realqueen #sameerbapu #समीरबापू #sameergaikwad    
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!