कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

कोरोना काळातील माणूसकीचे झरे - विशेष मराठी लेख✍ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: Facebook       जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात, अनेक घटना घडतात, ज्याने मनुष्याचे जीवन बदलून जातं, जगणं बदलून जातं, पण कांही दुर्मिळ प्रसंग असेही असतात जे पूर्ण मानवजातीलाच आतून-बाहेरुन बदलून टाकतात. कोरोना व्हायरसने आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे दुर्मिळ काम केले आहे. प्रत्येक घटनेचे चांगले-वाईट परिणाम होतात. कोरोनाने अनेक दुर्भाग्यपूर्ण गोष्टी केल्या असल्या तरी कांही चांगल्या गोष्टीही कोरोनामुळेच घडून आल्या आहेत. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, आरोग्य, योगा, प्राणायाम किती आवश्यक आहे हे कोरोनामुळे माणसाच्या लक्षात आले. शारीरिक स्वास्थ, मानसिक स्वास्थ या गोष्टीकडे माणूस गंभीरपणे बघू लागला आहे. कोरोनाने पर्यावरण शुध्द केलं. प्राण्यांना या काळात मोकळेपणाने वावरता आले. नद्या शुध्द व स्वच्छ झाल्या. या काळात जणू निसर्गाने स्वतः ला बरंच रिफ्रेश करुन घेतलं. गरिबांना, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या लोकांची माणुसकी समोर आली. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे असंख्य झरे वाहू लागल्याचे आपण पाहिले. त्यातील तीन लोकांच्या माणुसकीच्या झऱ्यांचे दर्शन घडविण्यासाठी हा लेखन प्रपंच.पोलीस आकाश गायकवाडफोटो साभार: Twitter       त्यातील पहिला झरा पोलिसातील परमेश्वराचा, मुंबई पोलीस क्र. १४००५५ आकाश बाबासाहेब गायकवाड, मूळ गांव माळवाडी, ता. मिरज, जि. सांगली यांचा. ते सद्या नेमणूक स. पो. ताडदेव (A कंपनी) मुंबई येथे कार्यरत आहेत. दि. ३ जून २०२० रोजी कोरोनाने भयग्रस्त झालेल्या जनतेला चक्रीवादळाने वेढले. निसर्गाच्या या भयंकर कोपाने लोक सैरभैर झाले. अनेकांची घरे उध्वस्त झाली. लाखो संसार उघड्यावर पडले. त्याच दिवशी हिंदुजा रुग्णालय मुंबई येथे चौदा वर्षाच्या सना फातिमा खान या मुलीला अचानकपणे ओपन हार्ट सर्जरी च्या वेळी A+ रक्त देण्याकरीता तिच्या कुटुंबातील व नातेवाईकातील कोणीही रुग्णालयात येवू शकत नव्हते. अशा गंभीर परिस्थितीत आकाश गायकवाड यांना ही बातमी समजली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी हिंदुजा रुग्णालयात जाण्यासाठी आपली बाईक स्टार्ट केली. चक्रीवादळाने बाईक चालविणे महाकठीण झाले. बाईक कित्येक वेळा आडवी झाली. पण ते अजिबात डगमगले नाहीत. त्यांच्यापुढे एकच ध्येय होते, सना फातिमाचा जीव वाचवायचेच. त्यांनी अतिशय कौशल्याने चक्रीवादळावर मात केली व काही मिनीटातच हिंदुजा रुग्णालय गाठले व डायरेक्ट टेबलावर गेले. रक्तदान केले. सना फातिमाची ओपन हार्ट सर्जरी सक्सेस झाली. तिला जीवनदान देणारा हा योध्दा माझ्या माहेरचा माझ्या भाच्यांचा मित्र आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतो व पवित्र कुरआनमधील एक वचन आठवते "जिसने किसकी जान बचायी, उसने सारा जहाँ बचाया!"तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुुमाळफोटो साभार: Facebook       दुसरा माणुसकीचा झरा भरुन वाहताना दिसला तो शिरोळ जिल्हा कोल्हापूर च्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या रुपात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा, अधिकारांचा तोरा न मिरवता मातीशी आणि लोकांशी नाळ जोडलेल्या आणि सेवेला सर्वोच्च मानणाऱ्या डॉ. अपर्णा मॅडम यांच्या रुपात. श्री महंमदहनिफ मुबारक मुल्ला, रा. औरवाड यांची बारा वर्षाची पुतणी सना ही कोरोना पॉझिटीव्ह सापडली. त्यांच्या कुटुंबाची अवस्था दयनीय झाली. सनाला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला नेण्यात आलं आणि तिच्या कुटुंबीयांना शिरोळ येथे क्वारंटाईन करण्यात आलं. सना बिचारीला एकटीलाच ५०-६० कि. मी. लांब जावं लागलं. कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी काळजावर दगड ठेवून तिच्याकडे एक मोबाईल दिला व तिच्याशी संवाद साधून तिला धीर देणे सुरु केले. संवाद साधताना कुटुंबीयांना कळलं की, फक्त तेच तिला धीर देत नव्हते तर अजून एक व्यक्ती दररोज तिच्याशी संवाद साधून तिला धीर देत होती, ते नांव होतं तहसीलदार डॉ. सौ. अपर्णा मोरे-धुमाळ. इतकी महाभयंकर स्थिती आजूबाजूला असताना, दररोज वेगवेगळे विषय हाताळावे लागत असताना, नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत असताना यातून वेळ काढून डॉ. अपर्णा मॅडम दररोज सनाशी गप्पा मारत होत्या, तिला धीर देत होत्या. आपल्या मुलीसारखीच लहान लेक कुटुंबापासून दूर राहून कोरोनाशी झुंज देत आहे हे पाहून त्यांच्यातील मातृहृदय जागं झालं. त्या स्वत: तर बोलत होत्याच शिवाय सनाएवढ्याच आपल्या मुलीला तिच्याशी गप्पा मारायला लावायच्या. एकमेकींना कधीही न भेटलेल्या त्या दोघी. आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. अशा संकट काळात आपलं आईपण सांभाळणाऱ्या मातृहृदयी अपर्णा मॅडमना मानाचा मुजरा.रिक्षाचालक अक्षय कोठावळेफोटो साभार: गूगल       तिसरा माणुसकीचा झरा दिसला, तो अक्षय कोठावळे या तीस वर्षाच्या युवकामध्ये, तो रिक्षाचालक आहे. त्याच्या वडिलांचे कांही दिवसापूर्वीच निधन झाले. त्याच्या लग्नासाठी दोन लाख रुपये या कुटुंबाने साठवले होते. ते महात्मा फुले पेठ, पुणे येथे राहतात. अक्षय यांचे मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील मनाच्या अक्षयने रस्त्यावरुन पायी जाणारे कामगार पाहिले, गोर-गरीब लोकांचे जेवणाअभावी होणारे हाल पाहिले. परोपकारी अक्षयने त्यांचे हाल कमी करण्याचा निर्णय घेतला. विवाहासाठी जमविलेल्या रकमेतून शहरात रस्त्यावर दिसणाऱ्या उपाशीपोटी नागरिकांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला. दररोज सुमारे चारशे परप्रांतीय कामगार तसेच रस्त्यावरील गोरगरीब नागरिकांना तो जेवणाचे वाटप स्वतःच्या रिक्षातून करत राहिला. त्याच्या वडिलांचे १८ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तेही ऑटोरिक्षाचालक म्हणून काम करीत होते. मात्र वडिलांच्या निधनाने डोंगराएवढे दुःख उराशी बाळगून अक्षय यांनी दररोज गरिबांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाच काम न थांबवता चारशे लोकांची भूक भागविली. केवढे हे महान कार्य! अक्षयच्या या कार्यास मानाचा मुजराही कमी पडेल. देश अडचणीत असताना मदत करणाऱ्या रतन टाटा, अक्षयकुमार, सोनू सूद अशा अनेकांची उदात्त भावना देशासमोर आली. स्वच्छता, सावधानता, सहकार्य, सहनशीलता, सहवेदना यांचे महत्व लोकांच्या लक्षात आले.       आकाराने अतिशय लहान असलेला एक विषाणू विज्ञान, धर्म, वैद्यकीय सुविधा या सर्व क्षेत्रांच्या मर्यादा अधोरेखित करुन गेला. वाईटातून वाईट घडतेच, पण वाईटातून काही चांगले घडते हे सर्व जगाने पाहिले. आपण वाईटातून जे चांगलं घडलं, जे चांगलं शिकायला मिळालं त्यातून एक नवा चांगला माणूस आणि एक नवा देश नक्कीच उभा करु शकतो. यासाठी कोरोनातून मिळालेल्या या निर्मळ झऱ्यांचे पाणी आपण निश्चित प्राशन करु शकतो. अशा या खळखळ वाहणाऱ्या माणुसकीच्या झऱ्यांना - आकाश, डॉ. अपर्णा व अक्षय यांना त्रिवार वंदन !
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!