अश्शी शाळा सुरेख बाई.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

माझी मुलगी मला नेहमी तिच्या शाळेतल्या गोष्टी सांगते. आणि आता मुलगा सुद्धा !!या दोघांच्या शाळेतल्या गोष्टी ऐकून मला नेहमी माझी शाळा आठवते. आणि मग त्या दोघांना मीही माझ्या शाळेच्या गोष्टी सांगते.त्यांना तर आता सारं काही पाठ झालंय; इतक्यावेळा ऐकलंय त्यांनी माझ्या शाळेचं कौतुक......पण खरंच; हल्लीच्या शाळा, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती बघून मला तर राहून राहून सारखीच माझ्या शाळेची आठवण येते. सारखं तुलना करत असतं माझं मन आणि वाटतं खरंच ज्ञानाचं मंदिरच होती माझी शाळा!!ह्या माझ्या शाळेत मी पहिलीतच आले. आत्तासारख्या नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर अशा पायऱ्या नव्हत्या चढायला. त्यातल्या त्यात घराजवळ एक बालवाडी होती, अगोदर तिथे बागडायला पाठवलं होतं.मुद्दामहून बागडायला म्हटलं कारण आता नर्सरीच्या मुलांना देखील लिहायला आणि वाचायला बळी पाडतात. पहिलीत जाईपर्यंत मुलाला १ ते १०० अंक, संपूर्ण ABCD, अ आ इ ई सर्व काही वाचता लिहीता आलं पाहिजे, असा दंडक करून ठेवलाय त्यांचा त्यांनीच. आम्ही पहिलीत पहिला 'अ' गिरवला. आणि तो सुद्धा बागडतच म्हटलं तरी चालेल.तर ही माझी शाळा आमच्या घरापासून खूप खूप लांब होती. घर एका टोकाला आणि शाळा एका टोकाला. खूप चालावं लागे. बरं असं काही नाही घरापाशी शाळा नव्हत्या, पण आमच्या कुणी ओळखीच्याने सांगितलं की ती शाळा चांगली आहे, म्हणून तिथे घातलं गेलं.मी आताही विचार करते, कसं काय बरं एवढी लांबची शाळा निवडली असेल??पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी.......या शाळेने जे काही दिलं ते पूर्ण आयुष्यभर मी विसरू शकणार नाही.साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतली "आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर", ही माझी शाळा, पहिली ते चौथी पर्यंतची.तशी लहानशीच होती, इन मिन चार खोल्या आणि एक हेडमास्तरीण बाईंचं ऑफिस. तुकडी फक्त एकच.पहिलीचा वर्ग चांगला मोठा होता. काही खास कार्यक्रम याच वर्गात व्हायचे. अशा या लांबच्या लांब असणाऱ्या शाळेत सोडायला आणि आणायला माझे आजोबा यायचे. बरं ते यायचे म्हणजे नुसते यायचे नाहीत, तर ते त्यांचं आणि माझं तोंड अखंड सुरू ठेवायचे. १ ते १०० आकडे म्हणा, पाढे म्हणा, बाराखड्या म्हणा, देवाची स्तोत्रं, नाहीतर नाव गाव फळ फुलांच्या भेंड्या खेळत उड्या मारत, नाचत बागडत शाळा कधी यायची कळायचं पण नाही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  शाळा भरल्याची घंटी वाजली की प्रार्थनेसाठी सारे वर्ग पहिलीच्या वर्गात जमायचे. नेहमीची प्रार्थना झाली की चला लागा अभ्यासाला, असं अजिबात नसायचं.प्रार्थनेनंतर कोणी गोष्टी सांगायचं, कोणी चांगले सुविचार वाचून दाखवायचं, कोणी म्हणी सांगायच्या, कोणा नेत्यांची जयंती, पुण्यतिथी असेल तर त्यांच्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जायच्या. बोधकथा सांगितल्या जायच्या.याबरोबरच पेपरात येणारा हवामानाच्या अंदाजचा छोटासा कॉलमही मुलांकरवीच वाचून घेतला जायचा. त्यावेळी हे हवामान वगैरे काही कळायचं नाही. पण आपण हा कॉलम नेला, तर आपल्यालाही वाचून दाखवायला मिळेल, म्हणून मी एक दिवस घरी येणाऱ्या किराणा सामानाच्या पेपरमध्ये (त्यावेळी किराणा माल पेपरात बांधून यायचा) तो हवामानाच्या अंदाजच कॉलम शोधला, आणि कापून दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेले.पण मला सर्वांसमोर वाचायला धीर होईना, म्हणून मैत्रिणीला वाचायला सांगितलं आणि तिने तो अगदी मोठ्या आवाजात वाचला. आणि नंतर मात्र सर्व बाई हसायला लागल्या. कारण तो हवामानाचा अंदाज त्या दिवशीचा नसून जुना कधीचातरी होता. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पण त्यांनी तिने छान वाचल्याबद्दल तिचं कौतुक केलं आणि नीट समजावून सांगितलं. त्या मैत्रिणीने मात्र मी तिचा पचका केल्याबद्दल मला चांगलंच वेडावून दाखवलं.तर मुलांनी पुस्तक वाचावं, पेपर वाचावा म्हणून त्यातून काही न काही सतत शोधून आणायला सांगितलं जायचं. नकळतच मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायचा प्रयत्न होता तो.हा सगळा अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम झाल्यावर आम्हाला डोळे मिटून पसायदान म्हणायला सांगायचे. आणि त्यानंतर पाच मिनिटं ध्यान लावायला सांगायचे, काही नाही नुसतं डोळे मिटून स्वस्थ बसायचं........ते पसायदान अजूनही डोक्यात पक्के आहे.हा सर्व असा कार्यक्रम झाल्यावर मग आम्ही आपापल्या वर्गात जायचो. आणि नंतर अभ्यासला सुरुवात व्हायची.ह्या सगळ्या गोष्टीचं मला आता खरचं खूप कौतुक वाटतं.माझ्या मुलांच्या शाळेत असले काही सोपस्कार नाहीत, प्रार्थना झाली की रट्टामारगिरी सुरू!! आणि माझ्या शाळेत तेव्हाही किती विचार केला जायचा मुलांच्या मानसिक वाढीचा.अगदी सगळ्या सणांना आवर्जून शाळेत बोलावलं जायचं. सर्वाना त्याची तयारी करण्यासाठी सहभागी करून घेतलं जायचं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सोयी म्हणाल तर काही नव्हत्या, पण सुख मात्र भरपूर होतं.शाळेसमोर छोटसंच पटांगण होतं, आणि मधोमध मोठं झाड. या झाडाजवळ गोल करून आम्ही सगळे डबा खायला बसायचो.आम्हालाही प्रोजेक्ट्स दिले जायचे. पण ते आजच्यासारखे घरच्यांचे डोके खाणारे नव्हते.मुलांचं कुतूहल वाढवणारे, ज्ञान वाढवणारे, विविध गोष्टींची गोडी लावणारे होते.त्यातला एक उपक्रम अगदी कायमचा लक्षात राहिलाय माझ्या........मी चौथीत असताना दिला होता तो. एका वहीत आपल्याला मिळतील तेवढया झाडांची पाने आणून चिटकवायची आणि ती कोणत्या झाडाची पाने आहेत त्या झाडाचं नावही लिहायचं.हे मला एवढं आवडलं होतं की सगळ्यात जास्त पानं माझ्या वहीत चिकटवून मी पूर्ण वही भरून टाकली होती. अगदी ज्यांच्याकडे वेगवेगळी झाडे आहेत, त्या ओळखीच्या बिन-ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून त्या प्रत्येक झाडांचं नाव विचारून मी खूप सारी पाने जमवली होती. आज्जीने मला ती वहीत चिकटवायला मदत केली होती. एवढी विविध प्रकारची पाने जमवलेली बघून, माझ्या बाईंनी खुष होऊन संपूर्ण वर्गात माझी वही दाखवली होती आणि माझं कौतुक केलं होतं !!त्याचा मला झालेला फायदा म्हणजे, आज मी माझ्या मुलांना जवळपास सगळ्या झाडांची नाव सांगते, त्याची ओळख करून देते. अगदी माझ्या नवऱ्याला सुद्धा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); असे निसर्ग प्रेम वाढवणारे प्रोजेक्ट्स हल्लीच्या शाळा देतात का ??शाळेतल्या सर्व शिक्षिका सुद्धा अगदी सर्व मुलांशी आपुलकीने वागायच्या. शाळेत जणू आम्ही त्यांचीच मुले होतो.पहिलीला शिकवणाऱ्या प्रभुणे बाई, दुसरीला अष्टपुत्रे बाई, तिसरीला वंजारी आणि चौथीला पाठक बाई या सगळ्यांनी मुलांना शिकवण्याबरोबर एवढा लळा लावला होता की अजूनही त्या साऱ्यांच मनामध्ये अगदी तसंच रूप आहे.मुख्याध्यपिका होत्या देशपांडे बाई , खूप भीती वाटायची त्यांची तेव्हा.......कुणाला साधं रागावलेलं बघितलं नव्हतं तरीही!!! त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक दरारा होता.सहल खरोखर शैक्षणिक असायची, निसर्गसुंदर किंवा बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिरात, ऐतिहासिक स्थळ बघायला, एखाद्या धरणाची माहिती घ्यायला, साखर कारखान्यात साखर कशी बनते दाखवायला, नाहीतर मग एखाद्या गड- किल्ल्यावर न्यायचे आम्हाला.आमची पोरं आता सहलीच्या नावावर वॉटरपार्क आणि अम्युजमेन्ट पार्क मध्ये एन्जॉय करून येतात. साताऱ्याला गेलं की प्रत्येकवेळेस मला माझ्या शाळेला जाऊन भेटावसं वाटतं, पण नाही जमत. मात्र एकदा मुलीला खास घेऊनच गेले होते, माझी साधी सुंदर शाळा दाखवायला. दिवस सुट्टीचे होते, मनसोक्त हिंडून घेतलं शाळेच्या आवारात.....ते झाड, शाळेच्या भिंती, व्हरांड्यात असणारे खांब सगळ्यांवरून हात फिरवला. तो स्पर्श अंगात भिनवून घेतला. पटांगणातल्या मातीत फतकल मारुन बसले, ड्रेसला लागलेली माती निघता निघत नव्हती, ती माती झटकून देणाऱ्या मैत्रिणी कुठे दिसतायत का पहिल्या......पळताना मुद्दाम धक्का मारून पाडणाऱ्या, वेण्या ओढणाऱ्या, रिबिनी सोडणाऱ्या, भांडण झालं की नखांनी ओचकारणाऱ्या आणि सारखं बाईंना नाव सांगायची धमकी देणाऱ्या डांबरट मैत्रिणी; कधी मात्र हळूच न येणारं चित्रही काढून द्यायच्या, न येणारी गणितं सोडवून द्यायच्या, खिशातल्या गोळ्या, चिंचा,आवळे काढून द्यायच्या आणि कधी त्यांच्या बागेतील फुलंही आणून द्यायच्या.कुठे लपल्यात का बघितलं साऱ्या........शिल्पा, पूर्वा, दिपाली, यशोदा, सारिका, मंदाकिनी, मनिषा, चंदा अगं ऐकताय काsss सगळ्यांना हाक मारली....मग काय एक एक करून आल्याचं सगळ्या......सारी शाळा गजबजून गेली, साऱ्या आठवणी जिवंत होऊन उतरल्या होत्या......छे, दिवस सुट्टीचे नव्हतेच मुळी.......!!!©️स्नेहल अखिला अन्विततुमची शाळाही माझ्या शाळेसारखीच सुरेख असेल, तर तिच्या आठवणी मलाही वाचायला आवडतील बरं का !!! ????हिच माझी साधीशी शाळा, जिचा मला खूप अभिमान आहे???? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!