एका लग्नाची गोष्ट

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

 झाले बुवा एकदाचे लेकाचे दोनाचे चार हात. लेकाने आम्हाला जेव्हा फोनवर लाजत लाजत सांगितलं, "आई तू माझ्या मागे लागली होतीस ना लग्न कर म्हणून... ऐकलं आणि हृदय थबकलं, धडधडलं, काय-काय झालं. तोंडून शब्दच फुटेना.तो म्हणाला,"लग्न म्हटलं की इतकी का घाबरतेस? मी छान पाकिस्तानी मुस्लिम मुलीशी लग्न करणार आहे." आता हृदय नाही तर कमीत कमी फोन तरी खाली पडायला हवा होता पण सगळं जागच्याजागीच राहिलं. मला ऐकलेले किस्से मात्र आठवले. मुलगी कोण वगैरे न विचारता आधी मी त्याला म्हटलं."रात्रीचा घराबाहेर पडू नकोस. दार नीट लाव." मुलाला यात आई काहीतरी वेगळंच बोलतेय असंही वाटलं नाही इतकं ते त्याच्या सवयीचं होतं. तो घाबरला नाही म्हणून मीच घाबरत म्हटलं."अरे, त्या मुलीचे भाऊ येतील तुला मारायला नाहीतर तिचे वडील गुंड पाठवतील.""आऽऽऽई" हा स्वर म्हणजे वादळापूर्वीची शांतता."बरं मग तिला पण तेच सांगू का? तुम्हीपण पर्णिकाला नाहीतर गुंडांना पाठवणार आहात का?""आम्ही आणि पर्णिका काय 'तसले' वाटलो  काय?" विचारलं आणि लक्षात आलं आपण त्या कोणा मुलीच्या घरच्यांना ’तसल्या’ त टाकलं. मग मी त्याचं एकदम अभिनंदनच केलं. शिकली आहे ना त्याची खात्री केली कारण आमच्यावेळी आई-वडील असंच म्हणायचे, कोणीही आणा पण शिक्षण झालेलं असलं पाहिजे. विचारता विचारता अजून एक लक्षात आलं."अरे, ते लोक जबरदस्तीने धर्म बदलतात. तू तुझा धर्म बदललास तर आम्हाला मेलास." हे जरा नाट्यमय झाल्यामुळे नाटकाची तालीम असल्यासारखा प्रॉम्प्टर (मराठी शब्द?) म्हणजे नवरा ओरडला. "कोणी कोणाला मेलेलं नाही. होऊन जाऊ दे." मग आम्ही मुलीला भेटायला रवानाच झालो. सहा तास गाडी चालवत पोचलो, भेटलो. भावी सासु म्हणून तिच्यावर प्रभाव टाकायला एका घोटाऐवजी दोन घोट अमृत घेतलं आणि ते जे चढलं आणि तरुणांना लाजवेल इतका तरुणपणा माझ्यात घुसला त्यावरुन आमच्या सुनबाई सासुबाईंचा धसकाच घेणार की काय असं मी सोडून उरलेल्या ३ जणांना वाटलं.आता ही तशी गुप्त गोष्ट होती. लेक जोपर्यंत मेहविशला मागणी घालत नाही तोपर्यंत चुपचाप. दोन - तीन वर्षांनी झालं, करशील का लग्न?, हो करेन प्रकार आणि आम्ही उत्साहाने सार्‍या जगाला सांगितलं. इथून पुढे खरं नाट्य. ३ वर्षात न पडलेले सारे प्रश्न इतरांना पडले, त्यांचे प्रश्न रोज एक या धर्तीवर ऋत्विककडे पोचले."अरे, निकाह असा होतंच नाही. कबुल, कबुल, कबुल म्हटलंस की झालास तू मुसलमान." लेकही आता या सार्‍याला सरावला असावा."आमचा काझी मॉडर्न आहे." आता ही काय स्पर्धा होती का पण मी म्हटलं "आमचे गुरुजी आयआयटीत शिकलेले आहेत (कापसे गुरुजी, बरोबर ना?)"म्हणजे?""काळजी करु नकोस. धर्मांची सरमिसळ होऊ देणार नाहीत दोघं. घेतील ते काळजी.""आई, काळजी मी करत नाही. तुझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक करतायत." भानावर आणायला पुत्र तयारीत."तुझ्या मुलांची नावं काय ठेवणार?" लेक प्रश्नपत्रिका सोडवायच्या तयारीतच."आम्हाला मुलं होतीलच हे तुम्हाला काय माहित?" "आगाऊ, असं उत्तर पोचवू का?""बरं, पुढचा प्रश्न. मुलांच्या धर्माचं काय?" "असा प्रश्न विचारतात लोक?" त्याला आश्चर्यच वाटत होतं पण मला ज्या प्रश्नाचं आश्चर्य वाटत होतं तो मी त्याला आधी सांगितला."अरे, मेहविशचं नाव बदलणार का असंही विचारतायत."  "आई, असल्या भानगडीत पडू नकोस हा. तिच तुझं नाव बदलेल." लेकाने सासु - सूनेचे प्रेमळ संबंध कसे ताणले जातील ते डोळ्यासमोर आणलं."अरे माझं नावपण बदलू दिलं नव्हतं मी. तिचं बदलायचा विचार करणारी मी कोण?" हे मी माझं मलापण विचारलं. उत्तर मिळालं नाही. कोणाची नावं आडनावं आपण बदलायची नाहीत एवढंच कळलं.आता माझी मुसलमान मैत्रीण सरसावली,"कबुल, कबुल, कबुल शिवाय निकाह होतंच नाही आणि ते म्हटलं की धर्म बदललाच..." मला एकदम मुलगा नमाज पढतानाच दिसायला लागला. मग सरसावून आम्ही मुलांच्या ’मॉडर्न’ काझीची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची खात्री केली. मुलांनीपण आमच्या गुरुजींची मुलाखत घेतली. सगळं आलबेल असल्याची मेहविशची खात्री झाली. तरीपण निकाहच्यावेळी दोनचार गुप्तहेर ठेवायचे आणि कबुल हा शब्द ऐकला की.... इथे गाडी अडली. काय करायचं ते ठाऊक नव्हतं पण वेळ पडली तर गुरुजी आहेतच असा ’फक्त’ बायका करतात तसा फार पुढचा विचार करुन टाकला. नवर्‍याने नेहमीप्रमाणे उगाच फालतू गोष्टीत वेळ घालवतेस सूर लावला. तर अशा अनेकांना पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं सोडवत, कोणी कोणाचे धर्म न बदलता, नाव - आडनाव न बदलता ऋत्विक जोगळेकर आणि मेहविश जमाल बोहल्यावर चढले. चढताना बुरखा आणि मुंडावळ्या विसरले. बुरखा कोणालातरी आठवला म्हणून काहीक्षण आला, मुंडावळ्या पिशवतच राहिल्या तरी दोघांचे चार हात झाले. त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून आमचे आणि मुलांचे मित्रमैत्रिणी हजर राहिले, भारतातले आमचे नातेवाईक अगत्याने आले आणि हे कार्य सफळ संपन्न झाले. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!