अभिव्यक्तीचे विद्रुपीकरण करणारे 'अनसोशल' अल्गोरिदम...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

इथे सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱ्या मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षात अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. तुम्हीदेखील केवळ नि केवळ राजकीय भूमिका इथे मांडत असाल वा तुमच्या मित्रयादीत केवळ राजकीय पालख्या उचलणारे भोई असतील तर तुम्ही हे वाचावं. इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते. एक काळ होता जेंव्हा मी कट्टर हिंदुत्ववादी होतो, अत्यंत जहरी नि कडवट भूमिकांचे समर्थन करायचो तेंव्हा माझ्या फीडमध्ये केवळ अशाच पोस्ट्स येत आणि माझ्यातल्या विषाला ते पोषक होते. नंतर यावर जाणीवपूर्वक काम केले. जे केवळ अत्यंत कडवे, कट्टर राजकीय भूमिकांसाठी इथं वावरत असत अशांच्या यादीतून आधी रजा घेतली. स्वतःची विखारी विचारधारा बदलणं अत्यंत त्रासदायक होतं मात्र ते जमलं. माझ्या जडणघडणीवर, जीवनातील अनुभवांवर नि भवतालातल्या काही गॊष्टींकडे सजगतेने पाहू लिहू लागलो, त्यावर लिहू लागलो. माझ्या लेखनाचा घाट बदलताच जे निव्वळ राजकीय चिखलफेकीसाठी माझ्या भिंतीवर येत असत अशांचं येणं आपसूकच अत्यंत वेगाने कमी झालं. काहींनी मला बाजूला काढलं तर नाइलाजस्तव काहींना मी रजा दिली. दरम्यान माझ्या फीडमधील गोष्टीही बदलत गेल्या. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बदलवू शकतो, मात्र त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींशी आपला संपर्क वाढणं अत्यंत महत्वाचं आहे. विविध परस्परविरोधी विचारांचे विस्तृत नि अभ्यासू विचार वाचनात आले की त्यांचा नेमका अन्वयार्थ लागतो. उदाहरणार्थ मी जर कट्टर अबकप्रेमी असेल आणि माझ्या मित्रयादीत सगळेच तसे लोक असले तर आपली फीड तशाच पोस्ट दाखवते, सगळीकडे तेच सुरु आहे असे आपल्याला वाटू लागते. दुसरी बाजूच आपल्या समोर येत नाही. मग कट्टर अबकविरोधी लोक काय लिहितात, त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या भूमिकेस कोणते आधार आहेत हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या विचारांत बदल संभवत नाही. आपल्या यादीत सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय विचारधारांचे, सर्व जाणिवांचे लोक असले की आपल्यासमोर विविधांगी पोस्ट्स येत राहतात. आपलं वैचारिक संतुलन राहण्यास त्याने मदत होते. असे न करता केवळ एका भूमिकेने इथे वावरणाऱ्या अनेकांचे हेतू ठाऊक नाहीत. मात्र आपल्यापैकी कित्येकांना ठाऊक असलेली एक गोष्ट नक्की शेअर करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यास बेरोजगार असहाय नि परावलंबी पोरांची गरज असते (कारण तेच त्याचे कथित कार्यकर्ते असतात), तेच त्यांचे प्यादे असतात. त्यांचा वापर करून ते आधी गल्लीतल्या एखाद्या मंडळाचे अध्यक्ष होतात, मग नगरसेवक, मग काही वर्षांनी एखादी स्थायी कमिटी मग महापौर वा आमदार, खासदार आणि सरतेशेवटी मंत्री संत्री इत्यादी त्यांचे ध्येय असते. या शिडीवरून अनेकांना पुढे जायचे असते त्यासाठी त्यांना आपले पाय ठेवण्यासाठी डोकी हवी असतात. ही ती डोकी असतात जी रिकामी असतात आणि नेत्यांनी भडकावलेल्या भावनांवर चालत असतात, शिवाय नेता त्यांचा बिडीकाडीचा खर्च भागवत असतो! ही फळी जेंव्हा तुटेल तेंव्हा आपल्या देशात खूप काही घडेल. असो... तर अशीच रिकाम्या युजर्सची फळी इथे राजकीय भूमिका घेणाऱ्या धुरिणांना हवी असते. फुरसतीच्या वेळासाठी इथे आलेली माणसं सुरुवातीला कंड वा हौस म्हणून राजकीय भूमिका मांडतात आणि नंतर ते पूर्णवेळ राजकीय समर्थक होऊन जातात. त्यांच्या आयुष्यातील इतर अनेक चांगल्या आवडीनिवडींचा बट्ट्याबोळ होऊन जातो. माणूस निव्वळ राजकीयविकृतीने पछाडला जातो. त्याच्या यादीतले बहुतांश सगळेच असे असतात. मग जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला राजकीय भूमिका दिसू लागतात. आपला विवेक त्याने गामवलेला असतो मात्र पुढे जाऊन स्वतःच्या आकलनशक्तीचे देखील आकुंचन केलेलं असतं. राजकीय भूमिका मांडणारे इथे अनेक पेड लोक्स आहेत, त्यांना निदान फुटक्या कवडीचे आमिष तरी आहे! बाकींच्यांचे काय? मात्र पेड आयटीसेल्सच्या नादी लागून आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीचे नि जडणघडणीचे अतोनात नुकसान करून घेणाऱ्या लोकांच्या हाती काय लागते? मेंटल स्ट्रेस, नैराश्य आणि अतिआक्रमकता, वैचारिक साचलेपण आणि बौद्धिक अधोगती याचे ते शिकार होतात. खेरीज समाजाकडे बघण्याचा सच्चा नजरिया नकळत हरवून जातो. इथे अनेक छुपे लोक असेही आहेत की जे स्वतः आरामात, मजेत, आनंदात जगतात; टिवल्या बावल्या करत अनेकांच्या पोस्ट्सवर राजकीय शेरेबाजी करतात, इतरांना उसकवतात नि स्वतः मात्र थंड राहतात, नंतर मजा घेत राहतात! तर काही लोक्स असेही आहेत की जे लिहिणाऱ्याला खतपाणी घालत राहतात, त्यांच्या भिंतीवर काहीच नसते, अगदीच शोध घेतला तर एखादा डीपी बदललेला फोटो दिसतो ! हे हरामी असतात यांच्या आयुष्यात काहीच नसतं हे दुसऱ्याचं आयुष्य खराब करणारे लोक असतात. मुळात सोशल मीडिया हा निव्वळ राजकीय अजेंडा म्हणून जेजे लोक वापरतात त्यांच्यापासून आपण दूर जात राहिलं की आपल्यातला सोशलनेस खऱ्या अर्थाने बाहेर येतो. ज्यांचं पोटच अजेंड्यावर चालतं त्यांचं आपण समजू शकतो, मात्र आपलं काय? आयुष्यातील अनेक घटकांचा आनंद हवा असेल, जीवनातील अनेक अनुभूतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकरेषीय वा एकांगी भूमिकेतून तो कधीच साध्य होत नाही. याचा अर्थ असा नाही की आपल्याला राजकीय विचार नसावेत वा राजकीय विचार मांडले जाऊ नयेत. 'मी तटस्थ असतो वा मला राजकीय भूमिका नाही' हे देखील एक राजकीय ढोंग असते, इथल्या ट्रोल्सपायी घाबरून अनेक जण आपली भूमिका मांडू शकत नाहीत हे समजू शकतो. मात्र जेंव्हा जेंव्हा आत्यंतिक प्रकटनाची गरज पडते तेंव्हा आपली भूमिका सौम्य नि नेटक्या शब्दात मांडली तरी आपल्याला कणा असल्याचे समाधान लाभते. इथे चोवीस तास निव्वळ राजकीय मोडमध्ये असणाऱ्या द्वेषमत्सराने ग्रासलेल्या लोकांपासून दूर राहिलं की आपल्या जाणिवा समृद्ध होण्यास मदत होते, नकळत स्वतःमध्येही डोकावता येते. केवळ अशांच्या पोस्ट्सवर जाणं हा स्वतःचा ऱ्हास करण्या सारखं आहे. हे लोक कोण आहेत याची साधी चाचणी घेता येते, आपण राजकीय, धार्मिक भूमिका न मांडता फक्त अन्य विषयांचीच मते मांडायची वा तशा पोस्ट्सवरच व्यक्त व्हायचे, हे लोक आपल्यापाशी फिरकत देखील नाहीत. मात्र अधूनमधून केवळ एखादी राजकीय पोस्ट केली कि हे लगेच हजर होतात. कारण त्यांची पोस्ट्स फीडच तशी असते, यावरून लक्षात घ्या की आपल्या बहुआयामी विचारांवर ताबा मिळवून केवळ एका सीमित विश्वात जगण्यासाठी फेसबुक आपला वापर करतं, यातून फेबुला काय मिळतं ते आपण मार्कच्या आर्थिक वाढीवरून पाहतोच आहोत. आत्मसन्मान गमावलेल्या ट्रोल्सना काही दिडक्यांची हाडे मिळतात, राजकीय लबाडांना घबाड मिळतं मात्र त्यांच्या मागे धावणाऱ्या युजर्सना काय मिळतं? तर विविधांगी विचार करण्याच्या कुवतीचा ऱ्हास आणि गळकी सडकी अभिव्यक्ती! कीबोर्ड आपल्या हाती आहे आपण काय करायचेय हे आपल्यालाच ठरवायचेय. मी यातून गेलोय म्हणून हा शब्दप्रपंच! बाकी पृथ्वी केव्हढी तर ज्याच्या त्याच्या डोक्याएव्हढी हे तर सर्वज्ञात आहे आणि इथे अनंत सर्वज्ञानी आहेत हे सर्वांनाच ज्ञात आहे!- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!