अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

अक्षयतृतीया - विशेष मराठी लेख✍ डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल       अक्षयतृतीया या सणाला ग्रामीण भाषेत आकिती असे म्हणतात. पूर्वीच्या आजीबाई म्हणायच्या आकिती दिवशी परसात फळभाज्यांच्या बिया पेरा. आकितीचं आळं आणि बेंदराला फळं. बेंदूर या सणापर्यंत फळं हवी असतील तर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बियांची पेरणी करा. किती छान मंत्र दिलाय पूर्वजांनी आपल्यासाठी !या सणाची नैसर्गिक पार्श्वभूमी:       चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचेच आहेत. या महिन्यातील पौर्णिमेला सायंकाळी विशाखा नक्षत्र क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला आपल्या पूर्वजांनी वैशाख असे नांव दिले. वैशाख महिना अगदीच वेगळा. या महिन्यात सर्वत्र कडक असा रखरखीत उन्हाळा असतो. सगळे वातावरण तापून गेलेले असते. उष्म्याने जीव अगदी नकोसा झालेला असतो. दिवस रात्रीपेक्षा मोठा झालेला असतो.       वसंताच्या कडक उन्हातच निसर्ग देवतेचा एक हिरवा चमत्कार दिसतो. झाडावेलीना सर्वत्र हिरवीकंच कोवळी लुसलुशीत पालवी फुटलेली असते. वातावरणात रानफुलांचा एक मधुर सुगंध दरवळत असतो. हिरव्या गर्द  पानाआड बसून शेपटी खालीवर करत कोकिळा आनंदाने गात असते.या सणामागील पौराणिक कथा:       भगवान श्री परशुराम महापराक्रमी होते. त्यांनी एकवीस वेळा निःक्षत्रिय केली. परशुरामांचा जन्म याच तिथीला अक्षयतृतीयेला झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामांची जयंती साजरी केली जाते. कोकणात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामांचे पावन क्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते.       दुसरी एक फार फार वर्षापूर्वी ची गोष्ट सांगितली जाते. कुशावती नावाचे एक शहर होते. तेथील राजा सदा चैनीत, ऐष आरामात रहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करायचा. प्रजेची त्याला कसलीच काळजी नव्हती. त्याचे अधिकारी प्रजेवर अन्याय करीत, लोकांचा छळ करीत. त्या राजाने या अन्यायाची कधीच दखल घेतली नाही. अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करणार कोण? सर्वजण धास्तावले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी रहात होते. राजाला या तपस्व्याबद्दल नितांत आदर वाटत होता. लोकांना युक्ती सुचली. लोक त्या तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख तपस्वी ऋषीना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला झाली. त्यांनी ऋषींचे पाय धरले आणि प्रजेला सुखी करण्याचे वचन दिले. ऋषींनी राजाला कल्पना दिली की की, "हे राजा, तू पूर्वी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षयतृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पुर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील!" ऋषींच्या या खड्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर राजाने अन्नदान केले. जलकुंभ दान केले. लोक संतुष्ट झाले. प्रजा सुखी झाली. तेंव्हापासून लोक भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी गार पाण्याचे माठ, रांजण भरून ठेवतात. कडक उन्हात वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या वाठसरूचा जीव कासावीस होतो. अशावेळी हे व्याकुळ जीव थंडगार पाण्याने शांत होतात. आजही ठिकठिकाणी यादिवशी अनेकजण अन्नदान करतात. पाणपोई सुरु करतात.सण कसा साजरा करतात:       या दिवशी अनेक लोक ज्ञानी, शास्त्री पंडीतांना घरी बोलावून गोडधोड, उत्तम भोजन देतात. दानधर्म करतात. अशा ज्ञानी लोकांमुळेच समाजाचे पाऊल पुढे पडते. आपण जे शक्य असेल ते दान द्यायचे. पाण्याने भरलेला कुंभ द्यायचा. अशा या दानाची अक्षय म्हणजेच अखंड आठवण रहाते असे मानले जाते. दान करणाऱ्यास सुखसमृद्धी लाभते अशी आपली परंपरा आहे.       अक्षयतृतीयेला वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपणास जे शक्य आहे असे एखादे पुण्यकर्म करावे. समाजातील गोरगरीब, पददलित, उपेक्षित यांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. त्यामुळे समता निर्माण होऊन बंधुभाव आणि ऐक्य वाढण्यास मदत होते.       अक्षयतृतीयेच्या दिवशी अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान केले जाते. सुवासिनी इष्ट मैत्रिणींना बोलावून, हळदीकुंकू व सौभाग्य अलंकाराची देवाण-घेवाण करतात. सौभाग्य दान म्हणून चूडे बांगड्या देतात. त्याबरोबर थंडपेये देऊन संतुष्ट करतात अक्षयतृतीयेला केलेले दान, सत्कृत्य अखंड टिकणारे असते म्हणून दान द्या. सत्कार्य करा. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..।
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!