एक नवीन वर्ष येते आणि एक वर्ष जाते एक सरळ साधी प्रक्रिया, त्याच बरोबर येणारे हे वर्ष खूप काही देऊन गेले, धडे, शिकवण वगैरे सुद्धा दरवर्षी येत असते. तसे पाहिले तर ज्यांचे लग्न झाले त्यांना बायको किंवा नवरा मिळतो आणि मुलबाळं झाली तर मुलं मिळतात त्याशिवाय वर्ष मौलिक अर्थाने फार काही देत नाही हो. परंतु वर्ष संपायला लागले अशा गप्पा मारायला काय जाते. सारेच बोंबलत असतात तेंव्हा आपणही घसा साफ करुन घ्यायचा. सेल्फ हेल्प नावाचा पुस्तकाचा एक प्रकार विशेषतः इग्रजीत खूप वाचायला मिळतो. कुणा दुसऱ्याच्या आय़ुष्यातील गोष्टी सांगत ही मंडळी वाचकाला त्याच्या समस्येचे समाधान सांगितल्याचा आव आणत असतात. खरतर त्या लेखकाला वाचकाच्या समस्येचे रतीभरही ज्ञान नसते पण माझं पुस्तक छापल्या जात आहे तेंव्हा मला हवे ते मी सांगणार तुम्ही यातच तुमच्या समस्येचे समाधान शोधा. नाही सापडले तर ती तुमची समस्या आहे लेखकाची नाही. असा प्रकार किती तरी वर्षे चालू होता आणि लाखांनी पुस्तकं छापल्या जात होती. मग युट्युब आणि फेसबुकवर ज्ञान पाजळणारे आले. ते पुस्तक वाचायला कमीत कमी दिवस तरी लागत होता हि मंडळी तर वीस पंचवीस मिनिटांतच जग शहाणे करायला निघाली. आता इंस्टा रील आल्या एका मिनिटाच्या रीलमधे वीस बावीस वर्षाची पोरपोरी अंशी वर्षाच्या आयुष्याचे सार सांगत असल्याचा आव आणत काहीतरी सांगतात. लोक ते बघतात बरं. शाळेत गीताई पाठ करायचा कंटाळा करायचे. थोडक्यात काय शिकविणाऱ्यांची कमी नाही शिकणारा बकरा हवा. अशा या शिकविणाऱ्यांच्या भाऊगर्दीत दरवर्षी एक नवीन शिक्षक अविरत येत असतो तो म्हणजे येणारे नवीन वर्ष. या शिक्षकाची पद्धत सुद्धा खूप साधी आहे तो काही बोलत नाही, काही करीत नाही, सार तुम्ही बोलता, तुम्हीच करता वरुन म्हणता गेले वर्षे खूप काही शिकवून गेले. शिक्षक आले म्हणून तुम्ही जल्लोष करता, शिक्षक वर्ग सोडून गेले म्हणून तुम्ही अधिक गोंधळ घालता शिक्षकाला त्याचे काही नाही. तुम्ही या म्हटले नाही म्हणून शिक्षक यायचे थांबत नाही की तुम्ही जल्लोष केला नाही म्हणून ते शिक्षक जायचे थांबत नाही. असा स्थितप्रज्ञ शिक्षक पुन्हा होणे नाही असेही म्हणता येत नाही कारण दरवर्षी अगदी तसाच नवीन शिक्षक येत असतो. शिक्षक तुम्हाला झोपू नका असे म्हणत नाही परंतु या वर्गात तुम्ही झोपला की झोपला. मला तरी भगवतगीता आणि जाणारे वर्षे जे शिकवून जाते तेवढे कुणी शिकवित असेल असे वाटत नाही म्हणूनच मी हल्ली सेल्फ हेल्प पुस्तके, विडियो सारे बघणे सोडून दिले.
२०२३ या वर्षाने मला काय शिकविले असेल तर उगाच लोकांना शहाणपणा शिकवू नये. प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा स्वतःचा असतो आणि तो त्यालाच व्यवस्थित माहित असतो. अनुभव हा केसांच्या रंगावर, केलेल्या प्रवासावर, गाठलेल्या उंचीवर कशावरही अवलंबून नसतो. अनुभव हा प्रत्येकाचा स्वतःचा स्वतंत्र असा असतो. त्याला त्याचे आपले संदर्भ असतात आपले संदर्भ घुसडुन ज्ञान पाजू नये. कुणाला एकवेळ कुणाच्या आधाराची गरज असेल पण फुकाच्या ज्ञानाची नाही. कंन्सटल्सी कंपनी आणि अमेरिकन खाजगी संस्थातील शिक्षक सोडले तर ज्ञान पाजळणाऱ्यांना कुत्रही हुंगत नाही. खरतर कुणालाच त्याने काय करावे हे सांगायची गरज त्याला त्याचे चांगले ठाऊक असते कधीकधी विश्वास कमी पडू शकतो एवढेच. कुणाच्या ज्ञानाची गरज नाही हे कटु सत्य बहुतेक चांगल्या सीईओंना माहित असते तरीही ते अधेमधे कंन्संटल्सी कंपन्यांकडे जात असतात. असे का करतात माहित नाही कदाचित नवीन इंग्रजी जार्गन शिकण्यासाठी जात असतील. असे नाही केले तर गोल्फ क्लबला जाऊन काय गप्पा मारतील.
इतिहासासारखा दुसरा शिक्षक नाही. माझ्या आधीच्या कंपनीतील एक अधिकारी नेहमी म्हणायचे I don’t read strategy book I read roman history. इतिहास समजून घेताना एक गोष्ट गरजेची असते इतिहास त्यावेळेच्या संदर्भानुसार समजून घ्यायला हवा तरच तो कळतो त्याला आजच्या संदर्भांचा चष्मा लावून बघू नये. त्याकाळात ती व्यक्ती तशी का वागली हे त्याकाळातल्या संदर्भावर अवलंबून असते. ते जर कळले नाही तर तुम्ही त्यातून योग्य ती शिकवण घेऊ शकत नाही. एकदा ते झाले की मग तुम्ही शिकत जाता आणि शिकतच राहता. यावर्षी तंजावर, राष्ट्रकूट, वरंगल येथील राज्यांचा इतिहास वाचला. इतिहास असल्याने पराक्रमांच्या गाथांपेक्षा त्यामागची योजना, विचार, संदर्भ, पुरावे यावर अधिक भर असतो. इतिहास कधीच पूर्णपणे तुमच्यासमोर येऊ शकत नाही हे सत्य देखील इतिहासकार अधूनमधून अधोरेखीत करीत असतो.
२०२३ च्या सुरवातीलाच हैदराबादमधे नाट्याछंदचा प्रयोग केला आणि प्रचंड यशस्वी झाला. त्याविषयी मी इथे लिहिले आहे. यात माझ्या दोन लघुनाटिका होत्या मराठीतले शोले आणि एका अशाच स्टेशनवर दोन्ही लघुनाटिकांना खूप जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका अशाच स्टेशनवर विषयी खूप मंडळींनी सांगितले. मे महिन्यात आणखीन दोन नाटिका केल्या एक होती वसंत सबनीस लिखित प्रेक्षकांनी क्षमा करावी आणि दुसरी होती मी लिहिलेली ओल्ड माँक इन ओल्ड बॉटल. मी लिहिलेल्या नाटिकेत मला काम करायची संधी देखील मिळाली. हलकी फुलकी विनोदी नाटिका होती. या दोन्ही प्रयोगांन उत्तम प्रतिसाद मिळाला. रंगभूमीला हाऊसफुल्ल बोर्ड होता. नाटकात काम करणे म्हणजे एक प्रचंड डोकेदुखी आहे हे देखील कळले त्यापेक्षा गपचुप वेळ मिळेल तेंव्हा काहीतरी लिहून आपली सृजनशीलतेची भूक भागवावी काम करण्याच्या भानगडीत पडू नये.
नाटिका प्रेक्षकांनी क्षमा करावी
साहित्य कट्टा हैदराबाद न चुकता दरमहिन्याला होत होता. त्याचे विविध उपक्रम जसे साहित्यवड हा दिवाळी अंक याचा मला भाग होता आले. काही पुस्तकांचे प्रकाशन साहित्यकट्टातर्फे करण्यात आले. साहित्यकट्टा स्थापना दिनी गाण्यांचा सुंदर कार्यक्रम झाला त्यात मी लिहिलेल्या एका विडंबनाला चाल लानून गाण्यात आले. तसेच यावर्षी साहित्यकट्टा आणि मराठी साहित्य परिषद तेलंगणाच्या संयोगाने आशुतोष जावडेकर यांचे लेखन वर्कशॉप मधे भाग घ्यायची सुंदर संधी मिळाली. लेखनाविषयी वेगळा विचार मिळाला. त्यांचा लयपश्चिमा हा एक नितांत सुदंर कार्यक्रम बघण्याचा योग देखील आला. यात मराठीत वेगवेगळ्या पाश्चात्य संगीताचीओळख करुन घेत दोन तास कसे निघून जातात ते कळत नाही.
सायकलींग सुरुच होती यावर्षी राजस्थानचा दौरा केला. साधारण सहा दिवस सायकलींग करायची होती. जोधपूर ते उदयपूर असा साडेपाचशे किमीचा प्रवास होता. जोधपूर, जावई खोरे, कुंभलगड आणि उदयपूर असा प्रवास होता. बराचसा प्रवास हा राजस्थानमधील गावांमधून होता त्यामुळे राजस्थान आणि तिथले गावे जवळून बघता आली. मला तरी राजस्थानमधील हा पट्टा भारतातील कोणत्याही भागापेक्षा फार वेगळा वाटला नाही. उदयपूर आणि जोधपूरचा मेहरानगड हे खाजगी व्यवस्थेतून सांभाळले जातात तर कुंभलगड हे सरकारी आहे आणि फरक दिसतो. संपूर्ण प्रवासाविषयी लवकरच लिहिल.
मला २०२४ कडून काय हवे, खर सांगू एक बऱ्यापैकी लॅपटॉप हवा. ऑफिसचा लॅपटॉप ऑफिसपुरताच झाला आहे खूप बंधने आली आहेत. तर घरचा लॅपटॉप सुरु व्हायला दहा मिनिटे घेतो. कधीकधी सुरुच होत नाही. Writing Down the bones या पुस्तकाच्या लेखिकेने लेखन सुरु करण्याआधीचे साहित्य याची जी यादी दिली आहे त्यात आता लॅपटॉप जोडायला हवा. लॅपटॉपमुळे माझ्या लेखन आळस प्रक्रियेला एक कारण दिले मी लिहित का नाही तर लॅपटॉप चांगला नाही. खरतर तसेही फारसे लिहिले नसते पण आता कारण मिळाले.
या नवीन वर्षात जवळच्या मित्रांची गाठभेट व्हावी, नवीन मित्र मिळावे ही इच्छा तर आहे. २०२३ मधे मी माझ्या एका जुन्या मित्राला साधारण अठरा वर्षानंतर भेटलो. मित्रमैत्रीणींना भेटायची खूप इच्छा आहे, सर्वांचीच असते. यावर्षी ती इच्छा पूर्ण होवो ही प्रार्थना.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! २०२४ उत्तम लिखाणाचे, वाचनाचा, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, मैत्रीचे, प्रेमाचे जावो ही सदिच्छा !!
GIPHY App Key not set. Please check settings