सर्व उत्तम कवी आणि कवितांची माफी मागून. व्हायरल कविता कशी तयार होते त्याचा एक गमतीदार प्रयत्न
एक व्हायरल कविता
एक दिवस मला आल्या शिंका
मग मी टाकल्या पिंका
त्या तुषारकणांना दिली शब्दांची जोडणी
वरुन दिली दारुच्या विनोदाची फोडणी
मग आली बायकोची आठवण
माझं वेड आणि तिचं शहाणपण
अहो तेच किस्से आणि त्याच टवाळ्या
पण जोरात ऐकू आल्या हं, हशा आणि टाळ्या
म्हटलं चला रानावनात जाऊ
थोडी प्रेमाची गाणी गाऊ
वाटेत भेटला पाऊस, भरला थोडासा खिशात
प्रेम वगैरे म्हटले की तोच बिचारा येतो कामात
मग अचानक मला आली जगाची कीव
अरे मला देखील आहे सामाजिक जाणीव
घातल्या शिव्या व्यवस्थेला केला जनतेचा कैवार
खरडल्या ओळी, झिजवले शब्द, पेटवला अंगार
लावली आग, दाखवला मनाचा भडका
वरुन दिला गरीबी लाचारीचा तडका
शेवटी ओढून ताणून कसतरी आणलं अध्यात्म
इश्वराचे नांव घेऊन सांगितलं जगात सारं असे क्षम्य
इतकं सारं झाल्यावर पुढे काय आता
वाचून बघितले तर ही जवळ जवळ कविता
मग केली शब्दांची चिरफाड आणि जुळवून आणले यमक
अर्थाचे काय घेऊन बसलात यमक हेच व्हायरल चे गमक
आणि बघता बघता चक्क कविता तयार झाली
तुमच्या आशीर्वादाने लगेच व्हायरल देखील झाली
१३ – ४ – २०२५
GIPHY App Key not set. Please check settings