अजूनही जिवंत आहेत रोमन साम्राज्यातील राजप्रवृत्ती!

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

काही माणसं अधुरी असतात, त्यांची पात्रता एक असते आणि भलतेच काम ते करत राहतात. त्यांच्या आवडत्या प्रांतात त्यांना स्पेस लाभत नाही, त्याहीपलीकडे जाऊन काहींच्या वाट्याला अधिकचे भोग येतात. त्यांच्या नावावर अशा काही विलक्षण नकोशा गॊष्टींची नोंद होते ज्यात त्यांचा महत्वाचा रोल नसतो! रोमन सम्राट टायबिरिअस हा अशांचा शिरोमणी ठरावा. पराक्रमी रोमन सम्राट ऑगस्ट्स आणि विकृत रोमन सम्राट कॅलिगुला या दोघांच्या मधला कार्यकाळ टायबिरिअसच्या वाट्याला आला.महान रोमन सेनापतींपैकी तो एक होता; त्याने पॅनोनिया, डॅलमॅटिया, रेसिया आणि जर्मेनियाचा काही भाग जिंकून  उत्तर सीमेचा पाया घातला. तरीसुद्धा तो गुप्ततेकडे कल असणारा, एकांतप्रिय आणि उदास शासक म्हणून स्मरणात ठेवला गेला. वास्तवात त्याला सम्राट होण्याची खरोखर इच्छा नव्हती; प्लिनी द एल्डरने त्याला "पुरुषांमधील सर्वात हताश राज्यकर्ता" असं म्हटलेय, इतकी हताशा त्याच्या ठायी होती. विशेष बाब म्हणजे रोमन साम्राज्यातील सर्वाधिक शक्तिशाली नि प्रभावी समजल्या गेलेल्या ऑगस्ट्स याचा तो वारसदार होता.त्या काळात देखील सामान्य लोकांना मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून शासनकर्ते त्यांना आपल्या बाजूने अनुकूल करून घेण्यासाठी प्रसंगानुसार मोफत धान्य वाटण्याचे ठराव संमत करून घेत. इसवीसन पूर्व पहिल्या शतकात यासंबंधी जणू सामान्य नियमच झाले होते. त्यावेळी खुद्द रोममध्ये धान्य स्वीकारणारे सुमारे तीन लक्ष भिक्षेकरी होते. यावरून लक्षात यावे की लोकांनी आपल्या बाजूने राहावे म्हणून मोफत धान्य वाटण्याचे खूळ किती जुने आहे! असो! ऑगस्ट्सला यातील अनिष्टपणा समजत होता, पण लोकप्रियतेसाठी धान्य वाटण्याची ही पद्धत त्याने तशीच चालू ठेवली. एवढेच नव्हे तर गोरगरिबांना तो पैसेही वाटत असे. याशिवाय लोकांनी राजकारणात फारसे लक्ष घालू नये. म्हणून त्याने सार्वजनिक सामने व खेळ यांना उत्तेजन दिले. या सुमारास रोममध्ये ‘ॲक्टियन गेम्स’ नावाचे सामने दर चार वर्षांनी भरत असत. या खेळांतील द्वंद्वयुद्धात पराभव पावलेल्यांना ठार मारण्याची क्रूर प्रथा मात्र ऑगस्ट्सने बंद केली. गुलामांची स्थिती सुधारण्यासाठी त्याने काही कायदे केले परंतु प्रत्यक्षात त्यांची पुढे अंमलबजावणी झाली नाही. तत्कालीन साहित्यात एकाही लेखकाने या क्रूर चालीसंबंधी निषेध अथवा सहानुभूती व्यक्त केलेली आढळत नाही एवढी ही प्रथा त्यावेळच्या समाजात हाडीमासी खिळली होती.सम्राट ऑगस्ट्स याला मुलगा नव्हता. आपल्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यात आपल्या वारसावरून यादवी माजू नये टायबिरिअसम्हणून ऑगस्ट्सने आपल्या हयातीत आपला अनौरस पुत्र टायबिरिअस याला दत्तक घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे ऑगस्ट्सने टायबिरिअसला आपल्या शासनात सहसम्राट म्हणून सामावून घेतले आणि त्याला प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच ऑगस्ट्सच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे टायबिअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सिनेटसभेनेही त्याला मान्यता दिली.टायबिरिअसने राजेशाही थाट कमी करून सिनेटसभेचे काही अधिकार वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कारकिर्दीतली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रवर्तक येशू ख्रिस्त याला विद्रोहाच्या आरोपाखाली रोमन अधिपत्याखालील पॅलेस्टाईन या भूप्रदेशात क्रॉसवर ठोकून मारण्यात आले. वास्तवात हा निर्णय त्याचा एकट्याचा कधीच नव्हता. तरीही तो राजा असल्याने याचे उत्तरदायित्व इतिहासाने त्याच्याच कालखंडावर टाकलेय.त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जेरूसलेम मधील ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील काही सैनिकांनी बंडही केले होते. त्याचा कॅलिगुलापुतण्या व मुख्य सेनापती जरमॅनिकस याला सैन्याने सम्राट करण्याचे आमिष दाखविले आणि फितुरीचे प्रयत्न केले. परंतु टायबिरिअसने त्यालाच दत्तक घेऊन भावी वारस म्हणून घोषित केल्यामुळे सैन्यातील हा अंतर्गत संघर्ष टळला. जरमॅनिकस हा महापराक्रमी योद्धा होता. त्याच्या कारकिर्दीत रोमन साम्राज्याने आपल्या सीमारेखा दूरवर भिडवल्या. टायबिरिअसने त्याला दत्तक घेतले असले तरी त्याच्या मनात जरमॅनिकस विषयी अपार असूया होती, आपण त्याच्या इतके पराक्रमी नाही याचा सल त्याला भयगंडाकडे घेऊन जाई. कधीतरी तोच सम्राट होईल या भीतीने टायबिअरिअसने काही काळानंतर त्याला विषप्रयोग करून ठार मारले! नात्याने तो त्याचा काका असला तरी त्याला भय, असुरक्षिततेने ग्रासले होते. याचे परिणाम त्यापुढच्या काळावर झाले नि साम्राज्यास उतरती कळा लागली. टायबरिअस या सर्व हतबलतेस त्रासला होता, त्याचा एकुलता मुलगा द्रसस सिझर याची हत्या झाली आणि तो खचला. त्याने सम्राटाचे हक्क त्यागले आणि तो ज्याला जरमॅनिकस आपला निष्ठावंत प्रशासक समजत होता त्या सेजानुसच्या हातात त्याने सूत्रे सोपवली. सत्तेत येताच सेजानुसने टायबिरिअसच्या पत्नीची आणि तिच्या अनौरस पुत्राची हत्या केली. त्याचा अधिकारही फार दिवस चालला नाही, अनागोंदीपायी त्याला जेरबंद करून त्याचा वध करण्यात आला. त्याच्या नंतर मॅक्रोनने सूत्रे ताब्यात घेतली आणि टायबिरिअसने दत्तक घेतलेल्या कॅलिगुला याला त्याने रोमन सम्राट घोषित केलं. वास्तवात कॅलिगुलाऐवजी टायबिरिअसचा नातू म्हणजे द्रसस सिझरचा मुलगा जिमेलस याला गादीवर बसवणं अपेक्षित होतं. मात्र सारी सूत्रे आपल्या हाती राहावीत म्हणून सेनापती मॅक्रोनने कॅलिगुला याला सम्राट घोषित केले. याच कॅलिगुलाने पुढे जाऊन जिमेलसचा खून करवला तसेच मॅक्रोनला आत्महत्या करायला भाग पाडले.रोमन साम्राज्यातील सर्वात क्रूर नि विकृत लिंगपिसाट राजा म्हणून इतिहासात कॅलिगुलाचे नाव नोंदले गेलेय. प्रिटोरियन सैनिकांच्या मदतीने राज्यपदी आल्यापासून त्याला मारण्याचे कट रोमन सरदारांमध्ये सुरू झाले होते.इतिहासात तो अत्यंत क्रुर, निष्ठुर, उधळ्या आणि माथेफिरू असल्याची नोंद आहे. एका वदंतेनुसार त्याने चक्क आपल्या घोड्याला रोमन सेनेटचा अधिकारी म्हणून नेमले होते! कॅलिगुला स्वतःला देव मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच ज्यूंनी आपल्या पुतळ्याची सिनेगॉगमधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकाऱ्यांनी त्याचा खून करून क्लॉडिअस या वृद्ध अधिकाऱ्यास सम्राटपदी बसविले. अगदी अल्पकाळ सत्तेत असलेल्या क्लॉडिअसनंतर निरो हा रोमचा सम्राट झाला. रोम जळत असताना फिडल-वादनात मग्न असणारा ऐशआरामी, बदचलनी नि हव्यासी निष्क्रिय राजा म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतलीय. ऑगस्ट्सच्या वैभवशाली राजवटीची धुरा टायबिरिअसच्या खांदयावर आली आणि रोमन साम्राज्य गर्तेत गेलं. टायबिरिअसने प्रजा आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून प्रजेला अनिष्ट सवयी लावल्या, चुकीची वचने दिली, भोंगळ कल्पनांनी त्याने प्रजेचे मन भारून टाकले. ऑगस्ट्सपेक्षाही स्वतःला ओजस्वी समजणाऱ्या टायबिरिअसच्या हाती राजसूत्रे जाण्याआधी प्रजा सुखात आनंदात होती मात्र प्रत्यक्षात तो सम्राट झाल्यापासून रोमन जनतेस दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागले. कित्येक पिढ्या त्याची शिक्षा भोगावी लागली. एक चुकीचा माणूस चुकीच्या जागी आल्याने पुढचे कित्येक कालखंड अक्षरशः रोमन प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवणारे ठरले!बारकाईने पाहिले तर लक्षात येते की ऑगस्ट्स, टायबिरिअस आणि कॅलिगुला हे कधीच मरण पावले असले तरीही एक प्रवृत्ती बनून जगभरातील शासनकर्त्यांमध्ये ते जिवंत आहेत. त्यांचे व्हर्जन थोडेफार बदलले आहे आणि सिक्वेन्स थोड्याफार फरकाने मागेपुढे होताना दिसतो हाच काय तो फरक! - समीर गायकवाड #sameerbapu #sameergaikwad #history#roman #king #politics #समीर #समीरगायकवाड रोमन साम्राज्याचे अवशेष 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!