छावणी...एक ऐतिहासिक अक्षरानुभव

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

कपाळावर  टिळा आणि तळहातावर गुळाचा खडा...असे स्वागत आजकाल दुर्मिळच. यासोबतच आणखी काही दुर्मिळ तिथे असेल तर भोवतालचा परिसर . डावीकडे नजर फिरवली कि नजरेस पडत होता शिवाजी महाराजांची तिजोरी म्हणून प्रसिद्ध असलेला लोहगड आणि उजवीकडे दृष्टीस पडतो या लोहगडाच्या  संरक्षणार्थ दूरवर पसरलेल्या  विसापूर किल्ल्याचा एक उत्तुंग कडा. या दोन्ही किल्ल्यांच्या कुशीत उभे राहणे म्हणजे आपोआपच शिवप्रेम जागृती होईलच. आणि या भावनेला अधिक जागृत करत शिवरायांच्या काळात घेऊन जाणारी 'छावणी' म्हणजे खरोखर एक सुंदर अनुभव. छावणी...लोणावळ्यात निसर्गाच्या कुशीत, लोहगड आणि विसापूर या प्रसिद्ध शिवकालिन गडांच्या पायथ्याशी उभा राहिलेला जवळजवळ १० एकरचा भूभाग जो छावणीरूपी रिसॉर्ट म्हणून उदयास आला आहे. मुख्य दरवाजापासूनच तेथील कोपरा न कोपरा शिवकाळाची आठवण करून देतो. ज्याप्रमाणे छावणी चार भागांत विभागलेली असते त्याचप्रमाणे इथेही सैनिकी भोजनालय , मावळ्यांच्या राहण्याची सोय, राजे महाराजांचा निवास आणि पुढे इतर उपक्रमांसाठी मोकळी जागा अशाप्रकारे अगदी नियोजनपूर्वक व्यवस्था आहे. दगडाचे किंवा पितळेचे बेसिन , भोजनालयातील खास बैठक व्यवस्था , तिथले पडदे ,तांब्याचे पुरातन घंगाळ ,इतर भांडी,अडकित्ते, ऐतिहासिक मूर्त्या, चिलखत  सर्वच अभूतपूर्व...या इतक्या जुन्या वस्तू कशा काय जमवल्या असतील असा प्रश्न नक्कीच इथे येणाऱ्याला पडेल. आणि जेवण तर विचारूच नका... मराठमोळ्या मेनू सोबत इतर प्रकारचे जेवणही उत्तम मिळत होते. खास इंद्रायणी भात, भाकऱ्याही मस्तच आणि सोबत कधी तांबडा- पांढरा रस्सा तर कधी मस्त पाटवडी रस्सा . पाटावर मांडलेल्या चटण्या, ठेचा हा प्रकार मला खूप भारी वाटला.  जणू नुकत्याच त्या चटण्या वाटून वरवंटा बाजूला ठेवला आहे. भोजनाप्रमाणेच निवासी सोयही उत्तम आणि विशेष होती. बैलगाड्यांवर खास मराठमोळी रचना, तिथली प्रत्येक वस्तू पुरातन काळातली म्हणून आपल्याला नाविन्यपूर्ण भासणारी.फुलदाणी म्हणून तांब्याचा हंडा... अशी कल्पनाच कधी कोणी केली नसेल . त्या पूर्ण वास्तूमध्ये जिथेही जाऊ तिथे ज्याप्रकारे ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा मांडला आहे त्यावरून त्याची रचना करणाऱ्या आर्किटेक्ट तुषार यांनी किती खोलवर अभ्यास केला असेल याची प्रचिती येते. इतकी सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू निर्माण करणाऱ्या या आर्किटेक्टचे करावे तितके कौतुक कमीच.  शिवप्रेमींसाठी तिथे असलेले आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील ऐतिहासिक संग्रहालय जिथे शिवकालीन शस्त्रास्त्रे , वस्तू , नाणी , मोडी लिपीतील अनेक महत्त्वाची पत्रे असे बरेच काही संग्रहित आहे जे फार दुर्मिळ आहे . तर पहाटे सहा वाजेपासून मुंबईतून सुरु झालेला आमचा प्रवास इथे येऊन पुन्हा नव्याने सुरु होणार होता. आम्ही म्हणजे प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालवांचे निष्ठावंत अक्षर मावळे. 'अक्षरनामा' या अनोख्या प्रयोगात्मक उपक्रमासाठी छावणीने आम्हा सर्वांना तेथे पाचारण केले होते. तसे आम्ही सर्व एकमेकांना बऱ्यापैकी ओळखत असल्याने लोणावळ्यापर्यंतचा प्रवास मस्त मजेत गेला. पुढेही छावणीपर्यंतचा खिंडीतून झालेला कार प्रवास एक छान अनुभव . ज्यांच्या नशिबात छावणीने पाठवलेली कार नव्हती त्या सर्वासाठी तर प्रत्येक चढावर पावलांनी केलेल्या प्रवासातुन मिळालेल्या आनंदामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला. प्रखर उन्हातही सो सो वाहणारा वारा सर्व काही सुसह्य करत होता .भरली वांगी, भाकरी अशा मराठमोळ्या जेवणावर ताव मारून आम्ही सर्वजण कार्यक्रमाची रूपरेषा समजून घेण्यासाठी एकत्र जमलो. ठरवून काम तर नेहमीच करतो, आज सभोवताल अनुभवून काम करायचे होते. सुरवातीला काय नक्की करायचे हे माहित नसले तरी काहीतरी भन्नाट आपल्या हातून घडणार हा विश्वास होता. ३ वाजेच्या सुमारास सर्वानी कामाला सुरुवात केली. कोरे कागद ,रंग आणि अर्थात आम्ही सर्व एकत्र आलो आणि पुर्णपणे रिकामे असे ते प्रशस्त दालन अवघ्या काही क्षणांत एका वेगळ्याच भावनांनी, सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. सर्वांनी आपापल्या परीने कामाला सुरुवात केली. मोडी , देवनागरी पुस्तकांच्या पानापानांतून अक्षरे जिवंत होऊन आम्हाला उस्फूर्त करत होती. कोरे कागद आणि कॅनव्हास विविध रंगानी भिजू लागले होते. त्यावर अक्षरांनी आपली जादू मांडायला सुरुवात केली होती. पण या अशा जादूने आमचे मास्तर  भारावून शाबासकी देतील तर ते अच्युत पालव कसले! जसजसे कागद भरले जात होते आणि मनासारखे काम निघत नव्हते तसतसा सरांचा पारा चढत होता. पण  निश्चितच आम्ही सर्व मिळून काहीतरी भारी उद्याला नक्कीच करू अशा आमच्यावरच्या विश्वासामुळे सर्व काही शांतपणे सुरळीत सुरु होते. मी सुद्धा काही प्रयोग करून पाहिले...काही फसले... काही शिकले आणि शेवटी माझ्या रोजच्या लकबी प्रमाणे मोडी अक्षरांची सोनेरी चंदेरी गुंफण मी कागदावर कुंचल्याने विणण्यास सुरुवात केली.... आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीला नुसतीच रेखाटलेली अक्षरे अधिकाधिक सुंदर भासू लागली. हा माझा सर्वात आवडता प्रकार असल्याने मी अगदी देह भान विसरून इतके तल्लीन झाले कि आसपास काय सुरु आहे तेही उमगले नाही. इतरांची देखील हीच कहाणी... नंतर सभोवताली पाहिले तर सर्वानीच एक सुंदर सुरुवात केली होती जी नक्कीच उद्या पूर्ण झाल्यावर एक अनुभवपूर्ण इतिहास निर्माण करणार होती. संध्याकाळ झाली आणि लोणावळ्याच्या त्या थंड वातावरणात या उपक्रमातील संगीतमय आणि तालबद्ध अशा सुंदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसिद्ध कथक नृत्यांगना आरती धानिपकर आणि त्यांच्या शिष्या उमा साठे या दोघींनी सादर केलेली नृत्यमेखला ... मेघना देसाई यांचे सूत्रसंचालन आणि सुरेल गीतमालिका... अरुंधती जोशी यांच्या व्हायोलिन मधून  थेट हृदयाला भिडणारे स्वर आणि या सर्वांसोबत आपल्या चित्रकलेने कार्यक्रमात रंग भरणारे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार निलेश जाधव.... असा हा अविस्मरणीय सुंदर कार्यक्रम रंगला होता. मधुर गीतांचे बोल, व्हायोलिनची धून आणि घुंगुरांची रुणझुण कान तृप्त करत होते तर या सर्व भावना कागदावर उमटताना पाहून डोळे भरून येत होते. आम्हां प्रेक्षकांसाठी तर ही  कलात्मक मेजवानी होती जिचा शेवट अर्थात अच्युत सरांच्या कुंचल्याने व गाण्याने झाला. प्रचंड थंडीत पार पडलेला हा कार्यक्रम सर्वांच्या चांगलाच स्मरणात राहील.ती रात्र सरली... पहाटे निसर्गाच्या अदृश्य कुंचल्याने आकाशात रंगांचा खेळ मांडला होता. तोच रंग मनात साठवून आज तो परिसर कागदा-कागदांवर मांडायचा होता, रंग उधळायचे होते. छावणीत रंगलेल्या या अक्षरनाम्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते साकार करणारे हात खूप वेगवेगळ्या चित्रकार आणि सुलेखनकारांचे होते ज्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती. अक्षया , गोपाल आणि भावेश यांच्यात उत्तम बॅकग्राऊंड आणि स्ट्रोक्स निर्माण करण्याचे सामर्थ्य होते तर निलेश आणि महेश यांचा कॅनव्हासना जिवंत स्वरूप आणून देण्यात हातखंडा. तृप्ती, अमृता, श्रीकांत यांची देवनागरी वरची पकड मजबूत तर मी, केतकी, तेजस्विनी आणि  पिनाकीन आमची लपेटीदार मोडी कागदावर शिवकाळ उभा करण्यात समृद्ध.सोबत मनीषा आणि वैशाली या चित्राला वेगळेपण देण्यात उत्तम आणि या सर्वांना एकत्र आणून चित्राला पूर्णस्वरूप देण्यात सक्षम असे आमचे अच्युत सर. प्रत्येकाने आपापला नवा कागद घेऊन चित्राला सुरुवात केली खरी पण ते चित्र पूर्णत्वास जाईपर्यंत जिथे ज्याची गरज तिथे त्याची मदत घेऊन ते चित्र प्रवास करत होते. हा खरंच एक खूप सुंदर अनुभव. एरव्ही आम्ही सर्वच आपापल्या घरी चित्र पूर्ण करत असतो पण इथे ते करण्यात एक वेगळीच मज्जा होती. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, कल्पना... या सर्वांचीच येथे देवाणघेवाण होत होती आणि खूप काही नव्याने शिकायला मिळत होते. कधी न बोलता तल्लीन होऊन , कधी गाणी गुणगुणत तर कधी अगदी ओरडत, नाचत-गात ही सर्व चित्रे आकार घेत होती. सरांच्या शब्दांचे फटकारे जसे मिळत होते तसेच प्रोत्साहन देखील मिळत होते. जसजसा दिवस मावळतीला येत होता तसतसे दालनाचे रूपही पालटू लागले. जवळजवळ सर्वच कोरे कागद आता शिवतेजाने रंगले होते, रंग सारे संपत होते, स्वच्छ पाण्याच्या बादल्या रंगानी भरून निघाल्या होत्या त्यात कुंचले गर्दी करत होते. पाहता पाहता कालपर्यंत रिकाम्या भकास वाटणाऱ्या त्या दालनाला आता समृद्ध कलादालनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. चित्रेही सर्वच एकसारखी नव्हती कारण ती वेगवेगळ्या हातांनी निर्माण केली होती आणि ती ही  मिळून मिसळून, त्यामुळे सारीच एकदम कडक झाली होती. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा लाल-पिवळ्या पाश्र्वभूमिवर ललकारात होती तर कुठे वीर मराठ्यांच्या शौर्याच्या गाथा उसळलेल्या तलवारीच्या पात्यांप्रमाणे तळपत होत्या. कुठे मोडी- ब्राह्मी या प्राचीन लिप्यांचा खजिना पुनर्जिवित झाला होता तर कुठे इतिहासातील घटना. कुठे बाळ शिवाजीसाठी अंगाई सजली होती तर कुठे सह्याद्रीच्या सिंहासाठी , जाणत्या राजासाठी राज्यभिषेक सोहळा,कुठे राजमुद्रा तेजाने झळाळत होती तर कुठे अक्षरांची रचना जादू करत होती ....अशी अनेक चित्रे कलादालनात शिवकाळ जिवंत करत होती. आज अगदी मनासारखे काम पूर्ण झाले होते म्हणून सर्वजण आनंदात...आणि मग काय ! एका मैदानात शेकोटीभोवती सारे जमले ,नाचले ...  वाद्य आणि गाण्यांची सुरेल मैफिल सजली. आसपास दोन्ही किल्ले जणू या सर्वांची साक्ष देत उभे होते. आजच्या चांदण्या रात्री साक्षीला आणखी कोणी तरी आकाशी स्तब्ध उभी होती... किती सुंदर दिसत होती ती... चमचमणारी शुक्राची चांदणी माथ्यावर चंद्रकोर घेऊन. तिसऱ्या दिवशी पहाटेच जोमाने कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता ३ मोठमोठाले  कॅनव्हास एकमेकांच्या साथीने अगदी ३-४ तासांत पूर्ण झाले. या नव्या कलाकृतींनी त्या कलादालनाला एक वेगळीच शोभा आणली. या चित्रांना पाहताना सर्वांचे एकत्र प्रयत्न दिसत होते आणि त्यामुळेच उत्तम टीमवर्कचे हे  एक उत्कृष्ट उदाहरण आहे असे मला वाटते . नाहीतर ३०-४० इतकी विविध वाटणारी पण तरीही  विषयाला धरून असणारी अशी  चित्रे केवळ २ दिवसांत साकार करणे ... अशक्यच . आणि हा अनुभव अभिमानास्पद वाटतो. गेले तीन दिवस छावणीत येणाऱ्या इतर पर्यटकांसाठी सुद्धा आमची ही कार्यशाळा एक विशेष आकर्षण ठरली. लहान मुले कौतुकाने अक्षरांचा आनंद घेत होती...मांडण्याचा प्रयोग करत होती. इतका सुंदर आणि वेगळाच कार्यक्रम आयोजित करून आम्हाला येथे निमंत्रित केले त्यासाठी खरेच सर्व आयोजकांचे खूप आभार मानावेसे वाटतात. आणि आमच्यावर विश्वास ठेवून अक्षरांचा झेंडा फडकवण्यासाठी येथे सर्वाना एकत्र आणणाऱ्या अच्युत पालव सरानी नक्कीच एक संस्मरणीय अनुभव दिला यात शंकाच नाही. दुपारी छावणीचा निरोप घेतला पण आपली अक्षरे तिथेच नांदतील आणि तेथे येणाऱ्या अनेकांना आनंद देत राहतील या भावनेने एक वेगळेच समाधान वाटत आहे. आम्हा सर्वांना येथे बोलावून हा अनुभव देणारे आर्किटेक्ट तुषार आणि छावणीचे सर्वेसर्वा उदय जगताप यांचे मनापासून आभार. आजच्या मॉडर्न काळातही इतिहासाला जागवणारे आणि इतरानाही हा ऐतिहासिक अनुभव देणारे तुम्ही दोघेही धन्यच. छावणीची ही कल्पनाच किती अनोखी आहे. लोहगडापाशी असलेल्या या छावणीचा  अनुभव घेत असताना अगदी मनापासून माझ्या मनात निर्माण झालेली एक इच्छा अशी होती कि जर अशा छावण्या महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्याच्या पायथ्याशी निर्माण झाल्या तर गड पर्यटनात वृद्धी होईल, अगदी थोरांपासून लहानांपर्यंत सर्वांच्याच मनात शिवकार्य, स्वराज्याभिमान जागृत होईल आणि नक्कीच या शिवप्रेमाने प्रत्येक गडालाही पुन्हा जाग येईल आणि कदाचित शिवकाळ पुनर्जीवित होईल. गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र मग खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आज आम्ही या ऐतिहासिक ठिकाणी राहून काम करून खरंच  कृतकृत्य जाहलो....... असा योग पुन्हा पुन्हा येत राहावा ही  सदिच्छा. - रुपाली ठोंबरे. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!