व्यथा पावसाची – मराठी कविता
✍️ डॉ. ज्युबेदा तांबोळी
फोटो साभार:गूगल
पाऊस माझ्या स्वप्नी आला
व्यथा त्याची सांगतो म्हणाला।
तू तर आमचा जीवनदाता
ऐकेन आनंदे तुझी व्यथा।
नांवे मला सर्वजण ठेवतात
बरसलो जोरात विध्वंसक म्हणतात।
नाही आलो तर निर्दयी संबोधतात
आलो मध्येच अवकाळी बोलतात।
आलो हळूहळू पीरपीर म्हणतात
बनलाय लहरी सगळे चिडवतात।
तुम्हीच मजला लहरी केलं
बोलून घ्यायचं नशिबी आलं।
नद्या अडवल्या, जंगलतोड केली
सिमेंटची जंगले तुम्हीच बनवली।
डोंगर पोखरून सपाट केले
तलाव नाले बुजवून टाकले।
ओझोनचं आवरण झालं लीक
ग्लोबल वार्मिंगचं फोफावलं पीक।
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली
भरपूर वाफ वर येऊ लागली।
नाईलाजाने मी बरसू लागतो
नद्यांना मग महापूर येतो।
सगळे ठेवतात मलाच नांवे
माझे दुःख मलाच ठावे ।
खरं आहे मी म्हणाले पावसाला
प्लीज तुझी व्यथा ठेव बाजूला।
आता थोडं थांबून वाचव आम्हाला ।
GIPHY App Key not set. Please check settings