ऋषी सुनक कुंडली विश्लेषण | ब्रिटनचे पंतप्रधान पद आणि पुढील राजकीय वाटचाल

By vedicjyotish on from https://vedicjyotishmail.blogspot.com

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे मागच्या महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांची आतापर्यंतची एकूण राजकीय कारकिर्द आणि इथून पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याविषयी कुंडली विश्लेषण आपण या लेखात पाहणार आहोत.  गेल्या दोन आठवड्यापासून तुमच्यापैकी खूप जणांनी त्यांच्या कुंडली विषयी प्रश्न विचारले होते. विशेषकरून सूर्यग्रहणाच्या दिवशी त्यांना पंतप्रधानपद कसं काय मिळालं याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळतील. ज्या इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केलं, आज त्यांच्या देशाचा प्रमुख एक भारतीय वंशाचा माणूस आहे, याविषयी भारताबद्दल सहानुभूती असलेले लोक जगभरातून आश्चर्य आणि कौतुक करत आहेत. विश्लेषणाला आरंभ करूयात...ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० ला साऊथम्पटन इथे झाला. दुपारचा जन्म आहे. त्यादिवशी अमावस्या होती. जन्मकुंडलीत जेव्हा चंद्र व सूर्य समोरासमोरील भावात असतात तेव्हा पौर्णिमेचा जन्म असतो आणि एकाच भावात असतील तर अमावास्येचा जन्म असतो. त्यांची कुंडली सिंह लग्नाची आहे.  सूर्य हा लग्नेश आहे, आणि तो नवम स्थानात मेष राशीत उच्चीचा आहे. त्यातून तो स्वतःच्या मालकीच्या कृत्तिका नक्षत्रात आहे. त्यामुळे रविबल खूप जास्त आहे. लग्नभावात गुरु, राहू, शनि आणि मंगळ असे विरुद्ध स्वभावाचे शुभ व पापग्रह एकत्र आलेले आहेत. त्यापैकी राजकारणात यश मिळवण्यासाठी सूर्य आणि राहू हे दोन ग्रह खूप महत्त्वाचे आहेत.  लग्न भावात राहू असेल तर अशा माणसाला स्वतःच्या संस्कृतीपेक्षा दुसऱ्याची संस्कृती अधिक आवडते. त्यामुळे स्वधर्माच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकेत बऱ्याचदा राहू प्रथमस्थानी असतो. त्यामुळे याला अनुसरून ऋषी हे ब्रिटनमधल्या उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षात आहेत. बोरिस जॉन्सन आणि लीझ ट्रस या  त्यांच्या आधीच्या पंतप्रधानापेक्षा ते जास्त कट्टरतावादी आहेत. त्यामुळे ते भारतासाठी तितकेसे अनुकूल नाहीत, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात राहू एकटाच असता तर मी हे मान्य केलं असतं. पण राहूच्या जोडीने तिथे गुरु पण आहे. जो देव-धर्म व संस्कृती याचादेखील कारक आहे. आणि तो त्यांच्या अष्टम भावाचा स्वामी आहे जे त्यांच्या सासुरवाडीचे स्थान आहे. त्यांची सासुरवाडी भारतात आहे. इन्फोसिस या भल्यामोठ्या तंत्रज्ञान विषयक संस्थेचे संस्थापक व संचालक असलेल्या श्री नारायण मूर्ती व सुद्धा मूर्ती या कतृत्त्ववान दाम्पत्याचे ते जावई आहेत. त्यांचा विवाह ऑगस्ट २००९ ला सूर्याच्या महादशेत आणि गुरूच्या अंतर्दशेत झाला. गुरु हा लग्नाभावात आहे आणि सासुरवाडीच्या भावाचा स्वामी आहे. तो संपत्तीकारक आणि श्रीमंती दर्शवणारा ग्रह आहे. त्यामुळे हा गुरु संबंध त्यांना भारताविषयी व आपल्या संस्कृतीविषयी अनुकूल होण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच निवडणूकीच्या वेळी पत्नीच्या जोडीने एका मंदिरात गाईला चार खाऊ घालतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. पूर्णपणे अनुकूल किंवा भारतविरोधी भूमिका ते घेतील कि नाही हे पत्रिकेतील ग्रहदशा आणि ग्रहांचे गोचर ठरवेल. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हि बिझनेसमधून झाली आहे. बिझनेसमधील कारकिर्दीसाठी तुम्हाला बुधग्रहाचं  बळ लागतं. पण त्यांच्या पत्रिकेत बुध हा सूर्याचा खूप जवळ गेल्यामुळे अस्तंगत झालेला आहे. त्यामुळे बुधाचे कुठलेही गुणधर्म त्यांना तितक्याशा प्रभावाने मिळणार नाहीत. म्हणूनच कि काय त्यांनी बिझनेसमधील कारकीर्द अर्धवट सोडून राजकारणात उडी घेतली. राजकारणावर सूर्याचा प्रखर प्रभाव असतो जो त्यांच्या पत्रिकेत खूप बलवान आहे. त्यामुळे राजकारणात प्रवेश केल्या केल्या त्यांना यश मिळालं.   बुध जरी अस्तंगत असला तरी त्याच शुभ भावात बलवान सूर्य आणि चंद्र यांची युती असल्यामुळे या दोघांच्या ग्रहदशा त्यांना खूप चांगल्या गेल्या. राजकीय कारकीर्द चंद्राच्या महादशेत सुरु झाली. २०१४ ला पहिल्यांदा ते निवडून आले तेव्हा राहूची अंतर्दशा सुरु होती. वर नमूद केल्याप्रमाणे तो देखील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ग्रह आहे. त्याच दशेत २०१५ ला पुन्हा निवडून आले. त्यानंतर २०१६ ला गुरुची अंतर्दशा सुरु झाली तेव्हा गुरूशी संबंधित कामं केली. म्हणजे अभ्यास करून विविध प्रकारचे प्रशासकीय अहवाल तयार करणे, ते कार्यालयात सादर करणे, वगैरे. त्यानंतर २०१७ ला पुन्हा निवडणूक जिंकली. त्यानंतर बुधाच्या अंतर्दशेत बुधाशी संबंधित कामे करावी लागली. चिटणीसाची कामं, कार्यालयीन कामकाज, हिशोब, वगैरे. पण त्यांच्या कुंडलीत बुधग्रह अस्ताला गेलेला असल्यामुळे इतर कामात जसं त्यांचं कौतुक झालं तसं या कामाच्या बाबतीत झालं नाही. याच बुधाच्या दशेत त्यांच्यावर मालमतेविषयी टीका झाली. कार्यपद्धतीवर टीका झाली. सासुरवाडीच्या पैशासंबंधित आरोप झाले.  त्यानंतर आलेल्या शुक्राच्या अंतर्दशेत तर आणखी टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं. शुक्र हा स्त्रीचा कारक आहे. पत्नीचा कारक आहे.  त्यांच्या पत्नीवर कर चुकवल्याचे आरोप झाले. मोठा कर भरून तो विषय मिटवावा लागला. शुक्र हा लैगिकता, विलासीपणा, कला याचादेखील कारक आहे. आणि तो ऋषी यांच्या लाभ स्थानात आहे. जे मित्र-सहकारी-कामाचं वर्तुळ वगैरे गोष्टींचा कारक आहे. त्यामुळे या शुक्राची अंतर्दशा संपताना त्यांच्या एका सहकार्याचे सेक्स स्कँडल उघडकीला आले आणि त्यामुळे घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यांना सहकार्याच्या कृत्यामुळे राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्या पत्रिकेत शुक्र हा बुधाच्या मालकीच्या मिथुन राशीत आहे. बुधग्रह अस्ताला गेल्यामुळे त्याचा कुठलाच उपयोग त्यांना होताना दिसत नाही. उलट त्याचा फटकाच बसताना दिसतोय.  जुलै महिन्यात त्यांना LGBT विषयक वादविवादाला सामोरे जाताना तृतीयपंथांच्या अधिकारावर स्वतःच्या पक्षाची बाजू मांडावी लागली. तृतीयपंथी सुद्धा बुधग्रहाशी संबंधित येतात. पंतप्रधानपदाच्या निवडणूकीच्या वेळी २००१ मध्ये त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. विसंवाद व कुप्रसिद्धी हि सुद्धा बुधग्रहामुळेच त्यांना पहावी लागली. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना शुक्राची महादशा सुरु होती. जुलैच्या शेवटी त्यांची सूर्याची अंतर्दशा सुरु झाली आणि एकाएकी बलवान सूर्याने आपली करामत दाखवायला सुरुवात केली. त्यांचं बळ वाढत गेलं. जसजसा सूर्य गोचर करत करत शुक्राच्या बाजूने यायला लागला तसतशा त्यांच्या विरोधात निवडून आलेल्या शुक्रकारक लीझ बाई यांच्या अडचणी वाढत गेल्या.  शेवटी ऑकटोबर  महिन्यात सूर्याने शुक्राच्या तुला राशीत प्रवेश केला, तेव्हा शुक्र तिथेच होता.वास्तविक स्वतःच्या मालकीच्या राशीत शुक्र राजयोगकारक असतो. असा राजयोगकारक बलवान शुक्र ऋषी यांच्यासाठी घातक आहे. हे याआधी आपण पाहिलंय.  पण इथे तो एकटा नव्हता, त्याच्या जोडीला प्रत्यक्ष सूर्य होता. सूर्याच्या प्रकाशामुळे शुक्र बुधाप्रमाणे अस्तंगत झाला आणि लीझ बाई यांना राजीनामा द्यावा लागला.  त्यानंतर लगेचच तिथे चंद्र पण आला, अमावस्या झाली आणि सूर्यग्रहण लागलं. ऋषी यांचा जन्म हा देखील असाच अमावास्येचा आहे, त्यामुळे जन्मवेळचाच सूर्य उच्चेचा असलेला योग निर्माण झाल्यामुळे ऋषी यांना पंतप्रधानपद मिळालं. त्यांना बुध आणि शुक्र या दोन ग्रहांपासून सावध राहण्याची गरज आहे. महिलांमुळे, विशेषकरून पत्नीमुळे ते अडचणीत येऊ शकतात. जेव्हा केव्हा शुक्र अस्ताला जाईल तेव्हा त्यांनी महत्त्वाची कामं केलेली कधीही चांगलं.येत्या जानेवारी महिन्यात २०२३ ला त्यांची चंद्राची महादशा संपून मंगळाची महादशा सुरु होत आहे. मंगळ हा सुद्धा लग्नभावातच आहे. त्यामुळे या महादशेत त्याविषयीची फळे अनुभवायला मिळतील. म्हणजे कदाचित कौटुंबिक वाद उद्भवतील, किंवा भावंडांशी वाद होतील.  नवीन घर, नवे वाहन घेतील. नवीन विमान सुद्धा घेतील कदाचित. परदेशी दौरे वाढतील. अध्यात्माकडे देखील ओढा राहील. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. अपेक्षा करूयात कि त्यांच्या पत्रिकेतील गुरु हा त्यांची भूमिका भारताविषयी अनुकूलच ठेवेल. अपेक्षा करतो तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. त्यांच्या कुंडलीविषयी काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!