अनुवाद दिनानिमित्त-

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

 आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन ! मी मुद्दाम अनुवाद दिन असा शब्दप्रयोग केला आहे. ह्याचे कारण अनुवाद करण्याचे काम फाल्तू समजणारे अनेक तथाकथित सृजनशील लेखक आहेत. खरे तर, अनुवाद करण्यासाठी अनुवादक हा सृजनशील लेखकाइतकाच समर्थ असावा लागतो.  सृजनशील लेखक स्वतःला कितीही मोठे समजत असले तरी जोपर्यंत ते सुप्रसिध्द लेखक होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही अनुवादकाची ते बरोबरी करू शकणार नाहीत. तसे पाहिले तर सुरूवातीचे मराठी साहित्य  भाषान्तर युग म्हणून गाजले. उत्तमोत्तम अनुवादाखेरीज साहित्य समृध्द होत नाही. संस्कृतातल्या गीतेचा ज्ञानेश्वरांनी केलेला भावर्थदीपिका हा अनुवाद हे त्याचे उदाहरण आहे. माझ्या करीअरची सुरूवात अनुवादकापासून  झाली. वर्तमानपत्रात नोकरी करण्यासाठी मी मुंबईला आलो होतो. परंतु मला वर्तमानपत्रात नोकरी मिळत नव्हती. म्हणून मी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेला बसलो. परंतु माझी निवड होऊ शकली नाही. माझ्या सुदैवाने बॅलार्ड पीयरस्थित रोजगार केंद्रातर्फे माझे नाव `एक्झॅमिनर ऑफ बुक्स अँड पब्लिकेशन्स’ ह्या कार्यालयाला कळवण्यात आले. ह्या कार्यालयाने मला भेटीला बोलावले. माझे दैव बलवत्तर होते  म्हणून अधिपरीक्षक थोरात ह्यांनी मला दुय्यम अनुवादकाची नोकरी दिली आणि लगेच कामावर बसण्यास सांगितले. कामावर बसवण्यापूर्वी थोरातांनी भाषान्तर विभागाचे प्रमुख गु. ह. दिवेकर ह्यांना पाचारण करून मला त्यांच्या सुपूर्द केले. दिवेकरांनी मला र. ल. पाटील आणि कुळकर्णी ह्यांच्या हाताखाली काम करायला सांगितले. कुळकर्णींच्या नावाची आद्याक्षरे मी विसरलो. मात्र एक लक्षात राहिले. ते कृ. पां कुळकर्णी ह्यांचे चिरंजीव होते हे मात्र माझ्या कायमचे लक्षात राहिले. कृ. पां कुलकर्णी हे आचार्य अत्र्यांनी संपादित केलेल्या सुभाष वाचनमालेचे सहसंपादक होते. सुभाषवाचनमाला माध्यमिक शाळेत अभ्यासाला होती. ज्या अधिपरीक्षक पुस्तके आणि प्रकाशने’ ह्या कार्यालयात मला पहिली तोकरी मिळाली त्या कार्यालयाचे नाव ब्रिटिश काळात ‘ओरिएंटल ट्रान्सलेटर’ होते. हेच ते ऑफिस ज्याने करून दिलेल्या भाषान्तरामुळे लोकमान्य टिळकांवर खटला भरणे सरकारला शक्य झाले. त्या खटल्याच्या निकालात टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्याची शिक्षा झाली! दिवेकारांनी ही माहिती मला पहिल्याच दिवशी दिली. दुसरी माहिती त्यांनी दिली ता म्हणजे आस्थापना शाखा वगळता ह्या कार्यालयात एकही कारकून नाही! फक्‍त अनुवादक आणि शिपाई ही दोनच पदे होती. माझी ही नोकरी ‘लीव्ह व्हेकन्सी’ असल्याने मला हेडक्लार्क गोखले ह्यांनी बोलावून सांगितले, आता ह्या वर्षांचे बजेट संपल्याने तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका. बजेट आले की मी तुम्हाला पत्र पाठवून बोलावून घेईन. सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला मे महिन्यात पत्र पाठवून बोलावून घेतलेही. मे महिन्यात मी पुन्हा  रूजू झालो. माझ्या भाषान्तरात फारशा चुका नसल्याचा अभिप्राय सा-यांनी दिल्यामुळे मला पुन्हा बोलावण्यात आले हेउघड होते. कॅज्युअल बजेट असलेल्या पदावर नोकरी करण्याची पाळी आल्याने माझे आयुष्य अस्थिर होऊ शकते ह्याची विदारक जाणीव मला मार्च-एप्रिल महिन्यात झाली. म्हणून त्या काळात रोज अर्ज करण्याचा सपाटा लावला. टाईम्समध्ये एके दिवशी अनुवादक आणि दुभाषा ह्या पदासाठी स्मॉल कॉजेस कोर्टाची जाहिरात आली. साहजिकच त्या जाहिरातीनुसार मी अर्ज केला. रोजच ॲप्लाय ॲप्लाय अँड नो रिप्लाय, ह्या उक्‍तीचा मला आला. अधिपरीक्षक पुस्तके आणि प्रकाशने कार्यालयात असतानाच मला स्मॉल कॉजेस कोर्टाचा कॉल आला. दुस-या दिवशी बरोबर सकाळी १० वाजता मुख्य न्यायाधीश माझी मुलाखत घेणार होते. म्हणून आदल्या दिवशीच उशिरा येण्याची परवानगी मी घेतली होती. ठरल्याप्रमाणे मी स्मॉल कॉजेस कोर्टाचे मुख्य न्यायाधीश शिवमोहन खत्री ह्यांच्या केबिनच्या दारासमोर हजत झालो. त्यांच्या शिपायाने मी आल्याची वर्दी न्यायाधीशसाहेबांना दिली. त्यांनीही मला लगेच आत बोलावले. ते म्हणाले, तुमचं क्‍वालिफिकेशन फिट् आहे. परंतु गुजराती बोलण्याचा उल्लेख जाहिरातीत केला आहे. तुम्हाला गुजराती बोलता येतं का?   ‘मला गुजराती बोलता येत नाही. परंतु मी भाषेचा विद्यार्थी आहे. शिवाय कोणतीही भाषा शिकण्याची मला आवड आहे. त्यामुळे गुजराती भाषा मी शिकेन.’ हे सगळे संभाषण अर्थात इंग्रजीत झाले. मी मराठी माध्यमात शिकल्यामुळे मला इंग्रजीत बोलणे थोडे अवघडच गेले. पण मी धीटपणाने वेळ मारून नेली. कदाचित माझ्यातला आत्मविश्वास खत्रीसाहेबांना आवडला असावा. ‘ठीक आहे’, असे सांगून त्यांनी रजिस्ट्रार गावस्कर ह्यांना फोन करून बोलावून घेतले. गावस्करांना मला सशर्त नेमणूक देण्याचा हुकूम दिला. तो देताना त्यांनी अशी अट होती की ३ महिन्यांनंतर गुजरातीची टेस्ट घेण्यात येईल. त्या टेस्टमध्ये मीउत्तीर्ण झालो तरच मला नोकरीत कायम करण्यात येईल; अन्यथा मला नोकरी सोडावी लागेल. ह्या अर्थाचे कलम नेमणूकपत्रात टाकण्याचे गावस्करांना त्यांनी फर्मावले. त्यानंतर गावस्करांनी मला १० मिनीटात नेमणूकपत्र दिले. ते घेऊन मी जुन्या कार्यालयात गेलो. संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी थोरातांच्या जागी बढती मिळालेले अधिपरीक्षक दिवेकर ह्यांची भेट घेतली. मला स्मॉल कॉजेस कोर्टात नोकरी मिळाल्याचे मी त्यांना सांगितले. माझे अभिनंदन करून त्यांनी मला राजिनाम्याचे पत्र लिहायला सांगितले. त्यानुसार मी पत्र दिले. सर्वांना प्रत्यक्ष भेटून मी निरोप घेतला. स्मॉल कॉजेस कोर्टातले अनुभव सांगण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागेल. एक आठवणच सांगायची झाली तर असे सांगावेसे वाटते की, ह्याच कोर्टात महात्मा गांधी प्रथमच वकील म्हणून उभे राहिले होते! टिळक आणि गांधी ह्या दोघा महापुरूषांचा दूरान्वयाने का होईना, माझा संबंध आला ! ह्या कोर्टात असतानाच मी भवन्सच्या जर्नालिझम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वर्ग संध्याकाळी सहा वाजता सुरू व्हायचे. स्मॉल कॉजेस कोर्ट ५ वाजता संपायचे, त्यानंतरच ज्युडिशियल क्लार्कचे खरे ‘काम’ सुरू व्हायचे ! त्या ‘कामा’त मला रस नव्हता. कॉलेजचे प्राचार्य जोसेफ जॉन ह्यांनी मला एकदा भेटायला बोलावले. There is an offer for you! There is an opening in Daily Maratha. If You are interested here is my card, Go and meet Mr. Pai managing director of the paper. शिक्षण पुरे व्हायच्या आत मला मराठात नोकरी मिळत असेल तर मला हवीच होती. मी ’मराठा’त जाऊन पैसाहेबांना भेटलो. ते म्हणाले, तुम्हाला न्यूजडेस्करवर पीटीआय, युएनआयच्या बातम्या कराव्या लागतील. पण तुम्हाला काम येतं की नाही हे पाहण्यासाठी ट्रायलला यावं लागेल. ’माझी तयारी होती. पण ट्रायलसाठी संध्याकाळी कोर्टाचं काम संपल्यावर मी येऊ शकेन. ह्या कामासाठी मला रजा घेणे परवडणार नाही. दुसरं म्हणजे माझं काम तुम्हाला पसंत पडल्यानंतर अपॉईंटमेंट लेटर मिळाल्याखेरीज मला तुमच्याकडे जॉईन होता येणार नाही !’   ‘ऑफकोर्स !’  पैसाहेबांनी वृत्तसंपादक मनोहर पिंगळे ह्यांना बोलावून घेतले. हे श्रीयुत झवर हे आपल्या न्यूजडेस्कवर रोज संध्याकाळी ट्रायलला येतील, असे त्यांनी पिंगळे ह्यांना सांगितले. मी मराठात संध्याकाळी ट्रायल ड्युटीवर जायला सुरूवात केली. बाळाराव सावरकर रात्रपाळीचे मुख्यउपसंपादक होते. ह्यांच्या हाताखाली माझी ट्रायल सुरू झाली. बाळाराव सावरकर  स्वतः ‘सेलेब्रिटी’ होते. स्वातंत्रवीर सावरकरांचे ते खासगी सचिव होते. तात्यारावांनीच त्यांची हिंदू महासभेवर नेमणूक केली होता. तात्याराव गेल्यानंतर ते हिंदु महासभेचे संघटना सचिव झाले. त्यांनी माझ्याकडून भरपूर बातम्या करून घेतल्या. एकदा तर त्यांनी संस्थानिकांचे तनखे हळुहळू कमी होणार ही हेडलाईनची बातमी माझ्याकडून करून घेतली. नेमणूकपत्र मिळण्यापूर्वी हेडलाईनची बातमी लिहणारा मी मुंबईतला एकमेव पत्रकार असेन. सगळ्या चीफ सबनी माझ्याबद्दल अनुकूल मत दिल्याने पिंगळ्यांनी माझ्या नावाची शिफारस पैसाहेबांकडे केली. पैसाहेबांनीही वांककरना माझे नेमणूकपत्र तयार करायला सांगितले. मला म्हणाले, तुमची मुलाखत घेतल्यानंतर अत्रेसाहेब तुमच्या नेमणुकीला संमती देतील. एक महान संपादक माझी मुलाखत घेणार होता. माझी कुठलीही तयारी झालेली नसताना !  त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची ह्या विचारानेच मला धडकी भरली. त्यांच्याबरोबर वरच्या मजल्यावरील साहेबाच्या दालनात प्रवेश केल्यानंतर माझी ओळख करून देत पैसाहेब म्हणाले. हे श्रीयुत झवर. ते इंग्रजीतून मराठी बातम्या उत्तमरीत्या करू शकतात. ’…मी रमेश झवर. नवयुग, रविवारचा मराठा, महाराष्ट्रा टाईम्समध्ये माझे लेख छापून आले आहेत.‘ माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी मला विचारले, तुमचं गाव कुठलं ? ’जळगाव’ ‘ म्हणजे सोपानदेवांच्या जळगावचे ! ‘ ‘हो. अप्पांकडे माझं नेहमी जाणंयेणं असतं .‘ कविवर्य सोपानदेव चौधरींना मी अप्पा ह्या नावानेच हाक मारत असे. ब-याचदा मी त्यांच्याकडे नाशिकला जात असे. कधी कधी त्यांचा मुक्‍काम मुंबईला त्यांचे चिरंजीव मधुसूदन चौधरी ह्यांच्याकडे असे. आचार्य अत्र्यांनी माझ्या नेमणूकपत्रावर सही केली. आम्ही खाली आलो. तोपर्यंत मी कोर्टात राजिनामा दिलेला नव्हता. तुमचे नेमणूकपत्र स्वीकारण्यापूर्वी मला कोर्टात राजिनामा द्यावा लागेल, असे मी पैसाहेबांना सांगताच ते म्हणाले , दॅट इज नो बिग इश्यु ! १ ऑगस्टला मला दोन्हीकडचा जुलै महिन्याचा पगार मिळाला. स्मॉल कॉजेस कोर्टाचा राजिनमा देऊन मी मराठीत १ ऑगस्ट रोजी रीतसर दुपार पाळीत रुजू झालो. अनुवादकौशल्याच्या जोरावरच मला पुढे लोकसत्तेत नोकरी मिळाली. लोकसत्तेत न्यूजडेस्कवर काम करताना माझ्या मनात एक वेगळीच खंत होती. स्वतंत्र लेखन करता येत असूनही न्यूजडेस्कवर मला पाट्या टाकाव्या लागतात. अर्थात महत्त्वाचे लेख भाषान्तर करण्याचे काम र. ना. लाटे आणि विद्याधर गोखले हे दोन्ही साहेब मला अथुनमधून सोपवत.  एकदा गोखल्यांकडे मी तक्रारीच्या सूरात बोललो, हे बरे आहे! भाषान्तर करण्यासाठी तुम्ही मलाच वेठीस धरता अन्‌ लेख लिहण्याची वेळ आली की तुम्ही तो दुस-या कुणाला तरी लिहायला सांगतां ! त्यावर गोखले म्हणाले, तू लेख लिहून आणून दे. मी अवश्य छापीन. बोलल्याप्रमाणे गोखल्यांनी माझे लेख छापले. गोखल्यांनीही माझा लेख कधी नाकारला नाही. महत्त्वाचा लेख अनुवाद करून हवा असल्यास माझ्याशी संपर्क करण्यास न्यूजएडिटर कोकजेंनी मुकुंद आयर्न, सौभाग्य ॲडव्हर्टायझिंग, फायझर, सिप्ला इत्यादि कंपन्यांना सांगितले. त्या कंपन्यांनी माझे नाव त्यांच्या खास डायरीत लिहून ठेवले. सुरूवातीला ते वृत्तसंपादक कोकजेंमार्फत माझ्याशी संपर्क साधत. कोकजेही तो फोन माझ्या हातात देत. नंतर नंतर ते मला परस्पर संपर्क करू लागले. मूळ लेखनाला जितका पैसा मिळतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा अनुवाद वा भाषान्तर करणा-याला मिळतो ह्याचा मला अनुभव‍ आला. साप्‍ताहिक गावकरी, सोबत, हंस, मोहिनी, पैंजण इत्यादि नियतकालिकात केलेल्या लेखनाचे मला अत्यल्प मानधन मिळाले होते. बेकारीच्या काळात सोबचे मानधन मिळण्यासाठी मी ग. वा. बेहरेंना पत्र लिहले. त्यांनी ३५ रुपयांचा चेक पाठवला. सोबत पत्रही पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहले होते, ’प्रतिष्‍ठित झाल्यावर तुम्हाला मानधन पाठवणार होतो. परंतु तुमची अडचण ओळखून ३५ रुपये पाठवत आहे.’ पुस्तकांचा अनुवाद करण्याचा विचार माझ्या डोक्यात आला नाही असे नाही.  परंतु प्रकाशकांच्या वाटेला जायचे नाही असे मी आधीच ठरवून टाकले होते. ह्या संदर्भात मला सविता दामले ह्यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. रमा नाडगौडा ह्यांचेही मला कौतुक आहे. घरातली कामे सांभाळून त्यांनी तीन पुस्तकांचे अनुवाद केले. त्या अनुवादाची पुस्तकेही निघाली. सविता दामले ह्यांनी इंदिरा गांधी, सोनियाजी आदींच्या चरित्राचा उत्तम अनुवाद केला आहे. पाश्चात्य पुस्तकांच्या अनुवादाच्या बाबतीत त्यांचे नाव मोठे आहे. हिंदी, गुजराती, कन्‍नड ह्या भाषात मराठी पुस्तके भाषान्तरित झाली पाहिजे असे मला नेहमी वाटत आले आहे. अर्थात ह्यात अडचणी आहेत ह्याची मला जाणीव आहे.  जोपर्यंत भरघोस मानधनाचे आश्वासन मिळत नाही किंवा वेळप्रसंगी ॲडव्हान्स मिळत नाही तोपर्यंत अनुवाद करण्याच्या कामाला कोणालाही हुरूप येणार नाही असे मला वाटते. रमेश झवर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!