चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

चूक कुणाची, शिक्षा कुणाला? - मराठी कथा✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल       कॉलेजचा जिमखाना हॉल कॉलेज युवक युवतींनी खचाखच भरला होता. आज गॅदरिंगमधील सर्वांना आवडणारा विविध गुणदर्शन म्हणजेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा दिवस होता. कार्यक्रम सुरु झाला आणि टाळ्या शिट्ट्याना पूर आला. ओरडण्याचे खास सूरही पुरात मिसळू लागले. त्यामुळे आवाजाच्या महापुराने हॉल दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी. ए. भाग ३ ची विद्यार्थिनी पूनम व प्रकाश करत होते. खरं तर कार्यक्रयापेक्षाही सूत्रसंचलनातील भावपूर्ण निवेदन, विनोदी किस्से कार्यक्रमात रंगत आणत होते. कार्यक्रम उंचीवर पोहचलेला असतानाच पूनम आणि प्रकाश यांनी एक द्वंद्वगीत सादर केले 'वादा कर ले साजना, तेरे बिना मै न रहूँ, मेरे बिना तू न रहे, ना होंगे जुदा, ये वादा रहा।' या गीताने तर कमालच केली. हॉलमधील सर्वांनी स्टँडिंग रिस्पाँन्स दिला. टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी त्या दोघानांच आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना शांत करावे लागले. तेंव्हा कुठे पुढचा कार्यक्रम सुरु झाला.       प्रकाश एक हुशार, विनयशील व समंजस विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये नावाजलेला विद्यार्थी होता. तो अभ्यासात तर हुशार होताच, शिवाय वक्तृत्व, चित्रकला, गायन, लेखन व क्रीडा या सर्व क्षेत्रांत चमकणारा तारा होता. या अष्टपैलू प्रकाशला शोभेल अशीच शरीरयष्टी त्याला लाभली होती. रंगाने गोरा, नाकीडोळी छान, उंची त्याला साजेशी होती. एवढे सगळे असूनही त्याचे पाय जमिनीवर होते. त्याला गर्व अजिबात नव्हता. त्यामुळे सर्व प्राध्यापकांचा व मित्रमैत्रिणींचा तो फारच लाडका प्रकाश होता.       पूनमही इतकी सुंदर होती की तिला पाहून हे गीत ओठावर यायचे, 'कुदरतने बनाया होगा, बडी फुरसतसे मेरे यार' पूनम अभ्यासाबरोबरच गायन, वादन, वक्तृत्व, खेळ या सर्व क्षेत्रात अग्रेसर होती. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सर्व क्षेत्रात चमकणारी होती. श्रीमंत बापाची एकुलती एक लेक असूनही कमालीची मनमिळावू , प्रेमळ व समंजस होती. सर्वजण तिला  'काॅलेज क्वीन' म्हणून ओळखायचे.       कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रकाश व पूनम एकत्र यायचे. परिसंवादात भाग घ्यायचे. ठामपणे आपले विचार मांडायचे. वक्तृत्व स्पर्धेत दोघांपैकी कुणाला नंबर द्यावा हा परीक्षकांना प्रश्न पडायचा. त्या दोघांना एकत्र पाहून प्रत्येकजण म्हणायचा, दोघे एकमेकांना किती अनुरूप आहेत. किती मस्त जोडी होईल या दोघांची! आणि घडलेही तसेच, त्या दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले, ओढ वाटू लागली. नकळतपणे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. भेटी वाढल्या. पण दोघांनीही मर्यादा न ओलांडता समंजसपणे स्वतःला सावरून घेतले.       बघता बघता कॉलेजचे ते मोरपंखी दिवस संपले. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. प्रकाशने एम्. बी. ए. साठी चेन्नईला ऍडमिशन घेतले. जड अंतःकरणाने पूनमने प्रकाशला निरोप दिला. दोन वर्षाचा तर प्रश्न आहे, अशी मनाची समजूत घालून जड पावलांनी प्रकाश निघून गेला. पूनम मनाने खूप हळवी झाली होती पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून ती एम्. ए. चा अभ्यास करू लागली. दररोज ठराविक वेळी दोघांच्या फोनभेटी होऊ लागल्या. में महिन्यात व दिवाळीच्या सुट्टीत दोघे एकमेकांना भेटायचे, मनातलं बोलायचे. मनोराज्यात गुंग व्हायचे. आपल्या लग्नासाठी किती दिवस उरले ते मोजायचे.       लास्ट सेमची परीक्षा होण्यापूर्वीच प्रकाशचं कँम्पस् सिलेक्शन झालं. त्यामुळे दोघांना फार आनंद झाला. आता लग्नाच्या आड येण्यासारखे कांहीच नाही असे त्यांना वाटले. प्रकाश परीक्षा देऊन आला. त्यानंतर चारच दिवसांनी पूनमचा वाढदिवस होता. प्रकाशने आईला पूनमबद्दल सांगितले होते. त्याचे वडील तो लहान असतानाच देवाघरी निघून गेल्याचे आईने त्याला सांगितले होते. पूनमनेही आईवडिलांना सांगितले होते त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्र मैत्रिणींना अर्थात प्रकाशसह घरी बोलवायचे ठरले.       ठरल्याप्रमाणे सर्वजण पूनमच्या घरी जमले. बर्थडे पार्टी सर्वांनी मस्त मजेत साजरी केली. खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. पण प्रकाश या पार्टीत कांहीसा नाराज दिसला कारण त्याला आठवलं की त्यांने लहानपणी आईजवळ हट्ट केला होता माझे पप्पा कसे दिसत होते दाखव म्हणून, आईने कपाटात खास ठिकाणी जपून ठेवलेला एक फोटो दाखवला होता. त्या फोटोतील माझे पप्पा आणि आज प्रत्यक्ष पाहिलेले पूनमचे पप्पा यांच्यात खूपच साम्य होते. तो मनाला समजावत होता की साधारण एकसारखी दिसणारी माणसं असू शकतात पण मन मानायला तयार नव्हतं.       दुसऱ्या दिवशी दोघांनी आपापल्या घरी सांगून टाकले की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. प्रकाशच्या आईने त्याला वाढवले होते. कारण तिला लग्नापूर्वीच एका व्यक्तीने धोका दिला होता. लग्नाचे अमिष दाखवून वाऱ्यावर सोडून दिले होते. तिने समाजाची सर्व बंधने झुगारून प्रकाशला जन्म दिला आणि त्यानंतर नर्सचे ट्रेनिंग घेऊन प्रकाशला मोठे करण्यात व रूग्णांची सेवा करण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं होतं. प्रकाश हेच तिच्या जीवनाचं सर्वस्व होतं. आता प्रकाशनं पसंत केलेल्या मुलीला मागणी घालून त्याचं लग्न करून दिलं की तिच्या जन्माचं सार्थक झालं असा विचार करून ती प्रकाशला म्हणाली, "मी या रविवारी पूनमच्या घरी रीतसर मागणी घालण्यासाठी जाणार आहे". प्रकाशने पूनमला तसे कळविले.      ठरल्याप्रमाणे प्रकाश आईसह पूनमच्या घरी पोहोचला. पूनमचे आईवडील गेटजवळ स्वागतासाठी उभे होते. हात जोडून उभ्या असलेल्या पूनमच्या वडिलांना पाहून प्रकाशच्या आईला आभाळ कोसळल्यासारखे वाटले. तिला इतक्या जोरात चक्कर आली की ती खाली पडता पडता थोडक्यात वाचली. पूनमच्या घरी नाष्टा चहा कसाबसा उरकून कांहीच न बोलता ती घरी आली. प्रकाश पूनम दोघेही संभ्रमात पडले पण करणार काय?       प्रकाशची आई घरी आल्यावर प्रकाशला म्हणाली, "बाळ, तुला पूनमशी लग्न करता येणार नाही कारण ती तुझी बहीण आहे. पूनमचे पप्पा तुझे ही पप्पा आहेत". प्रकाशच्या डोळ्याला अंधारी आली. तो मटकन खाली बसला व मनात म्हणाला, "चूक कुणाची शिक्षा कुणाला!"
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!