फारच सिम्पल होतं ते !

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

फारच सिम्पल होतं ते ... मॅटिनीची क्रेझ ओसरत गेली आणि प्रेमकथांचे रंग भडक होत गेले..आता इतकं गुंतागुंतीचं नव्हतं ते !दोघांत एक पॉपकॉर्न. एखाद्या महिन्यांत तिच्यासाठी 'गोल्डस्पॉट' त्यात माझ्या वाट्याचे दोनच घोट,तर कधी लालकाळं थम्सअप इंटरव्हलला !ती कावरीबावरी होऊन मान खाली घालून बसलेलीअन् मी इकडे तिकडे पाहत मध्येच तिच्याकडे पाहणारा !फारच सिम्पल होतं ते !तिकीटबारीची विंडो होती लाकडी फळकुटीआत बसलेला साठीचा इसम विचारे, "ऐ भाय बोलो ज्यल्दी, ड्रेस सर्कल की सेकंड क्लास ?"तेंव्हा तिच्याकडे पाहणे शक्यही नव्हतं क्वचित जेंव्हा बाल्कनीत बसलो, कावरा बावरा झालेलो !काळे शिक्के तारखेचे असत, तावाच्या लाल पिवळ्या कागदी तिकिटांवर. सीट नंबरही असे गिचमिड अक्षरांत पेनाने खरडलेला तरीही आत गेल्यावर तोंडावर टॉर्च मारायचा डोअरकिपर, बादशहा अंधारल्या दुनियेचा !"ऐ ज्योडी तुम इधर बैठो" असं म्हणतानाच तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकायचा !फारच सिम्पल होतं ते !वाकलेल्या जुन्या खुर्च्या आणि धुरकटलेलं माहौलआजूबाजूला पडलेली कागदाची कस्पटे, फुटाणे आणि कचरा बाटल्यांची झाकणे काही, सिगारेट्सची थोटकेही काही. स्टोरीमध्ये असायचं मिलन पण दिसायचं फुलाजवळ येणारं फुलअसलाच कधी रेपचा सीन तर, दिसत नुसत्या बांगड्या फुटलेल्या. पडद्यावरचं कुणी मेलंच तर दिसत थवे उडणाऱ्या भरकटल्या पक्षांचे मग ती पुसत असे डोळे आणि जीव माझाही होई कासावीस !फारच सिम्पल होतं ते !मागच्या सीटवरचा मवाली कुणी लावायाचा पाय खुर्चीला पुढच्या सीटवरचा लंबू कुणी विनवल्यावर बसायचा मान वेळावूनबाजूच्या सीटवरचं जोडपं त्या मानाने असायचं हिंमतीचंसखीच्या पाठीवरून हात घेऊन चाळे केसांशी सुरु असायचेमाझी आपली मजल, हळूच नाजूक स्पर्श करण्याइतकी !त्यातही साली माशी शिंकायची,तिच्या बाजूला बसलेला मध्यमवयीन विचारे, "टाईम काय झाला भाऊ ?, पिक्चर लईच स्लो आहे" म्हणत पुटपुटत जायचा टॉयलेटकडे ! ती लाजून हसायची, माझी होई चडफड शिव्या मनातल्या मनात देत ! फारच सिम्पल होतं ते !इंटरव्हलला यायचा मिसरूड फुटलेला पोऱ्या कोल्ड्रिंक्सचे क्रेट घेऊन उगाच ओपनर फिरवायचा काचेच्या बाटल्यांवरून तिच्या बांगड्यांच्या आवाजाची आठवण द्यायचा करून पोरगेलासा कुणी कळकटलेला यायचा चिप्स पापड घेऊन दिसायचे त्याच्या एका डोळ्यात आठ आण्याचे नाणे आणि दुसऱ्या डोळ्यात त्याचे खोल गेलेले पोट !डोक्यावरून त्याच्या हात फिरवता कळायचे, तेलही त्याने कधी लावले नसावे, केस होते चरबटलेले. नकळत एक चवन्नी ज्यास्ती दिली की चेहरा त्याचा यायचा खुलून !फारच सिम्पल होतं ते !... तिच्याकडेही नव्हता मोबाईल की माझ्याकडेही नव्हती बाईकसारेच हातउसने असे, अगदी तिकिटाचे पैसेही !सिनेमा संपण्याआधी काही मिनिटे, डोळ्यापुढे तरळत चेहरे देणेकऱ्यांचे. तेव्हढ्यात पडद्यावर यायचा क्लायमॅक्सचा सीन. सुरु व्हायची हाणामारी, फार काही ट्रिक्स नसत. तोंडानेच काढलेले आवाज असत ढिश्यांव ढिश्यांवचेहिरोला बसताच जोराची फाईट, ती जायची घाबरून नकळत धरायची माझा हात गच्च आवळून !तेव्हढाच जीव माझा जाई सुखावून !फारच सिम्पल होतं ते !सिनेमा संपायला येई. 'द एन्ड'ची पाटी दिसण्याआधी ती होतसे सावध जराशी सलवार असता नेसलेला ओढणी करायची नीटनेटकी साडी नेसली असता करायची पदर ठीकठाक भाळावरच्या रेशमी बटांना घेई कानामागे ओढून उजव्या हाती दुमडलेल्या छोट्याशा रुमालघडीने टिपून घेई घाम चेहऱ्यावरचा . एव्हाना पंखे बंद झालेले असत अन लाईट्सही असत लागलेलेपब्लिक सगळं एक्झिट डोअरकडे हळूहळू मार्गस्थ झालेलं असेआळसावलेले चेहरे. डोळ्यावर आलेली बारीकशी पेंग दिसेएकमेकांना निरखताना दिसे भ्रांत स्पष्ट हरेकाच्या मुखड्यावर, दुपारनंतरच्या गणितांची.फारच सिम्पल होतं ते !सिनेमा असे संपलेला. खाली मान घालून ती संथ पावलाने माझ्या मागे चालतेय हे जाणवेलोक झपाझप चालत पायऱ्या उतरत थिएटरबाहेर पडतजणू वारुळातून बाहेर पडाव्यात स्वप्नाळू मुंग्या !मी मात्र जमेल तितके सावकाश चालत असेतितकाच तिचा सहवास जास्तीचा येई वाट्याला !अखेर गर्दीबाहेर पडताना तिचा नि माझा रस्ता होई वेगळा.गेटच्या कोपऱ्यावरती ती बदलेपर्यंत वळण मी उभा असे निरखत तिला पाठमोरंतिच्या देहाचा ठिपका अदृश्य होता जड पावलांनी मीही मार्गी लागायचोसोबत असे माझ्या, दरवळ तिच्या मंद देहगंधाचा ... फारच सिम्पल होतं ते !- © समीर गायकवाडनोंदी - **या प्रकटनाची पहिली ओळ मला अधिक महत्वाची वाटते <<<< मॅटिनीची क्रेझ ओसरत गेली आणि प्रेमकथांचे रंग भडक होत गेले..>>> तीन रनिंगशोज पेक्षा मॅटिनीचे अस्तित्व वेगळे होते. फुरसतीने येणारं काहीसं निवांत असं पब्लिक या दुपारी बारा ते तीनच्या शो ला असे. काळ गतिमान होत गेला आणि फुरसतच हरवली, मॅटिनीची क्रेझ संपली आणि त्या टिपिकल टाईमसाठी एका खास पठडीतले सिनेमे असत तेही लयास गेले. दरम्यान जगण्याच्या रोजच्या लढाईपासून प्रेमापर्यंत सारं काही भडक होत गेलं. त्याचंच प्रतिबिंब सिनेमाच्या पडद्यावर आलं. म्हणून मॅटिनीची क्रेझ ओसरत गेली आणि प्रेमकथांचे रंग भडक होत गेले. याला कारणीभूत गतिमान जगण्याची ओढ आहे ! अन्यथा 'फारच सिम्पल असणारं ते' आपण इतकं गुंतागुंतीचं करून ठेवलं नसतं. आता उसासे सोडण्याशिवाय उरलेय तरी काय ?****या मुक्तप्रकटनात <<< 'फारच सिम्पल होतं ते' >>> हे वाक्य मी ध्रुपदासारखं वापरलेलं आहे. यातील 'ते' म्हणजे काय याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष आणि अनुभवसापेक्ष भिन्न असेल. काहींच्या लेखी ते म्हणजे प्रेम असेल तर काहींच्या लेखी तो गतकाळ तर काहींसाठी हरवलेले नाते तर काहींचे विसरून गेलेले वा राहून गेलेले क्षण तर क्वचित काहींच्यासाठी जगायचे राहून गेलेले सोनेरी दिवस ! ... जे काही असोत अर्थ मात्र हरेकांसाठी ते फारच सिम्पल होते हे कुणी नाकारू शकणार नाही ...****या मॅटिनीचीही एक खास बात होती, आठवड्यातल्या इतर दिवसांपेक्षा रविवारी जोडपी कमी असत, पोरंठोरं, प्रौढ, वयस्क पुरुष आणि महिला मंडळे बरीच असत. छानपैकी आवरून सावरून आलेल्या केसांत गजरा माळलेल्या स्त्रिया रविवारी जास्ती दिसत ! आणि आठवड्याचे बाकीचे दिवस खास मॅटिनीचे शौकीन असत...****आताच्या काळाच्या दृष्टीने मॅटिनी शो साठीचा टाईम स्लॉट अगदी ऑड म्हणावा असा. कारण अख्खा दिवस त्यात मोडून पडतो. एकतर येण्याजाण्यात तास जातात, हातात उरते ती संध्याकाळ. मॅटिनीच्या गोल्डन टाईममध्ये हा स्लॉट लव्हेबल असाच होता. त्यामुळे या शो साठीचे सिनेमे टिपिकल राजश्री प्रॉडक्शन वा बासूदा, ऋषिदांच्या स्टोरीलाईनमधले असत ! ब्लॉकबस्टरहिट टाईप सिनेमे कधीच मॅटिनीला लागत नसत. या सिनेमाला जी लय होती ती सौम्य मृदू मानवी भावनांची होती ! त्यामुळे ती आपलीशी वाटे. त्या दिवसांना मी आता मिस करत असलो तरी आताच्या दिवसांना नावे न ठेवता त्यांचाही जमेल तसा आस्वाद घेत राहतो. हर वक्त का जायका अलग होता हैं यावर माझा विश्वास आहे... ****इंटरव्हलमध्ये येणारी आशाळभूत चेहऱ्याची कोवळी मुले खाद्यपदार्थ विकत असत, त्यांच्या भुकेल्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पोटात कालवायचे, त्यांना होत नसेल का इच्छा हे पदार्थ खाण्याची ? न विचारताही माझा प्रश्न तिला कळलेला असे, अगदीच इवल्याशा पर्समधून चवन्नी काढून ती देत असे ! मी फकीर ! तोंडावर माझ्या समाधानही असे आणि विवंचनाही वसे !****ते दिवस संथ असले तरी एकसुरी नव्हते आणि माणसांमधला रसरशीतपणा तेंव्हा उठून दिसायचा. मागे वळून पाहताना हे प्रकर्षाने जाणवते.**** भूतकाळात रममाण होत राहिलं की नेहमी दुःख वेदनांचे कढच आठवले पाहिजेत असे नाही मात्र त्याच वेदना तेच दुःख दुसऱ्या नजरेने पाहिले तरी एक तृप्तता लाभते हे ही खरे ! सगळेच जुने दिवस 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी' या धर्तीवर कन्हून कुथायचे नसतात त्यातलेही सुखाचे बारकावे टिपता आले की जवाएव्हढे असणारे सुख पहाडाएव्हढे कधी होते कळत नाही...****आताही तशी माणसं असतील आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडत असू ... काळ परत येणार नाही हे मात्र खरे मात्र ती माणसं शोधण्यासाठी आपला नजरिया देखील जुना कुठे उरला आहे ? हा सवाल ही आहेच !****एका पिढीच्या हातून निसटलेल्या क्षणांचा पारा आहे हा ! कुणीही गोळा केला तरी त्यात त्याचे प्रतिबिंब दिसेल कारण तेंव्हाचे जगणे एकसमान पातळीवरचे नसले तरी समान अनुभूतीचे होते !**
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!