in

‘सोशल’ आक्रोशाचा दांभिकपणा!

या दहा दिवसांत आपल्याकडे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या डझनभर घटना समोर आल्यात. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसताहेत. अर्थातच सोशल मीडियावर याचा आक्रोश अधिक जाणवतोय! आक्रोशाची ही पहिलीच वेळ नाहीये, तरीही निव्वळ गदारोळ उठलाय! वास्तवात आपल्याकडे तासाला चार आणि वर्षभरात बत्तीस हजार बलात्कार होतात. दर तासाला किमान पन्नास महिलांना मारहाण केली जाते. बलात्कारांच्या नव्वद टक्के प्रकरणातील आरोपी हे पीडितेच्या परिचयाचे असतात. बलात्काराच्या काही मोजक्याच घटनांना मुबलक प्रसिद्धी मिळते, अशा घटनांची चर्चा वाढू लागली की त्याविरोधात आक्रोश केला की लोकांना कर्तव्यपूर्तीचा ऑर्गझम प्राप्त होतो. पोलिसांना नवी केस मिळते, राजकारणी मंडळींना नवा इश्यू मिळतो, सोशल मीडियावरील लाटेस नवा विषय मिळतो, मीडियाला टीआरपीसाठी नवं हत्यार गवसतं! या सर्वातला जोश निघून गेला की आपण थंड पडतो. माध्यमेही हळूहळू आपला फोकस नव्या हत्यारावर वळवतात, राजकारणी नवे इश्यू शोधू लागतात, पोलिसांना केसेसची कधीच कमी नसते नि आपण आपल्या रोजमर्राच्या बधीर जिंदगीत व्यग्र होऊन जातो! दरम्यान रोज होत असणारे बलात्कार अव्याहत सुरूच असतात. ओरबाडले जाणारे जीव, शापित जीवन जगत राहतात!

पुन्हा कधी तरी एखाद्या रेपच्या घटनेस अफाट प्रसिद्धी मिळते, आपण पुन्हा बाह्या सरसावून व्यक्त होऊ लागतो! ‘बरे झाले मुलगी नाही’, ‘मायबापहो आपल्या मुलांना वळणं लावा’, ‘मुली जन्माला आल्या म्हणजे घोर लागला’ अशी रुटीन स्टेटमेंट्स करू लागतो. याची पुढची पायरी म्हणजे सोशल मीडियावरचा सर्वांचा आवडता ‘हाणा-मारा’चा उद्घोष सुरु होतो! आरोपीचे हातपाय कापा, जाहीर रित्या फासावर द्या, तुकडे तुकडे केले पाहिजेत! जो तो आपापल्या परीने शिक्षा सुनावू लागतो! रकानेच्या रकाने माहिती प्रकाशित होऊ लागते! घरोघरच्या मेणबत्त्यांवरची धूळ निघून पडते! मोर्चे निघतात, आन्दोलने होतात! हळूहळू हा आक्रोशही थंड्या बस्त्यात जातो! हे सोंगही सरते! फास्ट ट्रॅकचं गाजर घेऊन आपण निपचित राहतो! खरं सांगायचं झालं तर अत्यंत संवेदनशील अशा बलात्कारांचे आपण हाडूक केलंय! एक चघळून झालं की काही कालावधीने आपण दुसरं हाडूक हाती घेतो! आपल्याला त्याची जराशीही शरम वाटेनाशी झालीय कारण आपण नाकर्ते झालो आहोत. आपली संवेदनशीलता तात्कालिक असते! अपवाद वगळता कुणीच मुद्द्यांवर बोलत नाही. नि तसं बोललं गेलं तरी त्याचा फॉलोअप कोण घेणार? त्यांचा अंमल कसा करणार हे प्रश्न अनुत्तरित राहतात.

कोलकता बलात्कार घटनेतील आरोपी घटनेच्या काही तास आधी रेडलाइट एरियातील वेश्येकडे गेला होता नि त्याने तिच्याकडे अनैसर्गिक शरीरसुखाची, फोटोंची मागणी केली होती असं तपासात पुढं आलंय! केवळ कोलकत्यात नव्हे तर आपल्या पुणे, पनवेल, नागपूर, मुंबई, वाशी, मिरज, अमरावती या शहरातदेखील चाइल्ड प्रॉस्टिट्यूशन चालतं. या मुलींकडे येणारे विकृतच असतात. अशांची केस हिस्ट्री पोलिस गोळा करू शकत नाहीत कारण या धंद्याला कुणाचा तरी वरदहस्त असतो. या वस्त्यामधल्या बायकांना पोलिस खबरी म्हणून वापरू शकत नाहीत, पोलिसांचे जुन्या पद्धतीचे खबरी संपुष्टात आलेत. वृत्तवाहिन्या केवळ क्लिक बाईट्सच्या भुकेल्या झाल्या आहेत. सत्य आपल्यापर्यंत पोहोचणार तरी कसे? मुळात फेक फॉरवर्ड करण्याच्या घमासान चढाओढीत आपल्याला तरी सत्याची चाड आहे का? केवळ व्यवस्थेला नि राजकीय पक्षांना शिव्या घालून चालणार नाही, आपणच ते लादून घेतलेलं आहे याचं भान असलंच पाहिजे, जे सोशल मीडियात अभावानेच दिसतं!

बदलापूर घटनेतील मुलींवर ज्या सराईतपणे अत्याचार केले आहेत ते पाहू जाता हे स्पष्ट आहे की या चिमुरडया मुली आरोपीच्या पहिल्या शिकार नसाव्यात. अशा गुन्ह्यातील आरोपींनी बहुतेक करून त्यांच्या वर्तुळात असे प्रकार आधीही केलेले असतात. मात्र पीडित मुली किंवा त्यांचे पालक मौन राहतात. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला आहे याची वाच्यता न करण्याकडे अनेकांचा कल असतो! बदनामीची भीती असते! लोक आज सपोर्ट करतील, पुढच्या काळात त्या पोरीचं कसं होईल याची चिंता त्यांना खात असते! पालकांच्या मर्जीशिवाय अल्पवयीन मुलींना बोलतं करण्याचं धाडस आपला समाज त्यांना बहाल करेल का? निव्वळ बोलतं करून न थांबता त्या मुलींचे भविष्यातील संगोपन करण्याची एखादी यंत्रणा असली पाहिजे असं व्यवस्थेला का वाटू नये? आपण यासाठी कधी बोलणार आहोत? केवळ दोन दिवसांचा संताप व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही! नगर रस्त्यावर गत दशकांत जे दरोडे घातले गेले त्यातला एक दरोडा एका प्रथितयश डॉक्टरांच्या कुटुंबावरचा दरोडा होता. या गुन्ह्यात डॉक्टरांच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार झाला होता. बदनामीला भिऊन त्यांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला नाही. मात्र याची दबक्या आवाजात चर्चा झालीच! काही वर्षांनी त्या डॉक्टरांनी पत्नीला घटस्फोट दिला. दुसरं लग्न केलं. कोविडपूर्व काळात त्या अभागी स्त्रीचे एकाकी अवस्थेत निधन झाले. ही घटना काय सांगते? ज्या स्त्रीवर अत्याचार होतो तिला त्याविरोधात बोलण्याचे साधे बळदेखील आपण देऊ शकत नाही. आपलं अधःपतन इतकं झालंय की आपण सतत मुलींना, स्त्रियांना दोष देत असतो! बदलापूर घटनेतील मुलींच्या वयोगटातील मुलींवर कोणती बंधने समाज घालू इच्छितो हे देखील समोर आलं पाहिजे! पुरुषप्रधान विचारसरणीचे बळी हे पालुपद आळवण्यापेक्षा त्याला विरोध करणाऱ्या मंडळींना आपण पाठिंबा न देता जे लोक स्त्रियांवर बंधने लादू इच्छितात त्यांची कड घेण्याकडे समाजाचा बहुतांश कल असतो! हे आपलं कडवं वास्तव आहे! यावर सोशल मीडियावरचे आक्रोश करणारे भामट्यागत गप्प राहतात हे कशाचे द्योतक आहे?

आपल्याकडे बलात्कारविरोधात कुणी आक्रोश करायचा याची एक छुपी वर्गवारी प्रचलित आहे! डॉक्टरवर अत्याचार झाला की सारे डॉक्टर पेटून उठतात, मात्र एखाद्या डॉक्टरकडून वा एखाद्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय / अवैद्यकीय कर्मचाऱ्याकडून बलात्कार झाला तर डॉक्टर मंडळी इतकी संतापत नाहीत ही फॅक्ट आहे! हीच बाब वकील, शिक्षक यांनाही लागू होते! ज्या ज्या पेशांचे संघटन आहे त्या त्या पेशामधली मंडळी आपल्या समदुःखी जिवासाठी आक्रोश करतात. मात्र आपल्या पेशाबाहेरची पीडिता असली की त्यांच्या आक्रोशाची धार् कमी होते हे वास्तव आहे! हेच सूत्र जात, धर्म, विचारधारा, भाषा, प्रांत आदी अस्मिताजंतूवाही गुणलक्षणांमध्ये अधिक आढळते! पीडिता आपल्या जातीची, विचारांची, धर्माची, भाषेची, प्रांताची असली की तिच्या जातीचे, विचारांचे, धर्माचे, भाषेचे, प्रांताचे लोक अधिक आक्रोश करतात हे नितळ स्पष्ट दिसते! आपल्या नावडत्या गुणलक्षणांचा आरोपी आहे हे लक्षात येताच काही ठराविक लोकांचा आक्रोश टिपेस पोहोचतो आणि आरोपी आपल्या आवडत्या गुणलक्षणांनी युक्त असला की अशांची दातखिळ बसते! हा शुद्ध नालायकपणा आहे असे सोशल मीडिया युजर्सना वाटत नाही हे दुःखद आहे!


शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश असला पाहिजे. त्या वयातच स्त्री देह आणि पुरुष देह यांची नेटकी ओळख नि दृष्टिकोन असला पाहिजे या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल असले पाहिजेत. कामेच्छा तीव्र असणाऱ्या पुरुषांना त्याचं शमन कसं केलं पाहिजे याचं मुक्त समुपदेशन उपलब्ध असावं. पॉर्नसाठीचे स्पष्ट नि परखड धोरण असलं पाहिजे; अमेरिका हा व्यक्तिस्वातंत्र्याचा सर्वाधिक डंका वाजवणारा देश. तिथे टेक्साससह अरकन्सास, मिसिसिपी, युटा आणि व्हर्जिनियनंही 2023 मध्ये पॉर्न वेबसाइटच्या वापरासाठी वयाची पडताळणी करणं अनिवार्य केलं आहे. नॉर्थ कॅरोलिना आणि मोन्टानानं 2024 च्या सुरुवातीला हा कायदा लागू केला. गेल्या काही आठवड्यांत आइडहौ, कन्सास, केंटकी आणि नेब्रास्कामध्येही या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. विशेष मुद्दा म्हणजे अमेरिकेत ज्या राज्यांमध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला आहे, त्याठिकाणच्या यूझर्सना जगातल्या सर्वात मोठ्या पॉर्न साईटचा लौकिक असणाऱ्या ‘पॉर्नहब’नं ब्लॉक केलंय!

पॉर्न पाहून उद्दीपित झालेल्या भावनांचे शमन कसे करायचे हे ठाऊक नसलेला पुरुष एखाद्या अधाशी शिकाऱ्यासारखा सावजाच्या शोधात वावरतो. विकृत वासनांध लोक समाजाला सहजी शोधता येणार नाहीत मात्र त्या व्यक्तीच्या परिचयातील लोक त्यांना नेमके ओळखत असतात. अशांना तपशीलवार माहिती देता यावी म्हणून एखादी हेल्पलाईन असली पाहिजे! कोलकत्यातील आरोपी पॉर्नच्या आहारी गेला होता. त्याच्या पूर्वपत्नी आणि शेजारी त्याच्या विकृतीविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात, हीच माहिती आधी कळली असती तर!

बलात्कारी लोकांना समाज जी ग्रेस बहाल करताना दिसतो ते धक्कादायक आहे! उदा. बाबा गुरमीत राम रहीम याला खरे तर कठोर शिक्षा सुनावली असूनही तो जेलइतकाच बाहेर आराम करताना दिसतो! आपल्या आवडत्या विचारधारेच्या लोकांनी बलात्कार केला तरी त्यांना आपण हारतुरे घालून गौरवतो हे कशाचे द्योतक आहे हे एकदा मनाशी विचारलं पाहिजे!

वेगवेगळे सामाजिक, धार्मिक, राजकीय वरदहस्त असणारे लिंगपिसाट लोक राजरोसपणे आपला कार्यभाग साधत असतात. पोलिसांना याची माहिती असते मात्र त्यांना विशेषाधिकार नसल्याने ते केवळ बघे म्हणून पाहत राहतात! बदलापूर घटनेतील शुभदा शितोळे या महिला पोलीस अधिकाऱ्यास कुणी सवाल केला आहे का, की मॅडम तुम्ही गुन्हा दाखल करण्यास बारा तास टाळाटाळ का केली होती? अशा गोष्टींचा तपास व्हायला लागला की पोलिसांच्या कारभारातील छुपा हस्तक्षेप काही प्रमाणात तरी घटेल!

आपल्या कुटुंबात आपण कधी खुलेपणाने लैंगिक विषयांवर चर्चा करतो का? घरी वयात आलेला मुलगा असेल तर त्याच्या सेक्सविषयक जाणिवा आपण जाणून घेतो आहोंत का? विजातीय लिंगी देहाचे आकर्षण एका विशिष्ट वयात अधिक असते त्याच काळात त्याविषयी कमी बोललं जातं याचा दोष कुणाचा? शाळकरी मुला-मुलींना जीएफ बीएफ नसेल तर वर्गातली मुलंमुली त्यांची चेष्टा करतात! तुझं उठत नाही का म्हणून हिणवतात हे वास्तव आहे! त्यांच्याशी या विषयावर कोण बोलणार आहे? मुलगा मुलगी आवडणे म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगता आला पाहिजे!
तरुण आणि प्रौढ यांच्या कामेच्छांइतकाच बिकट प्रश्न वाढत्या वयाच्या पुरुषांचा आहे हे आपण मान्य करणार आहोत की नाही? नजरेने बायकांना छेडणारे नग आपल्याकडे गल्लोगल्ली दिसतात, हे कुणाचे तरी भाऊ बाप मुलगाच असतील ना! मग त्याची जबाबदारी कोण घेणार?

आपल्याला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाहीये, कोणतेही नवे स्पष्ट धोरण आखले जावे म्हणून आपण आग्रही नाही, आपल्या बुरसट जुनाट शिक्षण पद्धतीत काही बेसिक बदल केले जावेत म्हणून आपली व्यवस्था पेटून उठत नाही. आपण फक्त दर मौसमात नवे हाडूक चघळत बसतो!

वास्तवात आपल्याला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाहीये, कोणतेही नवे स्पष्ट धोरण आखले जावे म्हणून आपण आग्रही नाही, आपल्या बुरसट जुनाट शिक्षण पद्धतीत काही बेसिक बदल केले जावेत म्हणून आपली व्यवस्था पेटून उठत नाही. आपण फक्त दर मौसमात नवे हाडूक चघळत बसतो! स्त्रीच्या कामेच्छा, देहभावना, तृप्तता याविषयी एक चकार शब्दही आपण उच्चारत नाही कारण तो मुद्दा आपल्या गावीदेखील नसतो! आपण अव्वल दर्जाचे ‘सोशल’ दांभिक आहोत हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख स्पष्ट आहे!

– समीर गायकवाड 


पूर्वप्रसिद्धी – दैनिक नवशक्ति दि. 25/08/2024      

Read More 

What do you think?

27 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

“यंदा दुर्गा मूर्तीसाठी आम्ही माती देणार नाही!… “

बारा गावचं संचित (कथासंग्रह) – पुस्तक परीक्षण