..लुईची रवानगी गिलोटीनच्या वधस्थळावर झाली आणि मारी ॲन्टोनेट घाबरली, पण तिला अजूनही आशा वाटत होती, की तिला फार तर देशाबाहेर हाकलतील, तिचा शिरच्छेद करणार नाहीत.
पुढे..
अर्थात असे काही झाले नाही, तिच्या लहान मुलाला तिच्यापासून हिरावून घेण्यात आले आणि शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला सुरुवातीस बरी वागणूक मिळाली, पण लुईच्या वधानंतर तो दुफां झाल्यामुळे क्रांतिकारकांना त्याचीही अडचण होऊ लागली. त्याच्या आजाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले आणि मारी ॲन्टोनेटच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आत आजारात त्याचा मृत्यूही झाला. म्हणजे अधिकृत सरकारी अहवालात असे लिहिले आहे म्हणून ते खरे मानायचे. काही लोकांनी त्याचा खून करण्यात आला अशी शंकाही व्यक्त केली आहे. मुलगा आजारी पडल्यावर ॲन्टोनेट दुःखाने वेडीपिशी झाली. तिला सोडवण्याचे प्रयत्न झाले, पण ते असफल झाले. दातोंने तर ऑस्ट्रियाशी बोलणी करताना तिला वाचवण्याचा प्रयत्नही करण्याचे ठरवले होते, पण दुर्दैवाने ऑस्ट्रियाने तिला दगा दिला, कारण या राज्यक्रांतीत तिचा बळी गेला असता, तर युरोपमध्ये फ्रान्सविरुद्ध वातावरण तापले असते जे ऑस्ट्रियाला पाहिजे होते. तिला नंतर कॉनसिएरजेरी नावाच्या तुरुंगात आणण्यात आले. तेथे तिची आणि मादाम एलिझाबेथ आणि तिच्या मुलीची ताटातूट करण्यात आली. तिच्यावर दिवसरात्र देखरेख ठेवण्यासाठी दोन पहारेकरी आणि एका मोलकरीणीची व्यवस्था करण्यात आली. ती या तुरुंगात सकाळी आपल्या कपड्यालत्त्यात वेळ काढायची आणि उरलेला दिवस आठणींवर काढायची. तिला भरपूर अन्न आणि कपडे पुरवण्यात येत होते. तिच्यावर सतत पहारा असे त्यामुळे ती चिडचिडी झाली. तिची तब्येत ढासळली. दिवसेंदिवस ती निराश दिसू लागली. ती कुठेतरी नजर लाऊन शांत बसत असे. पत्ते खेळणाऱ्या पहारेकऱ्यांकडे पाहताना बिचारीच्या शरिराला भीतीने कंप सुटत असे, किंवा क्वचित ती काहीतरी वाचत बसे. कधी कधी तिची पहारेकरीण तिच्या मुलाला घेऊन येई, तेव्हा मात्र ती निराशेतून थोडावेळा का होईना बाहेर पडत असे आणि त्या मुलाबरोबर खेळत बसे. त्या मुलाला पाहताच तिला दुफांची आठवण येत असे आणि मग ती त्याच्याबद्दल बोलत बसे. मुलाला घेऊन आल्यावर ॲन्टोनेटला दुःखच जास्त होत आहेत हे पाहिल्यावर मात्र तिने त्या मुलाला सोबत आणणे बंद केले.
जेव्हा उर्वरित युरोपच्या फौजा जवळ येऊ लागल्या तसे राणीच्या खटल्याची मागणी जोर धरू लागली. कैद झालेल्या फ्रान्सच्या दुतांना ऑस्ट्रियाने जी अमानुष वागणून दिली त्याला उत्तर म्हणून अशी मागणी केली गेली असावी असे मानण्यास जागा आहे. कॅपेटचा मृत्यू संसदेमुळे झाला आणि त्याच्या विधवेचा मृत्यू पॅरिस, न्यायालय आणि क्रांतिकारकांच्या सैन्यामुळे होऊ देत असे जनता म्हणू लागली. हेबरने जनतेला मारी ॲन्टोनेट जिवंत राहणार नाही असे वचन दिले होते आणि ते वचन पाळण्यास उशीर होत असेल तर तो स्वतः जाऊन तिला मृत्युदंड देईल असे त्याने जाहीरपणे सांगितले होते. याशिवाय सीमेवरील युद्धाच्या भयंकर बातम्या जशा फ्रान्समध्ये पोहोचू लागल्या तसे जनता राणीचा अधिकच द्वेष करू लागली. शेवटी ऑक्टोबर महिन्यात एके रात्री तिला कुठल्यातरी बोळातून एका मोठ्या दालनात नेण्यात आले. एवढ्या मोठ्या दालनात फक्त दोन मेणबत्त्या तेवत मंद प्रकाश फेकत होत्या. त्या भयाण वातावरणात तिची उलटतपासणी सुरू झाली. तिने सगळ्या आरोपांचा इन्कार केला आणि सांगितले, की तिने नेहमीच फ्रान्सचे हीत चिंतले आहे. पण तिच्या दुःखाने तिचे धैर्य झाकाळून टाकले होते हे स्पष्ट दिसत होते. तिने कागदपत्रांवर ‘‘विडो कॅपेट’’ (लुईची विधवा) अशी सही केली. त्याच वेळी, तिला पाहिजे असेल तर ती वकील देऊ शकते असे सांगण्यात आले. ते ऐकून ती परत तिच्या कोठडीत परतली.
जेव्हा बर्क (बर्क इंग्लंडच्या संसदेचा दीर्घकाळ सदस्य होता – १७६६ ते १७९४. तो संसदपटू होता, लेखक होता आणि तत्त्वज्ञानीही होता. त्याने ‘‘रिफ्लेक्शन्स ऑन द फ्रेंच रेव्होल्युशन’’ या नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला) काही वर्षापूर्वी व्हर्सायला गेला होता तेव्हा त्याने सजलेल्या धजलेल्या मारी ॲन्टोनेटला पाहिले होते. ‘‘तिच्या चित्तवृती प्रफुल्लीत होत्या..पहाटेच्या ताऱ्याप्रमाणे ती चमकत होती. रसरसलेली, सुंदर आणि आनंदी दिसणारी मारी ॲन्टोनेट मी विसरू शकत नाही.’’ फ्रान्स आता तिला विसरला होता. तिच्या जनतेला त्यांच्याच राणीवर आता खटला चालवायचा होता आणि तिला ठार मारायचे होते. दुःखाने वेडीपिशी झालेली ॲन्टोनेट आता मानसिक दृष्ट्या खचली. ती त्या तथाकथित खटल्याला निर्विकारपणे आणि त्रयस्थपणे सामोरी गेली. ही चौकशी सकाळी आठ वाजता सुरू व्हायची ते दुपारी चार पर्यंत चालायची. मग परत पाचला सुरू व्हायची ती पार मध्यरात्रीपर्यंत चालायची. या खटल्यादरम्यान ती तिच्या खुर्चीत बसून, न्यायाधिशांकडे पाहात, स्तब्ध बसत असे. तिच्यावर उधळपट्टी, (ज्याने फ्रान्सवर दिवाळखोरीची वेळ आणली), फ्रान्सविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युरोपला पैसे पाठवणे, ऑस्ट्रियाबरोबर कट कारस्थाने करत तिच्या नवऱ्याला स्वतःच्या देशाविरुद्ध कारवाया करण्यास भाग पाडणे असे आरोप ठेवण्यात आले. दुर्दैवाने यातील बहुतेक आरोप खरे होते. राणीने अर्थातच हे सगळे आरोप तिला अमान्य आहेत हेच नम्रपणे सांगितले. सहानुभूती राणीच्या बाजूने वळते आहे असे दिसताच, त्या प्रसंगात हेबरने प्रवेश केला. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ॲन्टोनेटच्या मुलाकडून दहशतीखाली काही वाट्टेल ते वदवून घेतले होते. त्याचा उपयोग करून त्याने ॲन्टोनेटवर स्वतःच्या मुलाशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप केला. ते आरोप इतके बेशरमपणाचे होते, की एका न्यायाधिशाला ते ऐकवेनात. त्याने ते कागद पटपट वाचण्याची विनंती केली. एका ज्युरीने राणीने उत्तर द्यावे असा आग्रह धरला, पण तिने अशा बेशरम आरोपांना कुठलेही उत्तर देण्यास नकार दिला. जेव्हा तिला विचारण्यात आले, की ती गप्प का? तेव्हा तिने उत्तर दिले, ‘‘ मी यावर गप्प आहे कारण हे नैसर्गिक नाही आणि परमेश्वर या गोष्टीचा तिरस्कारच करतो.’’ त्याच वेळी ती उभी राहिली आणि तिने उपस्थित असलेल्या स्त्रियांना, मातांना हे काय चालले आहे अशी विचारणा केली. ती म्हणाली, ‘‘येथे जमलेल्या सर्व मातांना मी विचारते, कुठलीही आई असे वागू शकते का?’’ तेथे जमलेल्या सर्वच स्त्रियांना तिला मृत्यूदंड द्यायचा होता, त्यांच्यातही कुजबुज सुरू झाली. हेबरने हे जे घाणेरडे आरोप ठेवले ही काही त्याच्या एकट्याची कल्पना नव्हती. मारी ॲन्टोनेटचा एक मित्र होता ल मार्क नावाचा. त्याने असा दावा केलाय, की या बदनामीमागे दरबारातील तिच्या शत्रूंचा सहभाग होता. त्यांनी राणीची प्रतिमा खराब होईल, ती बदनाम होईल अशी मोहीमच चालवली होती. जनतेच्या मनात तिची प्रतिमा एक भयंकर स्त्री अशी करण्याची हेबर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी योजना आखली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.
उलटतपासणीच्या पहिल्या दिवशी मारी ॲन्टोनेट अगदी थकून गेली. इतकी की, तिला गाढ झोप लागली. त्याचाही फायदा तिच्या विरोधकांनी करून घेतला. दुसऱ्या दिवशी तिने नेकलेसच्या प्रकरणात तिचा कसलाही सहभाग नव्हता हे ठामपणे सांगितले. तणावामुळे तिला ग्लानी येऊ लागली.. तिला समोरचे दिसेनास झाले. शेवटी तिला धरून तिच्या कोठडीत परत नेण्यात आले. जेव्हा ती परत न्यायालयात आली तेव्हा तिला अजून काही सांगायचे आहे का असे रिवाजाप्रमाणे विचारण्यात आले. यावर ‘‘काही नाही!’’ असे सांगून तिने न्यायालय सोडले. कोठडीत परतल्यावर तिने तिच्या मेहुणीला पत्र लिहिले व तिला आपण निर्दोष असल्याची ग्वाही दिली. नंतर तिने जमिनीवर अंग टाकले आणि खिडकीकडे एकटक पहात राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. अखेरीस न्यायालयाचे सदस्य निकाल वाचण्यास तिच्या कोठडीत आल्यावर तिने अंग चोरून घेतले. त्यांनी तिची मनगटे बांधली आणि कापण्यासाठी तिचे केस पकडल्यावर मात्र ती दचकली. तिला वाटले की तो तिला मारणार. त्या विचाराने तिला रडू फुटले. एका खिळखिळ्या झालेल्या गाडीतून तिला वधस्थानी नेण्यात आले. गाडीत ती एका फळकुटावर बसली होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि तिच्या एका डोळ्याला दिसत नव्हते. हात बांधलेले होते आणि तिच्या लिननच्या मळकट टोपीतून तिचे कापलेले केस बाहेर डोकावत होते. तिचे ओठ अपमानाने थरथरत होते. डेव्हिड नावाचा चित्रकार तिचे चित्र रेखाटत होता. तिच्या बरोबर एक ज्युरी-पाद्री काहीतरी पुटपुटत चालत होता. तिच्या कानावर आता जमावाचा आरडाओरडा, जल्लोश पडत नव्हता ना त्या पाद्य्राचे प्रवचन. जमाव मात्र बेफाम होऊन तिची अवहेलना करत होता, तिला शिव्याशाप देत होता. गिलोटीन दिसल्यावर तिने परत एकदा आपले अंग आक्रसून घेतले. ती गाडीतनू खाली उतरली. तिच्या मागे गिलोटीन चालवणारा सांसो चालत होता. पायऱ्या चढण्यासाठी त्याने तिला मदतीचा हात पुढे केल्यावर तिने त्याला नकार दिला आणि ती स्वतःच पायऱ्या चढून गिलोटीनच्या चौथऱ्यावर गेली. तेथे तिला एका फळीवर आडवे बांधण्यात आले आणि ती फळी गिलोटीनखाली सरकवण्यात आली. सांसोने खटका ओढल्यावर ते पाते सर्रकन खाली आले आणि तिचे शीर धडावेगळे झाले. सांसोने ते उचलले आणि हातात धरून जमावाला उंच करून दाखवले. ते पाहताच जमावाने उन्मादात ‘‘प्रजासत्ताक चिरायू होवो’’अशा तारस्वरात घोषणा दिल्या. तिचे अवयव एका स्नाशभूमीत नेऊन टाकण्यात आले आणि कित्येक दिवस त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
शिरच्छेद झाल्यानंतर जवळ जवळ १५ दिवसांनी म्हणजे १ नोव्हेंबर १७९३ या दिवशी एका थडगी खोदणाऱ्या माणसाने लुईच्या थडग्याशेजारी एक खड्डा खोदला आणि तिचे अवशेष त्यात पुरून टाकले. नियमाप्रमाणे त्याने खर्चाचा अहवाल प्रशासनाला पाठवला : विधवा कॅपेटचे दफन: बीअर: ६ लिव्हा. खड्डा खोदणारे – १५ लिव्हा’’
मारी ॲन्टोनेटने जे शेवटचे पत्र तिच्या नणदेला लिहिले, त्याचा अनुवाद खाली दिला आहे. मला वाटते आयुष्याच्या शेवटच्या काही क्षणात तिला जीवन हा एक गंभीर प्रकार आहे हे कळले असावे असो.. हे पत्र तिने १६ ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजून तीस मिनिटांनी लिहिले. या पत्रात तिने कसलीही सूडाची भावना प्रदर्शित केलेली दिसत नाही, उलट ती शांत झालेली दिसते.
… मी माझे शेवटचे पत्र तुला लिहित आहे. आत्ताच त्यांनी मला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.. माझा मृत्यू हा लाजिरवाणा नाही.. गुन्हेगारांचा मृत्यू शरमिंदा करणारा असतो, पण मी तुझ्या भावाकडे चालली आहे. मी ही त्याच्यासारखी निर्दोष आहे आणि तो ज्या धिरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला, त्याप्रमाणे मलाही जाता येईल अशी आशा करते. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून सांगते, मी निर्दोष आहे. माझे मन आता शांत आहे. माझ्या मुलांना मागे सोडून जाताना मला मनस्वी दुःख होतंय. तुला माहीत आहे की मी केवळ त्यांच्यासाठीच जगत होते.
आमच्याबरोबर राहून तू मोठाच त्याग केला आहेस, पण त्यामुळे तू स्वतःला संकटात टाकले आहेस आणि मला तुझी काळजी वाटतेय! माझ्या खटल्यादरम्यान मला कळले, की त्यांनी माझ्या मुलीलाही तुझ्यापासून हिरावून घेतले आहे. दुर्दैवाने मी तिला पत्र लिहू शकत नाही कारण मला माहीत आहे, की ते तिला कदापी मिळणार नाही. हे पत्रही तुझ्यापर्यंत पोहोचेल की नाही याची मला शंकाच आहे. माझे आशिर्वाद माझ्या मुलांना देशील का? मला खात्री आहे, की एक दिवस, जेव्हा ती मोठी होतील तेव्हा त्यांची आणि तुझी गाठ पडेल. तु त्यांच्यावर त्यांच्या आईसारखीच माया करशील आणि त्यात कधीही खंड पडणार नाही याचीही मला खात्री आहे.
माझ्या मुलांनी मी जे त्यांच्यावर संस्कार केले आहेत त्याप्रमाणे वागावे. प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडत जगणे हाच चांगल्या आयुष्याचा पाया आहे. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास यावर त्यांचे सूख अवलंबून आहे,. माझ्या मुलीचे वय पाहता, तिने आपल्या भावाची काळजी घेतली पाहिजे, तिच्या अनुभवावर अवलंबून आणि विचार करून तिने त्याला योग्य सल्ले द्यावेत. त्याचप्रमाणे तिच्या भावाने तिच्यावर प्रेम करावे आणि तिची कायम काळजी घ्यावी. थोडक्यात, संकटात आणि सुखाच्या क्षणी त्यांनी एकत्र राहावे. त्यातच त्यांचे भले आहे. त्यांनी आमचे उदाहरण घेण्यास हरकत नाही. संकट समयी एकमेकांवरील प्रेमच आपल्याला तारून नेते हे त्यांना समजावून सांग. यशामध्ये मित्रमंडळींना सहभागी करण्याने आनंद द्विगुणीत होतो हेही त्या दोघांना समजावून सांग. सगळ्यात जवळचा मित्र आपल्याला आपल्या कुटुंबाशिवाय कुठे सापडणार? माझ्या मुलाला सांग त्याच्या वडिलांचे शेवटचे शब्द कधीही विसरू नकोस.
‘‘माझ्या मुलाने माझ्या मृत्यूचा सूड घेण्याचा विचारही करू नये!’’
माझ्या मुलामुळे तुला आजवर खूपच त्रास झालाय याची मला कल्पना आहे. शक्य झाल्यास त्याला क्षमा कर. तो वयाने लहान आहे, निरागस आहे, लोक बोलतात ते तो बोलतो. एक दिवस असा उजाडेल जेव्हा त्याला तुझ्या प्रेमाची किंमत कळेल. हे लिहिताना मला फार वेदना होत आहेत. मीच त्यांना पत्रातून हे समजावले असते, पण घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की मला पत्र लिहिता आले नाही, शिवाय मला पत्रे लिहिण्याची तेव्हा परवानगी नव्हती.
मी माझ्या पूर्वजांप्रमाणे रोमन कॅथॉलिक म्हणून मरणार आहे. माझ्यावर याच धर्माचे संस्कार झाले आहेत आणि आजवर मी हाच धर्म पाळत आले आहे. दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत माझ्या बरोबर कोणी कॅथॉलिक धर्मगुरू असण्याची शक्यता नाही आणि एखाद्या धर्मगुरूने माझी भेट घेण्याचा विचार केला तर त्याच्यासाठी ते फारच धोकादायक ठरेल.
मी माझ्या आयुष्यात आजवर केलेल्या चुकांसाठी इश्वराची क्षमा मागते. उदार अंतःकरणाने तो मला क्षमा करेल आणि माझी शेवटची प्रार्थना ऐकेल अशी मला आशा आहे. मी कोणाला आयुष्यात दुखावले असेल, तर मी त्यांचीही क्षमा मागते आणि विशेषतः तुझी. मी कळत नकळत जर कधी तुला दुखावले असेल तर माझा तुला दुखवण्याच कधीच हेतू नव्हता हे लक्षात घे आणि मला त्यासाठी क्षमा कर! माझ्या ज्या शत्रूंनी मला इजा केली आहे त्यांना मी क्षमा करत आहे. मी याच पत्रातून माझ्या सर्व बहीण भावांचा, आत्यांचा, मावशांचा निरोप घेते. मला अनेक मित्र, मैत्रिणी आहेत आणि त्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने मला अत्यंत दुःख होत आहे. मी माझ्या शेवटच्या क्षणी त्यांचा विचार करत होते हे कृपया त्यांच्या कानावर घालशील का?
माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीचा आता मी निरोप घेते. हे पत्र तुला मिळो अशी मी इश्वराच्या चरणी ¬प्रार्थना करते. मला विसरू नकोस. आता मी या पत्रातूनच तुला आणि माझ्या बिचाऱ्या मुलांना अलिंगन देते. त्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने माझ्या जिवाची घालमेल होतेय.. मी आता या जगाचा निरोप घेते! आता मी थोडेसे ध्यानचिंतन करते. ते बहुतेक माझ्याकडे धर्मगुरू पाठवणारच नाहीत, पण जरी पाठवला तरी मी त्याच्याशी काही बोलणार नाही.. आपण त्रयस्थाशी कधी बोलतो का?
– मारी ॲन्टोनेट.
बहुधा शेवटी शेवटी या कॅथोलिक स्त्रिला परमेश्र्वरही परका वाटू लागला असावा…
-जयंत कुलकर्णी
खाली जे चित्र, गाडीत रेखाटले गेले होते ते दिले आहे. ‘‘डेव्हिड नावाचा चित्रकार तिचे चित्र रेखाटत होता.’’
GIPHY App Key not set. Please check settings