परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आजपावेतो परवीन नावाच्या तीन स्त्रियांनी मनावर भुरळ घातली होती. पहिली होती पाकिस्तानची प्रसिद्ध कवयित्री शायरा परवीन शाकीर, दुसऱ्या म्हणजे विख्यात भारतीय गायिका परवीन सुल्ताना आणि तिसरी म्हणजे आयुष्याची वीण विस्कटून गेलेली प्रेमभुकेली अभिनेत्री परवीन बाबी. या तीन नावांत गत सप्ताहात भर पडली त्या म्हणजे परवीन रहमान. पाकिस्तानच्या कराचीमध्ये परवीन रहमान या नागरी हक्क चळवळीविषयी जितक्या ओळखल्या जातात. त्याहून अधिक त्यांची ओळख शहर टाऊनप्लॅनर अशी होती. परवीन रहमान यांचा जन्म बांग्लादेशमधला. बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला. परवीन यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन त्यावर नंतर बरेच लेखन केले गेलेय. बांग्लादेशच्याही आधी फाळणीपूर्व ब्रिटीश राजवटीत त्यांचे कुटुंब प्रगत विचारसरणीचे होते आणि कट्टरतावादापासून काहीसे अलिप्त राहण्याकडे त्यांचा कल होता. कालपरत्वे भारतीय उपखंडात भौगोलिक राजकीय बदल होत गेले तरीही त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाले नाहीत. भारताची फाळणी झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रत्यक्ष फाळणीनंतर भारत पाक यांच्यात झालेलं नागरी स्थलांतर याविषयी आपल्याकडे खूप काही लिहिलं गेलेलं आहे. तद्वतच पूर्व पाकिस्तानचा बिमोड करून तेथे बांग्लादेशची निर्मिती झाली. १९७१ च्या या अस्वस्थ कालखंडात काही महत्वाची स्थलांतरे पूर्व पाकिस्तान ते पाकिस्तान अशी झाली. याच रेषेचा एक बिंदू म्हणून बांग्लादेश निर्मिती दरम्यान रहमान कुटुंबियांस ढाक्यात असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी पाकिस्तानात आपल्या आप्तेष्टांकडे जाण्याचे निश्चित केले. कराची मधली त्यांची सुरुवातीची काही वर्षे हलाखीत गेली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. किंबहुना अशाच लसलसत्या जखमा भारताने फाळणी आणि बांग्लादेश निर्मितीवेळीही झेलल्या आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा भागात याची झळ अधिक प्रमाणात बसली. आजही भारतीय राजकारणात आणि समाजकारणात या मुद्द्यांचे प्राबल्य टिकून आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या साहित्यांत यावर नाट्यमय लेखन आढळते. कोविडपूर्व वर्षी अनम झकेरिया या तरुण लेखिकेने 'नाईंटीन सेवेंटी वन - ए पिपल्स हिस्ट्री फ्रॉम बांग्लादेश, पाकिस्तान अँड इंडिया' या पुस्तकामध्ये अनेक लोकांच्या मौखिक माहितीचा उपयोग करून लेखन केलेय. हे तिचे ट्रिलॉजीतले तिसरे पुस्तक होते. 'द फुटप्रिंट्स ऑफ पार्टीशन : नॅरेटिव्हज ऑफ फोर जनरेशन्स ऑफ पाकिस्तानीज अँड इंडियन्स' आणि 'बिटविन द ग्रेट डिव्हाइड : ए जर्नी इनटू द पाकिस्तान ऍडमिनिस्टर्ड कश्मीर' या मालिकेतले ते अंतिम पुस्तक. तिच्या तिन्ही पुस्तकांत केवळ भौगोलिक राजकीय मुद्द्यांचा उहापोह समोर न येता या तिन्ही देशांतील नागरिकांची जी ससेहोलपट झाली, ज्या राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या, सामाजिक अभिसरणाचे चक्र ज्या गतीने उलटे फिरले गेले त्यावर तटस्थ वृत्तीतील भाष्य येते. अशा काही पुस्तकांचे वाचन केल्यास या तिन्ही देशातील परवीन रहमान प्रमाणेच अनेक कुटुंबांनी किती हालअपेष्टा सोसल्या असतील याची कल्पना येते. या तिन्ही देशातील सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांचे जी दोलायमान मनस्थिती झाली. आप्तेष्टांपासून ताटातूट झाली, स्थावर जंगम मालमत्तेवर पाणी सोडत जन्मभूमीपसून परागंदा व्हावं लागलं, जिथे ते स्थायिक झाले तिथे त्यांची गणती निर्वासितात झाली आणि मानहानीला तोंड देत अपमानास्पद जिणं त्यांच्या वाट्याला आलं. परवीन रहमान यांचं कुटुंबही याला अपवाद नव्हतं. एकोणीसशे एकाहत्तरमध्ये रहमान कुटुंब ढाक्यामधील राहते घर सोडून पाकिस्तानमधील कराची येथे वास्तव्यास आले. कष्टप्रद दिवसात परवीनने आर्किटेक्चरमधील पदवी शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण घेताना गृहनिर्माण, नागरीवस्ती नियोजन आणि ईमारत निर्माण यांत रुची दाखवत संशोधन केले. मुंबईमध्ये ज्याप्रमाणे धारावी झोपडपट्टी आहे वा राजधानी दिल्लीमधील कुसुमपुर पहाडी, मदनपूर भागात जसे झोपडपट्टीचे प्राबल्य होते तसे कराचीमध्ये ओरंगी भागात बकाल आणि विशाल झोपडपट्ट्या होत्या. परवीन रहमाननि या झोपडपट्ट्यांसाठी विशेष काम केलं. ओरंगी पायलट प्रोजेक्ट (OPP) या एनजीओचा परवीन मुख्य हिस्सा होत्या. ओरंगी झोपडपट्टी परिसरात स्वच्छता, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण आणि लघुव्यापार आस्थापनांसाठी वित्तसहाय्य अशा पंचसूत्रीने या परिसराचा कायापालट करण्यात आला. परवीननी इथे काम करताना अनेक बारकाव्यांचा व कराचीमधील नागरी समस्यांचा सकल अभ्यास करून केवळ झोपडपट्टी हटवून पक्की घरे बांधून समस्या सुटणार नसून त्याकरिता मूळ समस्येला त्याचवेळी हात घातला पाहिजे हे निदर्शनास आणून दिले. पाकिस्तान सरकारकडे त्याविषयीची योजना सादर केली. सरकारनेही याला सकारात्मक प्रतिसाद देत मोठया प्रमाणावर अर्थसहाय्य केलं. याचे चांगले परिणाम दिसून आले. तब्बल पंधरा लाख लोकसंख्येच्या लोकवस्तीचा चेहरामोहराच बदलून गेला. या रहिवाशांना मदत करण्याच्या परवीन रहमानच्या समर्पणामुळे त्यांची ओपीपीच्या गृहनिर्माण आणि स्वच्छता कार्यक्रमांची प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. प्रत्येक प्रकल्पामागे त्यांनी पुढाकार घेतल्याने स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून सहाशे पन्नास खाजगी शाळा, सातशे सुसज्ज वैद्यकीय दवाखाने आणि या भागातील तब्बल चाळीस हजार लघु व्यावसायिकांच्या उपजीविकेच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने एका करारा अंतर्गत भागीदारी करून अर्थसहाय्य केलं. परवीन रहमान यांना त्यांच्या या अनोख्या कार्याबद्दल आणि पाकिस्तानी लोकजीवनाच्या कल्याणासाठी समर्पणाबद्दल मरणोत्तर सितारा-ए-शुजात प्रदान करण्यात आला. परवीन रहमान यांच्या पासष्ठाव्या जयंतीनिमित्त गुगलने बावीस जानेवारी रोजी त्यांचे देखणे डुडल होमस्क्रीनवर ठेवलं होतं. परवीन यांचा हा मोठा नि उचित सन्मान म्हणावा लागेल. परवीनचे पाकिस्तानसाठीचे योगदान, ती ज्या मूल्यांसाठी उभी राहिली ती मुल्ये आणि तिचा वारसा गुगलने जणू साजरा केला. पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनी यावर तुफान आनंद व्यक्त केला. विख्यात पाकिस्तानी अभिनेता अहसान खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर डूडल शेअर करताना परवीन रहमान यांच्या जीवनावर आधारित गतवर्षी निर्मिल्या गेलेल्या चित्रपटाची आठवण केली. परवीन रहमान यांच्यावरील चित्रपटाने त्यांना जगभरात पोहोचवले होते त्याचेच प्रतिबिंब गुगल डुडलमध्ये उमटलं. गोरगरिबांसाठी झटणाऱ्या आणि विषमतेविरुद्धचा लढा बुलंद करणाऱ्या परवीनची तेरा मार्च दोन हजार तेरा साली दिवसाढवळया हत्या करण्यात आली. ज्या परिसराचा उद्धार होण्यासाठी आयुष्य वेचलं त्या ओरंगी उपनगरातच त्यांची हत्या झाली याचं शल्य पाकिस्तानी जनतेला आणि सरकारला विलक्षण डाचलं. त्यांच्या चारही मारेकऱ्यांना अटक करून पाकिस्तानच्या दहशतविरोधी न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवला गेला ज्यात. तेरा डिसेम्बर २०१३ रोजी चारही आरोपींना आजन्म जन्मठेपेची सजा सुनावली गेली. आपल्यासारख्या अनेकांनी रोजच्या दिनमानात परवीनप्रमाणेच जीवनातल्या प्रेरणा शोधल्या पाहिजेत. याच वेळी पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका उत्तम घटनेचा उल्लेख केलाच पाहिजे. पाकिस्तानबद्दल आपल्या समाजमनात तिथल्या सर्वंकष जाणीवांप्रती एक विशिष्ट द्वेषमूलक प्रतिमा आहे ; तिला बळकटी देण्याचे काम आपली प्रसारमाध्यमे आणि आपला सोशल मीडिया इमानेइतबारे करत असतो. पाकला आपले शत्रूराष्ट्र समजण्यास कुणीच हरकत घेणार नाही मात्र तिथे सारंच प्रतिगामी आणि बुरसटलेलं आहे, तो देश मध्ययुगाहून मागे जातोय, तिथे कमालीची धर्मांधता सर्वच क्षेत्रात नांदते असं चित्र आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. हे खरं वाटण्याजोग्या काही घटना तिथे अधूनमधून घडतही असतात हे नाकारूनही चालणार नाही मात्र हेच एकमेव सत्य नाहीये हे देखील मांडायला हवे. तिकडे काही सकारात्मक घटना घडली तर आपल्या माध्यमांचा कल ती बातमी लपवण्याकडे असतो. या गृहितकाला बळ देणारी एक विलक्षण मोठी घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडलीय. लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आयेशा मलिक यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीसाठी मंजुरी मिळाल्याने तिथे नवा इतिहास घडतोय. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या रोस्टरचा त्या प्रमुख भाग असतील आणि काही वर्षांनी त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी असतील. या अभूतपूर्व घटनेनंतर पाकिस्तानी सोशल मीडिया त्यांच्या कौतुकाने ओसंडून वाहत होता हे विशेष होय ! परवीन रहमान ते आयेशा मलिक यांच्या निमित्ताने का होईना पण पाकिस्तानमध्ये महिलांना गौरव लाभतोय हे चित्र आशादायक आहे. बातम्यांच्या गदारोळात हा अन्वयार्थ हरेकापर्यंत पोहोचायला हवा, त्यासाठीच ही बिटविन द लाईन धडपड ! - समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!