तर आपली मान झुकलेली राहील..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आपण जर शरद पवार यांचे समर्थक असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या भाजपचा कट्टर विरोध करतात त्यांच्या नेत्यांशी वेळ येताच युती कशी काय करतात?आपण जर आशिष शेलार, फडणवीस यांचे चाहते असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा प्रचंड तिरस्कार करतात त्यांच्याशी आघाडी कशी काय करतात?आपण शिंदे, ठाकरे वा गांधी नि आणखी कुणाचे जरी समर्थक असलो तरी आपल्या पक्षाने ज्यांना विरोध केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याविषयी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत?इथे मुद्दा एमसीएचा आहे त्यामुळे आपल्या चाणाक्ष नेत्यांचे उत्तर असते की आम्ही राजकारणातले विरोधक आहोत मात्र इथे खेळांत आम्ही मित्र आहोत!मग एक सुजाण नि परिपक्व नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खेळात राजकारण्यांचे काय काम? त्यांना त्यांतले नेमके काय ज्ञान वा अनुभव याचा सवाल पडला पाहिजे!मुळात आपलाच लोचा झालाय त्यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. आपण ज्यांचे कट्टर कडवट चाहते / समर्थक असतो त्यांना आपण कधीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू इच्छित नाही हा आपल्यातला मोठा दोष होय. आपल्या आवडत्या पक्षाने, नेत्याने काहीही केलं तरी आपण त्यांचे सार ओढण्यात धन्यता मानलेली असते. अशा प्रकारे आपण आपल्या विवेकाला तिलांजली वाहिलेली असते. एक बोलके उदाहरण देतो- स्त्रियांवरील बलात्काराबद्दल आपण हिरिरीने बोलत असतो. बलात्कारी नराधमांना कठोर शासन झाले पाहिजे असं आपण म्हणत असतो. मग बिल्किस बानो बलात्कार खटल्यातील आरोपींची वेळेआधी सुटका होण्याबद्दल आणि सुटकेनंतर झालेल्या विकृत सत्काराबद्दल आपल्याला क्रोध यायला हवा! आला का आपल्याला राग? काहींना आला तर काहींना नाही! तर काहींना राग आला तरी ते गप्प बसले कारण त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाने आणि नेत्याने यावर मौन धारण केलं!इथली गंमत पाहा. आपल्याला स्त्रियांच्या शोषणाबद्दल राग आहे म्हणजे आपला विवेक जागृत आहे मात्र त्याच वेळी बलात्कारींच्या सत्काराविषयी आपण मौन राहतो म्हणजे आपल्यातल्या विवेकाचा आपण गळा घोटत असतो! हे सर्व कुणासाठी तर आपल्या आवडत्या राजकीय पक्षाच्या आणि नेत्याच्या समर्थनासाठी!मग आपल्या कथित आक्रोशाला तरी कुठे अर्थ राहतो?अशी उदाहरणे सर्वच राजकीय पक्षांची आढळून येतील. इथे कुणीच धुतल्या तांदळासारखा नाही असं म्हणून आपण आपली सुटका करून घेऊ शकत नाही. हे माहिती असूनही यांच्या पालखीचे भोई का व्हायचे? मित्रांनो आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे, नेत्याचे समर्थक असावं. त्याबद्दल हरकत असण्याचे कारण नाही. मात्र आपल्या आवडत्या नेत्याला, पक्षाला नैतिकतेविषयीच्या चौकटीतून पाहिलं पाहिजे, त्यांच्याकडून काही चुकीचे काम झाले वा कुठलीही गैरविधाने केली तर त्याच्याशी सहमत असण्याची फरफट काय कामाची? आपल्या धडावर आपलाच मेंदू असला पाहिजे. एकदा का विवेक हरवत गेला की आपल्यात आणि पशूत फरक उरत नाही. माणसाचं पशूत रुपांतर होण्यास फारसे कष्ट पडत नाहीत मात्र पशूचे माणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागते, आयुष्य पणाला लागते. जिथे सत्ता, पैसा तिथे तत्वे गुंडाळून कुणालाही मिठ्या मारण्यास राजी असणाऱ्या अप्पलपोट्या राजकारण्यांसाठी आपलं अधःपतन होत असतानाही आपण मुकाट राहत असू तर त्यांच्याइतकेच आपण दोषी असू!कालपर्यंत ज्यांची सावली एकमेकांना चालत नसते, ज्यांच्यावर अगणित आरोपांची राळ उडते ती माणसे देखील एका कोलांटीउडीत पावन होत असतील आणि आपल्याला त्यात गैर वाटत नसेल तर नक्कीच आपल्या नैतिकतेच्या व्याख्या पोकळ झालेल्या असतात.कालपर्यंत जे राजकीय पक्ष एकमेकांस शिव्यांची लाखोली वाहत असतात ते एका रात्रीत, एका पहाटेत गळ्यात गळे घालतात तेंव्हा आपल्याला त्याचा संताप यायला हवा. तो येत नसेल तर आपली तात्विक सात्विकता दांभिक झालेली असते. राजकारणापासून तटस्थ राहणं हे ही वाईटच.आपल्याला राजकीय विचार नक्कीच असले पाहिजेत मात्र त्यांना नैतिकतेची चाड असली पाहिजे.दरम्यान आपल्या राजकीय भूमिकेपायी आपल्या विवेकाची फरफट होत असल्याने आपण जागृत कर्तव्यदक्ष नागरिक न राहता निव्वळ राजकीय समर्थक झालो आहोत.आपल्याला प्रश्न पडत नाहीत, चुकीच्या गोष्टींवर आपण सवाल करत नाही आणि आपण आत्मपरीक्षण तर आपण विसरून गेलो आहोत.असो.. आज मोठा नि महान वाटणारा राजकीय कालखंड इतिहासात रूपांतरित होईल तेंव्हा त्याचे वर्णन अवघ्या काही पानांत वा परिच्छेदात असेल.काळाच्या कसोटीवर आजच्या काळास तेंव्हा परखले जाईल, त्यावर सवाल केले जातील, त्याचं मूल्यमापन केलं जाईल तेंव्हा आपल्याला ताठ मानेने सांगता आलं पाहिजे की, काहीही झालं तरी मी नेहमी विवेकाच्या बाजूने उभा होतो! आपल्याला असं सांगता आलं नाही तर आपली मान झुकलेली राहील आणि आपल्याविषयी कुणाला आदर आपुलकी नसेल, आपल्या सन्मुख कुणीच नसेल! - समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!