टुचुक.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

माझी लाडाची मैत्रीण टुचुक घेऊन आली आणि चार पाच दिवस आsई उsई करत बसली. ताप भरला, हात सुजला, दोन दिवस झिणझिणतही राहिला. ते बघून इकडे माझा मात्र धीर खचला. लस घ्यायच्या विचारानेच हुडहुडी भरायला लागली. जबरदस्तीचं आजारी पडून घ्यायला मन काही केल्या धजेचना!!मग म्हटलं, जरा सर्व्हे करूया. म्हणून ज्यांनी ज्यांनी टोचणी लावून घेतली होती, त्या साऱ्यांना फोन लावले. तमाम ओळखीच्या, साठीच्या पुढच्या काकू, मावश्या, आज्या लस घेऊनही ठणठणीत होत्या. "हत् ग!! काय घाबरतेस एवढी? आम्हाला तर काही म्हणजे काही झालं नाही. ताप नाही की तापाचा बाप नाही. सगळ्यांनी दणदणीत आवाजात सांगितलं."मग म्हटलं, "आपल्या जवळचीलाच बादली असेल एखादवेळेस. लांबच्या सख्यांचा हालहवाल पाहू जरा." काय सांगू, दहा पैकी अगदी म्हणजे अगदी एकच मैत्रीण अशी निघाली, जिला टुचुकच्या टुचकीचा नखभरही हिसका बसला नव्हता. बाकी सगळ्या त्याच्या माऱ्याने बिथरल्या होत्या बापड्या. कोणाला दोन- तीन दिवस गरगरत होतं, कोणाला मळमळत होतं, कोणाचा हात जडावलेला, तर कोणाचं आख्खं शरीर चार दिवस ठसठसत होतं. मी त्याच्या नावाने फोन केला तरी गोळा आला त्यांच्या पोटात. "नाव नको काढूस त्या नसनखवडीचं!!" म्हणत एकीनं तर त्या लसीने तिला कसं तोंडघाशी पाडलं त्याचं मुसमुसत वर्णन केलं.लसीने म्हणे तिच्या अन् सासूच्या अगोदरच धुमसत असणाऱ्या भांडणाच्या आगीत तेल ओतलं होतं. सासूचं म्हणणं होतं, चांगले दोन डोस रिचवले मी, एकदाही मला काही धाड भरली नाही, अन् तुला काय झालं ग एक डोसातच अंथरूण पकडायला?इवळी गंगा नुसती!! तिचं दुखणं सासूला चक्क नाटक वाटत होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  असो.......सर्व्हेच्या निष्कर्षात सरळ सरळ असं आढळून आलं की प्रौढत्वाकडे थोडे जास्त झुकलेले जवळपास सर्व बापे बाया अगदी टुणटुणीत होते. आमच्या बाजूला राहणाऱ्या ऐंशी वर्षाच्या आजी सुद्धा!!त्या टुचुक फुचुकबद्दल काडीचं शिकवा गिला नव्हतं त्यांच्या मनात. त्यांचं जूनं मजबूत खोड सगळ्याला पुरून उरलं होतं. तितकंच टणटणीत राहीलं होतं.पण यांच्याकडे बघून आलेला धीर माझ्या वयाच्या आगेमागे असणाऱ्यांकडे पाहून मात्र पळून जात होता.मी आपली काय करू कसं करू विचार करत दिवस काढत होते, अन् नवऱ्याने मात्र नेहमीप्रमाणे स्वतःच्या डोक्याला किंचितही ताप करुन न घेता, मी उद्या लस घेऊन दोन दिवस आजारी पडणार आहे रे.......असं जाहीर केलं.मनात म्हटलं, "बरय याचं!! पोरं याला मस्त लोळू देतील. मी आडवी झाले की त्यांच्या काय पोटात दुखतं देव जाणे!! सासुहून वरतांड आहेत नुसती."नवरा टोचण घेऊन आलाही!! त्याला फार वाटत होतं, तरी काsहीsही झालं नाही. त्या निमित्तानही बायकोकडून लाड करून घेता आले नाहीत, म्हणून तोंड पाडून दुसऱ्या दिवशी तो कामावरही गेला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); संध्याकाळी लाडक्या मैत्रिणीला भेटल्यावर म्हटलं, "माझ्या नवऱ्याला ती महामाया अजिबातच डसली नाही की ग?"तर ती म्हणाली, "अगं ती आपल्यासारख्या बायकांवरच जास्त उलटतेय बाई. काय सांगू तुला?" बायका बिचाऱ्या सरळ साध्या!! कोणाचं काsहीsच वाकडं करत नाहीत, आणि त्यांच्याबरोबरच का सदान् कदा असं घडावं, यावर तोंड दुखेपर्यंत चर्चा करूनही तितकं दिलासादायक उत्तर समोर न आल्याने, आम्ही त्यानंतर तब्बल सात वेळा दीर्घश्वसन करून खदखदणारं मन शांत केलं.मी लसीकरण ढकलता येईल तेवढं पुढे ढकलू पाहत होते, पण घरादारापासून सगळेच मला त्यात जोरजोरात अडकवू पाहत होते. कोणीही भेटलं, कुणाचा फोन आला तरी पहिला प्रश्न एकच, काय ग टोचून घेतलं की नाहीस?त्या क्रूरकर्मा कोरोनापेक्षा लस कैकपट बरी ग, घेऊन टाक एकदाची!! असं म्हणत जे एकामागे एक भीतीदायक वृतान्त ते कथन करत, त्याने मी खरंच हैराण झाले होते. शेवटी त्यांची तोंड बंद करण्यासाठी म्हणून धडाडीने निर्णय घेऊन मी एकदाची टोचणीसाठी नोंदणी केली. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "शाब्बास मम्मी!!" मुलांनी पाठ थोपटली. "मला दोन दिवस जरा आराम लागेल, शाबासकी देण्यापेक्षा तो देण्याची कृपा केलीत तर बरं होईल," अशी मी त्यांना कळवळून विनंती केली.नवरा उस्फूर्ततेने म्हणाला, "आजारी पडलीस तर मी राहीन तुझ्यासाठी घरी!!"ते ऐकलं, आणि किमान या वर्षी तरी वडाला फेऱ्या मारायला पाहिजे होत्या, असं आतल्या आत कुठेतरी खोलवर वाटून गेलं खरं!!मनाचा हिय्या केला, अन् ठरलेल्या दिवशी जय भवानी!! जय शिवाजी !! करत स्वतःच स्वतःचं मनोबळ वाढवत टुचुक घ्यायला पोचले.तशी रात्रभर स्वप्नात कैकवेळा टोचणी झाली होती. हात सुजलेला, शरीर फुगलेलं, तापाने अंग फणफणलेलं, नको नको ते सर्व स्वप्नात दिसून झालं होतं. प्रत्यक्षात त्यातलं काहीही होऊ नये म्हणून एक मन प्रार्थना करत होतं. अन् दुसरं मन त्यावर हसून, अगं काही होणार नाही तुला, असं पैजेवर सांगत होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  मी वेटिंगवर होते. टोचून बाहेर येणारे जवळपास सर्वच नुकतंच कुणाला तरी पोचवून आल्यासारखे धीरगंभीर मुद्रा करून टेस्टिंगची पंधरा मिनिटं कधी सुखरूप संपतायत, याची वाट पाहत बाकड्यावर विसावत होते. त्यांची माझी नजरानजर झाली की मी आपली प्रत्येकाला डोळ्यांनी स्माईल देत होते (एरवी कम्पलसरी दात दाखवूनच देते, आता तो मास्क आडवा येतो ना त्यांच्यावर) मात्र उगाच काय हसतेय ओळख ना पाळख, म्हणून ते सारे दुःखीजीव मला इग्नोर मारत होते.(हा माझ्या टिनेज मुलीच्या तोंडातला शब्द! मला आत्तापर्यंत फक्त प्रपोज मारणंच माहीत होतं!!)माझं नाव पुकारलं तशी मी आत गेले. टोचणारी बाई जॉली नेचरची वाटली. मग मीही माझं नेचर थोडं बाहेर काढलं. अघळपघळ गप्पा सुरु झाल्याही आमच्या, पण तेवढ्यात तिला आपलं मूळ काम आठवलं. माझा दंड पकडून झर्रsकन सुई घुसवून टाकली तिने त्यात. मी 'हू की चू' केलं नाही. म्हणून तिने अंगठा दाखवून माझं कौतुक केलं. मी तिच्या हलक्या हाताचं कौतुक केलं."ताप आला तरच औषध घ्या," असं ती गोड आवाजात म्हटली. त्या नुसत्या तशा म्हणण्यानेच मला फार बरं वाटलं. अच्छा म्हणजे येतोच असं नाही तर!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पंधरा मिनिटं मीही बाहेर बसले. काही होत तर नव्हतं. पण बाकीच्यांना बघून काही तरी होईल असं हमखास वाटत होतं. लाडाची सखी बरोबर तर आलेली, पण तिला माझ्या इथं बसायची परवानगी नव्हती. पंधरा मिनिटं जाता जात नव्हती. नवऱ्याला, पोरांना फोन करून टोचून झाल्याची वार्ता बसल्याजागी कळवून टाकली. मग खाली असलेल्या लाडकीला फोन लावला, म्हटलं घेऊन झालं ग. आता बसलीय पंधरा मिनिटं होण्याची वाट बघत."बरी आहेस ना? चक्कर बिक्कर येत नाही ना? काही विचित्र वाटत नाहीये ना, डोकं तर जड झालं नाही ना........." ती सुरू झाली.मी तिला मधेच थांबवत म्हटलं, "बाई काही होत तर नाहीये, पण तुझ्याशी आणखी बोलले तर नक्की व्हायला लागेल." आता फोन बंद करून चुपचाप बसण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नव्हतं. जिओच्या रेंजनेही जीव सोडला होता. ताज्या ताज्या टुचुकबरोबर एक दोन सेल्फी काढले, पण ते एकालाही जाता जात नव्हते. इस्टंट वाहवा होणार नाही म्हणून  मनाला अत्यंत वाईट वाटलं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});     एकदाची पंधरा मिनिटं संपली, तशी झटकन उभी राहिले, आणि ताड ताड चालू पडले.घरी आल्यावर आता लक्षणं सुरू होतील, म्हणून पोरांवर डोळे वटारून आडवी पडले. तास झाला तरी विशेष काही होईना. आणि बिनकामाचं लोळवेहीना, म्हणून उठून थोडं इकडे तिकडे करून बघितलं. चेहऱ्यावर बेअरिंग मात्र काहीतरी होतंय असं मुद्दामच ठेवलं, घरादाराला काही वेळ तरी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मला ते गरजेचं वाटत होतं. तासाचे चार तास झाले, तरी कोणतचं लक्षण दिसेना, हात थोडासा दुखत होता इतकंच.मला हायसं वाटलं. मैत्रिणीला मेसेज टाकला, डोस घेऊनही मी मज्जेत आहे.त्यावर उत्तर मला अपेक्षित होतं, wow!! सहीच!!!आणि आलं काय तर, इतक्यात उडू नकोस. उद्या त्रास होण्याची शक्यता आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "हत् तिच्या मारी!! उगाच मेसेज केला," असं म्हणत मी कुकर लावला. भाजीही फोडणीला टाकली.भाकरी बडवायचं मनही करत होत कधी नव्हे ते, पण आवर घातला. काहीच होत नव्हतं, तरी काही तरी होईल म्हणून पुन्हा थोडं तोंड पाडून आडवी झाले. नवरा येण्याची वेळ झाली होती, निदान त्याला बायको लस खुपसवून आलीये असं थोडंतरी वाटायला हवं, म्हणून तोंड बऱ्यापैकी पडकचं ठेवलं.आल्यावर त्याने घराचा चार्ज घेतला. सर्वजण गुणी बाळासारखे वागत होते. मी आडवी पडून त्यांना सूचना देत होते. मला अगदी राणीसारखा फिल येत होता. हाक मारण्यापेक्षा टाळ्या वाजवून बोलावलं तर ....... लगेच अंमलबजावणी करून टाकली.एक टाळी वाजवली की नवऱ्याने सूचना ऐकायला यायचं, दोन टाळ्या वाजवल्या की पोरांनी!!पोरांना याची फारच मज्जा वाटली. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); परंतु, मला बेडरूममध्ये टाकून तिन्ही टाळकी जे काय सुटल्यासारखी बाहेर धिंगाणा घालत बसली, ते मी एक टाळी दहा वेळा, दोन टाळ्या पंधरा ते वीस वेळा वाजवूनही येईनात.शेवटी टाळ्या पिटून पिटून टुचुकवाला हात ठणकायला लागल्यावर मात्र मीच उठले, अन् स्वतःच स्वतःच्या सूचना अंमलात आणल्या. जेवणखाण झाल्यावर थंडीताप भरेल वाटलं, म्हणून पायाशी दोन चादरी, उशाशी पॅरासिटामोल  घेऊन झोपले. ताप ना रात्री भरला ना सकाळी!!  हातही किंचितच दुखत होता.मन आनंदाने न्हाऊन निघालं. नवरा माझ्यासाठी रजा टाकून निवांत पडला होता. मी उठताच म्हणाला, "आहे हा मी घरी. काय काय करू सांग?"मला राहवलंच नाही. मी दात दाखवून खिदळत म्हटलं, "काही करून नकोस. संध्याकाळी मस्त वाऱ्यावर फिरायला ने फक्त!! मी अगदी ठणठणीत आहे. हुर्रे......!!"मंडळी, लस सगळ्यांनाच डसते, असं नाही बरं का!! आपणच उगाच दुसऱ्याचं बघून बिथरून जातो.आणि हो, मी नीट निरखून पाहिलं होतं, इंजेक्शन चांगलं भरलेलं होतं. नुसती सुई अजिबात टोचली नव्हती. मास्क असूनसुद्धा लसीचा घमघमाट दंडावरून डायरेक्ट नाकात घुसला होता!!कोरोनापेक्षा लसीचा डंख बरा, हे मला तर पटलय बुवा !! काही त्रास झाला नाही म्हणून जरा जास्तच बहुतेक???? दो गज की दुरी, मास्क भी जरुरी और टिकाकरण तो एकदमच कम्पलसरी!!टोचवून घ्यायचं राहिलं असेल, तर पळा लवकर???? ©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!