नयनरम्य बाली - भाग १० - बतूर ज्वालामुखीवर आरोहण Beautiful Bali - Part 10 - Hike to Batur volcano

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

बालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले ज्वालामुखी. एकंदरीत इंडोनेशियामध्ये १३९ ज्वालामुखी आहेत. हा सगळं देशच pacific ring of fire वर वसलेला आहे. त्यामुळे वरचेवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या गोष्टी इथे सामान्य आहेत. बाली मध्ये एकूण चार  ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी अगुंगचा उद्रेक २०१९ मध्ये झाला होता. आणि त्याचा उद्रेक हा अजूनही सुरू आहे. बतूर हादेखील जागृत ज्वालामुखी आहे. त्याचा शेवटचा उद्रेक २००० साली झाला होता. बाकीचे एक तर मृत आहेत किंवा अर्धमृत आहेत. किंतामानी हे गाव बतूरच्या caldera मध्येच वसले आहे. बतूरवर चढाई करण्यासाठीच मी इथे मुक्काम केला होता. बतूरवर चढाई ही बालीमधली एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे. असंख्य पर्यटक इथे सूर्योदय बघण्यासाठी रात्री चढाई करतात. त्यासाठी नियोजित गाइडेड ट्रेक असतात. असाच एक ट्रेक जॉइन करायचा माझा विचार होता. तशी आगाऊ सूचनादेखील मी हॉस्टेलला दिली होती.  बतूर ज्वालामुखी कोणीतरी दार वाजवले आणि मी जागा झालो. हॉस्टेलवरचा कर्मचारी जेवण तयार आहे म्हणून सांगायला आला होता. मी एकदम भानावर आलो. दिवसभरच्या बाइक चालनाने मी प्रचंड थकलो होतो. पण भूकसुद्धा लागली होती. मग जेवायला बाहेर आलो. बाहेर हॉस्टेलमधल्या तरुणांचा एक ग्रुप जमला होता. एक जोडपं फ्रान्सचं होतं. एक मुलगी जर्मनीची तर एक बेल्जियमची होती. ओळखपाळख झाली. माझं तोडकंमोडकं जर्मन ऐकून सगळे एकदम इम्प्रेस झाले होते. माझी लगेचच सगळ्यांशी मैत्री झाली. आज रात्री  निघणार्‍या बतूर ट्रेकचं प्लॅनिंग सुरू होतं. आता मध्यरात्री उठून ट्रेकला जायचं अगदी जिवावर आलं होतं. मी तर जवळपास न जायचा निर्णयच घेतला होता. पण इथे जमलेला ग्रुप बघून माझा निर्णय बदलला. इथवर आलोच आहे तर करून येऊ ट्रेक. मी ट्रेकचे आगाऊ पैसे भरले आणि जेवण आटोपून परत रूमवर झोपायला गेलो. पण झोप काही येईना. फोनला नेटवर्क नव्हतच. उगीच सोबत आणलेलं पुस्तक चाळत बसलो. दहाच्या सुमारास थोडा वेळ आडवा झालो. जरा झोप लागतेय तेवढ्यात दारावर टकटक झालीच. रात्रीचे अडीच वाजले होते. ट्रेक सुरू करायची वेळ झाली होती. काल जमलेला सगळा ग्रुप आधीच आवरून तयार होता. वेळेच्या बाबतीत यूरोपियन लोकांचा काटेकोरपणा कौतुकास्पद असतो. थोडा चहा घेऊन आम्ही सगळे निघालो.  गाडीने डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून ट्रेक सुरू होणार होता. हवा गार होती. आभाळात तार्‍यांचा खच पडला होता. ढग अजिबात दिसत नव्हते. म्हणजे आज सूर्योदय सुंदर दिसणार या कल्पनेने आम्ही अजून उत्साहात चढू लागलो.  ट्रेकचा मार्ग बारीक वाळूने भरलेला होता. त्यामुळे चढताना ग्रीप मिळत नव्हती. चढण फारशी तीव्र नसली तरी बारीक वाळूने चढण जास्त अवघड वाटत होती.  धापा टाकत आम्ही माथ्यावर पोहोचलो. इथे तर चक्क लाकडाचे बाक लावून स्टेडिअम सारखी बसायची व्यवस्था केली होती. इथे बसून सूर्योदय बघायचा? माझी जरा निराशाच झाली. पण आमचा गाईड म्हणाला, नाही, आपलं "पॅकेज" वेगळं आहे. आम्ही थोडे जास्त पैसे भरले असल्याने आम्हाला माथ्यावरच्या थोड्या अजून उंच असलेल्या भागावर जायला मिळणार होते. तिथे एक जण प्रत्येक ग्रुपचे कोणते पॅकेज आहे ते तपासत होता! या जागेचे झालेले कमालीचे व्यावसायीकरण  बघून मी अचंबित झालो! ग्रुप मधल्या एकाकडून हेदेखील ऐकलं की इथे स्थानिक लोक पर्यटकांना स्वतंत्र येऊच देत नाहीत. यायचं तर गाईड सोबतच नाहीतर नाही. सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच आहे म्हणा. कारण ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप कधीही होऊ शकतो. पण या गोष्टीत स्थानिक तरुणांचा रोजगार सुरक्षित करणे हीच बाब जास्त उठून दिसत होती. असो. आमच्या पॅकेज मध्ये ज्वालामुखीच्या एका बाजूने चढाई आणि दुसर्‍या बाजूने उतरणे आणि शिवाय नाश्ता हे सगळे अंतर्भूत होते. ठरल्याप्रमाणे आम्ही डोंगराच्या थोड्या वरच्या भागात जाऊन थांबलो. इथे फक्त आम्ही आणि अजून एक ग्रुप होता. आम्ही तसे लवकर पोहोचल्याने इथे तशी शांतता होती. पहाटेचे पाच वाजत आले होते. सूर्योदय व्हायला अजून तासभर अवकाश होता. तार्‍यांनी भरलेलं आकाश सुंदर दिसत होतं. मध्येच आकाशगंगेचा धूसर पट्टा दिसत होता. दूरवर किंतामानीतले दिवे लुकलुकताना दिसत होते. थंड वारा सुटला होता. मी ट्रायपोडवर  कॅमेरा लावला आणि आकाशाचे फोटो काढण्यात दंग झालो.  तार्‍यांनी भरलेले आकाश आणि दरीत लुकलुकणारे दिवे सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले अचानक वाहत आलेला ढगांचा लोट सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले. आधी लाल, मग केशरी, गुलाबी, सोनेरी अशी रंगांची उधळण होऊ लागली. आता सूर्यबिंब लवकरच वर येणार म्हणून आम्ही उत्सुकतेने पूर्वेकडे बघत होतो. तेवढ्यात कुठून कोण जाणे एक ढगांचा प्रचंड लोट त्या डोंगरावर वाहत आला. अक्षरशः काही सेकंदांत त्या ढगाने अवघ्या डोंगराला कवेत घेतलं. हातातोंडाशी आलेला सूर्योदय त्या ढगाने एका क्षणात आमच्याकडून हिरावून घेतला. आम्ही सगळेच निराश झालो. अगदी काही मिनिटं आधी स्वच्छ असलेलं आकाश असं ढगांनी भरून जावं आणि ज्या जादुई क्षणासाठी इथवर आलो होतो तो असा निसटून जावा हे अगदीच निशाजनक होतं. पण शेवटी निसर्गच तो. त्याची तक्रार कोणापुढे करायची? असो. ज्या वेगाने तो ढग आला त्या वेगाने तो कदाचित निघूनही जाईल अशा अपेक्षेने आम्ही तिथेच थांबलो. वार्‍याने वाहणारे ढगांचे लोट त्या सोनेरी वातावरणात जादुई वाटत होते. थोड्याच वेळात सूर्यबिंब वर आले. त्याच्या प्रखर प्रभेने सारा आसमंत उजळला गेला. ढगांनी पूर्व दिशा रोखून ठेवली असली तरी पश्चिमेकडचे ढग मध्येच बाजूला जाऊन समोरच्या दरीचे दृश्य दाखवत होते. वारा भन्नाट सुटला होता. अंगात हुडहुडी भरत होती. थोड्या वेळाने तो ढगांचा आणि वार्‍याचा खेळ थांबला. थोडी उघडीप निर्माण झाली. एखादं लहान मूल इकडेतिकडे उद्या मारून, खेळून, मस्ती करून एकदाचं झोपी जावं तसं काहीतरी घडत होतं. आणि बघतो तर काय, खाली दरीत ढगांची मुलायम चादर पसरली होती. नुकताच पिंजलेला कापूस अलगद अंथरून ठेवावा तसे वाटत होते. वर स्वछ निळे आकाश दिसत होते. दूरवर अबंग आणि अगुंग या डोंगरांची त्रिकोणी शिखरे दिसत होती. ढग नसते तर समुद्रही दिसला असता. सारेच दृश्य अवर्णनीय होते. किती फोटो काढावेत किती नाही असं झालं होतं.  सूर्य वर आला आणि सारे वातावरण सोनेरी झाले ढगांच्या दुलईतून डोकं वर काढणारी अबांग आणि अगुंग ची शिखरे  मध्येच ढग बाजूला सरून दरीचे दर्शन घडवत होते इथे एक फोटो तर आवश्यकच होता!तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही खाली उतरु लागलो. ही वाट सुद्धा निसरडीच होती. पण इथे बारीक वाळू पेक्षा चिखल जास्त होता. मुख्य शिखर पार करून आम्ही मधल्या सपाट भागावर पोहोचलो. इथे आणखी एक आश्चर्य आमची वाट बघत होतं. ते म्हणजे दगडातून येणारे वाफेचे फवारे. ज्वालामुखी जागृत असल्याची एक खूण. इथे कुठल्याही दगडाला हात लावला तरी गरम लागत होतं. आम्ही चिखल आणि गवत बघत चाललो होतो. मग मध्येच गाईड म्हणाला, चला नाश्ता करूया. इथे मध्येच नाश्ता? नुसती फळं आणि सुकामेवा खायचं की काय नाश्त्याला? पण इथेच तर गम्मत होती. आमच्या गाईडने गरम दगडाखाली खड्डा खणून त्यात अंडी आणि केळी घातली आणि वर फोईल पेपर लावून खड्डा बंद केला. ही होती आमची नैसर्गिक चूल! दहा मिनिटातच त्याने खड्डा उकरून अंडी आणि केळी बाहेर काढली. अंडी तर व्यवस्थित उकडली गेली होती. त्याला थोडासा गंधकयुक्त वास येत होता. आणि केळ्यांचा तर चक्क जॅम तयार झाला होता. तो जॅम ब्रेडवर लावून आम्ही खाऊ लागलो. समोर ढगांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. ज्वालामुखीच्या कुशीत बसून त्याच्याच उष्णतेवर शिजवलेला नाश्ता खाण्याचा अनुभव अगदी शब्दातीत होता. पेटपूजा करून आम्ही पुढे निघालो. उतरताना एका ठिकाणी समोरच्या दरीत नुसती ढगांची चादर दिसत होती. मी तिथे जरा वेळ थांबलो. आणि बघतो तर काय, माझी सावली त्या ढगांवर पडली होती आणि त्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य, ज्याला इंद्रवज्र म्हणतात, निर्माण झाले होते! जेव्हा आपण उंचीवरच्या ठिकाणी असतो, समोर ढग असतात, आणि मागून सूर्यप्रकाश असतो तेव्हा असे इंद्रवज्र दिसते म्हणतात. आपल्या हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा इंद्रवज्रासाठी प्रसिद्ध आहे. इथेही तसाच योग जुळून आला होता. हे इंद्रवज्र म्हणजे आजच्या दिवसात दिसलेल्या निसर्गाच्या किमयेचा कळसाध्याय होता!  इंद्रवज्र! खड्ड्यातली नैसर्गिक चूल उताराची रम्य वाट जसजसे खाली उतरू लागलो तसा उकाडा वाढू लागला. आता पुन्हा बारीक वाळूचा प्रदेश सुरू झाला होता. ढगांची चादर विरून गेली होती. स्वच्छ निळं आकाश दिसत होतं. बतूर ज्वालामुखीचा caldera सुस्पष्ट दिसत होता. काल रात्री ज्या तीव्र वळणाच्या घाटाने मी आलो होतो तो रस्ताही दिसत होता. थोडं पुढे जाताच बतूरची दोन उपविवरं दिसू लागली. त्यांपैकी एक हे २००० साली झालेल्या उद्रेकादरम्यान निर्माण झाले होते. तिथून प्रचंड वाफा येत होत्या. सगळीकडे गंधकाचा वास भरून राहिला होता. गंधकयुक्त पिवळी मातीही इकडेतिकडे पसरलेली दिसत होती. तिथे थोडेफार फोटो काढून आम्ही पुढे निघालो. आता उतार संपला आणि राखाडी वाळूचा सपाट भाग सुरू झाला. या मऊ वाळूतून चालणे जिकिरीचे होत होते. पाय थरथरत होते आणि झोपही येत होती. कधी एकदा हॉस्टेल वर पोहोचतोय असं झालं होतं. अखेरीस आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचलो. आमची गाडी उभीच होती. गाडीत बसून आम्ही एकदाचे हॉस्टेलवर पोहोचलो.  ज्वालामुखीची उपविवरे आणि त्यातून येणार्‍या वाफा  वाफांची ऊब घेताना ;)विवरातले गंधकाचे थर राखाडी वाळूचे विस्तीर्ण मैदान क्रमशः 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!