भाऊ मामा

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

भाऊ, तुम्हाला जाऊन वर्ष उलटलं. पण अजूनही विश्वासच बसत नाही. आतून वाटत राहतं, कुठूनतरी तुमचा कॉल येईल आणि क्षणात सगळ्यांची विचारपूस सुरु कराल. पण आता हे शक्य नाही. फक्त भूतकाळ तेवढा मागे उरलाय. सगळं आयुष्य तुमचं संघर्षात गेलं. कष्ट करून मोठे झालात. नोकरी केली. मुलांना शिकवलं. मोठं केलत. तुम्ही निवृत्तही झालात. घराला जगण्याचे सुखाचे दिवस आणले. पैसा, प्रतिष्ठा माणसं सगळं काही मिळवलत. एका ठिकाणी शांत राहा आता! पोरं म्हंटली पण तुम्ही ऐकलं नाहीत. एका ठिकाणी बसून राहणं कदाचित जमलं नसेल तुम्हाला. कदाचित आयुष्याची सेकंड इनिंग तुम्हाला खुणावत असावी. तुम्ही खेळ खेळायला सुरवात ही केलीत. पण तुम्ही हरलात. सर्वांना जिंकण्यासाठी प्रवृत्त करणारा तुमच्यातला माणूस कसा काय हरू शकतो. अजूनही विश्वास बसत नाही. ज्या पोरांना शाळेत सोडताना त्यांच्या छोट्याशा बुटांची तुम्ही हाताने लेस बांधलीत, त्याच हातांना तुमची  तिरडी रचावी लागावी यापेक्षा दुर्दैव ते काय. तुम्ही म्हणायचा, “वेळ वाईट आली की माणसाला आपोआपच चांगले दिवस आठवतात!" आज तुम्ही आमच्यावरच ही वेळ आणलीत. तुमच्या जगण्याच्या गरजाही किती मर्यादीत होत्या. अगदी साधा शर्ट प्यांटही तुम्हाला वर्षभर पुरायची. तुमच्या एवढं साधं राहणं खरच आताच्या पिढीला जमेल का? चैनीच्या गोष्टी तुम्हांला आवडायच्याच नाहीत. सगळ्यांना शिस्तीत ठेवून त्यांच्या आनंदात आनंद मानणारे तुम्ही. आयुष्यभर ह्दयात एक दु:खाचा  कोपरा ठेवूनच जगलात. लेकरा- नातवंडात रमण्याचा तुमचा काळ. एका रात्रीत असा कसा भूतकाळ होऊन बसला. काळ पक्षाने मारला तरी कसा डंक म्हणायचा तुमच्या जगण्याला. गावाकडे आलात की लवकर उठून आंघोळ उरकून, एखाद्या देवळात दर्शन घेऊन एखाद्या कट्ट्यावर एकटेच बसून जगून झालेल्या आयुष्यावर चिंतन करीत बसायचा तुम्ही. अगदीच समोर एखाद्या लहान मुलांचा चाललेला खेळही तुम्हांला आतून आवडायचा. किती कौतुकाने बघत बसायचा तुम्ही. लहान मुला सारखंच निरागस होऊन. सगळं सरळ चाललेलं असतांना कुठल्यातरी वळणावर असा धक्का देऊन गेलात. पिकलं पान गळून पडावं इतक्या सहजपणे निघून गेलासा. आता घराचा उंबराही मोकळा पडलाय तुमच्या जाण्याने. त्या खिडकीलाही म्हणे फक्त तुमच्याच आठवणी असतात अलीकडे. गाव- शिवारातून फिरताना उमटलेले तुमच्या पायांचे ठसेही काळओघात या मातीतून नष्ट होतीलही. पण माणसांच्या काळजावर उमटलेले तुमच्या पाऊलवाटांचे ठसे कधीच नष्ट होणार नाहीत. आम्ही ते होऊ देणारही नाही. “स्टेच्यू स्टेच्यू...” खेळतां- खेळतां भलेही माणसं दगडाची झाली असतीलही. आम्ही होणार नाही. माणूस मरतो पण विचार मरत नाही. तुम्हाला गावच्या मातीत ना रुजता आलं ना अंकुरता. तुम्हाला फक्त सावली होता आलं. गाव पांढरीजवळ येऊन अखेर तुम्ही मातीलाच नमस्कार करून वळळासा! बहरण्याचे दिवस होते तुमचे! तुम्ही तर सरणावरच जळत गेलात.... शेवटी, तुमची आठवण येत नाही असा दिवस नाही. डोळे भरत नाहीत अशी रात्र नाही. स्वप्न पडत नाहीत अशी पहाट नाही. आज प्रथम पुण्यस्मरण! विनम्र अभिवादन भाऊ...!!!          ©ज्ञानदेव पोळ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!