जैन धर्मः श्रमण संस्कृती

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर आहेत असे सगळे जण समजून चालतात. परंतु खुद्द जैनमतानुसार भगवान महावीर हे अखेरचे तीर्थंकर. प्राचीन काळात होऊन गेलेल्या तेवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे चोविसावे तीर्थंकर! त्यांच्या आधी अडीचशे वर्षांपूर्वी भगवान पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर होऊन गेले. पार्श्वनाथ हे काशीच्या अश्वसेन राजाचे पुत्र होते. महावीर हे भगवान बुध्दाचे समकालीन. बौध्द ग्रंथात महावीरांचा उल्लेख ‘निगंठनापुत्त’ असा करण्यात आला आहे. काळाच्या ओघात अनेक तीर्थंकर होऊन गेले. भगवान वृषभदेव हे पहिले तीर्थंकर. पार्श्वनाथाच्या आधी होऊन गेलेले बाविसावे तीर्थंकर अरिष्टनेमि हे भगवान श्रीकृष्णाच्या नात्यात होते. जैन मतानुसार 24 तीर्थंकराची परंपरा अनंत काळाच्या ओघात पुनःपुनः अवतरत असते. भगवान वर्धमान महावीरांच्या मते काळ ‘मटेरियल सबस्टन्स’ स्वरूपात अस्तित्वात नाही. पण काळ बदलला असे आपण म्हणतो! वस्तुतः काळ बदलत नाही. बाह्यतः बदल झाले की आपण म्हणतो काळ बदलला! जैन धर्माचा आत्म्याला विरोध नाही, पण तो ईश्वरवादी नाही. म्हणूनच तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. हिंदू धर्मात शंकराचार्यानंतर अव्दैतवादाचा जोरदार पुरस्कार करण्यात आला. जैन धर्मात स्यादवादाचा पुरस्कार करण्यात येतो. बदल हा विश्वातल्या सर्व वस्तुंचा स्वभाव आहे. वत्थु सहावो धम्मो. सृष्टीतला प्रत्येक चेतन-अचेतन पदार्थ आपल्या स्वभावानुसार प्रवर्तमान आहे. प्रत्येक वस्तुचे अस्तित्व उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ह्या तीन धर्मांनी युक्त आहे. तीच खरी सत्ता. विशेष म्हणजे ही सत्ता नित्य परिवर्तनशील आहे. जैन धर्माची वास्तु ह्या एका तत्त्वावर उभी आहे. ह्यालाच जैन तत्त्वज्ञानात ‘स्यादवाद’ संबोधले जाते. स्यादवाद ह्याचा अर्थ अनेकान्तवाद. वस्तुंच्या अनेकात्वाकडे लक्ष न देता उत्पत्ती, स्थितीआणि विनाश स्वरूपात वसत असलेल्या परिवर्तनशील स्वरूपात विद्यमान असलेल्या असलेल्या भौतिकतेकडे लक्ष देणे. त्यामुळे लोकव्यवस्थेतील सगळ्याच प्रश्नांचा उलगडा करता येणे शक्य आहे. ह्या अर्थाने हिंदू धर्म जैन धर्मास अनात्मवादी मानतो. वेगवेगळ्या काळी जैन धर्म वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला. त्याला आर्य धर्म असेही संबोधले गेले. अर्हत ह्या नावानेही जैन धर्म ओळखला जातो. जैन धर्माचा प्रमुख असा ग्रंथ नाही. थोडक्यात, हा मुनिप्रणित धर्म आहे. निर्ग्रंथ आहे. विनोबांच्या सूचनेचा मान राखून प्रमुख जैन आचार्यांनी एकत्र येऊन ‘समणसुत्तं’ नावाचा भगवद् गीतेच्या धर्तीवर एक ग्रंथ तयार केला. पण जैन मंडळी ह्या ग्रंथाच्या फारशी वाटेला गेली नाही. ह्या धर्मातही श्रावक आणि श्रमण असे दोन वर्ग आहेत. श्रावकवर्ग हा संसारी लोकांसाठी आहे तर श्रमणमार्ग हा अत्युच्च आध्यात्मिक उन्नती साध्य करण्याचा प्रयत्न करू इच्छिणा-यांसाठी आहे. श्रमण मार्गाचे स्वरूप हिंदू धर्मातल्या संन्यासमार्गासारखे आहे. कोणालाही श्रमण मार्गाची दीक्षा घेता येतो. कठोर तपस्येचा हा मार्ग अनेकांना झेपणारा नाही हे उघड आहे. परंतु काळ आधुनिक झाला तरी मुनींच्या आदेशानुसार वाटेल त्या प्रकारचा त्याग करायला जैन अनुयायी केव्हाही सिध्द असतात. वैराग्य आणि विज्ञान हे जिनप्रशासनाचे लक्ष्य आहे. सम्यग् दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य ही तीन रत्ने ज्याने स्वीकारली त्याला अर्हत स्थिती प्राप्त करून घेता येते. जैन धर्मातही मंगलाचरणास महत्त्व आहे. ‘णमो अरहंताय णमो सिध्दाणं णमो आयरियाणं णमो उवज्झाणं णमो लोए सव्वसाहूणं’ हा मंगलाचरण अर्थमागधी भाषेत लिहीलेला आहे. वरील ओळी पाच चरणांच्या असून तो पहिला श्लोक आहे. हे मंगलाचरण सुधीर फडके ह्यांनी अतिशय सुरेल आवाजात गायिले आहे. कधीतरी मुंबई आकाशवाणी केंद्रावर ते ऐकायला मिळते. रमेश झवर ज्येष्ठ पत्रकार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!