गावाकडची रानफुलं...
By SameerBapu on मन मोकळे from https://sameerbapu.blogspot.com
उन्हं मोकार पडलीत. सुन्या आणि दत्त्या एरंडाच्या माळापर्यंत आलेत. अजून कोसभर चालत गेलं की पारण्याची टेकडी येईल मग ते तिथेच थांबतील. मानेवर आडवी काठी घेतलेला सुन्या पुढे आहे आणि त्याच्या दोन पावलं मागं दत्त्या. त्या दोघांच्या मागून जाधवाची म्हसरं. साताठ जाफराबादी म्हशी, दोन आटलेल्या गायी, एक निबार हेला, दोन दुभत्या गायी, दहाबारा दोनदाती खिल्लार वासरं, वीसेक शेरडं. सगळे एका लयीत चालत निघालेत. चालताना वाटेत येणारं हिरवं पिवळं गवत कधीच फस्त झालेलं असल्यानं कुठल्याही हिरव्या पानांसाठी त्यांच्या जिभा वळवळतात.सुन्या आणि दत्त्या दोघेही चौदा पंधराच्या दरम्यानचे. कोवळी मिसरूड ओठावर उगवलेले. उन्हात फिरून गोरं अंग तांबूस रापलेलं. बारमाही कष्ट करून गोटीबंद अंगातले पिळदार स्नायू सदऱ्याबाहेर डोकावू लागलेले, रुंद होऊ लागलेल्या छातीवरची हलकी तांबूस लव आताकुठे उन्हात चमकू लागली होती. शाळा अर्ध्यात सोडून घरासाठी राबताना त्यांची जिन्दगानी म्हसरांच्या संगतीत रानोमाळच्या चिलारीत तुकड्या तुकड्यात भिर्र होत होती. तीन साल झाले त्यांचं हे नित्यनेमाचं झालं होतं, त्या जित्राबांना त्यांची सवय झाली होती आणि त्यांना त्या मुक्या जीवांची सय जडलेली.जाधवाच्या वस्तीपासून शिंद्याच्या शेतापर्यंत आणि तिथून पुढं एरंडाच्या माळावरून पारण्याच्या हिरव्यापिवळ्या टेकडीपर्यंतची पायवाट रोज त्यांची प्रतीक्षा करे. निघताना दोघांची वटवट सुरु असे, निम्मी वाट सरली की गुरांसोबत ते देखील गप्प होत कारण तहान लागलेली असे. संगट आणलेली पाण्याची बाटली जेवताना लागे म्हणून वाटेत तहान भागवण्यासाठी रंदिव्यांच्या इंद्र्याच्या मळ्यावर थांबावंच लागे. इंद्र्या हा दत्त्याचा मैतर. त्याच्यापेक्षा दोन यत्ता पुढे असलेला. आता तो शिकायला शहरात गेलाय, हे मात्र गुरं वळायला टेकडीच्या वाटेवर... वाटेने रंदिव्यांची वस्ती लागताच दत्त्या जोराने हाळी देतो. मग इंद्र्याची आई बायडाअक्का त्या दोघांना पाणी देते. तिच्या वस्तीतल्या डेरेदार अंब्याच्या सावलीखाली बसून राहावं असं त्या दोघांनाही मनोमन वाटतं मात्र आपली पोच त्यांना ठाऊक असल्यानं माइंदळ बूड टेकवून ते पुढे निघून जातात. मधला एक आठवडा बायडाअक्का वस्तीवर नव्हती. दत्त्याने आवाज देताच मोडक्या कानाचा बळीच बाहेर येऊन त्यांना पाणी द्यायचा. आज सवयीप्रमाणे दत्त्याने हाळी मारली तेंव्हा बायडाअक्का वाईच हसत बाहेर आली, चार गोष्टी आपण होऊन बोलली. दोन मायेच्या गोष्टी बोलून झाल्या.दत्त्या उगाच पाल्हाळ लावून बसला होता कारण तिथली थंडगार सावली आणि शांतता त्याला खूप हवीहवीशी वाटे. दत्त्या उगाच लांबण लावत होता तोवर सुन्या गुरं घेऊन चिंचेच्या पट्टीखाली उभा होता. सहज त्याचं लक्ष वस्तीवरल्या कोठीकडे गेलं तर सुली उभी होती. ती त्यालाच न्याहाळत होती. विरलेल्या सदऱ्यातून दिसणाऱ्या घोटीव अंगाकडे पाहत होती, सुन्याशी नजरानजर होताच ती विलक्षण लाजली आणि क्षणार्धात तिने नजर झुकवली.सुन्याने त्याच्या धुळकट कुरळ्या केसातून उगाचच हात फिरवला आणि अगदी लोभस हसत तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. बायडाअक्काने तांब्या पेला वाजवला त्यासरशी ते दोघे तिथून निघाले. अक्काला मागे वळताना पाहून सुली दाराआड निघून गेली. सुन्या स्वतःवरच जाम खुश झाला. वाटेने पुढे जाताना त्याने दत्त्याला करकचून मिठी मारली, त्याने त्याला ढकलून लावलं. मग सुन्याने टिकलीचा मुका घेतला ! टिकली म्हणजे पांढऱ्या अंगावर चार तांबडे करडे ठिपके असलेली गाय !पारण्याची टेकडी आली. गुरं आपआपली जागा धरून निपचित रवंथ करत बसली. दत्त्याने भाकरीचं फडकं सोडलं, सुन्याचं काही लक्ष नव्हतं. तो काही केल्या ओ देत नव्हता. दत्त्याने एकट्यानेच जेवण उरकलं आणि हिरव्याकंच निंबाच्या सावलीखाली चवाळं अंथरून त्यानं पाठ टेकली. सुन्याचं मन काही थाऱ्यावर नव्हतं. टेकडीवरच्या आंब्यांना यंदा मोहर खूप आलाय. कण्हेर, चाफा, कंद भरात आलेत. सुट्टीवर आलेली सुली वस्तीवर असेपर्यंत तरी हा बहर टिकणार होता आणि त्याचं अनोखं तेज सुन्याच्या चेहऱ्यावर विलसणार होतं....- समीर गायकवाड #गावाकडची_रानफुलं