मी टक्कल केले, हो मी केस कापले, यावेळेला कापले म्हणजे नुसते कापले नाही तर अशी कत्तल केली की नामोनिशान मिटवून टाकले. माझे केस माझे हात काय वाटेल ते करीन. आता डोक्यावरुन हात फिरविला की असे वाटते या गुळगुळीत धावपट्टीवर विमान उडू शकते. करोनापासून माणसे दाढीच्या केसांच्या देखील वेण्या घालायला लागली होती तिथे मी उलट ट्रेन पकडून डोके गुळगुळीत करुन टाकले. उलट ट्रेन पकडली तर बोंबाबोंब होणारच तेंव्हा जो भेटेल तो ‘कोण होतास तू काय झालास तू’ या थाटात विचारत होता ‘अरे काय केलेस तू?’ काय केले आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सारे हाच प्रश्न विचारत होते. अशांना ‘डोळे फुटले का तुमचे?’ असे विचारायची खूप इच्छा होत होती पण काय करता सारी आपलीच माणसे होती. आपलेच दात आणि आपलेच ओठ तेंव्हा बोलायचे काय आणि चावायचे काय. कुण्या मूर्खाने लिहून ठेवले देव जाणे Change is only constant. एक वेळ साक्षात न्यूटन रोहित शेट्टीच्या सिनेमातील उलट्या गुरुत्वाकर्षणचा नियम स्वीकारेल परंतु सामान्य मनुष्य बदल स्वीकारु शकत नाही.
सुरवात घरातूनच झाली. पहिली प्रतिक्रिया बायकोकडून आली
“इSS हे काय केलेस तू?” घरात पाल बघून ती जेवढी दचकणार नाही तेवढे दचकून तिने विचारले.
“पूर्ण टक्कल केले.”
“शी आधीच छान दिसत होते”
“याआधी तसे सांगितले नाही.” जोपर्यंत माणूस कंपनीत नोकरीला असतो तोपर्यंत त्याला कुणी भीक घालत नाही. उलट त्याने स्वतःत काय सुधारणा करायला हव्या याचा पाढा दरवर्षी वाचला जातो. एकदा का त्याने कंपनीतून नोकरीचा राजीनामा दिला की त्याला माहिती नसणाऱ्या त्याच्याच सदगुणांची त्याला जाणीव करुन दिली जाते. माझ्या केसांचेही तेच झाले होते जोपर्यंत होते तोपर्यंत डोक्यावर कुठेतरी वाळवंट शोधून तुझं टक्कल पडत चाललय अशा खोचट प्रतिक्रिया येत होत्या. कधी भिंग लावून त्यातला पांढरी बट शोधून तू आता म्हातारा होत चालला आहे असे टोमणे मारल्या जात होते. आज मात्र त्या केसांसाठी श्रद्धांजली सभा घेतली गेली. मनुष्य प्राणी हा कसा दुटप्पी आहे याचा याहून वेगळा अनुभव नाही. अविर्भाव तर असा काही होता की तुझ्या केसांना धक्का लागू देणार नाही अशीच शपथ घेतली काय असे वाटत होते. मुळात त्या केसांना धक्का काय ते पूर्ण कापून गुळगुळीत टक्कल केले तरी फारसा फरक पडत नाही हे केस कापल्याशिवाय कळत नाही.
माझ्या केसांना रेशमी झुल्फे म्हणून त्याची तारीफ करावी या स्तरावरचे ते अजिबात नव्हते पण तरी त्याला झिंज्या म्हणावे म्हणावे असेही नव्हते. लहान असल्यापासून मानवी शरीरात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखा अवयव म्हणजे डोक्यावरील केस आणि बोटांची नखे, दोन्ही बाबातीत नेहमी एकच ताकीद वजा सल्ला मिळतो ‘अरे ते कापून टाक’. केसांच्या बाबतीत आणखीन एक सल्ला होता ‘केस नीट विंचरत जा’. इतर अवयवांसारखा मनुष्य गर्भातून घेउन येतो, पण जन्म झाल्यावर वर्ष होत नाही तर तेही साफ केले जाते. तेंव्हा ते केस टाळक्यावर असले काय नसले काय काही फरक पडत नाही असाच माझा समज होता. त्याला बायको म्हणत होत की छान दिसत होते. इतने भी बेवकूफ नही हम.
“काहीही करतो.” हे जरा अतीच होत होते पण यावर वाद घालणे म्हणजे उगाच एकवेळ जेवणावर पाणी सोडण्यासारखे होते. त्या टक्कलाच्या कौतुकापेक्षा मला माझ्या पोटाची अधिक काळजी होती त्यामुळे मी तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन आंघोळीला निघून गेलो. पुरुषांच्या डोक्यावरचे केस हे त्याच्या विद्रुपतेचे प्रतीक नसले तरी त्याच्या सौंदर्याचे प्रतीक होते असे मी तरी कधी ऐकले नाही. स्त्रीयांच्या केसांच्या सौदर्याची तारीफ करुन करुन कितीतरी कवी आणि शायर मंडळींनी आपली पोटं भरली. कितीतरी सिनेमांमधे डोक्याला टॉवेल गुंडाळून नायिका गॅलरीत येणार, तो टॉवेल सोडून त्या केसांना एक मोहक झटका देणार आणि नेमका त्याच वेळी नायक तिला बघणार. कस जमतं या नायकांना? तेंडुलकर सारखे टायमिंग असते या मंडळींचे. असो तर मग नायक तिला म्हणणार ‘ना झटको झुल्फोसे पाणी ये मोती टूट जायेंगे’. वाह क्या सीन है. मागे आमच्या घरासमोर एका सिनेमाचे शूटींग चालले होते त्यात ती नायिका गॅलरीत येऊन डोक्याचा टॉवेल सोडते, नायिका मग त्या केसांना झटका देते आणि नेमका त्या वेळेला नायक बघतो. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत तेच चालले होते. मुलांच्या केसांच्या बाबतीत कुणी इतकी मेहनत घेईल का? मुलांचे बघा पावसातून केस ओले करुन घरी आला की आई नाहीतर बाबा ओरडणार ‘मूर्खा ते केस पुस आधी सर्दी होईल’. कोणत्याही सिनेमात असा प्रसंग नाही की नायक ओले केस सुकवतोय आणि त्याच वेळेला नायिका बघते. प्रश्न नायिकेच्या टायमिंगचा नाही आहे. लुक देण्यात मुलींचे टायमिंग तेंडुलकर पेक्षाही उत्तम असते परंतु मुलांचे केसांकडे बघून लुक द्यावा असे त्यात काही नसते.
आंघोळ वगैरे करुन भावाला फोन केला कधी नव्हे तो विडियो कॉल केला तर त्याचा पहिलाच प्रश्न
“आबे काय केलं तू?”
“फॅशन आहे ही. अमेरिकन कंपनीचा सीईओ झाल्यासारखे वाटते.”
“त्यांचे सीईओ होतपर्यंत गळतात. तुला काय आताच धाड पडली होती.” खरतर या वाक्यात सत्यता होती पण त्याने काय फरक पडतो. मी केस गळून टक्कल पडण्यापेक्षा ते आधीच केले होते तर बिघडले कुठे? जे काम मी आधी दर महिन्याला शंभर ते दोनशे रुपये देऊन करीत होतो तेच काम मी आता शंभर रुपये देऊन कायमचे संपवले होते. फरक इतकाच आधी तो शंभर रुपयात चार मीमी केस कापत होता आता चार मीमी सुद्धा शिल्लक ठेवले नव्हते. आता पुढे जाऊन मी दर आठवड्याला दाढीसोबत डोकही गुळगुळीत करणार. सलूनच्या पैशांची बचत होणार. त्या वाचलेल्या पैशात SIP करुन म्युच्यअल फंडात गुंतवणुक केली तर वीस वर्षानी हेअर कटचे दुकान थाटता येईल इतकी रक्कम नक्कीच जमा होणार. या साऱ्यामागे असा खोल विचार होता पण लक्षात कोण घेतो. भारतात कुणालाच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचे पडले नाही.
“मूर्खपणा आहे डोक फिरलय तुझं”. वडीलांनी भावाच्या वाक्याला जोड दिली. केस कापले या साध्या कृत्यामुळे माझ्या मानसिक स्थितीवर शंका उपस्थिती केली गेली. डोक्यावरील केसांचा व्यक्तीच्या मानसिक स्थितीशी संबंध असतो हे म्हणजे ऐकावे ते नवलच या थाटातले होते. मुळात केस कापायचा निर्णय घेतला तेंव्हा डोक्यावर केस होते, केस कापल्यामुळे बुद्धी आली की गेली असे काही सांगता येत नाही. याचा अर्थ माणसाच्या बुद्धीचा आणि डोक्यावरील केसांचा काही संबंध नाही. तरी साक्षात पितृदेवतेकडून ही अवेहलना व्हावी केवढे ते दुर्भाग्य. हेच पितृदेव लहानपणी केस कापायला नकार दिला तर बळजबरीने उचलून दुकानात नेऊन बसवायचे. लहान असताना काही मुल अमिताभ किंवा शाहरुख सारखी केसरचना करायची. आम्ही करतो म्हटले तर पितृमहोदयांनी असा मार दिला होता की त्या आठवणी आजही जाग्या आहेत. वडीलांनी कमीत कमी उंचीत केस कापून आणणे आणि आईने त्यावर भरपूर तेल थापून चपटा भांग पाडणे इतकीच त्या केसांची उपयुक्तता होती. हल्ली परिस्थिती बदलली. ही मुलं केस कापण्याच्या उपक्रमाला हेअरकट किंवा केशरचना वगैरे म्हणतात पण मी मात्र आमच्या केस कापण्याच्या उपक्रमाला कटींग करणे असेच म्हणेल. झाड जास्ती वाढली की त्याची जशी ती हातात मोठी कैची घेऊन कटींग करतात तसेच या केसांचे होते जरा वाढले की कैची घेऊन कटींग करा. त्यात कुठेही कला, तंत्र किंवा विज्ञान असे काही नव्हते. तेंव्हा त्याला उगाचच केशरचना किंवा हेअरकट वगैरे म्हणून त्याची प्रतिष्ठा वाढविण्यात काही अर्थ नाही. एक दहा बाय सहाची लंबोळकी खोली, तीन आरसे, तीन खुर्च्या एक बेंच, दोन पेपर, एक जुने फिल्मी मासिक आणि खाली पडलेला केसांचा कचरा अशा वातवरणात श्रृंगारीक, रोमहर्षक असे काही घडू शकत नाही जे घडते त्याला भादरणे, कापणे, कर्तन, कटींग असलीच नावे शोभतात. आठवा ते नव्वदीतले वातावरण त्या दुकानातील बेंचावर टाटीवाटीने बसलेले गिऱ्हाईक, भिंतीवर चिकटलेले मिथुन, शाहरुख, अमिताभ, दुकानातील स्पीकरवर रडणारा कुमार शानू, लोकांच्या टकलावर मालिश साठी पडणारी थाप त्याला साथ द्यायची, एक पेपर आणि एक फिल्मी मासिक अशात कुणी येतो नमस्कार करतो कधी तो दुकानदार कुणाला नमस्कार करतो. मधेच कुणी सांगतो माझा नंबर लावून ठेवा, कुणी स्त्री येते आणि सांगते ‘काकाजी बाल्याची कटींग कराची हाय बारीक करजा’. असे म्हणून आपल्या मुलाला बिनधास्त तिथेच ठेवून निघून जाते. कांपुटर किंवा कोणत्याही ऍपची मदत न घेता, केसकर्तनामधे कसलाही व्यत्यय येऊ न देता दुकानदाराचे सर्वत्र व्यवस्थित लक्ष असायचे. त्या दुकानातील तीन खुर्च्यापैकी एक खुर्ची रिकामी का हे हे माणसाच्या डिएनए इतकेच न उलगडणारे कोडे होते. तो पेपर कितीही ताजा असला आणि फिल्मी मासिक कितीही जुने असले तरी तेच वाचावेसे (चाळावेसे) वाटायचे. मला सुरुवातीला गर्दीतील गिऱ्हाईक कोण आणि पेपर वाचणारे कोण हे समजत नव्हते. नंतर लक्षात आले ज्याला दुकानदार नमस्कार करतो तो गिऱ्हाईक आणि जो दुकानदाराला नमस्कार करतो तो फुकटात पेपर वाचणारा. कोणाची बायको कुणासोबत पळून गेली पासून ते राजकारणातील खलबत यासारख्या स्फोटक विषयावर होणारी चर्चा हे फार मोठे आकर्षण होते. हा माणूस निवडून येऊच शकत नाही असे छातीठोकपणे सांगणारे तिथेच सापडायचे. तीच मंडळी आता एक्झीट पोल वगैरे करतात की काय अशी शंका येते. क्रिकेटच्या सामन्याचे विश्लेषण ज्या बारकाईने व्हायचे तसे विश्लेषम पेपरात लिहिणाऱ्यांना जमले नसते. तेंव्हा बऱ्याच लोकांकडे टिव्ही देखील नव्हता तरी कुणाला फाइन लेग ठेवावा आणि कुणाला सिली पॉइंट या साऱ्याची सविस्तर कारणमीमांसा व्हायची. स्फोटक विषय आणि वस्तरा, कैची यामुळे वातावरणात कितीही हिंसकता आलेली असली तरी तिथल्या वादाचे भांडणात रुपांतर झाल्याचे आठवत नाही.
वडिलांनी केलेल्या विशेष टिपणीमुळे भूतकाळ आठवला पण महत्त्वाचा मुद्दा हा की कटींग करणे हा प्रकार ना रोमहर्षक होता ना त्यात कुठल्या कलास्वादाचा आनंद होता. तो एक रुटीन, रटाळ, कंटाळवाणा प्रकार होता. मी ते रुटीन बदलले तर सर्वांच्या पोटात दुखायचे कारण काय? जगात कुठे आहे की नाही माहित नाही परंतु भारतात काही सामाजिक मान्यता टक्कलाशी जोडल्या गेल्या आहेत. दक्षिण भारतात कुणी पूर्ण टक्कल करुन दिसला तर तो नुकताच तिरुपतीला जाऊन आला असल्याची टाट शक्यता असते. महाराष्ट्रात मात्र टक्कलाचा संबंध थेट पिंडाशी जोडलेला आहे. घरातला कुणी गेल्यावर नवव्या दहाव्या दिवशी घरातले सारे पुरुष टक्कल करतात. एकदा पवनारला गेलो असताना एक काका त्यांच्यापाशी टक्कल करुन घ्यायला घाई करणाऱ्या मुलावर जोरात ओरडले. “म्हातारी जिती होती तवा पाणी नाही देल्ल आन आता घाई करुन रायला बे, तुये केस भादरले नाहीतर म्हातारीच्या पिंडाला कावळा शिवणार नाही का.” परत त्या मुलाने घाई केली नाही. अशा मान्यतेमुळे काही मित्रांनी त्या काळजीनी चौकशी केली आणि मी तसे काही नाही हे सांगितले. शौक म्हणून सुद्धा टक्कल करण्यात किती समस्या आहे बघा.
हल्लीची मुलं चार केस कापून येतात आणि त्यासाठी पाचशे रुपये मोजतात. मी एकदा अशाच एसी केस कर्तनालयात गेलो होतो. लगेच नंबर आला मी खुर्चीत जाऊन बसलो. खुर्चीत बसून काय करायचे म्हणून समोर लावलेले रेटकार्ड वाचले. असे रेटकार्ड लहान असताना दुकानात जायचो तेथेही असायचे परंतु त्या रेटकार्डप्रमाणे कधी पैसे दिल्याचे आठवत नाही. नेहमी पैसे कमीच राहायचे. कटींग झाली पैसे द्यायला गेलो तर कांपुटरवर बील काढले. त्या रेटकार्डवर लिहलेल्या चारशे रुपयाच्यावर जीएसटी देखील लावला. त्याक्षणी मला या केसांचा बोझ जाणवला. केसांनी गळा कापणे ऐकले होते पण माझ्या केसांनी माझा खिसा कापला होता. यापलीकडे एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीसाठी अधिक पैसे मोजणे याला केसांनी खिसा कापला असा वाक्याप्रचार वापरावा अशी मी मराठी साहित्य आणि शब्दकोषांच्या जाणकारांना विनंती करतो. तेंव्हाच ठरविले या जीएसटीच्या जमान्यात आपले केस कापायला दुकानदाराला पैसे, वरुन सरकारला जीएसटी द्यायचा हा उद्योग यापलीकडे करायचा नाही. फक्त ठरविले नाही तर तसा ठाम निर्णय केला. आता वडील ओरडू दे, बायको नाक मुरुडे दे, भाऊ खिल्ली उडवू दे हा निर्णय आता बदलणार नाही म्हणजे नाही. या साऱ्यांचे खोचट किंवा दमदाटीचे बोल माझ्या गुळगुळीत टकलावरुन पाणी वाहून जावे तसे वाहून जात होते आणि माझा निर्णय अधिकाअधिक ठाम होत होता.
GIPHY App Key not set. Please check settings