निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही. तब्बल दहा वर्षांनी एकेदिवशी मार्सेलीहून परतीचा प्रवास करत असताना त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते संध्याकाळी निघाले. पहाटेच ट्रेन ब्लेझी-बा स्टेशनला पोहोचली. निळे घर अगदी तसेच होते मात्र रंग अजूनच फिका वाटत होता. घराकडे कुणाचेच लक्ष नसल्यासारखे वाटले. पण त्या बागेत एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती, जिचे मखमली केस गुलाबी रिबनने बांधलेले होते. ही लॉरिनच असावी असा त्यांनी कयास बांधला. लॉरिनच्या शेजारी बसलेला तरुण अगदी एकरूप झाल्यागत तिच्याकडे पाहत होता. प्रसन्न साधं हास्य आणि निखळ शांतता त्या दोघांच्या सहवासात नांदत होती. त्या तरुण-हृदयी भेटीच्या दृश्याने इमॅन्यूएलच्या काकांचे मन आनंदाने भरून आले. ट्रेनची शिटी वाजताच घाईने खिडकीबाहेर डोकावत नमस्कार करत ते ओरडले, "हॅलो मिस लॉरिन!...'गुड बाय'..." त्या सरशी त्या दोघांनी त्यांच्याकडे चकित होऊन पाहिलं नि मग दोघंही एकमेकांवर रेलल्यागत हसून नमस्ते म्हणत रुमाल हलवून अभिवादन केलं. एरेनना त्याचा आनंद झाला. याला बरीच वर्षे उलटली. मार्सेल लाईनवर त्यांचं अनेकदा येणंजाणं होऊनही कामाच्या रगाड्यापायी ज्या ट्रेन्सनी प्रवास व्हायचा त्या ट्रेन्स ब्लेझी-बा स्टेशनवर थांबत नव्हत्या. मात्र एकदा संध्याकाळच्या ट्रेनने तिथे जाण्याची संधी मिळालीच. आपण लॉरिनला तिच्या प्रियकराच्या शेजारी कधी पाहिले होते हे आता त्यांना नक्की आठवत नव्हते. या खेपेस ट्रेन जेव्हा तिथे थांबली तेंव्हा त्या निळ्या घराच्या बागेत एका महाकाय कुत्र्याशी खेळणारा किशोरवयीन मुलगा त्यांना दिसला. लॉरिन कुठे दिसत नव्हती. ते खूप निराश झाले. तितक्यात तो मुलगा ओरडू लागला, "मॉम !.. मॉम..ट्रेन आली.. ट्रेन..." लगोलग घरातून एक प्रौढा बाहेर आली. ही लॉरिनच असावी जी आता थोडी लठ्ठ, सावळीशी दिसत होती. पाहताच त्यांनी तिला ओळखलेलं. आपली टोपी वर उचलून त्यांनी आदराने नमन केले. उत्तरादाखल तिनेही आश्चर्यचकित मुद्रेने अभिवादन केले. आपल्या येण्याची खुण लक्षात राहावी म्हणून त्यांनी एक संत्री उचलून मुलाच्या दिशेने बागेत फेकली. ती गवतावरून घरंगळत गेली. मुलगा आणि कुत्रा त्यामागे धावले. यानंतर एरेनच्या काकांच्या आयुष्यात अशा काही विचित्र घटना घडल्या की ज्या आता दुःस्वप्नागत वाटत होत्या. एका कामासाठी तुर्कीहून परतताना त्यांचे जहाज समुद्रात बुडाले. त्या प्रलयभयात देखील ब्लेझी-बा स्टेशनच्या बाजूचे ते निळे घर त्यांना आठवले ! जहाज बुडाल्यावर मृत्यूच्या दारात उभं असताना त्यांच्या मनात अत्यंत काळजी दाटून आली होती. खरेतर जगभ्रमंतीची मजा टाळून थोडं समाधानी होण्यासाठी लॉरिनसारखं शांततेत जगलं पाहिजे हे त्यांना उमगलं होतं मात्र तशा निळ्या घरात राहण्याची शक्यता त्यांच्यासाठी दुरापास्त झाली होती. प्रलयाच्या घटनेत सुदैवाने ते वाचले. दोनेक आठवड्यांनी ते फ्रान्सला घरी परतले. त्यानंतर मार्सेलीहून पॅरिस शहरासाठी ट्रेनमध्ये चढले तेंव्हा तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास होता. म्हातारपणी इतक्या त्रासानंतर अजून प्रवास करायची त्यांची इच्छा नव्हती. सकाळी ट्रेन त्या ब्लेझी-बा स्टेशनवर पोहोचली. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले. आता ट्रेन थांबेल नि मग पुन्हा धावेल, दरम्यान केवळ क्षणभराची संधी असेल. कदाचित ही लॉरिनची शेवटची भेट असेल हे त्यांना ठाऊक होतं. डब्यातून डोकावून पाहताच स्टेशनला लागून असलेले, सूर्यप्रकाशाने उजळून निघालेले निळे घर दिसले. ते पाहताच आठवलं की ती अजूनही याच घरात असावी, बहुधा तशीच शांत आणि काहीशी उदासीन ! तिला त्यांचे जहाज बुडाल्याची माहिती असायचे काही कारण नव्हते. काका विचारमग्न असतानाच त्या घरासमोर ट्रेन थांबली. घराच्या पूर्वेला व्हरांड्यात एक वृद्धा बसली होती. रेखीव भांगामुळे माथ्यावरचे चंदेरी केस दोन भागात विभागले होते. घरातली लहान मुलं तिच्याभोवती कल्ला करत होती. ही लॉरिनच होती यात शंका नसावी. वृद्धावस्थेत तिला कोणीही ओळखू शकलं नसतं पण त्यांनी निमिषार्धात तिला ओळखले ! आधी तिच्या मुलाचे चेंडू खेळणे, मग तारुण्यातील तिचे प्रेमळ आयुष्य; मग पत्नी नि आईच्या रुपात आणि आज ती आजी होती. नातवंडांनी वेढलेली आजी ! प्रत्येक वेळी तिची वेगवेगळी रूपे होती ! या खेपेस तिला पाहताच त्यांच्या कारुण्याने भरलेल्या हृदयात तिच्याशी जवळीक साधण्याची उर्मी पुन्हा दाटून आली. ते या मार्गाने पुन्हा कधीही येणार नव्हते. या जन्मातली ती त्यांची अंतिम भेट असल्याने तिच्याशी थोड्याशा तरी संवाद व्हावा याची ओढ लागली होती. तिच्याशी बोलूनच चाळीस वर्षांपासूनच्या अबोल ओळखीचा शेवट करावा असं वाटत होतं. अखेर याकामी नियतीनेच त्यांना मदत केली, नेमके रेल्वेचे इंजिन बिघडले. दुरुस्तीस तासाचा अवधी होता तोवर स्टेशनवरच थांबणे क्रमप्राप्त होते. वृद्धत्व आले असले तरी गैर काही करत नसल्याने संधीचा फायदा घेत खेचल्यागत ते त्या निळ्या घराच्या गेटकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पाय थरथरत होते. आजवर कुणाच्या भेटीचा त्यांना इतका मोह कधीच पडला नव्हता. एका विराट जलप्रलयाशी सामना करून जगलेले असल्याने भित्रं असण्याचा सवालच नव्हता. गेटपाशी जाताच त्यांनी बेल वाजवली. आतून आलेल्या नोकराने दार उघडताच ते त्याला म्हणाले की, ‘त्या पोर्चजवळ बसलेल्या मालकिणीशी बोलायचे आहे. ‘ नोकराने त्यांना प्रतीक्षारत थांबवून ठेवले आणि तो मालकिणीला बोलवायला गेला. काही क्षणांतच ती आली. इतक्या दिवसांनंतर अखेरीस लॉरिन त्यांच्यासमोर उभी होती. पण तिच्याशी बोलण्यासाठी त्यांना एकही मुद्दा सापडला नाही. ते जणू मुग्धच झाले होते. न राहवून मग तिनेच त्यांना विचारले, "तुमच्या भेटीचा योग कसा जुळून आलाय ? याचे प्रयोजन काय आहे ? की हे एक सौभाग्यच समजावे ?” या प्रश्नावर ते घाबरून उत्तरले, " हे काय ? तू मला ओळखू शकली नाहीस?" "नाही !" – तिचे उत्तर. "अरेच्चा ! मी... मी तर तुम्हाला चांगलंच ओळखतो !... आठवून पहा बरं !... खूप काळ उलटलाय तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो. मी तुम्हाला या घराच्या बागेत चेंडूशी खेळताना पाहिलंय... तुम्हाला आठवतेय का पहा मागे एकदा ज्याने तुम्हाला रेल्वेच्या खिडकीतून नमस्कार केला होता तो मीच आहे. तेव्हा तुमचे लग्न झालेले नव्हते आणि नंतर खूप दिवसांनी एका लहानग्याच्या दिशेने संत्री फेकणारा माणूसही मीच आहे." एरेनकाका म्हणाले. त्या खुलाशनंतर ती स्त्री त्यांच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहतच राहिली; भीतीने ती दोन पावले मागे सरकली; कदाचित तिला ते वेजे वा नशेडी वाटले असावेत. पण मग त्यांचे म्लान म्हातार्‍याचे रूप पाहून तिला धीर आला असावा आणि ती अगदी मृदू स्वरात म्हणाली, “तुम्ही चुकलात साहेब ! आम्ही या निळ्या घरात राहून फक्त एक वर्ष झालो आहोत." थक्क होण्याची वेळ आता काकांची होती. स्तब्ध होऊन त्यांनी विचारले, "मग काय तुम्ही लॉरिन नाहीत ?" "लॉरिन !.. तुम्ही काय बोलत आहात मला काहीच समजत नाहीये. आमच्या घरात या नावाचे कोणी नाहीये !" त्या वृद्ध स्त्रीच्या उद्गाराने त्यांच्या आजूबाजूला भासमय वातावरण पसरल्यासारखे वाटले. ते पुन्हा बोलते झाले, "माफ करा, मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही येण्यापूर्वी या घरात कोण राहत होते?" "आमच्या आधी ? एक वृद्ध गृहस्थ. ते ब्रम्हचारी होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.” वृद्ध स्त्रीने उत्तर दिले. तरीही ते सवाल करत तिथेच उभे राहिल्यावर वृद्धेने संतापाने पाहत त्यांना गेटबाहेर काढले आणि गेट बंद केले. मिस्टर एरेन अगदी वेड्यात निघाल्यागत 'ब्लेझी-बा'च्या रस्त्यावर पावलं टाकत माघारी निघाले. अचानक झालेल्या या धक्क्याने त्यांचे मन दुःखभारीत झाले. हाती थोडासा वेळ शिल्लक असल्याने त्यांनी निर्धार केला की शोधाशोध करून खरे काय ते शोधून काढले पाहिजे. त्या स्त्रीने दिलेल्या माहितीमध्ये काहीतरी मोठी तफावत असावी, ती शोधून काढली पाहिजे असे त्यांना राहून राहून वाटू लागले. परत येऊन त्यांनी स्टेशन मास्तरांना लॉरिनविषयी विचारलं तर त्या सदगृहस्थांना काहीच माहीत नव्हते. या स्टेशनवर तो नवखा होता. पण त्याने सांगितले की या गावातील सर्वात वृद्ध माणूस स्टेशनजवळील निळ्या घरासमोर राहतो, त्याच्याकडे थोडीफार माहिती मिळू शकते. मिस्टर एरेन त्याच्याकडे थडकले. त्यानी त्यास प्रश्न विचारले. वृद्धाने स्मरणशक्तीस ताण देऊन काही आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला "लॉरिन ? ओहो, लॉरिन ? नाही सर, मला आठवत नाही." “पण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी मी त्या बागेत एक स्त्री पाहिली होती, काहीशी लठ्ठ आणि काहीशी सावळी. तिच्यासोबत एक लहान मूल आणि एक मोठा कुत्रा होता, मग ती कोण होती ?" एरेन यांनी सवाल केला. "भारीच ! मोठा कुत्रा...? एक मोठा कुत्रा ? अहो त्या तर एका फौजदाराच्या पत्नी, मिसेस झिलमे होत्या, त्यांचे नाव लॉरिन नव्हते. मला चांगलं माहीत आहे. मी त्याच्याच घरात राहायचो. आणि त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव फ्रान्सिस होते." ते ऐकून एरेन पुरते गोठल्यागत झाले. "बरं साहेब, नीट आठवतंय का पहा बरं... त्याही आधी, साधारण बारा वर्षांपूर्वी तिथे एक तरुण स्त्री राहत होती, खूप गोरी होती ती. तिचे लांबसडक केस गुलाबी रिबनने बांधलेले असायचे आणि एक छोटया अंगचणीचा गव्हाळ तरुणही तिथे असायचा. कदाचित त्यांच्यात काही नाते असावे अशी त्यांच्यात लगट होती, तो तरूण या निळ्या घरात राहत नव्हता का ?" या प्रश्नावर म्हातारा विचार करत राहिला. मौन राहिला. पुन्हा बराच वेळ विचार करत राहिला. शेवटी काहीच आठवेना झाले तेंव्हा त्याने त्याच्या म्हातारीला बोलावलं. ती वृद्धा बारीक अंगकाठीची होती, तिचे डोळे तेजस्वी पाणीदार होते. तिच्या प्रफुल्लित चेहऱ्यावरून अंदाज येत होता की तिच्यापाशी तीक्ष्ण स्मरणशक्ती होती. वृद्धाने एरेननी उपस्थित केलेले सर्व मुद्दे तिला कथन केले. ते ऐकताच वृद्धा उस्फुर्तपणे उद्गारली, "अरेच्चा ! ती मिस स्टेफनी होती. कॉन्ट्रॅक्टर सरांची मुलगी. तिचे लग्न झाले होते. अहाहा, बिचारी ! त्यांचे लग्न सुखाचे नव्हते. ते एकमेकांपासून विभक्त झालेत. अहा ! आता त्या मुलीचे नाव काय आहे ते आठवून पाहते... सोम्बरॉन गावी ती आता तिच्या वडिलांच्या घरी राहते. अरेरे ती गरीब आता खूप दुःखी आहे." लॉरिनचा सारा शोध दुःखद रीतीने संपुष्टात येऊ लागल्याने काहीसे उदास होऊन मिस्टर एरेननी तिथून निघण्यासाठी नमस्ते म्हटलं. एव्हाना त्यांच्याकडे आता फारसा वेळही शिल्लक नव्हता ; ट्रेन थोड्या वेळात निघालीच असती. नकळत एरेन बोलून गेले, "लॉरिन ! लॉरिन ! हा माझा भ्रम नाही. मी तिला इतक्या लहान वयात पाहिलं, तिचं नाव ऐकलं. आजही ती वसंताच्या फुलपाखरासारखी नाचताना आणि उडी मारताना माझ्या डोळ्यासमोर दिसते" ते ऐकताच निमिषार्धात काहीशा उत्साहाने ती वृद्धा उत्तरली, "उफ्फ ! तुम्ही हे आधीच सांगितले असतेत तर बरे झाले असते... तुम्ही आधी एका मध्यमवयीन बाईबद्दल विचारले, मग एका तरुण मुलीबद्दल विचारले... आता तुम्ही एका लहान मुलीबद्दल विचारताय.. .. होय, हो, मला ते चांगलं आठवतंय.. लॉरिन!... ..तुम्ही त्या सुंदर मुलीबद्दल विचारताय?...ती डॉक्टरची मुलगी होती, आमची नातेवाईक ! अहाहा, ती गरीब मुलगी अकस्मात मरण पावली हो ! वय दहा फक्त !" तिच्या माहितीने एरेन दिग्मूढ झाले. गोठून गेले... एरेननी लॉरिनला तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी पाहिल्यानंतर काही आठवड्यांनंतरच तिचा मृत्यू झाला होता आणि एरेन ? गत चाळीस वर्षांपासून ते पुन्हा पुन्हा तिच्या मागे मागे येत होते ! हे विस्मयकारक आणि काळीज उसवणारं वास्तव होतं !(इमॅन्यूएल एरेन यांच्या ब्ल्यू हाऊस या फ्रेंच कथेचा स्वैर मराठी अनुवाद)  *******************************************************इमॅन्यूएल एरेन (Emmanuel Arène_ १ जानेवारी १८५६ - १४ ऑगस्ट १९०८) हे फ्रेंच पत्रकार, नाटककार, कथाकार आणि गणतंत्राचे चिकित्सक होते. अनेक वर्षे ते कोर्सिकाचे उपसांसद होते आणि अंतिम काळात ते कोर्सिकाचे सिनेटर होते. समुद्र विषयक नियम आणि पनामा कालव्याच्या उभारणीतील आर्थिक घोटाळयांच्या अभ्यास समितीतही सामील होते. कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी कोर्सिकन राजनीतीमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. ते जितके सफल पत्रकार होते तितकेच उत्कृष्ठ लेखक होते, त्यांनी लघुकथांसह नाटके देखील लिहिली होती.- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!