भितीवर विजय - 'द कराटे किड'चे सार

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

'द कराटे किड' २०१० मध्ये रिलीज झाला होता. त्याने तिकीटबारीवर तुफान टांकसाळ खोलली. जॅकी चेन आणि जेडन स्मिथच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. एका शाळकरी मुलाचं भावविश्व त्यात अत्यंत भेदक पद्धतीने साकारलं होतं.कोवळया ड्रे पार्करच्या विधवा आईची शेरीची कार कंपनीत बदली होते. ती डेट्रॉईटवरून थेट चीनमध्ये दाखल होते. खरे तर ड्रे पार्कर डेट्रॉईटमध्येच झळाळून उठला असता, पण तसे घडत नाही.चीनमध्ये आल्यानंतर त्याला त्याच्या वेगळेपणाचं, बॉडी शेमिंगचं शिकार व्हावं लागतं. त्याला शाळेत प्रवेश मिळतो. त्याची सहाध्यायी असणारी मी यिंग ही त्याला पहिल्याच नजरेत आवडते. इथून त्याची समस्या गंभीर रूप धारण करते. अंगाने दणकट असणाऱ्या त्याच वर्गातल्या चँगचा मी यिंग वर डोळा असतो. तो ड्रे ला दातात धरतो आणि आपल्या साथीदारांना घेऊन बेदम मारहाण करतो.त्याला सातत्याने दमदाटी करू लागतो, त्याची खिल्ली उडवू लागतो, मी यिंग समोर त्याच्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडवतो. ड्रेच्या मनात चँगबद्दल अपार भीती बसते. त्याची आई त्याच्यात झालेल्या बदलांना अनुभवते मात्र तिला बारकावे उमगत नाहीत. मात्र योगायोगाने मिस्टर हान यांच्याशी ड्रेची भेट होते. एका अपघातात आपलं कुटुंब गमावून बसलेले मिस्टर हान हे कुशल कराटेपटू असतात, आपल्या पत्नीच्या मृत्यूसाठी ते स्वतःला दोषी मानतात. हान आणि ड्रे यांच्यात मैत्री होते. ड्रे त्यांचा शिष्य होतो. कराटेचे सर्व डाव शिकतो. सिनेमाच्या अखेरीस ड्रे आणि चँग यांच्यात टूर्नामेंट विनरसाठी तुंम्बळ लढत होते.आधीच्या फेऱ्यात काहीसा थकलेला असूनही लहानगा ड्रे चँगला जड जाऊ लागतो, चँगचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तेंव्हा त्याचे कोच मिस्टर ली हे त्याला छद्मकपटावर भर दयायला सांगतात. परिणामी पुढच्याच फेरीत ड्रे एका पायाने जवळपास जायबंदीच होतो. उभं राहणं देखील त्याला कठीण जातं. सामना काही वेळासाठी थांबवला जातो. तेंव्हा मिस्टर हान ड्रे पार्करला कडेवर उचलून घेऊन ड्रेसिंग रूममध्ये जातात. तिथे जो संवाद होतो तो या सिनेमाची जान आहे. ते ड्रे ला विचारतात की, "तू त्याला नमवल्यात जमा आहे, शिवाय तू त्याला मजबूत पंचेस मारलेत आणि जवळजवळ तूच विनर असल्यागत आहेस तरीही तुला आणखी का खेळावंसं वाटतं? शिवाय तुझा एक पायही खूप दुखावला आहे. इतका हट्ट कशासाठी?"यावर ड्रे जे उत्तर देतो त्यात अनेकांच्या आयुष्यातील एक महत्वाचे सत्व कायमस्वरूपी सामावलेलं आहे. तो म्हणतो की, "चँगला थेट हरवून जोवर मी विजेता होणार नाही तोवर माझ्या मनात बसलेली चँगची भीती कशी नष्ट होणार? त्याला हरवलं की माझ्या मनातली भीती खऱ्या अर्थाने संपलेली असेल."ड्रे च्या हट्टापुढे हान यांना नमते घ्यावे लागते. ते प्राचीन उपचार पद्धतीने त्याला तात्पुरता आराम मिळवून देतात. अंतिम फेरीच्या शेवटच्या राऊंडमध्ये एका पायावर उभा असलेला ड्रे चँगसमोर नव्या दमाने सज्ज होतो आणि एका अद्भुत शैलीने लाथेत त्याला पराभूत करतो. त्याच्यासाठी विजेतेपद महत्वाचे नव्हते, मनातली भीती कायमची नष्ट होणं यावर त्याचा जोर होता, शेवटी कठीण कसोटीद्वारे तो ते साध्य करतोच. आपल्यालाही आयुष्याच्या हरेक टप्प्यात कुणाची ना कुणाची भीती बसलेली असते. आपण त्यापासून जितके लपत छपत राहतो तितके तिचे प्राबल्य वाढते. भीतीपायी माघार ने घेता तिचा मुकाबला करायला हवा. भीतीवर विजय मिळवला की आपला आत्मविश्वास इतका दुणावतो की पुन्हा दुसरा कुणी आपल्याला भीती घालायच्या वाटेला जात नाही! कराटे किड हा सिनेमा या नजरियाने बूस्टर डोस आहे.आपली कुणाला भीती वाटली नाही तरी चालेल पण आपल्याला कुणी भीती घातली नाही पाहिजे! एकवेळ मनगटात अफाट जोर नसला तरी चालेल पण मान ताठ पाहिजे! - समीर गायकवाड.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!