राष्ट्रसंत तुकडोजी महाराज- विशेष लेख

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख....राष्ट्रसंत तुकडोजी महाराज✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल       आधुनिकतेची कास धरून अज्ञानाचा नाश करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन आणि कार्य अतिशय उद्बोधक आहे. समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी यांच्यावर घणाघाती प्रहार करून आदर्श समाजरचनेची उभारणी करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. आपल्या परखड विचारांनी आणि जागृतीपर लिखाणाने समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामविकास, राष्ट्रीय एकता, मानवता आणि विश्वशांती यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग त्यांनी दाखविला. त्यांच्या या महान कार्यामुळे 'राष्ट्रसंत' असा लौकिक त्यांना मिळाला.       ३० एप्रिल १९०९ रोजी 'शहीद यावली 'या छोट्याशा गावी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव 'माणिक' असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नामदेव गणेशपंत इंगळे आणि आईचे नाव मंजुळादेवी असे होते. गरिबीचे चटके तुकडोजी महाराजांना बालपणी सहन करावे लागले. त्यांचे आई वडील अशिक्षित होते. मात्र त्यांनी छोट्या माणिकला इयत्ता चौथीपर्यंत शिकविले. माणिकला बालपणापासून भजन, कीर्तन, कविता करणे यांची आवड होती. शाळा सोडून ते रानावनात जात. तेथे भजन करीत बसत. शाळेपेक्षा त्यातच त्यांचे मन अधिक रमत असे. हळूहळू ते कीर्तनातच रमू लागले.       भजन, कीर्तन आणि काव्य यामध्ये मन रमू लागल्यावर  त्यांच्या मनात भगवंताच्या दर्शनाची तळमळ वाढू लागली, म्हणून पंढरीनाथांच्या दर्शनासाठी ते पंढरपूरला दाखल झाले. पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचे चित्त वेडावले, देह भांबावला. अश्रूधारा विठ्ठलाच्या चरणावर ओसंडू लागल्या. पांडुरंगाच्या दर्शनाने ते देहभान विसरले. त्यामुळे वेडा समजून बडव्यांनी त्यांना कोरड्यांनी मारले.       ते पंढरपूरहून यावलीला परत आले, मात्र देवदर्शनाची ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. मंजुळादेवीना वाटत होते की, आपल्या मुलाने विवाह करून आनंदाने संसार करावा. मात्र तुकडोजी महाराजांना या विश्वाचा संसार सुव्यवस्थित करायचा होता. आईचा विचार त्यांना पटला नाही. पुढे त्यांनी काशी, ओंकारेश्वर, हरीद्वार, पशूपतिनाथ इत्यादि तीर्थयात्रा केल्या. देश व देवदर्शनाबरोबर समाजातील चालीरीती, अंधश्रद्धा, विषमता यांचे निरीक्षण केले. अनेक ठिकाणच्या पंडीतांशी चर्चा केल्या.       स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तुकडोजी महाराजांनी असामान्य कार्य केले. पारतंत्र्यात भारतीय जनतेवरील अन्याय, अत्याचार स्वतः पाहिला व अनुभवला. त्यांनी १९३५ साली सालबर्डीचा महायज्ञ केला. जनतेला भावनिकदृष्ट्या संघटित करून राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली. १९४२ साली आष्टी आणि चिमूरच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्यांनी चार महिने तुरुंगवास भोगला. राष्ट्र प्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेला स्वातंत्र्याचा विचार करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी धडपड चालू ठेवली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिक्षणविषयक विचार:       आपल्या भाषणात ते म्हणतात, "भारतात शिक्षणाची अत्यंत उणीव आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नसतील इतके निरक्षर लोक आपल्या देशात आहेत. स्वातंत्र्यप्राप्ती होऊनही या देशाची ऐंशी टक्के जनता अंगठाछाप आहे. परंतु ही स्थिती भूषणावह नाही. हा ऋषीमुनींचा देश आहे. या देशात गुराखीसुद्धा पदवीधर असले पाहिजेत. कोणतेही काम जाणीवपूर्वक व ज्ञानपूर्वक करण्यातच खरी मजा आहे".       तुकडोजी महाराजांच्या या भाषणातून आपणास जाणवते की, शिक्षणाविषयी ते अतिशय जागरूक होते. ग्रामगीतेमध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात...ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण ।उद्याचे राष्ट्र, आजचे संतान ।यासाठी आदर्श पाहिजे गुरूजन ।राष्ट्रनिर्माते ।       ग्रामविकासाचा पाया शिक्षणातच दडला आहे, असे ते आवर्जून सांगत. आजची बालके उद्याचे भावी नागरिक होतील. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था करणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव्य आहे असे ते सांगत.       ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनी जिव्हाळ्याने आणि आवडीने अध्यापन करायला हवे, असे त्यांचे मत होते. बालकांच्या साक्षरतेबरोबर प्रौढशिक्षणांविषयीही ते जागृत होते. साक्षरता प्रसाराविषयी ते म्हणतात, "साक्षरता प्रसार हा समाजशिक्षणाचा पाया आहे. भारताचा प्रत्येक घटक सुसंस्कृत, स्वावलंबी आणि सुखी व्हावा यासाठी समाजशिक्षणासारखा दुसरा उपाय नाही. आज आपल्या देशातील एक माणूससुद्धा अंगठाछाप असणे हे आम्हा सर्वांना लाजिरवाणे आहे. राष्ट्राचा हा कमजोर घटक म्हणजे राष्ट्राच्या जीविताला धोका आहे हे विसरू नका. समाजशिक्षण हाच खरा धर्मयज्ञ आहे, कारण यामुळेच समाजाचा विकास योग्य रीतीने होऊ शकेल. जनतेला जर आपण सुसंस्कृत व डोळस बनविले नाही तर यापुढील परिस्थिती आम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही". प्रौढशिक्षणांविषयी ते म्हणतात..अक्षरशत्रूना सामर्थ्य यावे ।म्हणोनी प्रौढ शिक्षण चालवावे ।घरोघरी नंबर द्यावे।नामपाटी लावोनिया ।तुकडोजी महाराजांचे देशप्रेम:       भारताबद्दल महाराजांच्या मनात अतिशय आदर होता. भारत-पाक व भारत-चीन युद्धाच्या वेळी ते प्रत्यक्ष युद्ध सीमेवर संरक्षण मंत्र्यांबरोबर गेले. सैनिकांसमोर देशप्रेमाने ओथंबलेली भजने गाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. देशसंरक्षणार्थ सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ते देशातील तरूणांना करत.       ग्रामोन्नती झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही असे ते म्हणत. ग्रामगीतेमध्ये त्यांनी आदर्श ग्रामसंकल्पना मांडली आहे. ते म्हणत....मेरा प्रभू सब व्याप्त है ।हर मानवो की जान में ।इस बात को भूलो नही ।हर काम में हर ध्यान में।सामान्य जनांमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महान राष्ट्रसंतास कोटी कोटी प्रणाम ।
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!