डबोलं........!!
By SnehalAkhila on मन मोकळे from https://hallaagullaa.blogspot.com
"अबब!! किती किलो सोनं मिळालंय तिला माहेरहून माहितीये. आम्ही तर एवढे दाग-दागिने पहिल्यांदाच पाहिले. बघूनच डोळे गरागरा फिरतात नुसते!!जुने पारंपरिक आहेत सगळे, आता तर बघायलाही मिळत नाही हो तसे. तिच्या आईच्या आईचे, सासूबाईंचे अन् त्यांच्या आया सासवांपासूनचे आहेत म्हणे!!लग्न करताना मुळीच माहिती नव्हतं एवढं सगळं. मला तर सून पसंतच नव्हती अजिबात. पण पोराने प्रेम आहे म्हटलं, अडूनच राहिला म्हणून होकार दिला बरं का मी. खोट काढण्यासारखं निघालही नाही नंतर काही पोरीत !!"छायाताई फोनवर आपल्या बहिणीला सांगत होत्या, तेवढ्यात त्यांची सून दुर्वा समोर आली, आणि त्या कारण नसताना चपापल्या आणि त्यांनी बरं आता बोलू नंतर म्हणून फोन ठेऊन दिला.दुर्वाला त्यांच्या वागण्याने हसायला आलं. "ठिक आहे ना एवढं काय त्यात, बोलायचं होतं, कोणालाही सांगावसं वाटणारच की!!"खरंच सध्या त्यांच्या घरात अति चघळला जाणारा विषय तोच एक होता. चैतन्यमयी वातावरण होतं. लक्ष्मी आपणहून जी चालत आलेली!! चांगलं डबोलं मिळालं होतं दुर्वाला. नुकतीच तिच्या आई वडिलांनी तिच्यात आणि भावात अगदी समान वाटणी करून टाकली होती, वडिलोपार्जित चालत आलेले दागिने तर मिळालेच आणि काही एकर जमिनीचीही मालकीणही झाली दुर्वा. तिला सर्व आहे हे तर माहिती होतच, पण इतक्या सहजी आपल्या तरुणपणातच सर्व मिळेल अशी अपेक्षा नव्हती. तिच्या आईवडिलांनी विचार केला, घेऊ देत सुख आताच पोरांना. पोरांना देऊनही चैनीत जगता येईल असं त्यांनी स्वतःलाही ठेवलं होतं. दुर्वा खूष तर नक्कीच होती, मात्र तिच्या वागण्यात त्याने अजून तरी फारसा फरक पडला नव्हता. पण छायाताईंची मात्र झोप उडालेली, तिला मिळालेलं डबोलं बघून!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); दुर्वाला त्यांच्या वागण्यातला बदल जाणवत होता, पण त्यांना नेमकं काय झालंय हे तिला समजत नव्हतं. दागिने घरी आणल्या आणल्या तिने त्यांना सगळे दाखवलेही होते. तिच्या आजीची माळ आठवण म्हणून मुद्दाम त्यांना गळ्यात घालायला दिली होती तिने, त्यानिमित्ताने सतत डोळ्यासमोर राहील म्हणून. त्यांनी आढेवेढे घेतच ती घातली होती.दुर्वाला कळेना, "असं तर नाही ना त्यांना दुसरं काही हवं होतं, आणि मी साधीशी माळ दिली म्हणून रुसल्यात. एवढे दागिने आहेत पाहिजे ते घ्यावे त्यांनी, तसेही मी कुठे घालून फिरणार आहे?हल्ली आपल्याशी नॉर्मल वागतच नाहीयेत त्या. सगळं काही मला विचारून करणं चाललंय. जराही वाद घालत नाहीयेत माझ्याशी? हे ओढून ताणून नीटनेटकं वागणं कशाला माझ्याशी?कुठला तरी खास ऐवज डोळ्यात भरलेला असावा त्यांच्या, आणि सांगवत नसावं बहुतेक!!"बोलू कधीतरी त्यांच्याशी म्हणून तिने सोडून दिलं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मात्र दोन दिवसाने छायाताईच स्वतःहून तिच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या, "अगं तुला ते डबोलं मिळाल्यापासून माझी झोप उडालीये ग अगदी!!""का बरं?," दुर्वालाही तो विषय काढायचाच होता."कसं सांगू तुला?" छायाताईंना बोलू की नको असं झालेलं.मग दुर्वालाच काही तरी कळल्यासारखं, ती उठली. आणि कपाटातली दागिन्यांची पिशवी काढून त्यांच्या समोर ठेवत म्हणाली, "मी अजून ठेवले नाहीत बँकेच्या लॉकरमध्ये. घ्या तुम्हाला जे आवडलय ते ठेवा तुमच्यासाठी. किती मिळालय आपल्याला, मला आवडेल तुम्ही यातलं कायमसाठी काहीही घेतलत तर." (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "अगं दुर्वा, तुला काय वाटलं मी यासाठी आले तुझ्याकडे?," छायाताई कडाडल्या एकदमच."हो, तुमचं वागणं खूपच बदललं होतं. तुम्ही जरुरीपेक्षा मला जास्त मान देत होता. माझा शब्द झेलत होता, मला वाटलं तुम्हाला हवं असेल काही यातलं, मी काय समजणार दुसरं?," दुर्वाने एकदाचं तिचंही मन मोकळं केलं."असं समजलीस मला तू? तसं असतं तर मी एखादी श्रीमंताघरची सूनच मुद्दाम शोधून नसती का आणली मुलासाठी!! माझा तर नकार होता लग्नाला. नंतरही आम्हाला तू आणि तुझ्या घरच्यांनी तरी कुठं याबद्दल सांगितलेलं?तुमची राहणी ही तेवढी अगदी उच्च नव्हती. माझ्यासाठी तर हे अचानकच घडलं. मला तर धक्काच बसलाय सगळ्याचा." (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); थोडा दम घेऊन पुन्हा छायाताई बोलू लागल्या, "अगं, मला भीती वाटतेय की तुम्ही दोघं मला इथं टाकून दुसरीकडे कुठे मोठ्ठया घरात जाल. माझं काय होईल? मी कशी राहीन माणसांशिवाय!! पैसा आला की माणस बदलताना पहिलीत ग मी. म्हणून थोडं तुझ्याशी जास्त जमवून घ्यायला बघत होते. मला सांगायचं होतं तुला, मी ऍडजस्ट करेन सर्व पण मला एकटीला सोडू नका."हे सगळं ऐकून दुर्वाने कपाळाला हात लावला. आणि म्हणाली, "मला माफ करा. मी काहीतरी दुसराच विचार केला.गेले चार वर्ष एकत्र राहतोय, अन् एकमेकींना काहीच नाही समजलो आपण........अहो, आमच्या मनातही नाहीये तसं काही. हो घर आम्ही बघतोय. एक आवडलंयही. उद्या तुम्हाला घेऊन जाणारच होतो आम्ही दाखवायला. तुम्ही हो म्हटलात, तुम्हाला आवडलं तरच पक्कं करायचं ठरवलं होतं आम्ही. तुम्हाला सोडून तिथे मज्जा तरी येईल का मला? लुटुपुटूच भांडायला कोणी नको का माझ्याशी?"हे ऐकून छायाताईंच्या जीवात जीव आला, आणि लहान मुलासारख्या टाळी वाजवून त्या म्हणाल्या, "अय्या खरंच, मलाही घेऊन जाणार तुम्ही मोठया घरात?""म्हणजे काय? तुमच्यासाठी स्पेशल देवघर सुद्धा बनवायचा प्लॅन आहे माझा!!," दुर्वाही तितक्याच उत्साहाने म्हणाली."अरे वा!! मग आता हे सगळं डबोलं उचल, यात माझा जीव मुळीच नाही!!," छायाताई बोलल्या तशी दुर्वाही चटकन उत्तरली, "माझा तरी कुठाय हो?"एकमेकींकडे बघून दोघीही अगदी निर्व्याज हसल्या.त्यांना कळून चुकलं, आताकुठे आपली ओळख कायमची आहे पटली.........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});