अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

अलेक्झांडर पुश्किन अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव. 1816 च्या मे महिन्यात पुश्किनला राज्यातील एका मार्गाला भेट देण्याची संधी मिळाली. एक सामान्य अधिकारी असल्याने भाडोत्री गाडीने त्याचा प्रवास व्हायचा. ते दिवस उष्ण, दमट होते. स्टेशनच्या सुमारे तीन मैल आधी पाऊस सुरू झाला, एका मिनिटात धुवाधार पावसाने त्याला पूर्णपणे भिजवले. पोस्टऑफिसमध्ये पोहोचताच कपडे बदलणं आणि चहा मागवणं हे प्राधान्यानं आलंच.त्याला भिजलेलं पाहून पहारेदार ओरडला,"ऐ डॉनिया, सामोवर ठेव आणि क्रीम आण." त्याच्या हाकेसरशी चौदा वर्षांची कोवळी युवती भिंतीमागून समोर अंगणात आली. तिचे सौंदर्य पाहून पुश्किन थक्क झाला."ही तुमची मुलगी आहे का?" त्याने चौकीदाराला विचारले. तो अभिमानाने उत्तरला,"होय ! ती इतकी हुशार आणि बिलकुल चंचल आहे की तिच्या दिवंगत आईवर गेलीय !” संवाद वाढवत तो पुश्किनच्या प्रवासाचा इतिहास टुरिस्ट रजिस्टरमध्ये लिहू लागला. पुश्किन त्याच्या छोट्याशा पण स्वच्छ झोपडीच्या भिंतींवर लटकलेली त्याची चित्रं पाहू लागला. ती चित्रे एका भरकटलेल्या मुलाबद्दल होती.तो त्याच्या चालकाचा हिशोब करत होता तितक्यात तिथे आलेल्या डॉनियाने एका नजरेत त्याच्यावर पडलेला आपला प्रभाव ताडला. त्याच्या प्रश्नांना ती न डगमगता उत्तरे देत होती. त्याने तिच्या वडिलांना वाईन दिली आणि तिला चहा दिला, त्यानंतर त्यांचे गप्पाष्टक सुरु झाले. बराच वेळ तिथे थांबल्यानंतर इच्छा नसूनही त्याला तिथून निघावे लागले. निघताना त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले जे पुढे जाऊन दीर्घकाळ त्याच्या स्मरणात राहिले.पाचेक वर्षांनी तो त्याच रस्त्यावरून जाताना त्याला तो वृद्ध वॉचमन आणि त्याची तरुण मुलगी आठवली. तो आता हयात असेल का नाही या विचाराने त्याच्या मनात काहूर केले. त्याची घोडागाडी बरोबर त्या पोस्टऑफिस समोर थांबली. त्याने खोलीत प्रवेश करता आत भिंतींवर भरकटलेल्या मुलाची कहाणी असलेली ती चित्रे ओळखली. टेबल आणि बेड देखील जुन्या ठिकाणी ठेवले होते, परंतु खिडक्यांमध्ये आता फुले नव्हती आणि सर्व काही निर्जीव, विस्कळीत दिसत होते. वॉचमन जाड कोट घालून झोपला होता. पुश्किनच्या येण्याने त्याला जाग आली. तो उठून उभा राहिला. तो सॅमसनच होता. मात्र तो अगदी म्हातारा दिसत होता. तो रजिस्टरमध्ये पुश्किनची नावनोंदणी करत असताना पुश्किनने त्याला निरखून पाहिले, तो अगदी जख्ख जरठ दिसत होता. अवघ्या पाचेक वर्षात एखादा माणूस इतका कसा काय वठलेला वृद्ध दिसू शकतो या प्रश्नाने त्याला हैराण केले. अखेर न राहवून पुश्किनने त्याला सवाल केलाच, “आपण एकमेकांना ओळखतो ! तुमच्या लक्षात आहे का ?”सॅमसन काहीशा थंडपणे उत्तरला, “हा रस्ता लांब पल्ल्याचा आहे इथे खूप लोक माझ्या घरी येतात जातात त्यामुळे अनेकजण मला ओळखतात.”त्याच्या निर्विकार उत्तरास दुर्लक्षत त्याने विचारले की, “तुमची मुलगी आता कशी आहे ?त्यावर सॅमसनने त्रोटक उत्तर दिलं, “देव जाणो !”“बहुधा तिचे लग्न झाले असेल ना ?” पुश्किन न राहवून बोलला.म्लान पहारेकऱ्याने त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जणू काही ऐकलेच नाही असा अविर्भाव होता त्याचा. कुजबुजत पुश्किनचे जर्नी डिटेल्स वाचत राहिला. पुश्किनने प्रश्नांची सरबत्ती थांबवली आणि चहा आणायला सांगितला. पुश्किनला वृद्धाच्या तुटकपणाचे कुतूहल मला सतावू लागले. याला निदान मद्य दिले तर हा बोलू तरी लागेल असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने वाईन काढली आणि ग्लास भरले. वृद्धाने पुश्किनने देऊ केलेला ग्लास घेण्यास नकार दिला नाही. पुश्किनने दिलेल्या 'रम'ने त्याचा हळूहळू ताबा घेतला. दुसरा ग्लास पिऊ लागताच तो खुलेपणाने बोलू लागला. त्याने एकतर आता एकतर पुश्किनला ओळखले तरी होते वा तो तसे नाटक तरी करत होता. मात्र त्याने जे सांगितले ते ऐकून पुश्किनला अंतरबाह्य हादरवले."मग, तुला माझी डॉनिया माहीत आहे तर ?" त्याने संभाषण सुरू केलं."तिला कोण ओळखत नाही बरं ? अहो नुसतं डॉनिया डॉनिया हाच नाद ऐकतोय मी ! काय पोर होती ती ! जो कोणी येतो, त्याची स्तुती करतो, त्याला कोणी दोष देत नाही. तिच्यावर खुश होऊन शिक्षिका कधी तिला रुमाल द्यायची, तर कधी कानातले. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घ्यायचे असल्यासारखे राहगीर मुद्दाम थांबायचे. पण खरोखर तुम्ही ते बराच काळ पाहू शकलात. अधिकारी कितीही रागावले असले तरी तिला पाहून शांत व्हायचे, आणि माझ्याशी प्रेमाने बोलत असत. सैन्याचे दूत अर्धा तासभर तिच्याशी बोलत असत. घर तिच्या भरवशावर होतं. काय आणायचे, काय बनवायचे, सगळे करायचे सर्व तीच ठरवे.” ते मुलीबद्दल इतकं प्रेमाने सांगत होते नि काही वेळापूर्वी त्यांची धास्ती घेतली होती. ते पुढे सांगू लागले, मुलीने आनंदी राहावे असे मला वाटत नव्हते का ? माझे माझ्या मुलीवर प्रेम नव्हते का? मी तिची काळजी घेतली नाही का? तिचे जगणे इथे अवघड झाले होते का ? नाही. काही संकटांपासून कोणीही सुटू शकत नाही. ललाटीचे भाष्य पुसता येत नाही हेच खरे...” असं म्हणत प्रदीर्घ सुस्कारा टाकत त्याने आपले दुःख सविस्तरपणे सांगितले: तीन वर्षांपूर्वी एका हिवाळ्याच्या संध्याकाळी, जेव्हा पहारेकरी नवीन रजिस्टरची आखणी करत होता आणि त्याची मुलगी भिंतीच्या मागे बसून शिवणकाम करत होती, तेव्हा एक ट्रोइका थांबला आणि केसाळ टोपी, लष्करी कोट आणि शाल घातलेला एक प्रवासी आला आणि त्याने पहारेदाराकडे शिल्लकीतले घोडे मागितले. मात्र घोडे जागेवर नव्हते. नकार ऐकण्याची सवय नसलेल्या त्या प्रवाशाने आवाज वाढवला आणि चाबूक बाहेर काढला. पण अशा दृश्यांची सवय असलेली डॉनिया लगेच भिंतीवरून धावत आली आणि प्रेमळ आवाजात प्रवाशाला विचारू लागली की त्याला काही खायचे आहे का. डॉनियाच्या आगमनाचा अपेक्षित परिणाम झाला. प्रवाशाचा राग निवळताना स्पष्ट दिसत होता. त्याने घोड्यांसाठी वाट पाहण्याचे मान्य केले आणि स्वतःसाठी खाण्याच्या जिनसा मागवल्या. त्याने टोपी, शाल काढताच स्पष्ट झाले की बारीक मिशांचा तो कणखर तरुण काळ्या घोडदळाचा अधिकारी होता. पहारेदाराजवळ बसून तो त्याच्याशी नि डॉनियाशीही अदबीने बोलू लागला. त्याचे जेवण होईपावेतो घोडेही माघारी आले. पहारेकऱ्याने दाणापाणी न देता त्यांना प्रवाशाच्या घोडागाडीला त्वरित जुंपण्याचा आदेश दिला. दरम्यान त्याने आत येऊन पाहिलं तर तो तरुण प्रवासी बेंचवर जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत लोळत पडलेला दिसला. त्याची प्रकृती खालावली होती. डोकं दुखत होतं. तशा अवस्थेत पुढे जाणे शक्यच नव्हते. चौकीदाराने त्याला त्याची खाट दिली नि त्याची सुश्रुषा सुरु केली. त्याची प्रकृती सुधारली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातून डॉक्टरांना बोलवावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याची प्रकृती खालावली. त्याचा नोकर घोड्यावर स्वार होऊन डॉक्टरांना बोलावण्यासाठी शहरातून निघून गेला. व्हिनेगरने भिजवलेल्या रुमालाने डॉनियाने डोके बांधून त्याच्या कॉटजवळ जाऊन बसली. पहारेकऱ्यासमोर एकही शब्द न उच्चारता तो नुसता रडतच होता. तथापि, त्याने दोन कप कॉफी प्यायली आणि आक्रोश करत दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली. डॉनिया त्याच्यापासून अजिबात दूर गेली नाही. प्रत्येक क्षणी तो काहीतरी प्यायला मागायचा आणि ती आपल्या हाताने बनवलेलं सरबत त्याला द्यायची. तो आपले ओठ ओले करायचा आणि दरखेपेस ग्लास परत करताना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉनियाचा हात आपल्या घ्यायचा. डॉक्टरांनी त्याची नाडी तपासली. त्याच्याशी ते जर्मनमध्ये बोलले, रशियनमध्ये त्यांनी सर्वाना सांगितले की त्याला फक्त विश्रांतीची गरज आहे, दोन दिवसांनी ते जाऊ शकतात. त्याने डॉक्टरांना पंचवीस रूबल्सची फीस दिली, त्यांना लंचचे आमंत्रण दिले. ज्याला डॉक्टरांनी होकार दिला. दोघे भरपेट जेवले. 'वाइन' ची अख्खी बाटली रिचवली नि अगदी आनंदाने एकमेकांपासून वेगळे झाले. दुसऱ्या दिवसानंतर तो तरुण पूर्णपणे बरा झाला. त्याला खूप आनंद झाला. सतत डॉनियाशी वा चौकीदाराशी मस्करी करणे, शिट्ट्या वाजवणे, प्रवाशांशी बोलणे, त्यांचा प्रवास नोंदवहीत लिहिणे अशी त्याची वागणूक होती. तिसऱ्या दिवशी सकाळी तो निरोप घेऊ लागला तेव्हा पहारेकऱ्याचे मन भरून आले. तो रविवार होता, डॉनिया चर्चला जायची तयारी करत होती. तरुणाला त्याची गाडी देण्यात आली. त्याने पहारेकऱ्याचा निरोप घेतला. सेवाबडदास्त ठेवल्याबद्दल त्याला बक्षीस दिले. डॉनियाचा निरोप घेताना त्याने गावाच्या शेवटच्या टोकास असलेल्या चर्चपर्यंत तिला लिफ्ट देण्याची ऑफर दिली. डॉनिया आधी विचारात पडली नंतर तिने होकार दिला. त्याच्या शेजारी बसली. चालकाने इशारा करताच घोडे धावू लागले. डॉनियाला आपण त्याच्या सोबत कसे जाऊ दिले याचा उलगडा त्या बिचार्‍या पहारेकऱ्यास कधीच झाला नाही. त्याला काहीच कसे वाटले नसेल ? विरह वेदनांनी जेमतेम अर्ध्या तासानंतर त्याच्या छातीत कळा येऊ लागल्या. अस्वस्थतेतून तो स्वतःवरचा ताबा हरवून चर्चच्या दिशेने निघाला. चर्चजवळ येताच त्याने पाहिले की सर्व लोक आपापल्या घरी गेले आहेत. डॉनिया कुठेच दिसली नाही. प्रिस्ट बाहेर पडत होता, सेवक मेणबत्त्या विझवत होता. कोपऱ्यात बसलेल्या दोन वृद्ध स्त्रिया अजूनही प्रार्थना करत होत्या. पण तिथे डॉनियाचा मागमूसही नव्हता. मोठ्या कष्टाने त्याने सेवकाला डॉनियाबद्दल विचारले पण तिथेही निराशाच पदरी पडली. पहारेकरी उदास मनाने घरी परतला. आता एकच आशा उरली होती. तारुण्याच्या चंचलतेमध्ये डॉनियाने पुढच्या डाकचौकीत जाण्याचा निर्णय घेतला असावा जिथे तिची गॉडमदर राहत होती. त्याने आपल्या मुलीची प्रतीक्षा केली. शेवटी एकाकी नि अस्वस्थ अवस्थेत तो संध्याकाळी परतला तेंव्हा "डॉनिया पुढच्या पोस्टचौकीतूनही त्या तरुण अधिकाऱ्यासह पुढे निघून गेल्याचा दुःखद निरोप त्याला मिळाला. त्याला हा आघात सहन झाला नाही. आदल्या रात्री ज्या कॉटवर तो तरुण झोपला होता त्याच कॉटवर तो लगेच पडला. आता सर्व गोष्टींचा विचार केल्यावर चौकीदाराच्या लक्षात आले की त्या तरुणाचा आजार खोटा होता. पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या पहारेकऱ्याची तब्येत ढासळली, त्याला शहरात नेण्यात आले. त्याच्या जागी काही काळासाठी दुसरा पहारेकरी नेमण्यात आला. त्या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच वृद्ध पहारेकऱ्यावरही उपचार केले. त्यांनीच त्याला खात्री दिली की तो तरुण पूर्णपणे निरोगी होता यावरूनच त्याचे दुष्ट हेतू कळले होते मात्र चाबकाच्या फटक्यांच्या भीतीने तो गप्प राहिला. एकतर सत्य बोलत होता वा त्याच्या दूरदृष्टीची बढाई मारत होता. पण त्याच्या या वक्तव्याने पहारेकऱ्यास अजिबात दिलासा मिळाला नाही. आजारातून बरे झाल्यानंतर पहारेकऱ्याने पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दोन महिन्यांची रजा मागितली आणि कोणालाही आपल्या हेतूबद्दल एक शब्दही न सांगता तो पायीच आपल्या मुलीच्या शोधात निघाला. रजिस्टर पाहून त्याला कळले की घोडदळाचा अधिकारी मिन्स्की स्मोलेन्स्कहून पीटरबर्गला गेला होता. तिला घेऊन जाणार्‍या चालकाने कथन केलं की, वाटेने डॉनिया सतत रडत असली तरी ती स्वतःच्या मर्जीने जात आहे असेच वाटत होते. त्याने पीटर्सबर्ग गाठले. त्याच्या जुन्या ओळखीच्या ठिकाणी, सैन्यातील निवृत्त अधिकारी असलेल्या ठिकाणी राहिला आणि डॉनियाचा शोध चालू ठेवला. लवकरच त्याला कळले की मिन्स्की अजूनही पीटर्सबर्गमध्ये आहे. पहारेकऱ्याने त्याच्या घरी जायचे ठरवले. पहाट होताच, तो तिच्या गेस्ट-हाउसमध्ये गेला आणि हुजूरच्या बाजूने विनंती केली की, एका वृद्ध सैनिकाला त्याला भेटायचे आहे. विहिरीजवळ चपला साफ करत असलेल्या ऑर्डरलीने सांगितले की, साहेब झोपले आहेत आणि ते अकरा वाजण्यापूर्वी कोणालाही भेटत नाहीत. पहारेकरी परत आला. नंतर मिन्स्की स्वतः लाल टोपी घालून बाहेर आला."का भाऊ, काय हवंय तुला?" त्याने विचारले.वृद्धाचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, आणि थरथरत्या आवाजात तो फक्त म्हणाला, "हुजूर!...कृपया!..." मिन्स्की त्याच्याकडे पाहताच किंचाळला. हात धरून त्याला अभ्यासाच्या खोलीत घेऊन गेला आणि मागचा दरवाजा बंद केला. म्हातारा पहारेकरी म्हणाला, “गाडीतून पडलेले धान्य देखील धुळीत मिसळते, निदान मला तरी माझी गरीब डॉनिया द्या ! तुमच्या हृदयात ती सामावली असावी. तिला मारू नका हो !” "जे झाले ते झाले आता तो काळ पुन्हा येणार नाही," मिन्स्की म्हणाला. “मी तुमचा अपराधी आहे, तुमची क्षमा मागतो, पण मी डॉनियाला सोडेन असे समजू नका. ती आनंदात राहील याचे वचन देतो. तुम्हाला तिची काय गरज आहे? ती माझ्यावर प्रेम करते, ती तिचे जुने आयुष्य विसरली आहे.” एव्हढं बोलून एक लिफाफा त्याने पहारेकऱ्याच्या बाहीत सरकावला आणि चटकन दार लोटून निघून गेला. पहारेकरी बराच वेळ तसाच उभा राहिला. शेवटी त्याने लिफाफा उघडला आणि त्यातल्या पाच-पाच, दहा-दहा च्या काही चुरगळलेल्या नोटा त्याला दिसल्या. त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले - अपमानाचे अश्रू ! त्याने त्या नोटा चुरगाळल्या नि जमिनीवर फेकल्या. त्याने आपल्या डाकचौकीत परतण्याचा निर्णय घेतला. निघण्याआधी एकदा तरी आपल्या गरीब मुलीला पाहण्याची त्याची इच्छा होती. याच हेतूने दोन दिवसांनंतर तो पुन्हा मिन्स्कीच्या घरी आला, परंतु ऑर्डरलीने मोठ्या गांभीर्याने उत्तर दिले की मालक कोणालाही भेटणार नाहीत. वृद्ध पहारेकऱ्याची मान पकडून त्याने त्याला गेस्टहाऊसच्या बाहेर ढकलले, घाईघाईने दरवाजा बंद केला. दमलेला पहारेकरी बराच वेळ निशब्द उभा राहिला आणि काही वेळाने निघून गेला. त्याच दिवशी संध्याकाळी तो चर्चला प्रार्थना करून लिटेयानाया रस्त्याने जात होता. अचानक एक भव्य वॅगन त्याच्या समोरून गेली आणि पहारेकऱ्याने त्यात बसलेल्या मिन्स्कीला ओळखले. तीन मजली इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वॅगन थांबली आणि मिन्स्की आत शिरला. पहारेकऱ्याच्या अधीर मनात एक आनंदी विचार तरळला. मागे वळून चालकापाशी तो गेला आणि विचारले की, "भाऊ कोणाचा घोडा आहे? मिन्स्की आता इथेच कुठेतरी आहेत ना?""तुझी माहिती बरोबर आहे," चालकाने उत्तर दिले, "पण तुझे काय स्वारस्य ?""हे असे आहे: तुझ्या मालकाने मला हे पत्र त्याच्या डॉनियाला देण्यास सांगितले, पण मी विसरलो की डॉनिया कुठे राहते?""येथे, दुसऱ्या मजल्यावर. तू तुझे पत्र खूप उशिरा आणलेस, भाऊ, आता तो स्वत: त्याच्याकडे आला आहे."“काही हरकत नाही”, पहारेकरी धडधडत्या हृदयाने म्हणाला. "मला सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी माझे काम करेन." असे म्हणत तो पायऱ्या चढू लागला.दरवाजा बंद होता. त्याने बेल वाजवली. काही क्षण तणावाच्या प्रतीक्षेत गेले. चावी फिरवण्याचा आवाज आला.दार उघडले."अवडोत्या समसानोव्हना इथे राहतात?" त्याने विचारले."हो, इथेच," तरुण दासीने उत्तर दिले. "तुला त्यांच्याकडे काय काम आहे?"पहारेकरी उत्तर न देता दिवाणखान्यात शिरला."नाही, नाही," मोलकरीण पुढे-मागे ओरडली, "अवदोत्या समसानोव्हना पाहुणे आहेत."पण पहारेकरी काही न ऐकता पुढे निघून गेला. पहिल्या दोन खोल्यांमध्ये अंधार होता, तिसर्‍या खोलीत उजेड होता. तो उघड्या दरवाजाजवळ थांबला. मिन्स्की एका सुशोभित खोलीत विचारात मग्न होऊन बसली होता. अत्याधुनिक पोशाख घातलेली डॉनिया त्याच्या खुर्चीच्या हातावर बसलेली, जणू तिच्या इंग्रजी घोड्यावर स्वार अशी बैठक ! तिने मिन्स्कीकडे प्रेमाने पाहिले, आपल्या चमचमत्या बोटांनी तो तिच्या केसांशी खेळत होता. बिचारा पहारेकरी ! त्याची मुलगी त्याला कधीच इतकी सुंदर वाटली नव्हती. तो फसगत झाल्यागत तिच्याकडे बघत राहिला. "कोण आहे तिकडे ?" मिन्स्कीने डोके वर न करता विचारले. तो गप्प राहिला. काहीच उत्तर न मिळाल्याने डॉनियाने मस्तक उंचावून वर पाहिलं !आणि किंचाळत ती कार्पेटवर पडली. घाबरलेला मिन्स्की त्याला उचलण्यासाठी पुढे गेला आणि अचानक, दारात असलेल्या वृद्ध पहारेकऱ्याला पाहून, डॉनियाला तिथेच सोडून, ​​रागाने थरथरत तो त्याच्या दिशेने झेपावला."तुम्हाला काय पाहिजे?" दातओठ खात तो म्हणाला, “दरोडेखोरासारखे माझ्या मागे का फिरत आहात? मला मारायचेय का ? चालते व्हा ! " आणि म्हातार्‍याच्या कंबरेचा पट्टा धरून त्याला पायऱ्यांवरून खाली ढकलले. पहारेकरी त्याच्या खोलीवर परतला. मित्राने त्याला कोर्टात तक्रार करण्याचा सल्ला दिला, मात्र विचाराअंती त्याने हात झटकले आणि मागे हटण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनी तो पीटर्सबर्गहून त्याच्या डाकचौकीत परतला नि स्वतःला कामात गुंतवलं.... "दोन वर्षे झाली," पहारेकरी आपलं संभाषण संपवत म्हणाला, "मी डॉनियाशिवाय जगत आहे, अलीकडे तिची कोणतीही खबर नाही. जिवंत की मृत, देव जाणो. काहीही होऊ शकते. ती पहिली किंवा शेवटची नाही जिला प्रवाशाने आमिष दाखवून काही दिवस सोबत ठेवले आणि नंतर सोडले. पीटर्सबर्गमध्ये अशा अनेक मूर्ख तरुणी आहेत, ज्या आज मखमली कपडे घातलेल्या आहेत, आणि उद्या त्या ठिपक्याच्या कपड्यांमध्ये रस्त्यावर झाडू मारताना दिसतात. जेव्हा मला वाटते की कदाचित डॉनियाचेही असेच नशीब असेल, तेव्हा मी नकळत तिच्या मृत्यूची इच्छा करतो...” त्या वृद्ध पहारेकऱ्याने आपली दास्तान सांगताना कैकदा शर्टच्या बाह्यांनी आपले अश्रू पुसले. आपली व्यथा सांगताना त्याने वाईनचे पाचेक ग्लास रिचवले होते. त्याच्या कथेचा पुश्किनच्या हृदयावर खोलवर परिणाम झाला. त्याला अलविदा करूनही कधीच विसरू शकला नाही. डॉनियाचा विचार करत राहिला. या घटनेनंतर काही काळाने शहरातल्या एका मित्राच्या भेटीत त्याला कळले की तो वृद्ध पहारेकरी जिथे काम करत असे ती डाकचौकी आता अस्तित्वात नाही. “वृद्ध पहारेकरी निदान जिवंत आहे का?" ह्या पुश्किनच्या प्रश्नावर मित्राकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. न राहवून पुश्किनने तिकडे जायचे ठरवले आणि घोडा घेऊन त्या गावाकडे निघाला. हिवाळ्याचे दिवस होते. आकाश ढगाळ ढगांनी व्यापले होते. शेतांमधून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतासोबत लाल पिवळी पानं उडत होती. पुश्किन सूर्यास्ताच्या वेळी गावात पोहोचला आणि तडक डाकचौकीपाशी जाऊन थांबला. पोर्चमध्ये जिथे कधीकाळी गरीब डॉनियाने त्याचे चुंबन घेतले होते तिथे एक लठ्ठ स्त्री आली. तिने त्याच्या प्रश्नांचे उत्तर दिले. वृद्ध पहारेकरी जवळजवळ एक वर्षापूर्वी मरण पावला होता. आता त्याच्या घरात एक दारूवाला राहतो. आणि ती त्याच दारू बनवणाऱ्याची पत्नी आहे. व्यर्थ गेलेल्या प्रवासाबद्दल आणि त्यापायी खर्ची पडलेल्या सात रूबलबद्दल पुश्किनला वाईट वाटले."तो कसा मेला?" पुश्किनने दारूभट्टीच्या बायकोला असंच नकळत विचारलं."पिऊन..." ती म्हणाली."त्याला कुठे दफन केलेय ?""वस्तीच्या बाहेर, त्याच्या कालकथित पत्नीच्या शेजारी.""तुम्ही मला त्याच्या कबरीपर्यंत नेऊ शकता का?""का नाही. अरे वांका! मांजरासोबतचा तुझा खेळ पुरे झाला आता.. यजमानांना स्मशानात घेऊन जा आणि पहारेकऱ्याची कबर दाखव.”तिचे उद्गार ऐकून लाल केस असलेला, कंबरेत बाक आलेला, फाटके कपडे घातलेला एक तरुण धावत पुश्किनकडे आला आणि ताबडतोब वस्तीबाहेर घेऊन गेला."तू मृतास ओळखतो का?" जाताना पुश्किनने त्याला विचारले."का बरं ओळखणार नाही ? त्यांनीच तर मला गोफ कसा बनवायचा ते शिकवलं. मधुशालेतून निसटलो की आम्ही त्यांच्या मागे जायचो. आजोबा ! अक्रोड ! म्हणून ओरडायचो मग ते आम्हाला अक्रोड द्यायचे. अधूनमधून आमच्यासोबत हँग आउट करत.""तुला त्यांची आठवण येते का?"“आता प्रवासी क्वचितच येतात. प्रवासी विशेषतः या मार्गाने येतील तरी कशाला ? आणि निवर्तलेल्यांच्यात तरी काय अर्थ बाकी असतो ? नाही म्हणायला मागच्या उन्हाळ्यात एक मेमसाब आली होती. तिने याच वृद्ध पहारेकऱ्याबद्दल विचारले आणि त्याच्या कबरीपाशी गेली."कसली मेमसाब?" पुश्किनने कुतूहलाने विचारले."खूप सुंदर ! कर्ती स्त्री असावी ती", मुलगा म्हणाला. “सहा घोड्यांची गाडी घेऊन ती आली होती. तीन लहान मुले आणि आयादेखील सोबत होती. मेमसाबच्या चेहऱ्यावर काळा मुखवटा घातला होता. वृद्ध पहारेकरी निवर्तल्याचे सांगताच तिने हंबरडा फोडला आणि मुलांना म्हणाली, शांत बसा, मी कब्रस्तानात जाऊन येते. मी तिला घेऊन इकडे येणार होतो पण ती म्हणाली की ‘मला रस्ता माहीत आहे.’ आणि तिने नंतर मला चांदीचे पाच कोपेक दिले." बोलत बोलत पुश्किन आणि तो तरुण कब्रस्तानात पोहोचले. ती अगदी निर्जन जागा होती. कुंपणही नव्हते. बऱ्यापैकी लाकडी क्रॉसने भरलेला परिसर होता तो. तिथे एखाद्या झाडाची सावलीदेखील नव्हती. इतकी दयनीय स्मशानभूमी पुश्किनने त्याच्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती.“ही त्या वृद्ध पहारेकऱ्याची कबर आहे,” एका वाळूच्या ढिगाऱ्यावर चढत तरुणाने सांगितले, ज्यावर तांब्याचा पुतळा जडलेला काळा क्रॉस उभा होता."मेमसाब इथे आली होती ?" पुश्किनने विचारले."होय", वांकाने उत्तर दिले. "मी तिला दुरून पाहत होतो. बराच वेळ ती इथे उभी होती. मग गावात जाऊन पाद्री बोलावून आणला. तिने त्याला पैसे दिले आणि निघून गेली. जाताना मला एक चांदीचे नाणे दिले. ती चांगली सारथी होती."आणि मग पुश्किनने देखील वांकाला पाच कोपेक्सचे नाणे दिले. त्या प्रवासाबद्दल आता पुश्किनला खेद वाटत नव्हता आणि त्याकामी खर्च केलेल्या सात रूबलबद्दलही खेद वाटत नव्हता...***** ******* ******* ******** ******** ******** ********* ******** ******* ******* ****** पुश्किनची कथा अखेरपर्यंत भावनांच्या हिंदोंळयांवर झुलते, वाचकांना भुलवते. खेचून आणल्यागत खिळवून ठेवते. हिंदीत प्रेमचंद यांच्या काही कथा अशाच मांडणीच्या आहेत. कथेत खूप काही घडत नाही मात्र वाचकाच्या मनाशी त्या खेळत राहतात हे या कथांचे वैशिष्ट्य होय. कथेच्या शेवटी काहीच नाट्य नाहीये तरीही वाचकाच्या मनात प्रचंड घालमेल होते हे या कथेचे खूप आगळेवेगळे गुणवैशिष्ट्य. रशियन लोकसंस्कृतीची नि निसर्गाची देखणी वर्णने कथेला वेगळ्याच उंचीवर नेतात त्यायोगे ही कथा कायमची स्मरणात राहते. कुणा एकाची जितेपणी भेट झाली नाही तरी चालेल मात्र निदान त्या व्यक्तीच्या मनातले भाव तरी आपुलकी स्नेह जोपासणारे आहेत याची जाणीव देखील सुखावह असते या संवेदनेची इथे टोकदार जाणीव होते. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांचे आपण ऋणी आहोत त्यांच्या प्रती आपल्या किमान मानवी संवेदना असल्याच पाहिजेत. कथेच्या शेवटी डॉनिया आपल्या वृद्ध पित्याच्या कबरीवर येऊन गेल्याचे कळताच आपली जीवनमुल्ये नकळत दृढ होतात.या कथेत फारसे नाट्य नाही. निवेदन शैलीमधून कथा पुढे सरकते. वृद्ध वॉरेन आणि त्याची तरुण मुलगी यांची किमान एक तरी भेट व्हायला हवी होती असे राहून राहून वाटू लागते. कथेच्या शेवटी वॉरेन मरण पावतो. त्याच्या भेटीला निघालेला लेखक त्याच्या मृत्युच्या बातमीने हताश शोकमग्न होतो. सारं व्यर्थ गेल्याची भावना त्याच्या मनी येते मात्र अंतिम परिच्छेदात डॉनिया आपल्या मृत पित्याच्या कबरीस भेट देऊन गेल्याचे कळते तेंव्हा आपल्याला नकळत खूप बरे वाटते. हे समाधान नक्की कशाचे आहे याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष भिन्नच येईल. तरीही राहून राहून नात्यांच्या सचेत असण्याचे हे संकेत सर्वाना हवेहवेसे वाटतात हे लपून राहत नाही ... वास्तवात ही पात्रे आपल्या परिचयातली नाहीत नि आपल्या परिघातलीही नाहीत तरीही इथे मानवी जीवनमूल्यांचे संवर्धन व्हावे असे आपल्याला सतत वाटत राहते. किंबहुना आपल्याला असं वाटणं ही देखील आपल्या माणूसपणाची खुण आहे !- समीर गायकवाड पूर्वप्रसिद्धी दै.संचार - इंद्रधनू पुरवणीमधील कथेची गोष्ट सदर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!