अॅडम ब्रिटन हे नाव प्राणी संरक्षकांना आणि प्राणीप्रेमी नागरिकांना परिचयाचे आहे, किंबहुना कालपर्यंत अनेकांना त्यांच्याबद्दल विलक्षण आदर आणि प्रेम होतं. काहींनी तर त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिलं होतं, त्यांनाच ते देवमाणूस मानत होते. त्यांच्याइतका नितळ प्राणीप्रेमी आणि सच्चा मानवतावादी कुणीच नाही असं पुष्कळांना वाटायचं. लोक त्यांचे नाव पाहून भरमसाठ देणग्या देत असत. त्यांच्या आस्थापनेला कधीही निधीसाठी तिष्ठत बसावे लागले नाही, त्यांनी आवाज न देताही लोक त्यांना भरभरून देत गेले. त्यांच्या क्षेत्रात त्यांचं नाव एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनच घेतलं जाई. वन्यजीव संरक्षक मंडळींसाठी तर ते अगदी खास होते, अॅडम ब्रिटन यांची लोकप्रियता होतीच तशी! मात्र आता त्यांचा बुरखा फाटला आहे, त्यांचा भेसूर विकृत चेहरा जगापुढे आला आहे. त्यांचं खरं रूप पाहून अनेकांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. वन्यजीवप्रेमी मंडळींना तर अजूनही त्यांच्या विकृतीविषयी विश्वास बसत नाहीये. आपण ज्या माणसाला सर्वोच्च प्राणीप्रेमी मानत होतो त्याचं चरित्र केवळ रक्ताळलेलं नसून विकृतीच्या विकारांनी खोलवर ग्रासलेलं आहे हे अनेकांच्या पचनी पडत नाहीये. बऱ्याचदा असं घडतं की एखादी व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाविषयी वा आयडेंटीटीविषयी हेतुतः भ्रामक कल्पना पसरवत असते, स्वतःची खोटी प्रतिमा निर्माण करण्याचं काम मात्र सच्चेपणाने केलेलं असतं. लोकांपुढे वेगळेच वास्तव समोर येतं तेव्हा लोक नाराज होतात किंवा आपल्याला फसवल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. त्याही पलीकडे जाऊन मुखवट्यातला चेहरा आणि खरा चेहरा यांच्यातील एकशे ऐंशी कोनातला फरक उघड होतो तेव्हा मात्र सर्वांचाच संताप अनावर होतो. अशा व्यक्तीस कठोर शासन केलं जावं अशी मागणी जोर धरू लागते. इतिहासातली पाने चाळली तर अशी पुष्कळ उदाहरणे सापडतात. काहींनी कलाकाराचा तर काहींनी अभिनेत्याचा मुखवटा धारण केला होता तर काहींनी चक्क समाजसेवींची झूल पांघरली तर काही चतुर्विकृत मात्र प्राणीप्रेमी, संवेदनशील, सेवाव्रती बनून वावरत राहिले! अॅडम ब्रिटन हा प्राण्यांवर प्रेम करणारा नसून प्राण्यांसोबत जगातील सर्वाधिक वाईट वर्तणूक करणाऱ्या, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे हे सिद्ध झाल्यापासून प्राणीप्रेमी व्यक्तींमध्ये भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे हे वास्तव आहे!
अॅडम ब्रिटनने काय केलं होतं हे जाणून घेतल्यावर हरेक व्यक्तीची तशीच घालमेल होईल जी कोणत्याही सहृदयी संवेदनशील प्राणीप्रेमी व्यक्तीची होतेय! जगासमोर ब्रिटन याची प्रतिमा प्राण्यांवर प्रेम करणारा आणि प्राण्यांच्या अधिकारांबद्दल बोलणारा एक संवेदनशील व्यक्ती अशी होती, मात्र प्रत्यक्षात त्यांनी प्राण्यांचे शोषण केलं! त्यांनी केवळ शोषण केलं नसून प्राण्यांवर लैंगिक अत्याचार केले ज्यात चाळीसेक मुक्या जिवांना आपले प्राण गमवावे लागले! या दरम्यान समोर आलेली विशेष बाब अशी की अॅडम ब्रिटनच्या अंतरंगात प्राण्यांविषयीची लैंगिक विकृती कुमार वयापासूनच होती. त्याचा बचाव करणाऱ्या वकिलांनीच ही माहिती न्यायालयात दिलेली असल्याने त्यात असत्याची शंका घेण्याचे काही प्रयोजन नाही. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच त्याने चक्क घोड्यांबरोबर अशा प्रकारची कृत्ये करण्यास सुरूवात केली होती. त्याच्या वकिलांनी तो प्राण्यांविषयी लैंगिक सुख भावनेने बालवयापासूनच चेतवलेला होता, त्याची ही विकृती मनोविकारात बदलत गेली असून त्याला अत्याचारी म्हणता येणार नाही अशी मल्लिनाथीही केली. त्यांच्या या निर्लज्ज युक्तिवादाचा प्राणीप्रेमी जगताने कठोर निषेध केला. ब्रिटन याच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षाही जाहीर झालीय. डझनभर कुत्र्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार करताना फिल्म बनवण्याच्या आरोपांसाठी एक दशकाहून अधिक काळाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. हा मुद्दा केवळ इतकाच नसून प्राण्यांबरोबर क्रौर्यानं वागण्याच्या तब्बल छप्पन्न प्रकरणांमध्ये अॅडम ब्रिटन याने बाल शोषणाशी संबंधित सेक्सुअल साधनांचा वापर केल्याचंही मान्य केलं आहे. म्हणजे त्यांची विकृती कोणत्या स्तरावरची होती नि किती खोलवर रुजली होती याचा अंदाज येईल!
ब्रिटनचा जन्म 1971 मध्ये इंग्लंडस्थित वेस्ट यॉर्कशायरमध्ये झाला होता. डिजिटल मीडियाच्या जमान्यात त्याला जगभरात विलक्षण प्रसिद्धी लाभली होती. ब्रिटनच्या आयुष्यावर त्याची आई, त्याचे जीवशास्त्राचे शिक्षक वैल रिचर्ड्स आणि सर डेव्हिड अॅटनबरो या तीन व्यक्तींचा प्रभाव पडला आणि त्यामुळे तो प्राणी वैज्ञानिक झाला. लीड्स विद्यापीठात त्याने विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं आणि 1992 मध्ये त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 1996 मध्ये त्याने ब्रिस्टल विद्यापीठातून वटवाघळांच्या शिकार करण्याच्या पद्धतींवर प्राणीशास्त्रातून पीएच.डी. पूर्ण केली. लहानपणापासून अंगी असलेल्या मगरींच्या आकर्षणाने त्याला शांत बसू दिलं नाही, इंग्लंडच्या बाहेर जाऊन मगरींवर संशोधन करण्याचं त्याचं स्वप्न होतं. जोपर्यंत लोक स्वेच्छेने प्राण्यांबद्दल जाणून घेणार नाहीत तोपर्यत लोकांमध्ये प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी जागृती करून काहीही फायदा होणार नाही असं त्याचं मत होतं. यासाठी तो जगभरात व्याखाने द्यायचा, वादविवादात सहभागी व्हायचा. 1990 च्या दशकाच्या मध्यास तो मगरींसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियातील नॉर्दन टेरिटरीमध्ये याच क्षेत्रात काम करणाऱ्या ख्यातनाम संशोधक ग्रॅहम वेब यांच्याकडे गेला. ‘क्रॉकोडाइल्स पार्क’ नावाचं त्यांचं एक छोटंसं प्राणीसंग्रहालय आणि संशोधन केंद्र होतं. इथे ब्रिटन याने अनेक प्रोजेक्ट्सच्या चित्रिकरणापासून ते प्रत्यक्ष संशोधन कार्यातही सहभाग घेतला. खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या मगरी इथे जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळतात. 2005 मध्ये ब्रिटनने मगरीच्या रक्तातील पॉवरफुल अँटिबायोटिक शक्तींसंदर्भात केलेल्या एका संशोधनानं जगाचं लक्ष वेधलं. सर्वत्र त्यावर चर्चा झाली. 2006 मध्ये त्यानं क्रॉकोडाइल्स पार्क सोडलं आणि आपल्या पत्नीबरोबर एक नवीन ‘मगर संशोधन केंद्र’ सुरू केलं. नंतर चार्ल्स डार्विन विद्यापीठात सहाय्यक संशोधक म्हणूनही काम केलं. 2011 मध्ये फिलिपाईन्समध्ये जगातील सर्वात लांब मगर पकडण्यात आली होती. त्या मगरीची लांबी मोजण्यासाठी देखील ब्रिटनने मदत केली होती. नंतर 2016 मध्ये त्यानं सीबीएसचे टीव्ही सूत्रसंचालक अँडरसन कूपर यांच्याबरोबर ’60 मिनिट’ या कार्यक्रमाच्या एका भागासाठी बोत्सवानामधील रानटी मगरींबरोबर पाण्यात डुबकी मारून चित्रीकरण करण्यासाठी मदत केली होती. विविध वाहिन्यांना मुलाखती देताना त्यानं आपल्याजवळील मगरींचा खजिना जगाला दाखवला नि त्या दिवसापासून त्यांचं नाव सर्वमुखी झालं! त्याला जगातल्या सर्वात मोठ्या मगरीबरोबर पोहताना पाहिलं गेलं. त्याच्याकडील स्मॉग या पाळीव मगरीला त्यानं अनेक चित्रपट आणि माहितीपटांच्या शूटिंगमधील वापरासाठी दिल्याचंही माध्यमांना ज्ञात होतंच! ब्रिटनचं निवासस्थान ‘मॅकमिन्स लगून’ ऑस्ट्रेलियातील डार्विन परिसरात आहे. स्टीव्ह बॅकशेल यांनी आपल्या साठ माहितीपटांसाठी इथे चित्रीकरण केलं होतं. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या जगप्रसिद्ध टीव्ही शोचे बेअर ग्रील्स सुद्धा इथे येऊन गेलेत. इथेच प्राण्यांवर लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले. ऑस्ट्रेलियातील याच घरी ब्रिटनने सर डेव्हिड अॅटनबरोचा पाहुणचार देखील केला होता. 2018 साली प्रदर्शित झालेल्या मगरींविषयीच्या ‘ब्लॅक वॉटर’ या भयपटाने अॅडम ब्रिटन हे नाव घराघरात पोहोचलं. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक, लेखक अँड्र्यू ट्राउकी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. याच चित्रपटाच्या सिक्वेलसाठी 2019 मध्ये त्यांनी ब्रिटन सोबत काम केलं. तोवर अॅडम ब्रिटन यांचं नाव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलं होतं! तो एक आदर्श, सहृदयी, संवेदनशील प्राणीप्रेमी म्हणून ओळखला जाऊ लागला! मात्र मानवतेला काळिमा फासणारी त्याचे कारनामे उघड झाले नि जग हादरलं!
सुरुवातीला त्यानं त्याच्याजवळील पाळीव प्राण्याचं शोषण केलं. त्यांची संख्या घटल्यावर त्यानं नवी शक्कल लढवली. कुत्र्यांच्या मालकांनी आपलं श्वान आपल्याकडे द्यावं म्हणून तो प्रयत्नशील असे. ‘गमट्री’ या ऑस्ट्रेलियन ऑनलाइन मार्केटमध्ये ब्रिटन अशा लोकांचा शोध घ्यायचा ज्यांना कोणत्या तरी कारणानं आपला प्राणी नको असायचा किंवा त्याच्यापासून विभक्त व्हावं वाटे! कुत्र्याला आपल्या स्वाधीन केलं तर त्याला प्रेमळ घर द्यायचं वचन तो द्यायचा. पूर्वी डोनेट केलेल्या प्राण्याविषयी कुणी माहिती घ्यायला आलाच तर तो त्याला खोट्या कथा ऐकवे अथवा जुने फोटो दाखवून त्याचं समाधान करत असे त्यामुळे त्याच्यातील विकृत श्वापदाचा लवकर पर्दापाश झाला नाही. लैंगिक शोषणासाठी त्यानं एक खास कंटेनर बनवला होता ज्यात तो या मुक्या निष्पाप आणि अनाथ जिवांवर अत्याचार करत असे. त्याची विकृती इतकी नीच होती की तो याचं रेकॉर्डिंग करत असे आणि या रेकॉर्डिंगसाठी जी उपकरणे वापरत असे त्याचा त्या मुक्या जिवांना त्रास होई, त्यांच्या अवयवांना इजा पोहोचे नि अत्याचारा दरम्यानच कुत्र्यांचा मृत्यू होई! या कंटेनरला हा नीच इसम ‘टॉर्चर रुम’ म्हणत असे! अटक होण्याच्या अठरा महिने आधी त्याने किमान 42 कुत्र्यांवर अत्याचार केले. त्यात 39 कुत्र्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीच्या काळातील कोणताही डेटाबेस उपलब्ध नसल्याने केवळ कयास बांधणेच हाती उरते! किती जिवांना या विकृताने मारले असेल याचा विचार करवत नाही! काही दिवसांपूर्वी आपल्या डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी, फॉलोअर्सनी त्याला मृत्यूदंड द्यावा अशी मागणी केली! त्याला अफाट प्रसिद्धी देऊन महान बनवणाऱ्या माध्यमांनीही त्याला कठोर शिक्षा द्यावी म्हणून विशेष शो केले! अॅडम ब्रिटनला आपण काय समजत होतो नि तो काय निघाला याची अनेकांना शरम वाटते. काहींना तर याचा मोठा धक्काच बसला! दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, याचाच फायदा ब्रिटनसारखे लोक घेत असतात आणि आपला कार्यभाग साधत असतात! माणसाचं खरं स्वरूप आकळल्याशिवाय त्याला डोक्यावर घेऊ नये हेच खरं! आपल्या प्रसारमाध्यमांत अॅडम ब्रिटनविषयी फारसं छापून आलं नाही याचं कारण आपल्या दिखाऊपणाच्या आकर्षणात दडलं असावं काय?
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings